The Kashmir Files: दिग्दर्शकाने नक्की काय लपवलं आहे?

The Kashmir Files चित्रपटाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना, चित्रपटात करण्यात आलेले किती दावे खरे आहेत? किती दावे खोटे आहेत? दिग्दर्शकाने तथ्यं लपवली आहेत का? वाचा सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी केलेले विश्लेषण;

Update: 2022-03-27 07:17 GMT

१. काश्मिरी पंडीतांबाबत जे घडलं ते अतिशय वाईट होतं. कोणताही संवेदनशील माणूस जगभरात कोणाही समुदायाबाबत हे झालं तरी दुःखीच होईल, मी त्या वेदनेशी सहमत आहे.

२. काश्मिरचे तमाम मुसलमान देशद्रोही आहेत हा खोडसाळ अपप्रचार आहे. सरसकट कोणताच समुदाय अतिरेकी असू शकत नाही. मात्र मूठभर का असेना, स्थानिक मुस्लिमांनी पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतली हे नाकारता येत नाही. काश्मिरी हिंदूंना स्थानिक मदत देण्यात तिथला बहुसंख्य मुस्लीम समाज कमी पडला हे वास्तव आहे.

३. जेएनयु या संस्थेबद्दल मला आदर आहे, मात्र काही वेळा तिथं होत असलेल्या उठवळपणाचा आणि कडवेपणाचा मी समर्थक नाही. दिल्लीच्या ल्युटेन्स झोनमध्ये ताज मानसिंग हाॅटेलात गरिबीवर चर्चा करणाऱ्या खादी सिल्कच्या झुळझुळीत साड्या परिधान केलेल्या महिला आणि चित्रविचित्र रंगाचे झब्बे घालून दाढ्या विचित्र वाढवणारे चस्कट पुरूष यांचाही समर्थक नाही. त्यांना भारत कधीच कळला नाही. भारत कळायचा असेल तर दिल्लीच्या बाहेर पडावं लागतं. 'एक वर्ष फक्त देशभर फिरा' हे सांगणारे गोखले आणि ऐकणारे गांधीजी दोघंही वेडे नव्हते.

आता चित्रपटाविषयी.

१. हा चित्रपट काढतांना दिग्दर्शकाला जे लक्ष्य देण्यात आलं त्यामध्ये नेहमीप्रमाणे खांग्रेस, खम्युनिस्ट, फुर्रोगामी हे व्यक्तीसमूह; नेहरू, गांधी, फारूक अब्दुल्ला, व्हीपी सिंग, मुफ्ती महंमद सईद या व्यक्ती (हे ठीक पण यात चक्क अटलबिहारी वाजपेयी आहेत! संघ-भाजपाच्या पुढच्या राजकारणाची दिशा त्यांनी स्पष्ट केली?); जेएनयु ऐवजी एएनयु असं नामांतर केलेली संस्था; भारताची तत्कालीन प्रशासकीय व्यवस्था, माध्यमं अशी एक मोठी यादी दिग्दर्शकाला नागपूर किंवा दिल्लीतून मिळालेली दिसते.

२. या यादीत फैज महंमद फैज यांच्या 'हम देखेंगे' या निष्पाप गाण्याचाही समावेश आहे. खरं तर हे गाणं माझ्या जुजबी माहितीप्रमाणे १९५१ साली पाकिस्तान सरकारकडून अटक झाल्यानंतर चार वर्ष फैज महंमद फैज रावळपिंडी जेलमध्ये होते तेव्हाचं पाकिस्तान सरकारच्या जुलमी राजवटीविरूदध लिहीलेलं गाणं आहे. त्यात अल्लाचा उल्लेख धर्मप्रसारासाठी नसून 'चांगूलपणा' या अर्थी आहे. मात्र चतुराईनं हे गाणं म्हणजे 'सरकार विरूद्ध धर्म' असं पोज करण्यात आलं आहे. फैज महंमद फैज यांच्या गाण्याचं हे असं विकृतीकरण कोणताही दिग्दर्शक कमीत कमी द्वितीय वर्ष प्रशिक्षित असल्याशिवाय शक्य नाही!

