#युद्ध :त्यांच्याही भूमीत होतं ;आपल्याही भूमीत होतं :डॉ. समीर अहिरे

जगभरातील अनेकांना युद्धज्वर चढला आहे. त्यात भारतीय प्रसारमाध्यमे ही काही मागे नाहीत. त्यावर काही मिम्स तर अशीही फिरत आहेत की रशिया भारतीय प्रसार माध्यम बघून स्वतःची रणनीती ठरवत आहेत, यावर विश्लेषण केलं आहे डॉ. समीर अहिरे यांनी.....;

Update: 2022-03-27 07:57 GMT

रशिया युक्रेन युद्धाचे संकेत मिळताच जगभरात 3 ऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचा अंदाज वर्तवला जाऊ लागला. बघता बघता महिनाभरापासून या दोन्ही देशातील आग विझत नाहीये.आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःच्या आकलन शक्ती प्रमाणे युद्धाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

रशियाने युक्रेन यांत युद्धाची ठिणगी का पडली , कधीकाळचा रशिया चा भाग असलेला , अनेक वर्षे रशियाच्या अधिपत्याखाली असलेला युक्रेन आज आपली सर्व ताकद लावून रशिया विरुद्ध का लढत आहे. NATO देशांनी युक्रेन ला मदत का केली नाही. अमेरिका , युरोप यांची भूमिका नेमकी काय या प्रश्नांच्या उत्तरात या युद्धाची बीजं असल्याचं आपल्या लक्षात येईल.

1 ) रशियातून युरोपला पुरवठा होणार गॅस , पाईपलाईन द्वारे युरोपला पुरवला जातो, ही पाईपलाईन युक्रेन मधून जाते . त्याबदल्यात युक्रेन भाडे स्वरूपात 30 बिलियन डॉलर इतकं भाडं मागत आहे. याआधीचे सरकार हे रशियाच्या अधिपत्याखाली असल्याने अशा प्रकारचे कोणतेही भाडे द्यायची रशियाला गरज नव्हती

2) दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या नाटो या सैनिकी समन्वयावर आधारित संघटनेवर नेहमीच अमेरिकेचा वरचष्मा राहिलेला आहे . या पार्श्वभूमीवर रशियाची कोंडी करण्याच्या दृष्टीने रशियाला अगदी जवळ किंबहुना रशियाचा भाग असलेल्या युक्रेन ला सभासद करून घेण्यास अमेरिका आणि युरोप राष्ट्र आक्रमक असल्याचे दिसून येते .

खरतर नाटो चे सभासदत्व घेण्यासाठी, त्या देशात कोणत्याही प्रकारचा सीमावाद नसावा ही अट आहे आहे . त्याकडे दुर्लक्ष करून रशियाला कोंडीत पकडण्याच्या दृष्टीने अमेरिका युक्रेनला सदस्य करून घ्यायला तयार आहे. तसे झाले तर अमेरिकेला रशियाच्या सीमारेषेवर स्वतःचे सैन्य उभे करण्याची जणू परवानगीच मिळेल. युक्रेन आणि रशियाला बावीसशे किलोमीटरचा सीमा भाग लाभलेला आहे , त्यामुळे रशियाला उक्रेनने नाटो चे सदस्य होणे परवडणारे नाही.

रशिया ही भूमिका अमेरिका आणि नाटो कडे सातत्याने मांडत होती , मागील काही काळातील युक्रेनचा युरोपीय देशांकडे झुकलेला कल रशियाच्या लक्षात येत होता, त्या सर्वांना संदेश देण्याच्या दृष्टीने रशियाने आक्रमकपणे युक्रेनवर हल्ला केला.

रशिया जगातील सर्वात मोठा गॅस पुरवठा करणारा देश आहे तर युक्रेन जगातील दोन नंबरचा गॅस पुरवठा करणारा देश आहे. युरोप देशांना त्यांच्या गरजेच्या तीस टक्के गॅस पुरवठा हा रशियाकडून पुरवला जातो. तर 20 टक्के ऑइल पुरवठा हा देखील रशियाकडून केला जातो . या पार्श्वभूमीवर रशियावर कोणत्याही प्रकारची बंधने लादण्यात अमेरिका , युरोप सहित जगातील सर्वच देशांना मर्यादा येत असल्याचे लक्षात आले आहे.

