#MahatmaGandhi : गांधीहत्येचा घटनाक्रम असा आहे.... - संजय सोनवणी
महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये सावरकरांचा हात नव्हता असा दावा केला जातो. पण गांधी हत्येच्या सूत्रधारांचा शोध लावण्यासाठी नेमण्यात आलेल्या न्या. कपूर आयोगाच्या अहवालात याबाबत महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवण्यात आले होते. या अहवालानुसार १५ ते ३० जानेवारी १९४८ या १५ दिवसांमधील घटनाक्रम काय होता, नथुराम गोडसे कुणाकुणाला भेटला होता, याची माहिती देणारा संजय सोनवणी यांचा लेख.;
१५ जानेवारी १९४८...गोडसे, आपटे, बडगे, करकरे आणि मदनलाल यांनी हिंदू महासभेच्या मुंबई कार्यालयात बैठक घेतली. नंतर दिक्षितजी महाराजांकडे त्यांनी ठेवलेली स्फोटके/शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. करकरे, आणि मदनलाल यांना दिल्लीला जाण्याचे सांगण्यात आले. गोडसे मात्र पुण्याला आला.
१७ जानेवारी १९४८....गोडसे, आपटे, बडगे आणि शंकर हे सावरकरांना त्यांच्या घरी भेटले. नंतर त्याच दिवशी गोडसे आणि आपटे दुपारी दोनच्या विमानाने दिल्लीला निघाले व साडेसात वाजता पोहोचले.
१९ जानेवारी १९४८...हिंदू महासभा भवनात गोडसे व आपटे बडगेला भेटले.
२० जानेवारी १९४८...सायंकाळच्या प्रार्थना सभेत गोडसेसहित सर्व आरोपींच्या समक्ष मदनलालने स्फोट केला. लगोलग सारे कानपुरला रेल्वेने पळाले.
२२ जानेवारीला सारे मुंबईला पंजाब मेलने निघाले. दुसर्या दिवशी ते मुंबईला पोहोचले. तेथे प्रथम ते आर्य पथिक आश्रमात राहिले, नंतर एका होटेलात.
२७ जानेवारीला बोगस नांवांनी त्यांनी एयर इंडियाचे बुकिंग केले. त्याच दिवशी दिल्लीला पोचल्यावर ते ग्वाल्हेरला गेले, डा. परचुरेला भेटले. तेथेच दंडवते याने त्यांना रिव्हाल्वर दिले.
२९ जानेवारीला वेगवान हालचाली झाल्या. दिल्लीत परत आल्यावर. गोडसेने रेल्वे स्टेशनवरील विश्रामगृहात एन. विनायक राव या नांवाने खोली बुक केली. आपटे, गोडसे आणि करकरेने त्या सायंकाळच्या बिर्ला भवनमधेल सायंप्रार्थनेला हजेरी लावली.
३० जानेवारी १९४८ ला सायंकाळी गोडसेने ३ गोळ्या झाडून सायंप्रार्थनेच्या वेळीसच बिर्ला भवनात गांधीजींची हत्या केली.
१५ ते ३० जानेवारीचा एकंदरीत घटनाक्रम न्या. कपूर यांनी दिल्याप्रमाणे आहे. संपुर्ण अहवाल वाचायचे कष्ट घेतले तर अनेक धक्कादायक बाबी दिसतील.
सावरकर या खुनाचे मुख्य सुत्रधार होते तर बाकी प्यादी हेही सरळ दिसते.
कितीही सारवासारव करायचा प्रयत्न केला तरी उपयोग नाही. सावरकर सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटले याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना गोवता येईल असा प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळाला नाही आणि भारतीय दंडविधानाप्रमाणे असा पुरावा नसेल तर दोषी ठरवता येत नाही. मानवत खूनखटल्यातही केवळ प्रत्यक्ष सहभाग व अन्य प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्याने सुत्रधार मुक्त सुटले होते.
आता...या लोकांच्या बैठका मुख्यत्वेकरून हिंदू महासभेच्या मुंबई व दिल्ली कार्यालयात झाल्या. हिंदू महासभेचे सर्वेसर्वा कोण होते हे सारे जाणतात.
सावरकरांना १७ जानेवारीला प्रत्यक्ष हत्याकांडात सामील झालेले भेटले. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे लोक मुंबईलाच आले व किमान चार दिवस तेथे राहिले. ते पुन्हा सावरकरांनाच भेटायला आले होते असे म्हणायला पुरेपूर वाव आहे. अन्यथा पळून जायला त्यांना अनेक जागा होत्या. त्यांना सक्षम शस्त्र हवे होते. ते त्यांना मुंबईतून गेल्यानंतर ग्वाल्हेरला मिळाले. ही व्यवस्था क्रांतीकारकांना शस्त्रे पुरवण्याचा आधीपासून उद्योग करणा-या सावरकरांशिवाय कोण करणार?
हे प्रश्न आहेत व यांची दखलपात्र उत्तरे सावरकरवादी देऊ शकत नाही हे उघड आहे.