इंधन दरवाढीमुळे नोकरदार हतबल होतील याची भिती वाटते – वैभव छाया
इंधन दरवाढ ही फक्च प्रवासापुर्ती मर्यादीत राहत नाही. या दरवाढीमुळे सबंधीत इतर गोष्टींवर देखील परीणाम झालेला पाहायला मिळतो. नुकत्याच झालेल्या दरवाढीमुळे मुंबईतल्या एक दिवसीय प्रवासाचा खर्च हा तब्बल ३००० रुपयांच्या वर गेला आहे. इतक्या महागलेल्या मुंबईत नोकरदार वर्ग फार का टीकणं कठीण आहे कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा वैभव छाया यांचा लेख...;
काल मुंबईत प्रवास झाला. घरून निघालो तेव्हा सीएनजी टँक फुल केला. ७३० रुपये लागले. चार वेळा टोल भरण्यासाठी फास्टटॅग मध्ये ४०० रुपये भरावे लागले. मुंबईतलं ट्राफिक इतकं भयाण होतं की उशीर झाला. त्यामुळे बाहेरचं खाणं झालं. चार जणांचं खाणं ४०० रुपये झालं. नंतर पुन्हा गॅस रिफीलींग केलं दादरला ६०० रुपये.
एकुण खर्च झाला २१३० रुपये. यात कारचं मेंटेनंस आणि ड्रायवर कॉस्ट पकडला तर सहज ३००० रुपये होतात. म्हणजे मला मुंबईत काल चार मिटिंग करण्यासाठी चार ठिकाणच्या प्रवासासाठी (१५० किमी) ३००० रुपये मोजावे लागलेत.
असा प्रवास महिन्यातून किमान २० वेळा तरी होतोच. काहीवेळेस मुंबईबाहेर नाशिक, पुण्याला होतो. एकुणच प्रकृतीमुळे मला पब्लिक ट्रांसपोर्ट वापरणे शक्य होत नाही. त्यापाई महिन्याला जर ६० हजार जर असेच खर्च होऊ लागले तर (जे कमी अधिक प्रमाणात होताहेत) परवडणारे नाही.
मी राहतो त्या ठिकाणाहून ओला, ऊबर किंवा इतर वाहनांनी जायचे म्हटले तर एका बाजूचे १८०० चं बिल होतं. ट्रेनने प्रवास करणे प्रचंड कठिण होऊन बसले आहे. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या पायदानाचे अंतर इतके जास्त असते की ट्रेनमधून चढणे उतरणे जीवाशी खेळण्यासारखेच. एकदा असाच अंदाज न आल्याने पडलो तेव्हा चालत्या ट्रेनखाली जाण्यापासून थोडक्यात बचावलो होतो. आणि तेव्हापासून तो प्रवास सोडला तो कायमचाच.
मुंबईत घर घेऊन रहावं इतकं आता तरी शक्य नाही. पण पूर्वी हाच प्रवास दिवसाकाठी ६०० रुपयांच्या गॅस आणि टोल धरून व्हायचा. फास्ट टॅग नव्हता तेव्हा मोजून ७० रुपये काढून ठेवले की काम व्हायचं. आता ४० रुपयांसाठी २४० रुपयांचा बॅलंस रिचार्ज करावा लागतो. बाहेरचं खाणं बरंच स्वस्त होतं. ओला ऊबेर १६ रुपये प्रति किमी होत्या. आज तेच २८ रुपये झालेत.
तेव्हा पेट्रोल ६० ते ८० च्या रेंज मध्ये असायचे तेच आता ११५ च्या रेंज मध्ये आहे. गॅस जो ४१ रुपये होता ८६ रुपयांवर पोहोचलाय.
इंधन दरवाढ साखळीत बांधलेली गोष्ट आहे. इंधन दरवाढ झाली की एकामागोमाग एक सगळं वाढत जातं. रेपो रेट वर्षभरात तीन वेळा वाढलाय. चार वेगवेगळे ईएमआय आता दणक्यात वाढलेत. एक तर टेन्यूर वाढवा किंवा रक्कम. ही परिस्थिती तुमचीही असेलच. नसायला तुम्ही परग्रहावरून आलेले नाहीत. पण सर्व लोक कसे मॅनेज करत असतील हा ही प्रश्न सतावतच राहतो.
सरकारी यंत्रणा युद्धाचं कारण देऊन इंधन दरवाढीचं समर्थन करत आहेत. पण युद्ध तर आता सुरू झालेय. पेट्रोलची शंभरी युद्धापूर्वीच झाली होती. ही महागाई एक दिवस तुमचा कणा मोडेलच. तेव्हा सुधरण्याचा मार्ग नसेल.
माझ्यासारखे नोकरी न करणारे लोक काही ना काही उद्योग वा उचापत्या करून मार्ग काढतीलच पण नोकरीवर असणारे हतबल होतील याचीच भीती अधिक वाटते.
असो... दसऱ्याच्या, अशोक विजयादशमीच्या, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या, खंडीभर दसरा मेळावा दिनाच्या, नॅशनल कार वॉशिंग डे च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.