शरद पवार यांनी भाकरी तर अजित पवार यांनी फिरवली चूल

अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ का सोडली? शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ का घेतली? याविषयी जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा लेख...;

Update: 2023-07-09 02:37 GMT

शरद पवार कुठलाही निर्णय उगीच घेत नाहीत. त्यामागे अनेक राजकीय समीकरणं असतात. तशाच प्रकारे शरद पवार यांनी भाकरी फिरवायला हवी, असं म्हणत पक्षात बदलाचे संकेत दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे जाणार याची चर्चा रंगली होती. त्यानंतर शरद पवार यांचं राजीनामा नाट्य घडलं आणि पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली गेली. त्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या कामातून दादागिरी दाखवून दिली. त्यामुळे सामान्य जनता ते राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्याकडे उद्याचं नेतृत्व म्हणून पाहू लागले. मात्र शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष केलं. एवढंच नाही तर प्रफुल्ल पटेल यांना इतर राज्यातील आणि सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या कार्याध्यक्ष करण्यात आले. त्यामुळे सुप्रिया सुळे केंद्रात आणि अजित पवार राज्यात हे अलिखित समीकरण होते. त्या समीकरणालाच तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाले.

अजित पवार यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भुषवायचं आहे हे कधीही लपून राहिलेलं नाही. मात्र आतापर्यंत अजित पवार यांनी चार वेळा उपमुख्यमंत्री पद भुषवलं. पण त्यांना सातत्याने मुख्यमंत्री पदाने हुलकावणीच दिली आहे. त्यातच आता सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचा पदभार दिल्याने ही अजित पवार यांना आपल्या कार्यक्षेत्रात झालेली घुसखोरी वाटू लागली. त्यातच आता सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्यक्ष म्हणून निवड केली असल्याने आगामी काळात शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याच्या नावाने सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री केलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळेच जर पून्हा राष्ट्रवादीची सत्ता आली तर आपला भ्रमनिरास होईल, हे अजित पवार यांना स्पष्ट दिसू लागले. त्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाले. पण हे पहिल्यांदा स्पष्टपणे दिसलं ते दिल्लीत सुप्रिया सुळे यांच्या निवडीची घोषणा केली त्यावेळी. तेव्हा स्टेजवर अजित पवार प्रचंड अस्वस्थ दिसले. त्यानंतर अजित पवार माध्यमांना प्रतिक्रीया न देता मुंबईच्या दिशेने गेले. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या दिल्या गेल्या. मात्र अजित पवार यांनी महत्वाच्या कामामुळे आणि फ्लाईटमुळे मी प्रतिक्रीया दिली नसल्याचे सांगितले. परंतू पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार अस्वस्थ असल्याचे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून वाटत होते.


एकीकडे ही घटना घडली असतानाच अजित पवार यांचं भाजपशी बोलणं सुरु होतं. त्याच्या बातम्याही येत होत्या. मात्र अजित पवार हे सगळं नाकारत होते. परंतू अजित पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्याचं दुसऱ्यांचा उघडपणे दिसलं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात...

अजित पवार यांनी या भाषणात आपल्याला पक्ष संघटनेत काम करायचं असल्याचं म्हटलं. यावेळी अजित पवार म्हणाले, मी विरोधी पक्षनेते म्हणून काम आक्रमक होत नसल्याची तक्रार आहे. मी आक्रमक होऊ म्हणजे त्यांची गचांडी पकडू का? असं म्हणत मला विरोधी पक्षनेते पदात कधीच इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मला विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करावं आणि पक्ष संघटनेतील कुठलीही जबाबदारी द्यावी, मग बघा पक्ष कसा चालतो ते. अजित पवार एवढंच बोलले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कोणत्या अध्यक्षाने किती वर्ष काम केलं, याचा लेखाजोखा मांडत जयंत पाटील यांना बदलण्याची गरज असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितलं आणि प्रदेशाध्यक्ष पदावर अप्रत्यक्षपणे दावा सांगितला. त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून गेलेली मान्यता.

अजित पवार हे जाणून होते की, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष न राहता प्रादेशिक पक्ष बनला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला तळागाळापर्यंत जायचं असेल तर पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व नाही मिळालं तरी प्रदेशाध्यक्षपद मिळायलाच हवं. कारण सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राचा पदभार असला तरी आपल्याला आपल्या सोईने पक्षाची बांधणी करता येईल. पण अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यास शरद पवार उत्सूक नसल्याचे दिसले नाहीत. त्यामुळे अजित पवार यांची नाराजी वाढत गेली.

राज्याचा विरोधी पक्षनेता हा भविष्यातील मुख्यमंत्री म्हणून पाहिला जातो. मात्र अजित पवार यांनी पक्षसंघटनेत येण्याची इच्छा व्यक्त करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी आमदारांवर पकड पाहिजे. त्यामुळे थेट पक्ष संघटनेत काम केलं तर जनससामान्यांपासून ते आमदारांपर्यंत सगळीकडे आपली छाप ठेवता येते, हे अजित पवार ओळखून होते. त्यामुळे त्यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र ही अजित पवार यांची इच्छा पूर्ण होण्याची कुठलीच शक्यता दिसत नसल्याने अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा जास्तीत जास्त फायदा राष्ट्रवादीच्या आमदारांना करून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त आमदारांचा अजित पवार यांनाच पाठींबा होता. त्यातच अजित पवार हे विधानसभेच्या निवडणूकीतही महाराष्ट्रभर फिरले होते. सभा घेतल्या होत्या. त्यामुळे अनेक आमदारांच्या विजयात अजित पवार यांचं मोठं योगदान होतं. अजित पवार यांचा एवढा दांडगा जनसंपर्क असतानाही शरद पवार यांनी फिरवलेली भाकरी सुप्रिया सुळे यांच्याच ताटात टाकण्याची रणनिती आखल्याने अजित पवार यांनी चूल आणि तवा फिरवून भाकरीच करपून टाकली. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली. पण ही फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी 2014 मध्ये भाजपला बाहेरून पाठींबा देण्याचा घेतलेला निर्णय. 2017 मध्ये शिवसेना जातीयवादी असल्याने भाजपसोबत जाण्यास तयार पण शिवसेनेसोबत नको, अशी भूमिका घेतल्याचे आणि 2019 मध्ये गुगली टाकून स्वतःच्याच गड्याला आऊट करण्याचा प्रयत्न केल्याच्या गोष्टी उघडपणे मांडल्याने शरद पवार यांच्याविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात अजित पवार यशस्वी झाले आहेत.

Tags:    

Similar News