कोण आहे भाजपची बी टीम ?
वंचीत बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणून हिणवले गेले. त्याच भाजप बरोबर राष्ट्रवादीने दोस्ताना केला. पक्षाच्या विचारधारा आणि त्यापलिकडे जाऊन केलेल्या अभद्र युत्या पाहता नक्की भाजपची बी टिम कोण असा सवाल उपस्थित होतो. वाचा अशोक कांबळे यांनी केलेले सखोल विश्लेषण…
राज्याच्या राजकारणात अचानक झालेल्या बदलामुळे जनता बुचकळ्यात पडली आहे. निवडून येण्याच्या आधी आणि निवडणूक आल्यानंतर नेत्यांच्या बदललेल्या भाषेमुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती दुसऱ्या बाजूला तर तिसऱ्या बाजूला एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होती. लोकसभेची ही युती विधानसभेला राहिली नाही. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने लोकसभा आणि विधासभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना जोराचा धक्का दिला. या दोन पक्षांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे बरेच उमेदवार पडले. त्याचा भाजपा आणि शिवसेना युतीला फायदा झाला. ज्या वेळेस प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली,तेंव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. परंतु निवडणुकीनंतर मात्र चित्र उलटले. शिवसेना,भाजपा युतीला फोडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. १०५ आमदार निवडून येवून ही भाजपा सत्तेपासून दूर गेला. शरद पवारांनी शिवसेनेला सोबत घेत काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी नावाने सरकार स्थापन केले. सुमारे दोन वर्षे सरकार सुरळीत चालले. परंतु भाजपला सत्ता मिळाली नसल्याचे दुःख सलत होते. त्यासाठी त्यांनी योजना आखण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुरुवातीला त्यांच्या गळाला शिवसेनेतील एकनाथ शिंदे लागले. त्यांच्याबरोबर जवळपास ४० आमदार आले. न्यायालयात वाद पोहचला. तेथे ही शिंदेंच्या बाजूने निकाल आला. चिन्ह आणि पक्ष दोन्ही शिंदे गटाला मिळाले. भाजपा आणि शिंदे गटाचे सत्ता नाट्य बऱ्याच दिवस चालू राहिले. सध्या शिंदे गटावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरोगामी आहे का ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वारंवार फुले,शाहू,आंबेडकर यांचे नाव घेवून राजकारण करत असतात. परंतु नेमके शरद पवार याच्या उलट वागतात,असा आरोप त्यांच्यावर होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजप बरोबर अगोदर पासूनच छुपी युती असल्याचे सांगितले जाते. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला न मागताच पाठींबा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पहाटेच शपथ विधी उरकला होता. याच्या मागेही शरद पवार यांचाच हात असल्याचे सांगितले जाते. ईशान्य भारतात देखील शरद पवारांनी भाजप सरकारला पाठींबा दिला आहे. त्यामुळे शरद पवारांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे,असा घणाघाती आरोप जनतेतून होतोय. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही पुरोगामी असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे जातीयवादी म्हणून आरोप करणाऱ्या भाजपा बरोबर युती करतोय. त्यामुळे राष्ट्रवादीचे राजकारण अवसानघातकी असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस नेत्यांच्या मागे ईडी,सीबीआय यांचा ससेमिरा लागल्याने या दोन्ही पक्षांचे नेते भाजपच्या वळचणीला गेले आहे. अशी चर्चा देखील पहायला मिळते. त्यामुळेच या दोन्ही पक्षांच्या पुरोगामीपणावर देखील प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
काँग्रेसचे काय होणार ?
काँग्रेस पक्ष सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाताना दिसतोय. परंतु काँग्रेस पक्ष ही भाजपा पासून किती दूर राहील हे येत्या काळात स्पष्ट होईल. काँग्रेसच्या नेत्यांवर देखील इडीची टांगती तलवार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. भाजपच्या विरोधात असणाऱ्या पक्षांच्या नेत्याची चौकशी सुरू असताना अचानक त्यानी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर त्यांची चौकशी बंद होते. त्यांच्यावर आरोप करणारे भाजपचे नेते एकदम शांत होताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर आरोप असताना अचानक त्यांच्याबरोबर भाजपा दोस्ती करतोय. ना खाणे दुंगा,ना खाऊंगा असे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर युती करतात. यावरून देखील लोकांत गोंधळ निर्माण झाला आहे. सध्या तरी काँग्रेसचे नेते भाजपच्या गळाला लागताना दिसत नाहीत. परंतु त्यांची आतून छुपी युती असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस ची काय भूमिका असेल याकडे देखील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
कार्यकर्ते,पदाधिकारी गोंधळात
सध्याच्या काळात लोकशाहीच्या नावाखाली नाना प्रकारचे उद्योग सुरू आहेत. सध्याचं राजकारण अत्यंत गलिच्छ झालं आहे. सर्वसामान्य माणूस या राजकारणाला पुरता वैतागला असून एकदम तळागाळातल्या कार्यकर्त्याची अवस्था तर केविलवाणी झाली आहे. वर्षानुवर्षे पक्षाच्या साहेबावर,पक्ष निष्ठा,विचारधारा याला प्रमाण मानून मतदान करणारा मतदार राजा देखील बुचकळ्यात पडलाय. विशिष्ट विचारधारा मानून आपल्या पक्षाला मतदान करणारे मतदार आता त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहताना दिसतात. कार्यकर्ते,मतदार म्हणतात,आम्ही मतदान विकासाठी देतो. परंतु हेच राजकारणी निवडून आल्यानंतर रंग बदण्यास सुरुवात करतात. निवडून आलेले आमदार,खासदार पक्षाला,विचारधारेला बांधील राहत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कोंडी होते. त्यामुळे या राजकारण्यांवर विश्वास नाही ठेवलेला बरा,असे मतदार आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटते. एकेकाळी कंगाल असलेले नेते आज हजार कोटींचे मालक झालेत,मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता रस्त्यावर आला आहे. त्याच्या जगण्या मरण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. त्याच्या प्रश्नाकडे संबधित पक्षाच्या नेत्याचे लक्ष नाही. आताच्या काळात नेते तुपाशी आहेत तर कार्यकर्ते उपाशी आहेत.
राजकारणाची बदलली दिशा
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्याने राजकारणाची अचानक दिशा बदलली आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील गटा - तटात विभागले गेलेत. त्यामुळे येत्या काळात या गटा - तटात शीतयुद्ध देखील पहायला मिळणार आहे. शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंना जनतेची सहानभुती मिळत आहे. शिवसेनेचा पारंपारिक मतदार आणखीन ही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असल्याचे दिसून येतो. पण याचे चित्र येत्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहेत. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांच्या मागे वयोवृध्द कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. तर पक्षाचे बरेच आमदार आणि तरुण नेते हे अजित पवाराबरोबर गेले आहेत. म्हणून येणाऱ्या काळात राजकारण कोणत्या दिशेने जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.