मोदींना भाषण लिहून देणारे आधुनिक मंबाजी कोण? - तुषार गायकवाड

हातातील हातकड्यांच्या चिपळ्या बनवून तुकोबांचे अभंग गायचे असा संदर्भ कुठे‌ आहे? मोदींच्या भाषणात उल्लेख कसा आला? हा दिव्य जावई शोध कोणी लावला?ज्या घटना दस्तुरखुद्द सावरकरांना माहिती नाहीत, त्या केवळ मोदींनाच कशा माहीत असू शकतात? मोदींच्या देहूतील वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे लेखक तुषार गायकवाड यांनी..;

Update: 2022-06-14 11:37 GMT

विनायक दामोदर सावरकर हयात असताना त्यांनी त्यांच्या कारावासातील दिवसांच्या ठळक व विस्तृत नोंदी 'माझी जन्मठेप' या पुस्तकरुपाने सार्वजनिक केलेल्या आहेत. त्याची जनआवृती नानासाहेब गोडसे यांनी काढली. त्याचे सर्व अधिकार हिमानी सावरकर यांच्याकडे आहेत. कोल्हापूरातील नागाळा पार्क येथील रिया पब्लिकेशन्स ने त्याचे प्रकाशन केले असून, कोल्हापूरच्या ज्योतिर्लिंग ऑफसेटने त्याचे मुद्रण केले आहे.

सावरकरांच्या जन्मठेपेच्या तुरुंगवासाची सुरुवात २४ डिसेंबर १९१० रोजी झाली. सावरकरांना सर्वप्रथम डोंगरी येथील तुरुंगामध्ये ठेवले. डोंगरीच्या तुरुंगात मध्ये सावरकरांना आपले पारंपारिक कपडे उतरवून कैद्याचे जाडे-भरडे कपडे देण्यात आले. तुरुंगातील नियमांनुसार प्रत्येक कैद्याला दिवसभरात काहीना काही काम करणे बंधनकारक होते. त्यामुळे सावरकरांना काथ्या कुटण्याचे काम देण्यात आले.

अतिशय नाजूक प्रकृती असलेल्या सावरकरांनी दिवसभर काथ्या कुटल्याने, दिवसाअखेरीस हातातून रक्त निथळू लागे. दिवसभर काथ्या कुटायचे आणि रात्रभर त्या अंधारकोठडीत पडून राहायचे. ना तेथे बोलायला कोणी असायचे, ना वाचायला कोणते पुस्तक मिळायचे. डोंगरीच्या तुरुंगातून सावरकरांना पुढे भायखळा आणि तेथून ठाण्याच्या तुरुंगात नेण्यात आले.

ठाण्याच्या तुरुंगात अंदमानला नेण्याचे सर्व कैदी एकत्र केले जात व तेथून त्यांना पुढे अंदमानसाठी रवाना केले जाई. पुढे सावरकरांना ठाण्याहून मद्रासला रेल्वेने नेण्यात आले. मद्रासवरुन सावरकर ४ जुलै १९११ रोजी अंदमानच्या किनाऱ्यावर पोहोचले. तेथून सावरकरांना अंदमानच्या 'सेल्युलर जेल' कडे नेण्यात आले.

या 'सेल्युलर जेल' चा जेलर अत्यंत क्रूर म्हणून ओळखला जाणारा आंबटशौकीन आयरिश वॉर्डन 'बारी' हा होता. अंदमानात सावरकरांना कोलू फिरवण्यासारखी शिक्षाही झाली. पुढे सावरकरांनी व त्यांचे कुटुंबियांनी ब्रिटीशांना वेळोवेळी माफीनामे दिले आणि एकमेव सावरकर अंदमान मधून भारतात संपूर्ण शिक्षा न भोगता परत आले.

सावरकरांचे चरित्रकार धनजंय किर यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' नावाने चरीत्र लिहिले आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर पुस्तक हे सावरकरांच्या तथाकथित तुफानी, स्फोटक आणि स्फूर्तिदायक जीवनाचे एक असाधारण नि समग्र सर्वांगीण व समतोल असे हे चित्रण आहे.

या पुस्तकाच्या पहिल्या इंग्रजी आवृत्तीच्या हस्तलिखितास सावरकरांच्या अवलोकनाचा अलभ्य लाभ झालेला होता. दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी स्वातंत्र्यवीरांनी महत्त्वाचे मूळ कागदपत्र, पुरावे व पत्रव्यवहार लेखकाला म्हणजे धनंजय किर यांना उपलब्ध करून दिले होते. आवश्यक तिथे सावरकरांनी लेखकाशी चर्चाही केली होती. या पुस्तकातही सावरकर कैदेत असतानाच्या नोंदी स्पष्ट आहेत. सदरील दोन्ही पुस्तके मी वाचलेली आहेत. या दोन्हीही पुस्तकात सावरकर कैदेत असताना हातातील हातकड्यांच्या चिपळ्या बनवून तुकोबांचे अभंग गायचे असा संदर्भ नाही.

हा दिव्य जावईशोध इतिहासचे जेष्ठ विकृतीकरणकार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावलाय. ज्या घटना दस्तुरखुद्द सावरकरांना माहिती नाहीत, त्या केवळ मोदींनाच माहीत असू शकतात. सावरकरांची सर्वात जास्त बदनामी २०१४ नंतर भाजपच्या लोकांनीच केली आहे. सावरकरवाद्यांचे डोळे कधी उघडणार कोणास ठाऊक? बाकी मोदींना भाषण लिहून देणाऱ्या आधुनिक मंबाजी साठी तुकोबांनी पुढीलप्रमाणे ओव्या लिहून ठेवल्यात.

अभक्त ब्राम्हण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥

वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ध्रु.॥

ऐसा हा निवाडा जालासे पुराणीं । नव्हे माझी वाणी पदरींची ॥२॥

तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टि त्या दुर्जना न पडो माझी ॥३॥.

Tags:    

Similar News