इम्यून एस्केप (Immune Escape) म्हणजे काय?
कोरोनाच्या व्हायरसमध्ये दिवसेंदिवस बदल होते आहे. आता नव्याने बदल झालेल्या डेल्टा व्हायरसची चर्चा सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. आता हा व्हायरस इम्यून एस्केप करण्यात यशस्वी होईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, इम्यून एस्केप म्हणजे काय? जाणून घेऊया डॉ. प्रिया देशपांडे यांच्याकडून;
सध्या डेल्टा प्लस या कोरोनाच्या आवृत्ती (उप-प्रकार) बाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे आणि हा व्हेरीयंट इम्यून एस्केप करण्यात यशस्वी होईल की काय यावर शास्त्रज्ञ पुढील अभ्यास करत आहेत. हा इम्यून एस्केप काय आहे आणि त्यामुळे जगभरामध्ये का चिंतेचे वातावरण आहे हे आज समजून घेवूया .
इम्युनिटी काय असते? (What is Mean by Immunity Power)
एखादा जंतू शरीरामध्ये शिरला तर त्याला प्रतिकार करून आजार होऊ न देणे यासाठी शरीर जे उपाय करते याला इम्युनिटी / रोगप्रतिकारक शक्ती असे म्हणतात.
करोना विरुद्ध इम्युनिटी कशी मिळते ?
ज्यांना करोना संसर्ग नैसर्गिकपणे झाला अश्या व्यक्तींना काही काळासाठी इम्युनिटी प्राप्त होते. तसेच ज्या व्यक्तींनी करोना विरुद्ध लस घेतलेली आहे, त्यांना देखील करोना विरुद्ध प्रतिपिंडामुळे प्रतिकार शक्ती मिळते. इम्युनिटी ही प्रतिपिंडे व पेशीय इम्युनिटी द्वारे प्राप्त होते.
प्रतिपिंडे / antibody म्हणजे काय? (What is Mean By Antibodyx)
प्रतिपिंडे ही इंग्रजी "Y" या आकाराची प्रथिने असतात. आपल्या शरीरातील "B लिम्फोसाईट्स" या पेशी ही प्रथिने तयार करतात.
प्रतिपिंडे कोणाविरुद्ध तयार होतात ?
प्रत्येक जंतूच्या शरीरामध्ये काही antigen / प्रतिजन असतात. जंतूच्या शरीरातील काही प्रथिने 'मानवी नाही / बाह्य आहेत' हे ओळखून त्याविरुद्ध आपले शरीर प्रतिक्रिया देते, ती प्रथिने इम्युनिटी तयार होण्यासाठी सहाय्यकारी ठरतात. त्यांना प्रतिकार-क्षम / immunogenic antigen असे म्हणतात. मात्र, प्रत्येक प्रथिनाची इम्युनिटी तयार करण्याची क्षमता वेगवेगळी असते. कोरोना मध्ये S, E , M आणि N असे चार मुख्य प्रतिजन असतात. याविषयी आपण
या पोस्ट मध्ये माहिती बघितली होती. या सर्व antigen विरुद्ध antibody तयार होतात. मात्र, केवळ S antigen विरुद्ध तयार झालेल्या antibody या neutralizing antibody असतात. S प्रथिन मानवी पेशीवरील ACE2 या रिसेप्टर ला सर्वात आधी जोडले जाते व नंतर विषाणूचा RNA पेशीमध्ये प्रवेश करतो. S प्रथिनाचा जो भाग ACE2 या रिसेप्टर ला जोडला जातो. त्याला RBD ( Receptor Binding Domain) असे नाव आहे.
या भागाविरुद्ध ज्या antibody काम करतात त्या विषाणूला पेशीमध्ये प्रवेशच करू देत नाहीत. जे म्युटेशन्स या RBD भागामध्ये बदल घडवून आणतात ते महत्त्वाचे मानले जातात.
antibody / प्रतिपिंडे नक्की काय करतात?
प्रतिपिंडामधील म्हणजे Y मधील उभा भाग सर्व प्रतिपिंडामध्ये सारखा असतो. मात्र Y च्या दोन्ही हाताच्या टोकावर विशिष्ठ antigen ला जोडला जाईल / फिट बसेल असा भाग असतो. ज्याला antigen binding site असे म्हणतात. आणि हा भाग प्रत्येक antigen साठी अगदी वेगवेगळा असतो. म्हणून एका आजाराविरुद्ध बनलेली प्रतिपिंडे इतर आजाराविरुद्ध कामी येत नाहीत. तसेच प्रत्येक जंतूच्या विविध प्रथिनाविरुद्ध वेगवेगळ्या antibody बनतात.
(सोबतची चित्रे पहा.) antigen च्या आकारास अनुरूप, अगदी प्रतिबिम्बाप्रमाणे antibody मधील antigen binding site असतात. उदा. त्रिकोणी antigen साठी त्रिकोणी , चौकोनी साठी चौकोनी .
प्रत्येक कुलुपासाठी जशी विशिष्ठ किल्ली असते तसे प्रत्येक antigen साठी विशिष्ठ antibody असते. याविषयी अधिक स्पष्टता येण्यासाठी हा व्हिडीओ बघता येईल.
जेव्हा antibody आणि antigen तंतोतंत जुळतात. तेव्हा विषाणू लवकर नष्ट होतात.
