ते नेते..ते दिवस: मधुकर भावे

जो देश किंवा जे राज्य, आपल्या पूर्वसूरीनी केलेला त्याग आणि त्यांचे समर्पण विसरतो ती कृतघ्नता ठरते. महाराष्ट्राने कृतघ्न होऊ नये. कृतज्ञ रहावे. जमेल तेवढी कृतज्ञता जपावी यासाठी उद्या आचार्य अत्रे पुण्यतिथी निमित्ताने मराठी पत्रकार संघात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, त्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी..;

Update: 2022-06-12 03:05 GMT

१३ जून १९६९ ला रात्री ८ वाजता अत्रे साहेबांनी के.ई.एम. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आचार्य अत्रे यांची ५३ वी पुण्यतिथी १३ जूनला आहे. जन्म १३ अॅागस्ट १८९८ चा. मृत्यू तारीख १३ जूनचीच. १३ जूनला पुण्यतिथी-दिन साजरा होईल.

अत्रेसाहेब गेले त्या रात्री ११ वाजता ग. दि. माडगुळकर यांच्या माहिम येथील घरी जाऊन अत्रे साहेबांवर कविता आणली होती. रात्री ११ वाजता उभ्या-उभ्या अण्णांनी चार ओळी सांगितल्या होत्या. त्या अशा होत्या.

'सर्वांगाने भोगी जीवन

तरीही ज्याच्या उरी विरक्ती

साधूत्वाचा गेला पूजक

खचली-कलली श्री शिवशक्ती....'

१४ जून १९६९ च्या मराठात पहिल्या पानावर हि कविता छापली होती. अत्रे साहेबांच्या पुण्यतिथीची महाराष्ट्र फार दखल घेत नाही. १३ ऑगस्ट जयंतीदिनी वरळी येथील आचार्य अत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ १००-२०० लोकं जमतात. तेही अलिकडे १०-१२ वर्षे. १९६९ नंतर जवळजवळ १९९५-९६ पर्यंत आम्ही अत्रे परिवारातील सदस्यच पुण्यतिथी साजरी करत होतो. जयंतीदिनाला वरळीच्या अर्ध पुतळ्याजवळ ५-२५ लोकं जमायचे. हा पुतळाही मोठ्या प्रयत्नाने वरळीच्या पेट्रोपलंपाजवळ बसवला गेला. 'दैनिक सकाळ'चे त्यावेळचे संपादक माधव गडकरी, माजी महापौर बाबुराव शेटे यांनी पुढाकार घेतला. पुढे १९९५ साली युतीचे सरकार आले आणि बाळासाहेब ठाकरे यांनीच पुढाकार घेवून आजचा वरळी नाक्यावरचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला. त्याचे आणखी एक श्रेयकरी श्री. प्रमोद नवलकर हे आहेत. त्यावेळी ते सांस्कृतिक कार्यमंत्री होते. पुतळ्याचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तेच झाले होते. त्यानंतर १३ जूनला स्मृतिदिनाला ५-१० लोकं येतात आणि भक्तीभावाने हार घालतात. अनेक १३ जून तर मला असे आठवतात की, मी आणि छायाचित्रकार मोहन बने दोघेच असायचो.

मिडास राजाच्या स्पर्शाने हात लागेल त्या वस्तूचे सोने व्हायचे, अशी गोष्ट आहे. ते बघायला कोणी गेलेले नाही. पण आचार्य अत्रे यांचा मला स्पर्श झाला आणि माझ्या आयुष्याचे सोने झाले, अशी माझी भावना आहे आणि ती कायम जपली आहे.

'मराठा'नंतर योगायोगने 'लोकमत'श्री. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांनी संधी दिली. मला संपादक केले. आणि इंदिराजी गांधी आणि राजीव गांधी यांच्यापर्यंत बाबुजींमुळेच पोहोचता आले. लोकमतमधील ३४ वर्षे पत्रकारितेच्या कामाचा प्रचंड आनंद, समाधान आणि स्वातंत्र्य मिळालेली होती. बाबूजींची जन्मशताब्दी येणाऱ्या २ जुलै २०२२ रोजी सुरू होत आहे.


