जागतिक तंबाखू विरोधी दिन: व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प करु
दरवर्षी 31 मे रोजी “जागतिक तंबाखू विरोधी दिन” जगभरात जनजागृतीसाठी साजरा केला जातो, दरवर्षी लाखो लोक तंबाखू सारख्या घातक विषामुळे अकाली वेदनादायक मृत्यूमुखी पडतात, लहानांपासून तरूण, वृद्धांपर्यंत या घातक विषाचा विळख्यात अडकलेले दिसतात. याच गंभीर विषयावरील हा विशेष लेख
आपल्या समाजात आणि देशात तंबाखूचे विष सतत पिढ्यानपिढ्या नष्ट करून त्यांना वेदनादायी मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे करत आहे. आश्चर्य म्हणजे की तंबाखूसारखे मादक घातक विष आपल्या आजूबाजूला अगदी सहज उपलब्ध आहे. लहान मुलांपासून तरूण, महिला, वडीलधारी मंडळी तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी गेली आहेत. घर-ऑफिस असो, चौक, बाजार, कार्यालय, संस्था किंवा इतर कोणताही परिसर, अनेक लोक तोंडात तंबाखू दाबताना किंवा सिगारेट फुंकताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी असतानाही लोक नियम मोडतात. सध्या शहरांमध्ये ई-सिगारेटचा ट्रेंड सुरू झाला असून, त्याकडे नवीन पिढी आकर्षित होत आहे. तंबाखूचे सेवन बीडी, सिगारेट, हुक्का, सिगार, चुटा, धुमटी, चिलम, चिरूट, गुटखा, खैनी, जर्दा, खर्रा, तंबाखू पान मसाला, तंबाखूची सुपारी, मावा, स्नूस, मिश्री, गुल, स्नफ व इतर स्वरुपात करण्यात येतो. तंबाखू जाळल्यावर त्या धुरातून निघणारी अनेक विषारी रसायने आणि संयुगे मानवी शरीरासाठी हानिकारक असतात. तंबाखूतील निकोटीन हे हेरॉइन, कोकेन आणि अल्कोहोलसारखे व्यसन आहे, ते काही सेकंदात मेंदूपर्यंत पोहोचते. धूम्रपान केल्याने फुफ्फुसांचे नुकसान होते, स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि तग धरण्याची क्षमता देखील कमी होते. निकोटीन व्यतिरिक्त, तंबाखूमध्ये अमोनिया, आर्सेनिक, कार्बन मोनोऑक्साइड, टार, नॅप्थालीन, किरणोत्सर्गी संयुगे, हायड्रोजन सायनाइड, शिसे, कॅडमियम, मेन्थॉल यांसारखे विषारी घटक असतात. तंबाखू मानवी शरीराला जीवघेण्या आजारांकडे ढकलते.
तंबाखूमुळे वेदनादायक रोगांची निर्मिती :- धूम्रपान करणारे इतरांपेक्षा १३-१४ वर्षे आधी मरतात. दरवर्षी, एचआयव्ही/एड्स, बेकायदेशीर ड्रग्स, आत्महत्या, हत्या, रस्ते अपघात आणि आगीमुळे एकत्रितपणे जितके लोक मरतात, त्यापेक्षा जास्त लोक तंबाखूमुळे मरतात. दररोज २८०० आणि दरवर्षी १ दशलक्षांहून अधिक भारतीय तंबाखूजन्य आजारांमुळे अकाली जीव गमावतात. २०११ मध्ये भारतात ३५-६९ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी तंबाखूच्या सेवनामुळे होणारे सर्व रोगांचे एकूण आर्थिक खर्च १,०४,५०० कोटी रुपये होते. धूम्रपान करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता २०-२५ पट जास्त असते, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता २-३ पट जास्त असते, अचानक मृत्यू होण्याची शक्यता ३ पट जास्त असते, स्ट्रोक येण्याची शक्यता २ पट जास्त असते, श्वासोच्छवासाचा त्रास होण्याची शक्यता ३ पट जास्त असते. तंबाखूच्या दीर्घकाळ वापरामुळे फुफ्फुस, तोंड, ओठ, जीभ, अन्ननलिका, घसा आणि मूत्राशयाचा कर्करोग होऊ शकतो. तंबाखूचा धूर ७० कर्करोगास कारणीभूत घटकांसह हे ७,००० हून अधिक रसायनांचे जटिल मिश्रण आहे. जागतिक स्तरावर, दरवर्षी ६,००,००० मृत्यू सेकंड हँड स्मोक मुळे होतात. सेकंड हँड स्मोक म्हणजे व्यक्ती स्वतः धूम्रपान करत नाही परंतु दुसऱ्याचा धूम्रपान द्वारे निर्मित धुराचा संपर्कात आल्याने जीवघेण्या आजारांनी ग्रासतात. जगातील जवळपास निम्मी मुले तंबाखूच्या धुरामुळे प्रदूषित हवेत श्वास घेतात.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार मुख्य तथ्ये :- तंबाखू वापरणाऱ्यांपैकी निम्म्याचा मृत्यू होतो. प्रत्येक सिगारेट ८ ते ११ मिनिटांनी आयुष्य कमी करते. तंबाखूमुळे दरवर्षी ८० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी ७० लाखाहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे झाले आहेत तर सुमारे १२ लाख मृत्यू हे धुम्रपान न करणाऱ्यांचे सेकंडहँड धुरांच्या संपर्कात आल्याने होतात. जगातील १३० कोटी तंबाखू वापरकर्त्यांपैकी ८०% पेक्षा जास्त लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. २०२० मध्ये, जागतिक लोकसंख्येच्या २२.३%, पुरुषांपैकी ३६.७% आणि महिलांपैकी ७.८% तंबाखूचा वापर करतात. तंबाखूमुळे भारतात दरवर्षी सुमारे १३.५ लाख लोकांचा मृत्यू होतो, म्हणजे दररोज सरासरी ३६९९ मृत्यू, दर तासाला १५४. तंबाखूच्या हानिकारक परिणामांमुळे दर ५ पैकी १ पुरुषाचा मृत्यू होतो.
