शूर्पणखा, चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर!
चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना रावणाची बहिण शूर्पणखा हिची उपमा दिली आहे. मात्र, शुर्पणखा नक्की कोण होती? तिने केलेले महान कार्य नक्की काय होतं? याची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा डॉ.श्रीमंत कोकाटे यांचा लेख;
जगातील सर्व जातीधर्माच्या स्त्रियांचा आदर-सन्मान केला पाहिजे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा दंडक होता. आपल्या विरोधी पक्षाची, देशाची स्त्री असली तरी वैचारिक मतभिन्नता कायम ठेवून तिचा आदर केला पाहिजे. अगदी चित्रा वाघ, रुपाली चाकणकर, अमृता फडणवीस यांचाही आदर ठेवला पाहिजे.
भाजप-राष्ट्रवादीच्या वादात आम्हाला पडायचे नाही, चित्रा वाघ,रुपाली चाकणकर या दोघींबद्दल आम्हाला आदरच आहे, परंतु आज चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना शूर्पणखेची उपमा दिली.
शूर्पणखा म्हटले की आक्राळ-विक्राळ देहाची, मनुष्यभक्षक, सुपासारख्या कानाची, मोठ्या नाकाची,नांगराच्या फळासारख्या दाताची राक्षस अशी तिची प्रतिमा पुराणकथांनी पिढ्यानपिढ्या समाजमनावर बिंबवलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातीला स्त्रियांना नाउमेद करण्यासाठी शूर्पणखा संबोधण्याचा प्रघात आहे. एखाद्या व्यक्तीने राजकारणात फितुरी केली की त्याला सूर्याजी पिसाळ म्हणायचे,वास्तवात ते फितूर नव्हते. एखाद्या स्त्रीवर टीका करताना तिला शूर्पणखा म्हणायचे हा प्रघात आपल्याकडे आहे. परंतु हा प्रघात वस्तुस्थितीला धरून आहे का? एखाद्या स्त्रीला शूर्पणखा म्हणणे हा शूर्पणखेचा सन्मान आहे की अपमान आहे? हे आपल्याला पाहायचे आहे.
जगविख्यात प्राच्यविद्याविद शरद पाटील यांनी प्रथमतः शूर्पणखेचा इतिहास आणि तिची व्युत्पत्ति शोधून काढली. वाल्मिकी रामायण, बहुप्रवाही अन्वेषण, अब्राह्मणी दृष्टिकोन आणि पाणिनी व्याकरणाच्या मदतीने ते शूर्पणखेचा इतिहास शोधू शकले.
ते म्हणतात "शूर्पणखा ही गोदावरी नदीच्या खोऱ्यातील जनस्थान तथा आताचे नाशिक येथील स्रीराज्याची राज्ञी (राणीपेक्षा अधिक स्वतंत्र) होती." ती प्रभावशाली,कर्तृत्ववान आणि सुंदर होती. ती काळ्या रंगाची होती, आपल्या देशात आर्य येण्यापूर्वी सौंदर्याचा रंग काळा होता. आर्य आल्यानंतर तो गोरा ठरविण्यात आला. काळी आई (जमीन),काळा कृष्ण,काळा विठ्ठल हे सर्व त्याची साक्ष देतात.
शूर्पणखेचा उल्लेख राक्षस असा देखील केला जातो. राक्षस याचा अर्थ आहे रक्षक! ज्या पूर्वजांनी येथील भूमिपुत्रांचे आर्यआक्रमकांपासून संरक्षण केले. त्यांना राक्षस, दानव ठरविण्यात आले. ज्यांच्या हातात लेखणी होती, ज्यांच्याकडे ज्ञानाची मक्तेदारी होती. त्यांनी इतिहास बदनाम आणि विकृत केला.
शरद पाटील म्हणतात "शूर्प म्हणजे धान्य पाकडण्याचे सूप होय. हाताच्या बोटाच्या सुंदर नखावरती लीलया सूप धरून धान्य पाकडणारी महाराज्ञी म्हणजे शूर्पणखा होय." शूर्पणखा ही महाराष्ट्राची आद्य महाराज्ञी आहे. ती महामाता आहे. तिने उत्पादनाचा भाग प्रजेला समान वाटून दिला. ती समतावादी होती. ती शूर पराक्रमी, हिम्मतवान आणि न्यायी होती. त्यामुळे एखाद्या स्त्रीवर टीका करताना त्या स्त्रीला शूर्पणखा संबोधने हा शूर्पणखेचा अपमान आहे.
चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांचा उल्लेख शूर्पणखा असा करणे, हा शूर्पणखेचा अपमान आहे. त्यांनी रुपाली चाकणकरांचे नांव जरी घेतले नसले तरी, शूर्पणखेची उपमा दिलेली आहे, हे निश्चित! एका कर्तृत्ववान महिलेचा अपमान आहे. नाशिक शहराला शूर्पणखानगर म्हणावे, इतकी ती महान होती. तिचा पदोपदी अभिमान बाळगला पाहिजे, इतकी ती आपली महान अस्मिता आहे.
-डॉ.श्रीमंत कोकाटे