 



अत्रेसाहेब गेल्यानंतर दुर्दैवाने 'मराठा' बंद पडला म्हणण्यापेक्षा, तो बंद पडेल, अशी व्यवस्था निर्माण केली गेली. ती एक फार भयानक कादंबरीचाच विषय आहे. कामगारांचा संप घडवून आणला गेला. अत्रेसाहेबांच्या भोवतीच वावरणाऱ्या डाव्या कम्युनिष्ट कामगार संघटनांच्या नेत्यांनीच तो घडवला. 'बँक ऑफ महाराष्ट्र'चे कर्ज वाढत गेले. त्यातच आचार्य अत्रे यांचे खोटे मृत्यूपत्र जाहीर करण्यात आले. तेही भयानक नाटकच होते. त्यातही जे लोक सामील होते, तेही अत्रेसाहेब असतांना, सतत त्यांच्याभोवतीच होते. माणसांचे दाखवायचे चेहरे आणि लपलेले चेहरे किती वेगळे असू शकतात, त्याचा अनुभव त्या काळात आला. त्या सर्व काळात श्रीमती शिरीष पै (आचार्य अत्रे यांच्या कन्या) आणि श्री. व्यंकटेश पै यांनी १९६९ ते १९७४ अशी ५ वर्षे 'मराठा' त्याच हिंमतीने चालवला. कामगार संपामुळे शेवटी 'मराठा' बंद करावा लागला. पण इतिहास याचा साक्षीदार आहे की, पै दाम्पत्याने कठीण आर्थिक परिस्थितीत एकाही कामगाराची पै बुडवलेली नाही. 'पै आणि पै'चा हिशोब करून पै दाम्पत्याने सर्व कामगारांची देणी चुकती केली. त्यावेळी त्यांच्या मानसिक त्रासाची कोणी कल्पना करू शकणार नाही. अशा भावनात्मक विषयावर अत्रेसाहेबांसारख्या महान नाटककाराच्या संस्थेतच किती भयानक नाट्य घडले होते! न्यायमूर्ती तुळजापूरकर यांनी 'ते मृत्यूपत्र खोटे आहे', असा निर्णय दिला. पण तिथपर्यंत जीवनातील उमेद, पैसा आणि वेळ अनेक वर्षे बरबाद झाली होती. न्यायालयाचा तो निर्णय मात्र शिरीष पै आणि व्यंकटेश पै यांच्या किंचित समाधानाचा होता. 'मराठा' बंद पडल्याचे दु:ख होतेच. हा सगळा इतिहास ४ दिवस डोळ्यांसमोर येत आहे.

तो 'मराठा', ती चळवळ, ते मोर्चे, त्या घोषणा, अत्रेसाहेबांचे घणाघाती अग्रलेख, घणाघाती सभा, महाराष्ट्रभरचे दौरे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०६ हुतात्म्यांचे बलिदान,  सर्वपक्षीय नेत्यांचे एकत्र येऊन ते महाआंदोलन, लाखालाखांचे मोर्चे, महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर या राज्याचे 'मुंबई राज्य' हेच नाव ठेवण्याचे कारस्थान या सर्व सहा वर्षांत अत्रेसाहेबांनी केलेले प्रचंड कष्ट, प्रवास, रात्र-रात्र जागरणं, आज कोणतीही सभा १० वाजता संपवावी लागते. त्यावेळच्या सभा पहाटे ३ वाजेपर्यंत चालायच्या... एका रात्रीत तीन-तीन सभा व्हायच्या. हे आज कोणाला खरे वाटणार नाही. एक सभा सुरू करून, पुढच्या सभेसाठी दोन वक्ते आधी जायचे. ती सभा सुरू व्हायच्या अगोदर अमरशेख यांचा डफ कडाडायचा. माईक नसायचा. पेट्रोमॅक्सची बत्त्तीही अनेक गावांत नसायची. तीन-तीन कंदिल लावून खेड्यांपाड्यांत अमरशेख यांच्या सभा झाल्या. लाखो माणसांपर्यंत त्यांचा पहाडी आवाज पोहोचत होता. एखादा माणूस रक्त ओकला असता. त्यांच्या जोडीला शाहीर आत्माराम पाटील, शाहीर गजाभाऊ बेणी, शाहीर जंगम, अमरशेख यांच्या मागे जैनू शेख, केशर जगताप आणि त्यांचे कलापथक, बाजुला अण्णाभाऊ साठे. सारा महाराष्ट्र घुसळून काढण्याची ताकद त्यावेळच्या नेत्यांमध्ये होती. स्वत:ला काही मिळवण्यासाठी यापैकी कोणाही नेत्यांनी काहीही केलेले नाही. काहीही मागितलेले नाही. त्यांना काही मिळालेले नाही. या चार शाहिरांची तर आयुष्यभर फरफट झाली. अमरशेख आणि अण्णाभाऊ साठे यांना 'महाराष्ट्र भूषण' या सन्मानाने गौरवित करावे, असेही कोणत्या सरकारला वाटले नाही आणि आजच्या 'रिक्षा सरकार'लाही तसे वाटत नाही. निदान उद्धवसाहेबांनी तरी- त्यांचे घराणे लढ्यात अग्रभागी होते म्हणून- अमरशेख आणि अण्णाभाऊ यांचा सन्मान करावा, एवढी माफक अपेक्षा आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद ही शहरे घुसळून काढणारे अत्रे, डांगे, एस. एम, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, ग्रामीण भाग घुसळून काढणारे उद्धवराव पाटील, एन. डी. पाटील, बापू लाड, क्रांतिसिंह नाना पाटील, दादासाहेब गायकवाड, भैय्यासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर यांचे पिताश्री) माढ्याचे एस. एम. पाटील, सांगलीचे भगवानराव सूर्यवंशी, नाशकात विठ्ठलराव हांडे, मराठवाड्यात वि. घ. देशपांडे, महिलांमध्ये पुढाकार घेणाऱ्या अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, तारा रेड्डी... सारा महाराष्ट्र पिंजून निघाला होता.

