शिवसेना कोणाची? रवींद्र पोखरकर

महाराष्ट्रात घडलेल्या मोठ्या सत्ता नाट्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. अडीच वर्षात महाराष्ट्राला काय मिळाले? शिवसेना फुटल्याचा फायदा कोणाला? प्रबोधनकारांच्या शिवसेनेचे खरे वारसदार कोण हे पत्र लिहून सांगितले आहे लेखक रवींद्र पोखरकर यांनी..;

Update: 2022-07-07 11:17 GMT

मा.उद्धवजी ठाकरे

यांस,

ज्या पद्धतीने आपणास मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं त्याबद्दल बहुसंख्य मराठी माणसांच्या आणि राज्यातील अन्य समाजातीलही सुजाण नागरिकांच्या मनात हळहळ आणि सहानुभूती आहे. आपणास मिळालेल्या अडीच वर्षांच्या काळातील दोन वर्षे तर करोनाचा सामना करण्यातच गेली.ते कमी म्हणून की काय अनेक नैसर्गिक आपत्ती,तुमचे ऑपरेशन ही संकटंही जोडीने उभी ठाकली.परंतु या सगळ्या प्रतिकूल परिस्थीतूनही तुम्ही राज्याला योग्य पद्धतीने सावरलं हे वास्तव या राज्यातील कोणीही सुजाण माणूस अमान्य करणार नाही. करोनाकाळात गुजराथमध्ये अनेक स्मशानात प्रेतं जाळता जाळता स्मशानाच्या चिमण्या उष्णतेने वितळल्या तर युपी, बिहारमध्ये गंगेत हजारो प्रेतं तरंगली. महाराष्ट्रातही त्या काळात कठीण परिस्थिती असली तरी तुम्ही आणि तुमच्या राजेश टोपेंसारख्या सहकाऱ्यांनी ती गुजराथ किंवा युपी,बिहारसारखी भीषण होऊ दिली नाही.याच काळात जातीय,धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काही पक्षांचे आणि काही लोकांचे मानसुबेही आपण उधळून लावले.राज्यात अडीच वर्षात कोणतीही जातीय,धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची काळजी घेतलीत.सर्व जातीय,धर्मीय लोकांना तुमच्याविषयी ममत्व वाटावं अशा प्रकारची तुमची कारकीर्द राहिली.

केंद्राची सापत्नभावाची वागणूक असूनही आर्थिक आघाडीवरही राज्याची अति धूळधाण झाली नाही.आता आपणाला सोडून गेलेली आमदार मंडळी आणि पदाधिकारी त्यांच्या कृतीचं समर्थन करण्यासाठी तुमच्यावर रोज वेगवेगळे आरोप करताना दिसताहेत.खरंतर त्यांनी त्यांचा मार्ग शोधल्यावर तुम्हाला बदनाम किंवा अवमानित करण्याची काहीच आवश्यकता नाही.पण मतदार संघातील लोकांना सामोरं जाताना आणि आपल्या कृत्याचं समर्थन करताना सांगायला काहीतरी हवं म्हणून हे तुमच्यावर आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांवर आरोप.. जनतेला हे सर्व कळतंय. असो..

मला आपणास सांगायचंय ते वेगळंच आहे.मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा हाती घेतल्यापासूनचा आपला सगळा प्रवास हा मला काही प्रमाणात आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची आठवण देणारा वाटला.मी हे आज नाही तर यापूर्वीही लिहिलेलं आहे. हिंदुत्वाचा अभिमान जरूर बाळगा पण त्यासाठी अन्य धर्मियांचा दुस्वास कशासाठी हा प्रबोधनकारांचा प्रश्न असायचा आणि अर्थातच तोच छत्रपती शिवाजी महाराजांचाही विचार होता.प्रबोधनकारांचे हिंदुत्व हे सर्वसमावेशक,सुसंस्कृत,सौजन्यशील होते. जातीपातीतील मतभेद,अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती.बालविवाह,हुंड्यासारख्या अनेक कुप्रथांना त्यांनी कडाडून विरोध केला.हिंदूंसह सर्वच धर्मातील कर्मकांडांच्या दलदलीवर आणि बुवा बाबांच्या भोंदूगिरीवर त्यांनी परखड कोरडे ओढलेत. आणखीही खूप काही सांगण्यासारखं आहे.

