#RussiaUkraineWar : आतापर्यंत नेमके काय घडले आहे आणि काय होऊ शकते?
रशिया-युक्रेनच्या संघर्षात अनेक ब्रेकिंग न्यूजचा मारा सुरू आहे. तिथे नक्की काय घडते आहे आणि त्या घडामोडींचा अर्थ भारताच्या दृष्टीने काय आहे, रशियन फौजा सहज युक्रेन पादाक्रांत करत आहेत की त्यांना तिथे युक्रेनचा कडवा प्रतिकार करावा लागतो आहे, याची माहिती आणि सोप्या भाषेतील विश्लेषण केले आहे, सुनील तांबे यांनी...
१. रशियाच्या फौजा युक्रेनमध्ये तीन दिशांनी आक्रमण करत आहेत. काही प्रदेश त्यांनी काबीज केला आहे.
२. युक्रेन कडवा प्रतिकार करत आहे. शहरामध्ये युद्ध पेटलं तर रशियन फौजांची गोची होईल. प्रत्येक इमारत युक्रेन फौजांचं ठाण बनेल. चार कोटी लोकसंख्येवर १ लाख ९० हजार सैनिक राज्य करू शकणार नाहीत. स्थानिक लोकांच्या पाठिंब्याविना युक्रेनमध्ये सरकार स्थापन करणं रशियाला शक्य नाही.
३. युरोपियन युनियन निव्वळ आर्थिक संघटना असल्याचा दावा करत होती. मात्र या संघटनेने युक्रेनला शस्त्रास्त्रं देण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेन हा युरोपचा भाग असल्याचं घोषित केलं आहे. युरोपियन देश एकजूटीने युक्रेनच्या पाठिशी उभे राह्यले आहेत.
४. युरोपियन देशांना होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा रोखण्याचा पर्याय रशियाकडे आहे.
५. पुतीन यांनी अण्वस्त्रांचा उपयोग करण्याची धमकी दिली आहे.
६. युद्ध विराम करा, रशियन फौजा मागे घ्या अशी मागणी युक्रेनने केली आहे. रशियाला ती मंजूर नाही. युद्ध चिघळण्याची, लांबण्याची लक्षणं दिसत आहेत.
७. रशियन नागरिकांचा युद्धाला विरोध आहे. युक्रेनचे नागरिक रशियन रणगाड्यांसमोर उभे राहात आहेत.
८. आर्थिक निर्बंधांमुळे रशियाची स्थिती नाजूक बनू शकते.
९. रशियाचं चीनवरील अवलंबित्व वाढू शकतं. तसं झालं तर आशियामध्ये चीनचं वर्चस्व प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्वाड - अमेरिका-जपान-आँस्ट्रेलिया-भारत ही रचना ( आशियायी नेटो) चं समीकरण बदलेल. भारताची कोंडी होऊ शकते.