आज अत्रेसाहेब डोळ्यांसमोर येतात. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी 'साहित्यिक अत्रे' यांनी आपली लेखणी मोडून टाकली आणि पत्रकाराच्या लेखणीचा हातोडा करून महाराष्ट्राच्या शत्रूंवर त्यांनी घाव घातले. त्यावेळची 'मराठा'ची शिर्षके आज डोळ्यांची बिबुळं बाहेर येतील, ऐवढी जहाल होती. पण ती महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी होती. आजच्या वृत्तपत्रांत स्वत:च्या समर्थनासाठीच अशी शिर्षके आहेत. धाडींचे समर्थन केले जात आहे. कोणी बाप काढतोय. कोणी फाट्यावर मारण्याची भाषा करतो. त्यावेळची भाषा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण करण्याच्या विरोधात असलेल्या मराठी विरोधकांवर होती. म्हणूनच मोरारजी देसाई यांनी 'गोळी मारा.... मरेपर्यंत मारा...' (शूट अॅट साईट... अॅण्ड शूट टू किल...) म्हणूनच अत्रेसाहेबांनी मोरारजी देसाईंना संतापून 'नरराक्षस' म्हटले. १०६ हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे. तो सगळा इितहास ज्यांनी निर्माण केला त्या लढ्याचे मुख्य सेनापती आचार्य अत्रे हेच होते. त्यासाठी त्यांनी साहित्याची लेखणी मोडली. सहा वर्षे त्यांनी एकही नाटक लिहले नाही. (१९५५ ते १९६१)

