महात्मा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म !
महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला एक पर्यायी धर्म देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याची मांडणी एका पुस्तकातून त्यांनी केली होती. यामागची त्यांची भूमिका काय होती, त्या पुस्तकात त्यांनी नेमके काय मांडले आहे, याचे विश्लेषण करणारा सुनील सांगळे यांचा लेख महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमीत्त पुनःप्रसारित करीत आहोत.;
साधारणपणे असे म्हणता येईल की क्रांतिकारांचे दोन वर्ग असू शकतात. एक म्हणजे जे प्रस्थापित अन्याय्य व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठतात आणि तिचा विध्वंस करू इच्छितात, परंतु त्याच्यापुढे जाऊन जुन्या व्यवस्थेच्या जागी कोणती नवी व्यवस्था आणावी याचा त्यांच्याकडे आराखडा नसतो. दुसरे क्रांतिकारक असे असतात की ज्यांच्याकडे अशी दृष्टी असते आणि त्यामुळे ते क्रांतीतून विधायक गोष्टी निर्माण करू शकतात. महात्मा फुले हे तरुण वयात तत्कालीन अन्याय्य व्यवस्थेविरुद्ध बंड करणारे आद्य क्रांतिकारक होतेच, पण नंतरच्या काळात त्यांनी शोषण करणाऱ्या व्यवस्थेला पर्याय देण्याचाही प्रयत्न केला. कोणी कितीही म्हटले तरी सामान्य माणूस हा देवावर विश्वास ठेवतोच व काही धार्मिक संस्कार करणे, उदा.पूजा, बारसे, लग्नविधी, अंत्यविधी, ही त्याची मानसिक गरजही असते.
ह्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे पुरोगामी चळवळीला परवडणारे नसते आणि त्यामुळेच आजही अशा चळवळी लोकप्रिय होत नाहीत हे आपण पाहतोच. धर्माच्या आधारावर गरीब जनतेचे जे शोषण होत होते, ते थांबवायचे असेल तर आर्थिकदृष्ट्या गरिबांना नागवणाऱ्या त्या व्यवस्थेला पर्याय देणे भाग होते. यातूनच "सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक" या पुस्तकाचा १८९१ साली जन्म झाला असावा. हे पुस्तक जोतिबांनी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर व उजवा हात लुळा पडल्यानंतर मोठ्या कष्टाने डाव्या हाताने लिहून पूर्ण केले होते. या पुस्तकाद्वारे जोतिबा फुले यांनी समाजाला एक पर्यायी धर्म देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो, ज्यात हिंदू धर्माचेच सर्व रीतिरिवाज आहेत, फक्त ते पाळतांना त्यातुन गरिबांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. काय आहे या पुस्तकात? हे पुस्तक प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आहे. आणि त्यातून सत्य धर्माची काही मूलभूत तत्वे खालीलप्रमाणे विशद केली आहेत.
या पृथ्वीवरील सर्व मानव शारीरिक व बुद्धिकौशल्याने समान असून कोणीही इतरांपेक्षा पिढीजात श्रेष्ठ व पवित्र नाही. अमर्याद विश्वाचा पसारा निर्माण करणारा एक "निर्मिक" असून तो कोण आहे, कसा आहे, व त्याचे दर्शन आपल्याला कसे करून घेता येईल या प्रयत्नात पडू नये. जे कोणी असे दर्शन झाले आहे असे म्हणतात ते कल्पित कथा सांगत आहेत. प्रचंड विश्वाचा पसारा मांडणाऱ्या निर्मिकाला आपण काय भेट देऊन पूजा करणार? त्याऐवजी सत्शील पुरुषाला फुलांच्या माला ईश्वराच्या नावाने अर्पण कराव्यात. ज्याप्रमाणे एखाद्या मुलाने आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी न घेता निव्वळ उपासतापास केले तर चूक आहे, त्याचप्रमाणे बहुरुप्याप्रमाणे बैराग्याचें सोंग घेऊन काहीही काम न करता फुकट खाणे चूक आहे. त्यापेक्षा सत्शील वर्तणुक ठेवून कर्तव्य करणे कधीही चांगले! तेच नैवेद्य देण्याबाबत आहे. जोतिबा म्हणतात की जगाच्या निर्मात्याला आपण काय खाऊ घालणार? त्यापेक्षा अपंग लोकांना वा अनाथ मुलांना मदत करावी.
स्त्री-पुरुष तुलनेबाबत जोतिबा सांगतात की स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ती खस्ता खाऊन संसार चालविते व मुलाबाळांना वाढविते, व विधवा झाल्यावरही पातिव्रत्याने राहते. पुरुष मात्र तीन चार लग्ने करतात व पत्नीचे निधन होताच लगेच दुसरे लग्न करतात. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की तत्कालीन समाजात अनेक लग्ने करणे हे शास्त्रसंमत होते. पुण्य काय आहे हे सांगतांना जोतिबा सांगतात की आपल्याला सुख मिळण्यासाठी इतर लोकांना शारीरिक वा मानसिक पीडा न देणे म्हणजेच पुण्य. जातीभेद हा कृत्रिम व मानवाने निर्माण केलेला आहे, कारण तसे नसते तर प्राणी-पक्षातही जातीभेद दिसला असता. वंशपरंपरागत श्रेष्ठत्वावर हल्ला करून ते म्हणतात की सद्गुण व दुर्गुण हे पिढीजात नाहीत व कनिष्ठ जातीची मुले देखील शंकराचार्यांसारखी बुद्धिवान असू शकतात.
