अतिशहाणा त्याचा बैल रिकामा : प्रा. हरी नरके
देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या आदेशाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागल्याने ते नाराज आहेत. राज्यात सत्ता बदल घडवून आणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना हा धक्का का बसला, याचे विश्लेषण केले आहे प्रा. हरि नरके...;
मा.मु.आणि नेते वि.प. श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला आलेली मानहानी ऐतिहासिक आहे. इतका भीषण अपमान महाराष्ट्रात कोणाही नेत्याच्या वाट्याला आला नव्हता.
१) २०१४-१९ मध्ये शिवसेना श्री. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी करीत होती तेव्हा ते पद घटनाबाह्य आहे असे विद्यमान उपमुख्यमंत्री सांगत होते. आज मात्र नियतीने उगवलेला सुड बघा, तेच "गैर संविधानिक" पद मामुंच्या वाट्याला आले आहे.
२)राज्यात आधी मुख्यमंत्री राहून मग मंत्री झालेली काही उदाहरणे असली तरी नाना फडणीस यांच्या नावे असलेला विक्रम/पराक्रम अन्य कुणीही केलेला नाही. कसे ते बघू या.
३) शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे व शिवाजीराव निलंगेकर असे आधी मुख्यमंत्री व नंतर मंत्री जरूर झाले, पण त्यातले कुणीही उपमुख्यमंत्री झाले नव्हते. मंत्री झाले तेव्हा ते किंगमेकरच्या थाटात वावरत नव्हते. दुसऱ्यांचे सरकार यातल्या कुणीही पाडले नव्हते. मुळात यातले कुणीही वेगवेगळ्या पक्षाचे नव्हते. एकाच पक्षात असताना विकासकामे पूर्ण करण्यासाठी मंत्रीपद स्वीकारणे यात असली मानहानी नाही.
४) यातल्या कुणीही मी " पुन्हा येईन" अशा वल्गना / गर्जना केलेल्या नव्हत्या.
५) यातले कुणीही पेशवे कुलीन नव्हते. नाना पेशव्यांचे कारकून होते.पण हे मात्र स्वत:ला थेट पेशवे समजतात.
६) यातल्या कुणाच्याही मागे मुख्यमंत्र्यांना असलेल्या पाठिंब्याच्या आमदार संख्येच्या (शिंदे गट ५० आमदार) अडीचपट संख्येच्या (१२५भाजप व अपक्ष) वेगळ्या पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा नव्हता.
७) सर्वात मोठा फरक म्हणजे यातल्या कुणालाही पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव सुचवून स्वत: कडे उपमुख्यमंत्रीपद घ्यायला लावलेले नव्हते. थोडक्यात थेट मानहानी म्हणून उपपद यातल्या कुणालाही स्वीकारणे भाग पडलेले नव्हते.
८) उपमुख्यमंत्री पद घटनेत नाही. तरीही मामुंनी शपथ घेताना त्या पदाचा उल्लेख करून शपथ घेतली.
९) यातल्या कुणीही राज्यपालांना भेटून आपल्याला पर्यायी सरकार स्थापन करायचे आहे अशी मागणी केलेली नव्हती.
१०) यातले कुणीही आधी नेता वि.प. नी लगेच उपमुख्यमंत्रीपदी आलेले नव्हते.
११) यातल्या कुणीही आधी मध्यरात्री राष्ट्रपती राजवट उठवून भल्या पहाटेच उठून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन बहुमत नसल्याने अत्यंत अपमानास्पद स्थितीत दीड दिवसात मुख्यमंत्रीपद सोडलेले नव्हते.
१०) राज्यपालांनी तर या पदाची प्रतिष्ठा पार धुळीला मिळवलेली आहे. मागच्या वेळी बाळासाहेबांचे नाव घेऊन शपथ घ्यायला विरोध करणारे हेच राज्यपाल काल मात्र मुग गिळून गप्प होते. इतके पक्षपाती राज्यपाल प्रथमच वाट्याला आलेले आहेत
११) देवेंद्र फडणीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार येणार असे सातत्याने ढोल वाजवणारे तोंडावर पडले ना हो.
१२) अडीच वर्षांपूर्वी शिवसेना याच शिंद्यांसाठी मुख्यमंत्रीपद मागत होती. तेव्हा ते नाकारल्यामुळे मविआ सरकार बनले. आता ते पाडून, शिवसेना फोडून, शिवसेना प्रमुखांच्या मुलाला अपमानित करून बनलेले हे सरकार सुरत, गुवाहाटी, गोव्याच्या लाजिरवाण्या पळापळीनंतर बनलेले आहे. असे सरकार या राज्यात यापूर्वी कधीही बनलेले नव्हते.
१३) शिंद्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनापक्ष फोडला, ज्यांनी तो फोडायला लावला त्यांना मी पुन्हा येईन म्हणत मुख्यमंत्री व्हायचे होते, पण आले दिल्लीच्या व नागपूरच्या मना, निमूटपणे दिलेला उप चा तुकडा स्विकारावा लागला. फडणीस, मापात राहायचं बरं, असा दम देण्यासाठी श्री. अमित शहा यांनी त्यांचे केलेले हे खच्चीकरण आहे...