#Governorgoback मुंबई (फक्त) मराठी माणसांची होती का कधी?

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा मराठी अस्मिता जागृत झाली आहे. मुंबईचा इतिहास काय? मुंबई नेमकी कोणाची? मुंबईचे मराठी कनेक्शन कसे? बहुपेडी आणि गुंतागुंतीच्या मुंबईच्या कॅरेक्टरची मिमांसा केली आहे पत्रकार सुकृत करंदीकर यांनी..

Update: 2022-07-31 03:42 GMT

सन १९६० पासून मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. त्या आधीपासून ती देशाचं भूषण आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. राजीव गांधी यांचा जन्म या मुंबईत झाला. अमित शहा यांचा जन्मही याच मुंबईतला आहे. स. का. पाटील, नवल टाटा या पक्क्या मुंबईकर दिग्गजांना पराभूत करून जॉर्ज फर्नांडीस या कानडी माणसाला दक्षिण मुंबईतून देशाच्या संसदेत निवडून पाठवणारी मुंबईच होती. मध्य प्रदेशातील महू येथे जन्म झालेल्या, आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त विद्वान बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करणारी देखील मुंबईच आहे.

मुंबईचं कॅरेक्टर बहुपेडी आणि गुंतागुतीचं आहे. या पार्श्वभूमीवर प्रश्न पडतो मुंबई (फक्त) मराठी माणसांची होती का कधी?

"मराठी माणूस फेकला गेला

महाराष्ट्राला अवकळा आली

पाहता पाहता मुंबईची

पंचवीस वर्षात 'बम्बई' झाली

आणखीन पंचवीस वर्षांनंतर

मुंबईत मराठी माणूस नसेल

गिरगावातील शिलालेखावर

फक्त पुढील मजकूर असेल –

'इस स्थानपर बम्बई का अंतिम मराठा

बटाटावडा खाते खाते

अल्ला को प्यारा हुआ!'

जय बम्बई !

जय इंडिया माता !!"

--------------------

रामदास फुटाणे यांची ही भाष्यकविता आहे. मुंबईतून मराठी माणूस फेकला जाणार असल्याचं भाकीत त्यांनी १९८५ मध्ये वर्तवलं होतं.

मुंबई महाराष्ट्राची आहे, हे प्रशासकीयदृष्ट्या खरेच आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. परंतु, ही एकच बाब मुंबईवर मराठी माणसांचा अधिकार प्रस्थापित करण्यासाठी पुरेशी आहे का?




 

१०५ मराठी माणसांच्या बलिदानामुळं मुंबई महाराष्ट्रात राहिली.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, गोवा मुक्ती संग्रामात, सीमा आंदोलनात, मुंबईचं अपार योगदान राहिलं आहे. ब्रिटीश आमदानीपासूनचा आर्थिक राजधानीचा लौकिक या शहरानं स्वातंत्र्यानंतरही कायम राखलाय.

पण खरंच मुंबई ही फक्त मराठी माणसांची आहे?

मुळात ती तशी कधी होतीच का ?

भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राला जवळ म्हणून मुंबईवर मराठीपणाचा शिक्का मारावा का? असे प्रश्न उपस्थित करणं देखील आज महाराष्ट्रद्रोह मानला जाईल. हरकत नाही. भावना थोड्या बाजूला ठेऊन चर्चा व्हायला हवी.