३. आणखी एक घोषणा टार्गेट केलेली आहे. 'आजादी, आजादी' ही ती घोषणा. या घोषणेचे जनक विद्यावाचस्पती कन्हैय्याकुमार आता काॅग्रेसमध्ये स्थिरावले आहेत. काश्मिरमध्ये १९९० साली ही घटना घडली तेव्हा हे गृहस्थ जेमतेम रांगत असावेत. तरीही दिग्दर्शक मोठ्या चतुराईनं नव्वदची घटना आणि कन्हैय्याकुमार यांचा संबंध बेलामूमपणे लावून दाखवतात. हे फार थोर लक्षण आहे.

४. दिग्दर्शकाची राजकीय समज अतिशय सुमार आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मित्र आहेत म्हणून काश्मिरात कारवाई होत नाही. ही राजकीय समज हात जोडावेत अशीच आहे. दिग्दर्शकाला सादर वंदन.

५. काश्मिरात दहशतवाद्यांकडून मोठे हल्ले १९८८ साली सुरू झाले. जानेवारी १९९० मध्ये हत्याकांड झालं आणि सप्टेंबर १९९० मध्ये लष्कराला विशेषाधिकार देऊन काश्मीर लष्कराहाती सोपवण्यात आलं. काश्मिरमध्ये शांतता यावी यासाठी भारत सरकारनं अब्जावधी रुपये आजपर्यंत खर्च केलेत. काश्मीरच्या पंडीतांच्या पुनर्वसनासाठी आत्तापर्यंत सगळ्यात जास्त प्रयत्न मनमोहनसिंगांनी केल्याचं अलिकडेच इकडे वाचलं. त्याचा कुठंही उल्लेख सुद्धा होणार नाही याची 'दक्ष'ता दिग्दर्शकानं घेतली आहे.

६. कश्यप ऋषींपासून पंचतंत्रच्या विष्णु शर्मांपर्यंत मोठी ज्ञानपरंपरा आहेच. शंकराचार्यांचं काश्मीरातलं कामही कोणी अमान्य केलेलं नाहीच. फक्त ही त्यांच्या कर्तृत्वाची 'श्रीशिल्लक' संघ भाजपानं चोरून पळवावी का हा मुद्दा आहे. मारलेला पहिला पंडीत आरेसेसचा होता हे आणि वरील मंडळी अशा पद्धतीनं लिंक केली आहेत की जणुकाही या ज्ञानपरंपरेसाठी आरेसेस हाती शीर घेऊन लढला! ही बदमाशी आक्षेपार्ह आहे. पटेल, सुभाषबाबूंची पुण्याई चोरून पोट भरलं नाही. आता शंकराचार्य, कश्यप ॠषीपर्यंत पोचले आहेत. प्रत्येक मोठ्या माणसाची पुण्याई चोरा आणि मतांची तुंबडी भरा हा जुनाच धंदा आहे. आता दुकानात काश्मीरच्या ज्ञानपरंपरेचा माल विकायला ठेवला आहे. बाकी पोलीस संरक्षणात लाल चौकात झेंडावंदन करणे वगैरे प्रतिकात्मक गोष्टी वगळता आगीत तेल ओतण्याशिवाय काश्मिरात संघानं काही केल्याचा इतिहास नाही. ना मोदींनी पंडितांच्या पुनर्वसनासाठी काही केल्याचं ऐकिवात आहे.

७. या चित्रपटातली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे एक प्रांजळ कबुली. 'फेक बातमी पसरवण्यापेक्षाही वाईट आहे खरी बातमी न पसरवणं' असं स्टेटमेंट दोनदा येतं. आम्ही फेक न्यूज पसरवतो याची ही प्रांजळ कबुली!

थोडक्यात काय तर काश्मिरचे पंडीत २०२४ च्या निवडणुकीत वापरले जाणार आहेत. त्याची तयारी म्हणून हा चित्रपट आहे. काश्मिरी हिंदूंबाबत संवेदनशील राहतांनाच त्यांच्या हालअपेष्टांचं रूपांतर स्वतःच्या मतांमध्ये करण्याच्या आप्पलपोट्या प्रयत्नांना साथ द्यायची नाही हे ठरवूनच हा सिनेमा पाहिलेला बरा.

The Kashmir Files चित्रपटाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना, चित्रपटात करण्यात आलेले किती दावे खरे आहेत? किती दावे खोटे आहेत? दिग्दर्शकाने तथ्यं लपवली आहेत का? वाचा सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी केलेले विश्लेषण

Tags:    

Similar News