अमोल कोल्हे यांचे समर्थन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरोगामित्व : खासदार हवा की विचारसरणी ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांच्या भूमिका करण्याचे समर्थन करून त्यांना पाठीशी घातले आहे हे अत्यंत संतापजनक आणि निराशाजनक आहे. त्यासाठी त्यांनी जे युक्तिवाद केले आहेत ते तर अतिशय हास्यास्पद आहेत.
गांधी चित्रपटातही नथुरामची भूमिका असते. रामाच्या चित्रपटातही रावणाची भूमिका असते, असे ते युक्तिवाद आहेत. गांधी चित्रपट गांधी या व्यक्तीच्या उदात्तीकरणासाठी निर्माण झालेला होता व नथुरामचा संपूर्ण चित्रपटातला वावर हा अक्षरशः दोन मिनिटांचा होता, हे शरद पवारांना सांगायला हवे का ? राम आणि रावणाची उदाहरणे त्यांनी घ्यावीत याला काय म्हणावे ? रावण आणि नथुराम यांची तुलनाच होऊ शकत नाही. नथुराम हे या देशातील संविधानातील मूल्यांना आव्हान देणारे पात्र झाले आहे. गांधी विचार हा या देशातील भारतीय संस्कृती उदारमतवाद आणि भारतीय संविधानातील मूल्य यांचे प्रतिक आहे. त्या मूल्यांना संपवणारी प्रवृत्ती ही नथुराम प्रवृत्ती आहे. ती केवळ इतिहासापुरतीच राहिली असती तरी या चित्रपटाला आक्षेप घेतला नसता. परंतु ती प्रवृत्ती पुन्हा जिवंत करण्याचे आणि संघटित करण्याचे प्रयत्न भारतीय राजकारणात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कलेच्या क्षेत्रातून नथुरामचे नाटक, चित्रपटातून उदात्तीकरण करणे सुरू आहे. या चित्रपटाचा नायक नथुराम आहे व तो त्याची बाजू संपूर्ण चित्रपटात मांडतो आहे. हे नुसत्या नावावरून कळते. हे शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या व्यक्तीला कळत नसेल का..? रावणाची भूमिका ही काही आज या देशाच्या राजकारणावर थेट परिणाम करणारी नाही पण नथुराम हा या देशातील संविधानाला आव्हान देणारी शक्ती होत असताना त्याचे उदात्तीकरण सर्व अर्थांनी मोडून काढले पाहिजे.
तुमचा जर नथुरामच्या काम करण्याला विरोध नसेल तर मग शरद पोंक्षे आणि मी नथुराम बोलतोय या नाटकाला विरोध का केला ? तिथेही त्याच्या अभिनयाला दाद का दिली नाही ? तेव्हा तिथे पुरोगामी मार्क घ्यायचे आणि इथे मतदारसंघ वाचवायचा ही राजकीय दांभिकता आहे. एक मतदार संघ वाचवायचा की आपली विचारधारा वाचवायची ? या दोन पर्यायात शरद पवार यांनी राजकारणाला कौल दिला आणि आपल्या पक्षाचे पुरोगामित्व किती वरवरचे आहे, याचा साक्षात्कार दिला. यापुढेही त्यांचे चाहते आणि महाराष्ट्रातील बुद्धिवादी पत्रकार त्यांना पुरोगामी समजणार असतील तर त्यांनी जरूर समजावे.
यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरोगामित्वाची ही चर्चा करायला हवी. हा पक्ष नेमका कोणत्या अर्थाने पुरोगामी आहे ? लोकशाहीवादी व उदारमतवादी आहे ?
१)महाराष्ट्राच्या राजकारणात जनसंघ व भाजपा ला कधीच मान्यता मिळाली नाही पण १९७८साली शरद पवार यांनी पुलोद सरकार मध्ये जनसंघाला घेतले व १९८५ च्या निवडणुकाही भाजपा ला सोबत घेऊन लढवल्या त्यातून आजचा भाजप विस्तारला आहे हे कटू सत्य नाकारता येणार नाही. अन्यथा महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपला कधीच स्थान दिले नव्हते याचे राष्ट्रवादी काय समर्थन करणार आहे ? केवळ त्यावेळी हिंदुत्व बाबत भाजप फार आक्रमक नव्हता असे स्पष्टीकरण देऊ शकतील परंतु बाबरीचा विध्वंस आणि नंतरच्या काळात गुजरातमधील क्रूर नरसंहार व त्याचे समर्थन करणाऱ्या पक्षाला २०१९ च्या निवडणुकीत मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला होता. हे कसे विसरता येईल ? त्यात नेमके कोणते पुरोगामित्व होते ?