१५३० च्या सुमारास पोर्तुगिजांनी मुंबई ताब्यात घेतली तेव्हा मुंबई हे शहरच काय पण छोटं गावसुद्धा नव्हतं. लहानमोठ्या मिळून चारशे उंबऱ्यांच्या आत राहणाऱ्या दहा हजारांपेक्षाही कमी लोकांची ही वस्ती होती. दहाव्या शतकापर्यंत मुंबई बेटांचा इतिहास धुंडाळता येतो. इथं तगून राहिलेल्या थोडक्या मंडळींमध्ये प्रामुख्यानं भंडारी, कोळी, पळशे जोशी, परभू, पांचकळशे-वाडवळ-सुतार या समुद्राच्या संगतीनं जगणारे आणि त्यानंतर मुसलमान, पोर्तुगिज, इंग्रंज हे आक्रमक प्रामुख्यानं दिसतात. या सर्वांची मातृभाषा फक्त मराठी नव्हती. मुंबईचं भौगोलिक स्थान व्यापारी बंदर म्हणून उपयोगाचं असल्याचं इंग्रजांनी आधी ताडलं. कलकत्त्यापेक्षा मुंबई बेटांवरुन पश्चिमेशी व्यापार करणं अधिक फायद्याचं ठरु शकतं हे उमजल्यानंतर इंग्रज या बेटांकडं गांभीर्यानं पाहू लागले. पोर्तुगिजांकडून मुंबई बेटं विकत घेण्याचा प्रयत्न इंग्रजांनी करुन पाहिला. यश आलं नाही. पण नंतर फुकटातच काम झालं. इंग्लंडचा दुसरा राजा चार्लस् यानं पोर्तुगालच्या राजकन्येशी सोयरीक जुळवली आणि आंदण म्हणून मुंबई बेटं आयती इंग्लंडच्या पदरात पडली. ही घटना १६६१ मधली. हे शालेय अभ्यासक्रमातच वाचलं. मुंबईच्या उत्कर्षाची ही नांदी होती.




 


सन १६६१ मध्ये इंग्लंडच्या राजानं वर्षाला शंभर सुवर्ण नाण्यांच्या बदल्यात मुंबईची बेटं ईस्ट इंडिया कंपनीकडं सोपवली. ऐतिहासीक नोंदी असं सांगतात, की मुंबई बेटं कंपनीच्या ताब्यात आली तेव्हा इथली सगळी सरकारी-खासगी मालमत्ता, घरेदारे वगैरे मिळून एकूण जिंदगानी २८ हजार ३४० रुपयांची होती. पुढच्या दोनशे वर्षात सन १८६१ मध्ये मुंबईच्या जमादारखान्यातली फक्त रोकड थेट ३ कोटी १२ लाख ५५ हजार लाख रुपयांवर पोचली. त्याचवर्षीच्या संपूर्ण हिंदुस्थानाच्या जमादारखान्यातली रोकड सव्वाचौदा कोटी रुपये होती. मुंबईचं आर्थिक वर्चस्व तेव्हापासूनचं आहे. एकूणात काय तर इंग्रज राजवटीत मुंबईची भरभराट झाली हे वास्तव आहे.

दहाव्या शतकाच्या आगे-मागे माणसाचं वस्तीस्थान झालेली मुंबई बेटं इंग्रज येईपर्यंत आकर्षणाचं केंद्र बनली नव्हती. मराठ्यांची घोडी अगदी अटकेपार जाऊन आली पण इकडे वसईच्यापुढे गेली नाहीत, हा दाखलासुद्धा इथे महत्वाचा ठरावा. इंग्रजांनी मुंबई वसवली. १६६१ नंतरच्या पुढच्या दोनशे वर्षांत इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेल्या मुंबईत हिंदूंच्या (म्हणजे फक्त महाराष्ट्रातल्या नव्हेत) सुमारे शे-दीडशे जाती मुंबईत स्थिरावल्या. वानगीदाखल सांगायचे तर मराठी-दक्षिणी-गुजराथी-मारवाडी यांच्यातल्या पंचवीस-तीस ब्राह्मण जाती, प्रभु-शेणवी-शिंपी-कोळी-भांडारी-पांचकळशे-सोनार, सुतार, लोहार, कासार, वाणी, भाट्ये, साळी, माळी आदींच्यातल्या अनेक जाती शिवाय देशभरातल्या कामाठी, कानडी, कोंगाडी, तेलंगी, पुरभय्ये, बंगाली, पंजाबी, लिंगायत, मांग, महार, चांभारांच्या जाती मुंबईत आल्या. जोडीनं पोर्तुगिज, इंग्रज हे राज्यकर्ते होतेच. त्यांच्याशी सलगी राखणारे फ्रेंच, तुर्की, जर्मन, चिनी आदी परकीयांची सोळाव्या शतकापासून मुंबईत ये-जा सुरु झाली. सध्याच्या पाकिस्तानपासून इराण-इराकपर्यंतचे मुसलमान, अफगाणी, बोहरी, पारशी, ज्यु, खोजे, अरब, बगदादी यांनीही मुंबई जवळची केली. थोडक्यात इथले मूळस्थायिक कोळी असले तरी मुंबईचा वैभवी प्रवास 'कॉस्मोपॉलिटीन' संस्कृतीसोबतच बहरत गेला. सन १८५० मधली मुंबईची लोकसंख्या अशी होती –

