अमीर खान आणि किरणचा घटस्फोट आणि आपण...

अमीर खान आणि किरण यांच्या म्युच्यूअल घटस्फोटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. अमीर आणि किरण यांच्या घटस्फोटाला कोणी म्युच्यूअल तर कोणी मॅच्यूअर फारकत म्हणत आहे. या निमित्ताने घटस्फोटा च्या वेगवेगळ्या कारणांचा आणि नवनवीन कंगोऱ्यांवर समाजाचा बुरसटलेला विचार फाडतं नव्या विचारांचा धागा हाती देणारा धम्मसंगिनी रमागोरख यांचा लेख नक्की वाचा...

Update: 2021-07-09 03:08 GMT

सहमतीच्या फारकती/प्रगल्भ घटस्फोट म्हणजे काय? लग्नव्यवस्था किती तकलादू बिंदूवर उभीय, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तेव्हा लग्नव्यवस्थेला धक्के बसल्यानंतर हळवं, चितांतूर होण्यात अर्थ नाही.

एखाद्या नात्यात गैरबराबरी, शोषण, हिंसा, दुय्यमत्व आहे. म्हणून ते तोडण्यातली रास्तत: सहज पटते. पण हे काहीही नसताना एकमेकांच्या सहमतीने, नव्या वळणावर उभे राहात ज्या फारकती होतात. त्याला 'म्यूच्युअल फारकती' वा 'प्रगल्भ फारकती' म्हणण्याची चाल आहे. मला जाम रस वाटतोय. हे समजून घेण्यात की, खरंच दोन जोडीदार लोकं एकदम-एकावेळी सहमतीच्या, प्रगल्भतेच्या बिंदूवर कसे काय येतात बरं? का हे लोकांना सांगण्यासाठी असतं? की, 'आम्ही प्रगल्भ घटस्फ़ोट घेतलाय, भांडण-तंडण काय नाही!' असो.

फारकतीनंतर कोणाला किती पर्याय उपलब्ध असतात?

हे लिंग, वर्ग, दिसणं, बौध्दिक क्षमता, कमाईचं व माणसं पटवण्याचं कौशल्य आणि तुमचा एकूण पब्लिक लाईफमधील वावर यावर अवलंबून असते. काही वेळा आर्थिकदृष्ट्या सुदृढ असूनही इतर बाबतीत कमजोर असलेल्या व्यक्ती नवे पर्याय शोधण्यात मार खातात.

'मिच्युअल घटस्फ़ोट', 'मॅच्यूअर घटस्फ़ोट' ही भानगड फार केविलवाणी आहे! यात आर्थिक, सामाजिक वा भावनिकदृष्ट्या डिपेन्डन्ट जोडीदाराला मिच्युअल वा मॅच्यूर बनणण्याशिवाय दुसरा काय पर्याय तरी असतो का?

ज्याने कुणी 'चांगला/नवा/ अधिक सर्जनशील पर्याय सापडल्याने' पुढाकार घेऊन फारकतीची बाजू पटवून देणे सुरू केलेले असते, त्याच्याशी कोण प्रतिवाद करू शकेल?

म्हणजे 'घटस्फ़ोट दोघांच्या हिताचा आहे', 'आता एकमेकांचा साचलेपणा सहन करण्यात काय अर्थय?'



 

हे कुणीतरी एकजण दुसऱ्याला पटवून देण्यात वा सहमत करण्यात यशस्वी होतो.

'प्रवाही', 'अखंड नव्या' जोडणाराला कोण थांबवू शकतं?

शिळे/जुने/साचलेले जोडीदार तर नाहीच नाही!

'अर्थहीन' लग्न मरेपर्यंत टिकवण्याचा' आग्रह जसा बुरसटलेला, तसंच आपल्याकडे असलेल्या 'जमेच्या बाजूंच्या जोरावर नव्या जोडीदाराचा सतत शोध घेणं' हे ही बुरसटलेलंच. कारण ज्यांना नवं, वाहतं, सर्जनशील राहण्याचे प्रिव्हिलेजस् आहेत, ते नेहमीच वरचढ ठरणार, आणि कुणीतरी बाधित होणार!

(या 'कुणीतरी'मध्ये स्त्रियांची ससेहोलपट मोठ्या प्रमाणात होते.)

सतत नवं, वाहतं, सर्जनशील राहण्याचे पर्याय कुणाला उपलब्ध आहेत? हा खरा प्रश्न आहे.

बरं ज्यांना सतत नवं, वाहतं, सर्जनशील राहण्याच्या क्षमता आणि पर्याय आहेत, त्यांनी रहावं बापडं वाहतं!.... पण त्यात किती लोकांना बुडवत स्वतः वाहातं राहणार? कुठेतरी टिंब द्यावं ना! या 'लग्नसंबंधाच्या' अखंड प्रवाहीपणात/ वाहतेपणात लय मोठा तीर मारतात काय हे लोकं? सामाजिक बंध धुडकावण्याच्या आडपद्यात हे उच्चभ्रू, चंगळवादी स्तोम कुरवाळण्यात बरेच धोके आहेत. आपल्या फारकतींना म्यूच्यूअल /मॅच्यूअर फारकती म्हणत पब्लिकली उच्चभ्रू जोडपी बरीच चांगली अॅक्टींग वठवत असली, तरी कुणा एकाचे 'कडूझार पडलेले तोंड' पब्लिकच्या नजरेतून सुटतं होय?!




 


जौदे मरू दे, हे 'वहाते लोकं' कधीतरी बुडते होतात आणि 'बुडते लोकं' कधीतरी वहाते होतात...... हे फारकतीचं राजकारणच फार गुंतागुंतीचं आहे. साचलेपणाला भेदण्याच्या, प्रवाही राहण्याच्या ईच्छेला प्राधान्यक्रम देणे. व्यक्तीवादाचा अवकाश उपलब्ध असलेल्यांना शक्य आहे. पण त्या अवकाशात व्यक्तीवादाचा फायदा सर्वांना (लिंगजातवर्ग वा कोणतीही सामाजिक लोकेशन घ्या) बरोबरीने घेता येतो का?

ही प्रवाही, वाहतं रहाण्याची प्रक्रिया खरोखरीच मुक्तीदायी व्हायची असेल, तर या प्रवासात हितसंबंधांना, तृष्णेला बरोबर ओळखता यायला हवं. प्रवाहीपणा वा साचलेपणा कुणात? का येतो? याला नीटपणे भीडता आलं पाहिजे. 'प्रवाहीपणा' वा 'साचलेपणा' ही बाब केवळ व्यक्तीगत नाही, तर सामाजिक आहे. साचलेपणाची ढाल पुढे करत, आपण आपल्यालाच फसवणं फार वेदनादायी.

धम्मसंगिनी रमागोरख

Tags:    

Similar News