कावधान….

अचानक आलेल्या पावसाला कावधन म्हणतात.. अशा पावसाने शेतकऱ्याची काय तारांबळ होऊ शकते? शेतकरी पुत्र असलेला बहुराष्ट्रीय कंपनीतील व्यवस्थापक मनोहर कुंभारकर यांनी शब्द रूपानं व्यक्त केलेलं ' कावधान'.;

Update: 2023-03-19 03:12 GMT


सोमवारी पहाटेची ४ः४० ची फ्लाईट घेऊन पुणे ते अहमदाबाद अन बुधवारी पहाटे ५ः५० च्या फ्लाईटने अहमदाबाद ते नागपुर अन आता गुरूवारी संध्याकाळी ४ः४५ च्या फ्लाईटने पुण्याला येत होतो. प्रवास, फ्लाईटच्या वेळा चुकीच्या, अवेळी जेवण, कामाचा ताण अन न झालेली झोप यामुळी पुरता शिणलो होतो. पावने सहाच्या दरम्यान पुण्याजवळ पोहचलो तर खाली ढगांची गर्दी होती, ऊन्हाळा असुन ६ः०० च्या दम्यानच खाली स्पष्ट दिसत नव्हत. ढगांच्या गर्दितुन वाट काढत, चांगले हादरे खात विमान हळु हळु लॅन्डीग साठी खाली येत होत. ढगांच्या खाली विमान आल पन परत जोरदार हादरा बसुन परत विमान वरच्या दिशेने निघाल. कदाचीत ढगांच्या गर्दि बरोबर वादळ असाव असं वाटल किंवा एअर ट्रॅफिक कंन्ट्रोलनी लॅन्डींग नाकारली असावी. पुन्हा विमान ढगांच्या खालच्या थरातून कमी ऊंचीवरून पुर्व पुण्याच्या अंगाने जाऊ लागल. मी आपला खिडकीवर डोक ठेऊन बाहेर विचित्र असा निसर्ग न्याहाळत होतो. ढगांमुळे विमान चांगलच हादरे खात होत, जस कच््या माळरानाच्या, दगडगोट्याच्या रस्त्याने बैलगाडी धक्के खात चालत तस. जस विमान डोंगराच्या बाजुला गेल तस जोरात धुळ उडताना दिसु लागला. त्याच डोंगराच्या कडेच्या माळरानावरून एक शेतकरी बैलगाडी घेऊन चालताना दिसला. कावधान जोराच सुटल्याने तो बैलांना पट पट चालाव म्हनुन सारका दापतोय असाच वाटला. मी मनाने कधीच्या बैलगाडीत जाऊन बसलो होतो. बैलगाडीत पाच सहा कांद्याच्या पिशव्या होत्या. शेतक-याच्या मनात काय चालल असेल याचा ठाव घ्यायचा मी प्रयत्न करत होतो.

ह्या कावधानानी चागलाच बैदा घातलाय, जेवढ कांद काढल तेवढ तर काठल पन नाय अन जेवढ काठल तेव्हढ निट झाकलं पन नाय. ते झाकत बसाव तर घरामागच्या रानातल हारबार तसच पडल्यात. आता ह्या कावधानात काढुन पडल्याल्या हाबा-याचं झाप ऊडुन नसल गेल मन्जी झाल. ते तरी कस दम काढतील, बारीक बारीक झाप घातल्याल, त्याच्याव दगड पन बारीकच ठेवलेली. आज नसती कांद्याला सुरूवात केली तर हारबार करून झाला आसता. हारबारा तरी निवार्याला गेला आसता. आता मशीन नाय मिळाली हाबार्याला आज आन बाया मिळाल्या

कांद्याला. कांद्यांचं तरी काय, दोन रूपड्या किलु खपतुय, पन काढला तर पायजे. थोडा यळ मिळाला आसता तर निट झाकुन कडनी पानी काढुन दिल आसत. मागच्या कावधानात पढविचा पत्र ऊडल्याल, त्याला बांधलय तंभाट्याच्या तारनी, दगड पन ठेवल्यात. यंदा कांद ईकल्याव पढवी निट करावी म्हनल हुत पन, ह्या आवकाळीनी अन कांद्याच्या भावानी, पुरत खिंडीत पकाडल. घराच्या मागच्या पाखावली तीन चार कौल पन फुटल्यात, आन दोन ठाप पन.

पोर शाळतुन आली आसत्यान, आन ह्या कावधानात दरवाजा ऊघडा आसन तर… सगळंच ऊडुन जायच. पोरं… कुठ असतील… काळजात धस्स झाल… परत एक आसोड बैलावर पडला…

कांद्याव घर पन नीट करू अन सोसायटी पन नवी जुनी करू आस वाटल्याल पन….

विहीरीच्या कडच्या टुकड्यातली मका जोरात आलीय, पन ह्या कावधानानी कोलमाडायची, बांधावरच्या आंब्याच्या झाडांना यंदा चांगला मोहर आल्याला, पोरांनी चांगल आंब खाल आसत यंदा पन, आता मोहर टिकतो का अन आंबा लागतो का… यंदा चांगल्या पावसानी मळयच्या वावरातली ज्वीरी पन जोरात हे, कणीस चांगल भरलय… ह्या वार्याच्या सपाट्यात ज्वीरी व्हायची आडवी. वैरणाची गंज सकाळी नीट झाकली नाय, ऊडली नसली मन्जी बर… नायतर जनावारांची आबळ वाढायची. कोंबड्याच्या खुराड्याच काय झाल आसन बर…. दार ऊघड आसन तर… कावधान आत घुसल तर…

झाड पार कावधानानी जमीनी चाटाय बघतत्यात, घरा मागच निलगिरीच झाड…. पडल तर…. मागच्या महिन्यातच कापायला पायजे होत, पन वाटल थोड थांबल तर दोन दांड्या होत्याल… एक कुळवाला अन एक नांगरीला. पन तीच घराव…. तर…पोर घरात…. तर… पुन्हा काळजात धस्स झालं. परत दोन्ही बैलांवर एक एक आसुड पडला. आता तो बैलगाडीत ऊभाच राहीला. घाराकड नजर नुसती लागुन हुती. घर दिसतय का…. समद ठिक आसन का. ही तर आपल्या आधी मळयच्या रानानी निघल्याली, ती पोचली आसन तर आवरल सगळ पन, ह्या कावधानात बरोबरच्या शेरड्या वाफासनार, त्या ईकड तिकड पळाल्या तर…. तीच पन हाल…

आता कावधाना बरोबर टिपक पन पडायला लागल. हि बुरगांट जर जोरात आल तर…. कांद्यांचं पन नुकसान, हारबार्याच पन, ज्वारी पन काढायला आली ती पन आडवी व्हायची.

गुरांच्या गंजीच,

काढलेल्या कांद्यांचं,

सोसायटीच्या हप्त्याच,

कुळवाच्या दांडीच,

पाडव्याला पोरांच्या नव्या कपड्याचं,

बायकु दिवाळीपासुन माग लागल्याल्या पाताळाच, फुटल्याल्या कौलांच,

ऊडाल्याल्या पढवीच्या पत्र्यांच,

आंब्याच्या मोहराच,

ज्वारीच्या कणसांच,

कलांडनार्या मकच…समदच गणित फसणार वाटत…

दार नसन लावल तर साळतुन घरी आलेल्या पोरांचं….

तेवढ्यात विमान जोरात हेलावलं, धावपट्टीवर विमाण लॅन्ड होत होत… मी भानावर आलो…. बैलगाडीतुन पुन्हा विमानात.


Tags:    

Similar News