उदा. करोनाच्या S प्रथिनावरील RBD भागाला antibody चिकटते तेव्हा RBD झाकला जातो. आणि त्यामुळे मानवी पेशीवरील ACE2 रिसेप्टर ला जोडला जाऊ शकत नाही. आणि आपोआपच विषाणूंची संख्या नियंत्रित राहते व आपण आजारी पडत नाही.
उत्परिवर्तन /म्युटेशन मुळे नक्की काय होते?
करोनाच्या प्रती बनवण्याची सर्व माहिती विषाणूमधील RNA मध्ये कोडच्या रुपामध्ये साठवलेली असते. करोनाच्या कोडमध्ये साधारण ३०,००० अक्षरे (अमिनो एसिड) असतात. यातील एखादे अक्षर बदलले किंवा गळाले की कोड बदलतो. आणि या कोड वरून बनवले जाणारे विषाणूचे प्रथिन देखील बदलते. होणारे बदल बऱ्याच वेळा निरुपयोगी असतात. मात्र, काही बदल विषाणूचा प्रसार अधिक सोपा करणारे असतात आणि मग असा विषाणू सर्वत्र पसरतो.
डेल्टा प्लस व्हेरीयंट मधील मुख्य म्युटेशन K417N हे आहे. म्हणजे ३०,००० पैकी 417 क्रमांकावरील amino acid बदलले गेले आहे. पूर्वी तिथे K असायचे त्याऐवजी आता N आले आहे. 417 ही जागा S प्रथिनाच्या कोड मधील आहे. म्हणजे या म्युटेशनमुळे S प्रोटीन चा आकार बदलेल. हा बदल किती मोठा आहे? त्यावर आपल्या शरीरातील antibody काम करणार की नाही हे ठरेल.
इम्यून एस्केप म्हणजे काय?
आता प्रत्येक देशातील बऱ्याच जनतेकडे करोनाविरुद्ध इम्युनिटी आहे. काही जणांना कोविड होऊन गेला आहे. तर काही जणांनी कोविडची लस घेतली आहे. S प्रथिनाला फीट बसेल अश्या antibody शरीरामध्ये तयार आहेत. इम्युनिटी आहे. करोना शरीरात शिरला की या antibody लगेच S प्रथिनाला चिकटतात आणि विषाणूला पेशीमध्ये शिरू देत नाहीत.
मात्र, जेव्हा विविध म्युटेशन होतात. तेव्हा आपल्या शरीरातील antibody नव्या प्रथिनाला फिट बसत नाही. कारण आता antigen बदलले आहे. जेव्हा हा बदल थोडा असतो तेव्हा कमी प्रमाणात का होईना पण antibody काम करू शकतात.
(चित्रानुसार षटकोनी antigen साठी षटकोनी antibody हव्या. मात्र, त्रिकोनी antibody देखील थोडी सुरक्षा देतील. मात्र, चौकोनी antibody काही सुरक्षा देऊ शकणार नाहीत. इंग्लंड मधील बीटा किंवा डेल्टा विरुद्ध सर्व लसी कमी प्रमाणात उपयुक्त होत्या. एफिकसी कमी झाली तरी गंभीर आजार टाळणे शक्य होत होते.
मात्र, डेल्टा प्लस मध्ये झालेल्या बदलामुळे शरीरामध्ये निर्माण झालेल्या antibody आता S प्रथिनाला चिकटू शकत नाहीत (चित्र पहा.)
म्हणजे शरीरासाठी हे नवे S प्रथिन नव्या antigen सारखे आहे, ज्याबद्दल शरीराकडे काहीही मेमरी नाही. जर असे झाले की शरीरामध्ये उपलब्ध असलेल्या इम्युनिटी मधून करोना स्वतःची सुटका करून घेऊ शकतो आणि गंभीर आजार देखील निर्माण करू शकतो. याला इम्यून एस्केप म्हणतात.
आता शरीराला पुन्हा नवी सुरुवात करून नव्या प्रथिनाविरुद्ध इम्युनिटी निर्माण करावी लागते. ज्यांना आधी कोविड झाला होता किंवा ज्यांनी लस घेतली होती. त्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे , कारण या व्हेरीयंट मुळे त्यांना आजार होऊ शकतो.
अर्थात डेल्टा प्लस बाबत सध्या ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, मात्र खरेच इम्यून एस्केप होत आहे का? यासाठी अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे.
यावर उपाय काय
नव्या व्हेरीयंट मुळे इम्यून एस्केप होण्याच्या शक्यता भविष्यामध्येही आहे. मात्र, मास्क, अंतर, स्वच्छता व वायूवीजन या उपायांनी नव्या व्हेरीयंट पासून देखील सुरक्षित राहता येते. गर्दी अर्थातच टाळायची आहे.
कोविडच्या जेवढ्या जास्त केसेस होतील तेवढी नवे व्हेरीयंट निर्माण होण्याची शक्यता वाढते. आयसोलेशन आणि क़्वारांटाईन चा वापर करून रुग्णसंख्या नियंत्रित ठेवणे अत्यावश्यक आहे!
सध्या नियम मोडणारी जनता संकट वाढवत आहे.
मात्र, नियम पाळणारी प्रत्येक व्यक्ती साथ नियंत्रित करण्यासाठी सहाय्यकारी आहे.
तुम्ही नियम पाळत असाल तर मनापासून धन्यवाद!
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोग तज्ञ , मिरज.
(follow for More info @UHCGMCMIRAJ in FB and YouTube)
(सदर पोस्ट डाॅ. प्रिया देशपांडे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे. साभारUHCGMCMIRAJ )