देशातील तंबाखूपासून उध्वस्त स्थिती :- इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने जारी केलेल्या राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम अहवाल २०२० नुसार, देशातील सर्व कर्करोगाच्या २७% प्रकरणांसाठी तंबाखू जबाबदार आहे. ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया २०१६-१७ नुसार, भारतात सुमारे २६.७ कोटी प्रौढ तंबाखू वापरकर्ते आहेत. २०१७-१८ मध्ये भारतात ३५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या सर्व आजारांमुळे एकूण आर्थिक खर्च रु. १,७७,३४१ कोटी होता. देशाच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणच्या नॅशनल फॅक्ट शीट ग्लोबल यूथ टोबॅको सर्व्हे (जीवाईटीएस-४) २०१९ नुसार, १३-१५ वयोगटातील सुमारे पाचवा भाग त्यांच्या आयुष्यात तंबाखूजन्य पदार्थ वापरतात. तंबाखू सेवनाचे प्रमाण मुलांमध्ये ९.६% आणि मुलींमध्ये ७.४% आहे. तंबाखूच्या धूम्रपानाचे प्रमाण ७.३% आहे. धूरविरहित तंबाखूजन्य उत्पादनांच्या बाबतीत, त्याचे प्रमाण ४.१% आहे. विद्यार्थ्यांमध्ये ई-सिगारेटचा वापर २.८% आहे. या राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये सध्याचा तंबाखू वापराची टक्केवारी अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम (प्रत्येकी ५८%) ते हिमाचल प्रदेश (१.१%) आणि कर्नाटक (१.२%) आहे. भारतात तंबाखूची एकूण किंमत सकल देशांतर्गत उत्पादन च्या १.०४% च्या बरोबरीचे आहे आणि डब्ल्यूएचओ ने प्रकाशित केलेल्या एक संशोधनानुसार, तंबाखूशी संबंधित आजारांच्या उपचारांवर थेट आरोग्य खर्च हा भारतातील एकूण वार्षिक खाजगी आणि सार्वजनिक आरोग्य खर्चाच्या ५.३% आहे.
जागरूकता आणि समजूतदारपणामुळे बहुमोल जीव वाचेल :- व्यसन फक्त नाश करते, मग ते कोणतेही असो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला गंभीर आजारांमुळे आपला जीव गमवावा तर लागतो, पण त्या धुराच्या संपर्कात आलेले कुटुंबीय किंवा तिथे श्वास घेणारे इतर लोकही जीवघेण्या आजारांच्या विळख्यात येतात. तंबाखू मानवी शरीराला आतून पूर्णपणे पोकळ बनवून कमकुवत करते, शरीर बिघडवून, वेदनादायक घातक रोगांनी अकाली वेदनादायक मृत्यूच्या तोंडात टाकते. यापैकी बहुतेक रोगांवर उपचार खूप महागडे असतात, उपचारासाठी जमा झालेले भांडवल खर्च करून, कर्जाच्या ओझ्याखाली येवून देखील अनेक वेळा या आजारांपासून सुटका होत नाही. गुदमरून आपण आपले अनमोल आयुष्य संपवत आहोत. तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागरूकता, इच्छाशक्ती आणि समज. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम भारत सरकारद्वारे चालवला जातो. तंबाखू सोडण्यासाठी नॅशनल टोबॅको क्विट लाइन सर्व्हिसेसच्या टोल फ्री क्रमांक १८०० ११२ ३५६ वर कॉल करा किंवा ०११-२२९०१७०१ या क्रमांकावर मिस कॉल देऊन तात्काळ मदत मिळवू शकता. आज देशाचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या पिढीला तंबाखूच्या विषापासून वाचवायचे आहे. मुलांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी पालक आणि शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. नशा करू नका आणि इतरांना व्यसनमुक्तीसाठी प्रेरित करा. आपले आणि आपल्या प्रियजनांचे जीवन आनंदी करण्यासाठी, व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प करा.
डॉ. प्रितम भि. गेडाम
मोबाईल आणि व्हॉट्सअॅप क्र. ०८२३७४ १७०४१
prit00786@gmail.com