हिंदू – २ लाख ९५ हजार ९३१

जैन – १ हजार ९०२

मुसलमान – १ लाख २४ हजार १५५

पारशी – १ लाख १४ हजार ६९८

यहुदी – १ हजार १७२

मिश्र पोर्तुगिज आणि किरिस्तांव – ७ हजार ४५६

एत्तदेशीय इंग्रज – १ हजार ३३३

एत्तदेशीय पोर्तुगिज – ५ हजार ४१७

अस्सल इंग्रज – ५ हजार ८८

सिद्दी – ८८९

संकर जातीचे लोक – ७ हजार ११८

मुंबई ही फक्त मराठी माणसांची नव्हती, हे या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं. एवढंच काय तर १८५७ सालातलं इंग्रजांविरुद्धचं मोठं बंड सुरु झालं तेव्हा याच मुंबईतल्या सर्व जातीच्या लोकांनी आपापल्या धर्मस्थळांमध्ये दिवसातून तीनदा इंग्रजांच्या विजयासाठी प्रार्थना केल्या होत्या. १८५७ चं बंड इंग्रजांनी मोडून काढल्यानंतर मुंबईतल्या शेठ-सावकारांनी कामगारांना सुट्टी दिली. त्यावेळच्या मुंबईकरांनी जागोजागी व धर्मस्थळी जमून इंग्रजी सत्ता चिरकालीन राहण्यासाठी ईश्वराच्या प्रार्थनाही केल्या. याचा अर्थ एवढाच की इंग्रजांमुळे आजची मुंबई आहे आणि इंग्रजच निर्माते, कर्ते-धर्ते आहेत, हे तत्कालीन मुंबईकरांनी मनापासून मानलं होतं. मराठी, गुजराथी, उर्दू, फारशी, अरबी, इंग्रजी, पोर्तुगिज आणि इतर भाषा शिकवणाऱ्या शाळांची संख्या मुंबई बेटांवर तब्बल ३५० होती. निरनिराळ्या भाषांमधल्या पुस्तकांची चाळीस ग्रंथालयं इथं होती. हे सगळं आहे अठराव्या शतकातलं.

इंग्रजांनी वसवलेल्या आणि वाढवलेल्या मुंबापुरीत मुंबादेवी-काळबादेवी-वाळकेश्वर ही पुरातन हिंदू देवस्थानं जपली गेली. जोडीनं ख्रिश्चनांची चर्च उभी राहिली. पोर्तुगिजांची प्रार्थनास्थळ, पारश्यांच्या अग्याऱ्या, मुसलमानांच्या मशिदी, ज्यु लोकांचे सिनेगॉग अनेक पंथांचे मठ, पीर आदी इथं नांदत आले. दिवाळी-पाडवा, गौरी, गोकुळअष्टमी, बकरी ईद, शिराळशेट, गणेश चतुर्थी, ख्रिसमस, मोहरम, यात्रा-जत्रा-उरुस सगळं ज्यांनी-त्यांनी उत्साहात चालू ठेवलं. इंग्रजांच्या राजवटीत मुंबईला सुरक्षितता मिळाली. व्यापार-उदीमाला चालना देणारी धोरणं त्यांनी आखल्यानं देशोदेशीचे व्यापारी इथं येऊ लागले. या व्यापारी पेढ्यांवर काम करण्यासाठी लिहीणारे, वाचणारे, हिशोब करणारे, बंदरावरच्या गोद्यांमध्ये काम करणारे, जहाजांवरचे खलाशी, कारागीर, कलाकार, दुकानदार अशा नाना हुनरबाज, सांगकाम्यांची गर्दी मुंबईत वाढत गेली. 'मुंबई कोणाला उपाशी झोपू देत नाही', हा लौकिक आजचा नाही. व्यापारी वृत्तीच्या इंग्रजांमुळे सोळाव्या-सतराव्या शतकातच मुंबईची ही प्रसिद्धी देशभर झाली. मद्रास, कलकत्ता, दिल्ली, हैद्राबाद आदी शहरांच्या नशिबी हे भाग्य आलं नाही. मुंबईच्या या प्रगतीस मराठी मंडळींचे कर्तुत्त्व नक्कीच कारणीभूत आहे. पण तशीच कर्तबगारी इथं स्थिरावलेल्या इतर प्रांतातल्या लोकांनीही सतराव्या शतकापासून गाजवलीय.