संसाराचा त्याग केलेले लोक हे महानच असतात या समजाबद्दल ते म्हणतात की आपल्यावर अवलंबून असलेल्या आई-वडिलांचा व पत्नीचा त्याग करून संन्यास घेणे वा बैरागी होणे हे चूक आहे. अशा संन्याशाबद्दल त्याच्या आई-वडील व पत्नीला काय वाटते ते त्यांनाच विचारले पाहिजे असे महात्मा फुले म्हणतात. पुराणांबद्दल ते म्हणतात की रावणाला शंभर तोंडे होते, दूंदुभिला तीनशे तोंडे होती असे सांगणारी पुराणे भाकडकथा आहेत. उकिरड्यावरील कचरा खाणाऱ्या गाय या पशूचे मूत्र जे लोक पवित्र मानतात, सरपटणाऱ्या नाग आदी विषारी सर्पाची पूजा करतात, तेच लोक अतिशूद्र माणसांचा स्पर्शही होऊ देत नाहीत हे कसे? असा प्रश्न जोतिबा विचारतात आणि हे अन्याय आमच्या पूर्वजांनी केले असे म्हणणाऱ्या लोकांबद्दल ते म्हणतात की याबाबत त्यांना पश्चाताप होऊन ते स्वतःला अहंब्रह्म म्हणणे बंद करतील तर ठीक झाले असते. पण तसे नाही.
सत्यवर्तन करणारी व्यक्ती कोणास म्हणावे याबाबत याबाबत फुले म्हणतात की सर्वच स्त्री-पुरुषांना जन्मतःच मानवी हक्क आहेत, व स्वतंत्र विचार करणे, ते प्रकट करणे याचा प्रत्येकाला हक्क आहे असे जो मानतो, तो सत्यवर्तन करणारा! तसेच जो स्वतःला पिढिजातच श्रेष्ठ आणि इतरांना नीच मानीत नाही, कपटाने लिहिलेल्या ग्रंथांचा आधार घेऊन इतरांना दास मानीत नाही, कोणताही व्यवसाय करणाऱ्याला तुच्छ मानीत नाही, नवग्रहांची भीती दाखवून लुबाडत नाही, काल्पनिक देवांची शांती करण्याची भीती दाखवून लुबाडत नाही, गरीब, रोगी अनाथ मुले यांना मदत करतो, तो सत्यधर्मीय आहे. आणि हे सगळे नुसते दुसऱ्यांना सांगणे नव्हते. महात्मा फुल्यांनी त्यांच्या स्वतःच्या मृत्युपत्रात लिहून ठेवले की माझा मुलगा यशवंत हा मॅट्रिक होऊन पदव्या संपादन करण्यासाठी प्रयत्न न करता जर उनाडक्या करीत फिरेल, तर, राहण्यापुरते घर सोडून, त्याचा इस्टेटीतील सर्व वारसाहक्क रद्द करावा, व शूद्र समाजातील जो कोणी सर्वात लायक मुलगा असेल त्याला माझ्या मिळकतीचा मालक करावे.
अशा प्रकारे खऱ्या धर्माची तत्वे सांगितल्यावरही सर्वसामान्य माणूस हा उत्सवप्रिय असतो हे लक्षात घेऊन, या सत्यशोधक समाजाचे जे सदस्य होते, त्यांच्यासाठी सर्वसंमतीने जन्म, बारसे, लग्न, अंत्यविधी, बारावे, वर्षश्राद्ध या साऱ्यासाठीचे विधी सत्यशोधक समाजाने विहित करून दिले होते. ते जुन्या रितीरिवाजांना व उच्चवर्णीयांकडून या प्रत्येक विधीत होणाऱ्या आर्थिक शोषणाला फाटा देणारे होते. उदा. मृत व्यक्तीचे तेरावे आणि वर्षश्राद्ध करतांना शाळेत जाणाऱ्या निराश्रित विद्यार्थ्यांना मदत करावी असा दंडक घालून दिला होता. हे सगळे १३० वर्षांपूर्वी सांगणे काळाच्या किती पुढे जाणे होते हे वेगळे सांगायला नकोच! ह्या सगळ्या गोष्टी सत्यशोधक समाजाच्या सदस्यांनी प्रत्यक्षात आणल्या आणि त्यासाठी समाजातील मोठ्या वर्गाचा रोष पत्करला. ह्या सगळ्या विधींपासून पुजारी वर्गाला त्यांनी कटाक्षाने दूर ठेवल्याने आपल्या वंशपरंपरागत उत्पन्नावर गदा आली असे कोर्टात दावे देखील दाखल झाले होते. अर्थात ज्या गोष्टी नष्ट करण्याचा १३० वर्षांपूर्वी या महान समाजसुधारकांनी प्रयत्न केल्या, त्या आजही आपला समाज इमानेइतबारे पाळत आहे हे आपण पाहतच आहोत.
वास्तविक या छोट्याशा पुस्तिकेत सामाजिक क्रांतीची बीजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की सार्वजनिक सत्य धर्म पुस्तिकेबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात की "जोतिबांच्या विश्व-कुटुंबवादाचा "सार्वजनिक सत्य धर्म" हा जाहीरनामा आहे. भारतीय लोकशाही क्रांतीची मूलभूत तत्वे विशद करून सांगणारा तो जाहीरनामा आहे. या पुस्तिकेत जोतिबांच्या महात्मतेचे तेजोवलय पूर्ण प्रकट झाले आहे".