महाराष्ट्र त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालला तर प्रगतीच्या दिशेने जोमाने वाटचाल करेल एवढी ताकद प्रबोधनकारांच्या विचारांमध्ये आहे.अर्थात हे सगळं मी कशाला आपणास सांगतोय ? आपणास हे सगळं माहितीच आहे.भाजपचे जे विकृत,आगलावे हिंदुत्व आहे त्याचा आणि प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचा कणभरही संबंध नाही.बरं..भाजपने सावरकरांचा हिंदुत्ववाद स्वीकारलाय म्हणावा तर तसंही अजिबातच नाही.सावरकरांचे सुधारणावादी, विज्ञानवादी,वेद-पुराणांविषयीचे विचार भाजपवाले खुंटीला टांगून ठेवतात.हिंदुत्वाची जी सर्वसमावेशक व्याख्या किंवा व्यापक विचार प्रबोधनकारांचे आहेत त्यापेक्षा सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार खूपच भिन्न आणि संकुचित स्वरूपाचे आहेत आणि भाजपचे हिंदुत्व तर या दोन्हींपेक्षाही प्रचंड भिन्न आणि विकृत आहे.

उद्धवजी,सुदैवाने म्हणा किंवा प्रबोधनाची पेरणी असल्यामुळे म्हणा पण या राज्यात अजूनही सुधारणावादी,पुरोगामी विचारांचा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे.यापुढील काळात तुम्ही बाकीच्यांचे विचार बाजूला सारून केवळ प्रबोधनकारांच्या मार्गावरून निर्धाराने चालण्याचा प्रयत्न कराल तरीही पुढे जाल.थोडे भाजपचे हिंदुत्व,थोडे सावरकरांचे हिंदुत्व,थोडे बाळासाहेबांचे हिंदुत्व अशा सगळ्या दगडांवर पाय ठेवण्यापेक्षा आपल्या आजोबांनी दाखवलेल्या आचार-विचारांच्या दिशेने मार्गक्रमण करा.तुमच्यात,आदित्यमध्ये आधीच ते आहे.मनातील संभ्रम मिटवा आणि ठोस दिशा ठरवा.मोदी-शहा यांचे तकलादू,ढोंगी राजकारण,परदेशात एक बोलणं आणि इथे वेगळंच करणं,वाढती महागाई,वाढती बेरोजगारी,धर्मांधता,सगळ्या राजकीय पक्षांना संपवण्याची अघोरी महत्वकांक्षा,अन्य पक्षाच्या आमदारांना साम-दाम-दंड-भेद याद्वारे फोडून राज्य सरकारे कोसळवून टाकणे,केंद्रीय संस्थांचा प्रचंड दुरुपयोग हे सगळंच आता काहीशा उशिराने का होईना परंतु जनतेला विचलित करू लागलंय.आपण मतदान करताना चुकलोय याची कबुली अनेक लोक आता देऊ लागलेत.दडपशाही लोकांना जाणवू लागलीय.

आणि म्हणूनच अशा या भाजपच्या वळचणीला जाऊन बसलेल्या तुमच्या आमदारांकडे दुर्लक्ष करा.संघटनेला पुन्हा जिद्दीने पुढे नेण्याचा निर्धार तर तुम्ही केला आहेच.तुमचे प्रयत्नही तसे दिसू लागलेत. प्रबोधनकारांच्या मार्गाने चला.काँग्रेस-राष्ट्रवादीनेही उद्या साथ सोडली तरी हतबल होऊ नका.थोडा त्रास होईल पण अंतिमतः तुम्ही यशस्वी व्हाल.त्या आमदारांना सोडा,या राज्यातील लक्षावधी सर्वसामान्य जनता आणि शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत.मराठी अस्मिता,महाराष्ट्र,मराठी माणसाच्या हाताला काम आणि पोटाला अन्न यावर फोकस करतानाच अन्य जाती-धर्माच्याही सगळ्यांना सोबत घेऊन चालणं तुम्हाला यश देईल.या देशातील अन्य अनेक राज्यांमध्ये शिवसेनेच्या स्थापनेनंतर अस्तित्वात आलेल्या काही प्रादेशिक पक्षांनी एकहाती आपापल्या राज्यांमध्ये सत्ता प्राप्त केली. शिवसेना आपल्या मूळ उद्देशांपासून भरकटत भाजपच्या आहारी गेली आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं.युतीत पंचवीस वर्षे सडली हे तुमचं निरीक्षण अगदी योग्यच आहे.जाऊद्या ते सगळं.. देश,हिंदुत्व वगैरे थोडं बाजूला सारा..महाराष्ट्रावर फोकस करा..भविष्यकाळ तुमचा आहे..विश्वास ठेवा..

धन्यवाद..
आपला एक हितचिंतक
रवींद्र पोखरकर

Tags:    

Similar News