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर आचार्य अत्रे यांच्यातला 'नाटककर' पुन्हा जागा झाला. आणि मग 'तो मी नव्हेच...', 'डॉ. लागू', 'प्रितीसंगम', अशी बहारदार नाटकं रंगभूमीवर आली. त्या अगोदरचे नाटककार अत्रे... ज्यांनी नाट्यभूमी जगवली. 'साष्टांग नमस्कार', 'घराबाहेर,' 'उद्याचा संसार', 'जग काय म्हणेल', 'मोरूची मावशी', 'पाणिग्रहण' अशी महान नाटकं दिली. आणि, त्याचवेळी खिशात पाच रुपयेही नसताना चित्रपटसृष्टीत उभे राहून ज्यांनी इतिहास घडवला.... 'श्यामची आई' या महान चित्रपटाला राष्ट्रपतींचे पहिले सुवर्णपदक अत्रेसाहेबांनी मिळवले. ही गोष्ट सोपी नव्हती. त्यावर्षीच्या स्पर्धेसाठी तीन चित्रपटांची निवड झाली होती. त्यातला पहिला चित्रपट होता... बिमल रॉय दिग्दर्शित प्रख्यात चित्रपट 'दो बिघा जमीन...', दुसरा चित्रपट होता सोहराब मोदी दिग्दर्शित 'झाँशीची रानी' आिण तिसरा चित्रपट होता... आचार्य अत्रे दिग्दर्शित 'श्यामची आई'.... सात राष्ट्रीय परिक्षकांत एकही मराठी परिक्षक नव्हता. तीन हिंदी, दोन बंगाली आणि दोन मध्ये एक उडीया... आणि एक परिक्षक मंडळाचे अध्यक्ष... तेही बिगर मराठी. आणि निवड झाली ती 'श्यामची आई' या चित्रपटाची. त्यावेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सुवर्णपदक अत्रेसाहेबांच्या गळयात घातले.... मराठी माणसांचा तो सर्वोच्च सन्मान होता. पण संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाल्याबरोबर अत्रेसाहेबांच्या अंगात छत्रपती शिवराय आणि राणाप्रताप यांचे सामर्थ्य प्राप्त झाले. दोन हातांत दोन दांडपट्टे घेवून एखाद्या यौध्याने घोड्यावर मांड ठोकावी, त्या दिमाखात अत्रेसाहेब लेखणीची आग ओकत होते. आणि वाणीतून तोफगोळे सोडत होते. त्यामुळेच शिवाजी पार्कमधील एक-एक सभा लाखा लाखांची होत होती. एरव्ही श्रोत्यांना हसवून शब्दांचा हास्यस्फोट करणारे अत्रेसाहेब, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात किती प्रखर आग ओकत होते....

'अन्यायाने संतप्त झालेल्या तीन कोटी मराठी जनतेला वाघनखं फुटतील आणि द्विभाषकाचा कोथळा बाहेर काढला जाईल..' हे शिवाजी पार्कवरील सभेतील त्यांचे वाक्य राणाप्रतापाच्या टोकदार भाल्यासारखे छातीत आजही घुसल्यासारखे वाटते. ते अत्रेसाहेब समोर असे उभे राहतात. त्यांचा शब्द न् शब्द आठवतो.... ते अग्रलेख आठवतात... आग ओकणारे आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर तेच अत्रेसाहेब... 'आषाढस्य प्रथम दिवसे'.... 'आम्ही जिंकलो आम्ही हारलो'... 'असा गंधर्व पुन्हा न होणे'.... असे नितांत सुंदर अग्रलेख लिहितात...

आज हे सगळे आठवते आहे... तो लढा आठवतो आहे. ते सगळे नेते आठवत आहेत... त्या लढ्यातील सगळे मोठे नेते पाहता आले... क्रांतिसिंह नाना पाटील यांना 'मराठा'त घेऊन येता आले. अत्रेसाहेबांकडे येताना ते मला म्हणाले.... 'अहो, 'क्रांतीसिंह' ही पदवी मला तुमच्या अत्रेसाहेबांनीच दिली.... ' तुकडोजी महाराज मुंबई रुग्णालयात आजारी होते. अत्रेसाहेबांनी शुभेच्छांचा गुच्छ देवून माझ्यासारख्या छोट्या पत्रकाराला महाराजांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांची अंत्ययात्रा कव्हर करायला अत्रेसाहेबांनी मला मोझरीला (अमरावती) महाराजांच्या आश्रमात पाठवले.... एखादा चित्रपट डोळ्यांसमोरून पुढे सरकावा, तशी आज अवस्था आहे. एवढ्याशा मेंदूत काय साठवायचे... आणि किती साठवायचे.... काय आठवायचेेे... आणि किती आठवायचे... काय लिहायचे आणि किती लिहायचे?

मनात विचार आला... अत्रेसाहेबांच्या पुण्यतिथिदिनी काय कार्यक्रम करता येईल? भाषणात अत्रेसाहेब सांगता येतील... पण कांहीतरी वेगळे करावे.. म्हणून एक विचार आला... संयुक्त महाराष्ट्रासाठी जी घराणी लढली त्याघराण्यातील आजच्या प्रतिनिधीला कार्यक्रमाला बोलावून त्यांचा एक छोटा सत्कार करावा.... हुतात्म्यांची प्रतिमा त्यांना भेट द्यावी... त्याच फ्रेममध्ये त्यांच्या घराण्याच्या नेत्याने जो त्याग आणि समर्पण भावना व्यक्त केली होती. तेही छायाचित्र असावे....

