संत तुकाराम महाराज यांचे शिळा मंदिर म्हणजे काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूत संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. पण हे शिळामंदिर म्हणजे काय? हे नेमकं कसलं मंदिर? असे प्रश्न करत संत तुकाराम महाराज यांच्या निर्भीड आयुष्यावर प्रकाश टाकत शिळा मंदिराचा अर्थ सांगणारा अभिनेते किरण माने यांचा लेख;
देहूत शिळामंदिराचं उद्घाटन झालं. शिळामंदिर म्हन्जे काय हो? शिळेचं म्हन्जेच खडकाचं मंदिर. खडकाचं कसलं मंदिर? तर मनूवाद्यांनी तुकोबारायाची अनमोल अशी गाथा इंद्रायणीत बुडवल्यावर दु:खी कष्टी होऊन तेरा दिवस तुकोबाराया इंद्रायनीकाठच्या ज्या खडकावर बसून राहिले त्या शिळेचं हे मंदिर !
गाथा का बुडवली? तुकोबारायाचा काय गुन्हा होता? तर त्यानं दीनदुबळ्या बहुजनांना गुलामगिरीतून बाहेर काढायचा प्रयत्न केला. अडाणीपणाचा फायदा घेऊन ज्यांना देवधर्म-अंधश्रद्धा-कर्मकांडांत अडकवून लुबाडलं जायचं, अशा शोषित-पिडीतांना तुकोबारायानं जागं करायला सुरूवात केली हाच त्याचा गुन्हा.
तुकोबांनी आपल्या अभंगांमधून वेद-पंडितांच्या पारंपरिक मक्तेदारीला चॅलेंज दिलं. एवढंच नाय, वेदांचा अर्थ जाणून घेण्याचा अधिकार सगळ्या जातीतल्या लोकांना, तसंच स्त्रियांनाही आहे असं ठणकावून सांगितलं. हळुहळू तुकोबाराया सामान्य जनमानसात प्रचंड लोकप्रिय होऊ लागला ! 'महाराष्ट्राचा खराखुरा फेवरेट सेलिब्रिटी' झाला. जळफळाट होऊन जातवर्चस्ववाद्यांनी तुकोबाला धर्मपीठासमोर खेचलं. "आम्हीच श्रेष्ठ आहोत. तू शूद्र असून आम्हाला ज्ञान शिकवतोस काय?" असं म्हणत गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याची शिक्षा दिली !
बघा, किती वर्षांपास्नं चालत आलंय हे !
संतांच्या मरणानंतर ह्या लोकांना त्यांचा लै म्हंजी लैच कळवळा येतो. 'आम्ही त्यांचे लै मोठ्ठे भक्त. आम्ही त्यांच्यासाठी टाळ वाजवले, चिपळ्या वाजवल्या अन घंटा वाजवली,' अशा खोट्या फकांड्या मारतात. पन तेच संत जिवंत असताना समाजाला शहाणं-विवेकी बनवू पहातात. त्यामुळं ह्यांचं रूप वेगळं असतं. मग त्या समाजसुधारकांना धमकावनं, बदनाम करनं, त्यांच्या पोटापाण्याच्या कामावर गदा आणणं, त्यांच्या भजनात, व्याख्यानात, चळवळीत अडथळे आणणं, हल्ले करणं, त्यांचे विचार नष्ट करायचा प्रयत्न करणं आणि अगदीच डोईजड झाले तर त्यांची हत्या करणं असं हे हजारो वर्ष चालत आलंय.
तुकोबारायालाबी असाच त्रास दिला यांनी. पन आपला वाघ मागं हटला नाय. "आता मी माझ्या मरनालाबी भेत नाय." अशी डरकाळीच फोडली त्यानं !
भीत नाहीं आतां आपुल्या मी मरणा । दु:खी होतां जना न देखवे ।।
आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुम्ही दातारा नेणां ऐसें ।।
भजनीं विक्षेप तें चि पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ।।
तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ।।
आता मला माझ्या मरणाचीही भीती वाटत नाही, कारण मला हे लोक दु:खात असलेले पहावत नाही. आमची जात लढवय्यांची परंपरा दाखवणारी आहे, हे का तुला ठाऊक नाही देवा? पण हे लोक माझ्या भजनात व्यत्यय आणतात. हे मला मरणप्राय यातना देतात. लोकजागृतीचा एक क्षणही वाया जाऊ नये असं मला वाटतं. शेवटी तुका म्हणे त्यामुळे जिथे अशा जीवघेण्या आघातांचा वाराही स्पर्श करणार नाही अशा ठिकाणी देवा मला ठाव दे.
आपल्यासाठी लै लै लै त्रास सहन केला हो तुकोबारायानं. अक्षरश: रक्ताचं पाणी केलं. मारहाण सहन केली. जळते निखारे झेलले. बदनामीच्या प्रयत्नांना तोंड दिलं. पन मागं हटला नाय. लढत र्हायला. "आरं आमची जातच लढवय्याची हाय, आम्ही पळपुटे नाय" अशी गर्जना केली आपल्या 'हिरो'नं !
आपल्या आज्ज्या-पणज्यांनी तुकोबाची बुडलेली गाथा तारली. आज तीच गाथा आणि त्यातला 'खरा विचार' पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवण्याचा आपण थोडाजरी प्रयत्न केला तरी लै मोठ्ठं काम हुईल. त्याचा संघर्ष सार्थकी लागंल... तोच त्या 'शिळेचा' खर्या अर्थानं सन्मान आसंल !
ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल
https://www.facebook.com/photo/?fbid=10225405393069355&set=a.3508579880783&__cft__[0]=AZXz3aoWe6bvo_KEMCcgYZzIHtPPcPHgyCKPoA_IZPTawps7JCi5niYsHggAwcVk0h1wjz3DlcpffrlnLwr68EuRVEPi1WFZ9S0HNRIkF2NfeqxMbjQugErJYu2tCZCntd4ZCYctbBZ4gHrjHmAP22Hfm36308WZJjJdw983pokBsg&__tn__=EH-र
- किरण माने.
#तुकाआशेचाकिरण