पुणं, सातारा, कोल्हापुर, नाशिक, रत्नागिरी, नगर, जळगाव, बीड, लातूर, जालना यासारखी गावं-शहरं अगदी मराठी म्हणावीत अशी आहेत. अगदी बडोदा, इंदौर, ग्वाल्हेर ही मध्यप्रदेशातली शहरंसुद्धा 'मराठी' म्हणावीत अशी होती. अलिकडच्या काही वर्षात या शहरांची मराठी ओळख पुसट होत चालली असली तरी मराठी शिक्का अजून कायम आहे. पण मुंबईवर असा निव्वळ मराठीपणाचा शिक्का होताच कधी? भारत स्वतंत्र होऊन महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईपर्यंत मुंबईवर केवळ मराठी माणसांची राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सत्ता होती असं म्हणणं धाडसाचं ठरेल.

तरी मुंबई मराठी माणसांची अस्मिता का बनली? कोणी बनवली? याची उत्तरं गेल्या साठ-सत्तर वर्षात सापडावीत. अर्थातच ती राजकीय आहेत. मुंबईसह महाराष्ट्र, १०५ हुतात्मे, मुंबईतल्या आर्थिक-व्यापारी-उद्योग जगतावर अंकुश ठेवण्यासाठी इथल्या सत्ताधाऱ्यांनी तेवत ठेवलेला भूमिपुत्रांचा मुद्दा, दिल्लीतल्या सत्ताधीशांना कह्यात ठेवण्यासाठी प्रारंभीच्या काळात बळ देण्यात आलेले बाळासाहेब ठाकरेंचे नेतृत्त्व आणि त्यांची शिवसेना यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख करावा लागेल. उत्तर प्रदेश, बिहार मागासलेला राहिला म्हणून तिथले लोक मुंबईत येऊन गर्दी करतात हे खरं असेल तर कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात संधी मिळत नसल्यानं मराठी माणसं मुंबईची वाट धरतात हेही खरं मानावं लागेल. मला इतकंच म्हणायंच आहे, की मुंबई जितकी महाराष्ट्राची तितकीच देशाची. खोट्या अस्मितेचा मुद्दा पुढं करुन मुंबईतल्या निवडणुका लढल्या जाऊ नयेत. मुंबईच्या प्रगतीच्या-विकासाच्या मुद्द्यांवरच मतं मागितली जावीत. चुकतंय का काही?

@सुकृत करंदीकर

११ फेब्रुवारी २०१७,

मुंबई

ताजा कलम : मुंबई फक्त मराठी माणसांची कधीच नव्हती, पण तिच्या आजवरच्या जडणघडणीतलं मराठी माणसांचं योगदान वगळता येत नाही. तसं केलं तर आजची मुंबई दिसली नसती. दिसणार नाही. म्हणूनच महाराष्ट्राच्या राज्यपालांनी २९ जुलै २०२२ रोजी मुंबईबाबत केलेलं वक्तव्य 'मराठी' माणूस म्हणून मला अवमानास्पद वाटतं. राज्यपाल पदाचा आणि कोश्यारी यांच्या वयाचा पूर्ण आदर राखून त्यांचा कमाल निषेध.

@सुकृत करंदीकर

३० जुलै २०२२,

मुंबई.

Tags:    

Similar News