भारतात आपण कितीही अफवा उठवत असलो की भारतासाठी रशियाने 6 तास युद्ध बंद ठेवलं ( तसं काही झालं नसल्याचं स्पष्टीकरण स्वतः भारतीय संरक्षण मंत्रालयाने दिलं आहे ) पासून तर पुतीन यांनी मोदींचा फोन उचलला असता तर युद्ध झालं नसत पर्यंत , तरी भारताला या युद्धापासून तटस्थपणाची ( नेहरूंपासून घेत असलेली ) भूमिका घेण्याशिवाय पर्याय नव्हता , हे ही तेव्हडचं खरं .

भांडवलशाही उत्पादनाच्या साधनांवर स्वतःची मक्तेदारी राहील याकडे कटाक्षाने लक्ष देते , त्यासाठी स्वतःच्या देशाची बाजारपेठ कमी पडायला लागल्यावर इतर देशांविषयी जगभरात गैरसमज निर्माण करून त्यावर वेगवेगळ्या माध्यमातून हल्ले चढवतात , त्याचा परिणामी अशी यादवी युद्ध करावी लागली तरी ते मागेपुढे पाहत नाही. युद्ध करणं , देश किंवा देशाचा काही भाग ताब्यात घेणं अथवा त्या देशात शांततेच्या नावाखाली सैन्य घुसवण हा प्रकार आता नवीन राहिलेला नाही . राजकीय नेते स्वतःची प्रतिमा पणाला लागल्याप्रमाणे सैन्य आणि नागरिकांना भावनिक आवाहन करतात . राष्ट्रवादाची फसव्या मांडणीने सगळेच युद्धज्वराने सैन्यासहित नागरिक ही पछाडले जातात. मीडिया तावातावाने युद्धा चे update देत राहून वातावरण तापत ठेवतो , प्रसंगी इतर देशांना युद्धात ओढण्याचा प्रयत्न करतो . त्यांना मिळालेली ही संधी गमवायची नसते.

या सर्व परिस्थितीत मात्र , ज्या देशात युद्ध होत असतं तिथल्या नागरिकांना अनेक पिढ्या युद्धाचे परिणाम सहन करावे लागतात. मनुष्यबळापासून संपत्तीचं झालेलं नुकसान भरून यायला अनेक पिढ्यांना खपावं लागतं. जगभरातील अनेक देशात अनिश्चितता , महागाई आणि संसाधनांची कमतरता निर्माण होते. भारत म्हणून आपण तर भारताचं भविष्य असलेले 2 भावी डॉक्टर गमावले. हे नुकसान भरून निघणारं नसतं. याचं भान ज्यांच्या रक्तात युद्धज्वराने adrenalin संप्रेरित झालेलं असतं त्यांना नसतं.

त्यामुळे जर उद्या आपल्यावर वेळ आलीच की आपण कोणाच्या बाजूने आहोत आणि कोणाच्या विरोधात , तर आपण नक्कीच नागरिकांच्या बाजूने आणि युद्धाच्या विरोधात उभं राहण्याचा निर्णय घ्यावा.

कारण

#युद्ध

त्यांच्याही भूमीत होतं

आपल्याही भूमीत होतं,

#नुकसान

त्यांचंही होतं

आपलंही होतं

#दुःख

तिथेही होतं

इथेही होतं

#शाळा

तिथल्या ही बंद होतात

इथल्या ही बंद होतात

#दवाखाने

तिथले ही विव्हळतात

इथले ही विव्हळतात

#पेठा

त्यांच्या ही तापतात

आपल्या ही तापतात

#पिढ्या

त्यांच्याही बरबाद होतात

आपल्याही बरबाद होतात

#इमले

तिथले ही कोसळतात

इथले ही कोसळतात

#उन्माद

तिथे ही चढतो

इथे ही चढतो

#सैनिक

त्यांचे ही मारले जातात

आपले ही मारले जातात

#संधी

तिथले ही संधीसाधू साधतात

इथले ही संधीसाधू साधतात

मग हळूहळू सगळं शांत होत

श्रेयवादाचं जोरदार पीक येतं

प्रश्न तसेच रहातात

तिथेही आणि इथेही

#युद्ध

त्यांच्याही भूमीत होतं

आपल्याही भूमीत होतं

डॉ. समीर अहिरे ,

नाशिक.

Tags:    

Similar News