जॅक मा गायब होण्याची कारण काय?

चीन चे उद्योगपती जॅक मा (Jack Ma) गायब असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, जॅक मा गायब होण्याचं नक्की कारण काय? वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचं विश्लेषण;

Update: 2021-01-08 04:43 GMT

चीनच्या नवउद्यमींचे आयकॉन जॅक मा... त्यांच्या अलीबाबा ग्रुपची "अँट" ANT ही एक महत्वाची फिनटेक कंपनी. तुफान वेगाने वाढलेली; ANT चा जगातील भांडवली बाजारातील सर्वात मोठा ठरणारा आयपीओ ऑक्टोबर मध्ये येणार होता. अगदी एक दिवस आधी तो रद्द करण्यास चीनच्या शासकीय संस्थांनी भाग पाडले. त्यानंतर जॅक मा सार्वजनिक व्यासपीठांवर दिसलेले नाहीत. असे रिपोर्ट्स आहेत.

दोन कारणे संभवतात...  एक झी जिनपिंग यांच्या वाढत्या राक्षसी एककल्ली महत्वाकांक्षा; राजवट नावाला चिनी कम्युनिस्ट पक्षाची असली तरी दिसतंय असे की ती एका व्यक्तीच्या हातात एकवटत चालली आहे.

अगदी अलीकडेपर्यंत चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी एक व्यक्ती जास्तीतजास्त ५ वर्षाच्या दोन टर्म्स राहू शकत होती. जिनपिंग यांनी ती घटनात्मक तरतूद रद्द करायला लावली. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या ते कितीही काळ चीनचे सर्वेसर्वा राहू शकतात. ते फक्त आता साठीत आहेत.

भविष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचे आव्हान ठरू शकेल असं राजकारण, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तीचे पंख छाटायचे, नाहीच ऐकले तर कायमचे नष्ठ करायचं. ही जिनपिंग यांची स्टाईल होत चालली आहे. जॅक माला चाप लावायचा निर्णय जिनपिंग यांच्या इशाऱ्यावर झालेला आहे हे उघड गुपित आहे. दुसरे कारण आहे महाकाय डाटा कोणाच्या हातात असणारा याच्या रस्सीखेचीचे. रिटेल इ कॉमर्स, ऑनलाईन कर्ज अशा क्षेत्रात असल्यामुळे अलीबाबा ग्रुपकडे चीनच्या कोट्यवधी नागरिकांचा डाटा संचित झाला आहे, होत आहे.

सर्वंकष राज्यकर्त्यांना आपल्या नागरिकांना मुठीत ठेवण्यासाठी त्यांची इथंभूत माहिती हवी असते. अलीबाबा /ANT ने ती शेअर करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना सरळ करण्यात आले असे सांगितले जाते. भांडवलशाही विरुद्ध कम्युनिझम, अमेरिका विरुद्ध चीन अशा बायनरीमध्ये सार्वजनिक चर्चा होत असतात; चीनमधील भांडवलशाही खूप गुंतागुंतीची आहे हे नक्की.

Tags:    

Similar News