अलिकडे माझ्यासारख्या फाटक्या माणसाला कार्यक्रम करणे आर्थिकदृष्ट्या फार सोपे नाही. पण कृतज्ञता म्हणून मुंबई मराठी पत्रकारसंघाच्या सभागृहात १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्व मित्रांना हा लेख हेच आमंत्रण आहे, असे समजून त्यांनी यावे, अशी विनंती आहे. त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे एकेकाळचे फार मोठे नेते उद्धवराव पाटील यांचे चिरंजीव धनंजय पाटील हे येणार आहेत. उद्धवराव दोन वेळा खासदार, तीन वेळा आमदार पण धनंजयवर ५ लाखांचे कर्ज ठेवून ते गेले. यशवंतराव चव्हाण हे उद्धवरावांना काँग्रेसमध्ये घेवून मुख्यमंत्री करणार होते. तसा निरोप त्यांनी त्यावेळचे खासदार रामराव अवरगांवकर यांच्याबरोबर पाठवला होता. उद्धवरावांनी हात जोडून नमस्कार केला... यशवंतरावांचे आभार मानले आणि निरोप दिला की, 'मी लाल झेंड्यातच गुंडाळला जाईन...' अशी ताठ कण्याची माणसं तेव्हा होती. भाऊसाहेब राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी आर्थिक मदत करण्यारिता त्यांचे माटुंगा येथील अरोरा टॉकिज विकून टाकले होते. या धनाढ्य माणसांनी सगळा पैसा डाव्या चळवळीसाठी वापरला. त्याकाळात असेही त्यागी 'राऊत' होते. आज हे सगळं आठवतं... दुसऱ्या पाहुण्या आहेत मिनाक्षी पाटील.... प्रभाकर पाटील यांची ही लढाऊ लेक... तिने किती लढ्यांत भाग घेतला... त्यांच्यासोबत मल्लिका अमरशेख (मल्लिका ढसाळ) आणि मृणालताईंची लेक अंजू वर्तक गोरे... एस. एम. जोशी यांच्या नातवाला बोलावण्याचा प्रयत्न आहे... आणखीन जेवढे आठवतील, जे येतील... त्यांना आमंत्रित करणार आहे... मी फाटका माणूस काय भेट देणार.... हुतात्मा स्मारकाची एक प्रतिमा आणि त्या प्रतिमेतच त्या लढाऊ नेत्यांचे फोटो...


 



खरं म्हणजे त्यावेळच्या लढाईतील प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव आज मुख्यमंत्री आहेत.... महाराष्ट्राचा हा मोठा सन्मान आहे... त्यांना आमंत्रित करावे, असे वाटत आहे... त्यांच्यापर्यंत पोहोचणेच अवघड आहे... आदित्यला आमंत्रण द्यायचा प्रयत्न आहे. मिलिंद नार्वेकरांना फोन करतो आहे.... पण लागत नाही. त्यांना आमंत्रण पत्र मेल केले आहे.... त्यांच्यापैकी कोणीही प्रतिनिधी आला तरी स्वागतच आहे...

या सर्व घराण्यांचा त्याग फार मोठा आहे. समर्पणाच्या भावनेने ही घराणी लढली आहेत. बापू लाड तर स्वातंत्र्यसैनिक होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्वातंत्र्य चळवळीतील पत्री सरकारातला लढा ख्यातनाम आहे. सेनापती बापट यांना 'सेनापती' ही पदवी स्वातंत्र्य लढ्यातील 'मुळशी सत्याग्रहा'मुळेच मिळाली होती. या घराण्यांना महाराष्ट्र विसरल्यात जमा आहे. जो देश किंवा जे राज्य, आपल्या पूर्वसूरिंनी केलेला त्याग आणि त्यांचे समर्पण विसरतो ती कृतघ्नता ठरते. महाराष्ट्राने कृतघ्न होऊ नये. कृतज्ञ रहावे. जमेल तेवढी कृतज्ञता जपावी, हीच या कार्यक्रमामागची भावना आहे. बाकी माझ्यासारख्या छोट्या पत्रकाराला ८२ व्या वर्षी आणखीन नवीन काय करता येण्यासारखे आहे...?

- मधूकर भावे

Tags:    

Similar News