२) अजितदादांनी बंड केले.भाजपसोबत सरकार बनवले. नंतर माघार घेतली. पण तरीही त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले गेले म्हणजे ते पारितोषिक ठरले. हे जर समजा पक्षाच्या दुसऱ्या आमदारांनी केले असते असे पद दिले असते का? व हे पद देणे म्हणजेच त्यांनी केलेल्या बंडाविषयी कोणतीच तक्रार नाही. असा होत नाही का हा प्रश्न पुरोगामी पक्षाला पडला नाही.
३)इतरही अनेक बाबतीत त्यांचे वागणे हे धक्कादायक असते. जितेंद्र आव्हाड यांनी बंगल्यावर विकृत करमुसे यांना केलेली मारहाण हा पक्ष नेतृत्वाला दखल घेणारा मुद्दा वाटला नाही. करमुसे यांनी किती नीच पद्धतीने लिहिले. याबद्दल संताप व्यक्त केला पाहिजे पण शिक्षा करण्याचा अधिकार पोलिसांना आहे की मंत्र्याला ? आणि त्या मारहाणीला जर समर्थन करायचे असेल तर या देशातल्या सर्वोच्च झुंडशाहीचे समर्थन करावे लागेल पण असे बोलले की तुम्ही विकृतीचे समर्थक आहात का ? असे विचारले जाते.
४) तीच गोष्ट धनंजय मुंडे यांच्या बाबतीत घडली. मुंडे यांच्या दोन लग्नाची. पक्षाला किंचितही धक्का बसला नाही उलट तो व्यक्तिगत प्रश्न अशाप्रकारे निकालात काढला गेला तेही एकवेळ समजण्यासारखे आहे पण त्यांची पहिली पत्नी जेव्हा परळी मध्ये गेली. ज्याप्रकारे नामोहरम करण्यात आले. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तुरुंगात बसवले गेले. एका महिलेला असे वागवले गेले याबाबत पक्षाला काहीच खटकलं नसेल का ? या पुरोगामित्वाच्या नेमक्या कक्षा काय आहेत ?
५) अभिव्यक्तिस्वातंत्र्य ची भाषा हा पक्ष बोलतात पण उदय निरगुडकर यांच्यासारख्या पत्रकाराचा बळी कोणी घेतला.याची चर्चा आता करायला हवी. उदय निरगुडकर यांनी शरद पवार यांची घेतलेली मुलाखत होती.त्यात मोदी यांनी राफेल मध्ये पैसे घेतले असतील असे मला व्यक्तिगत वाटत नाही असे विधान केले. त्याची निरगुडकर यांनी हेडलाईन केल्यानंतर अवघ्या काही दिवसात निरगुडकर यांच्या हकालपट्टी झाली हा योगायोग आहे का ?यामागचा घटनाक्रम एकदा समजून घेतला म्हणजे यांचे विचारस्वातंत्र्य कळेल.. आपल्या विरोधी बोलणाऱ्या व्यक्तीला अशा पद्धतीने संपादक पदावर घालवणे हे यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रेम आहे.
६) साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट पोसण्यात आणि निवडणुका महाग करण्यात दिलेले योगदान हा तर पोस्टचा नाही तर पुस्तकाचा विषय आहे
असे लिहीले की हमखास जात काढायची. आडनावावर घसरायचे किंवा छुपे संघीय म्हणून भाजपच्या शिक्का मारून टाकायचा पण मूळ प्रश्नावर मात्र बोलायचे नाही. आपल्याकडे होते असे आहे की पुरोगामित्वाचा प्रतिनिधित्व आपण अशा व्यक्तींना अशा पक्षांना देतो आणि मग ते पक्ष जे करतील त्याला दुर्दैवाने पुरोगामित्व म्हणावे लागते राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुरोगामीबाबत अशीच फसगत होते आहे का ?
हेरंबकुलकर्णी