आजचा रंग जांभळा...

Update: 2020-10-26 03:02 GMT

समाजाला अंधारातून उजेडाकडे नेताना स्वतः जळणारी ती स्त्री म्हणजे स्त्रीज्योतच... जांभळ्या साडीतली ही स्त्री म्हणजे कुणी सामान्य शिक्षिका नाही. तिच्यासमोर बसलेले विद्यार्थी समाजाने भोगलेल्या स्त्रियांची बालके आहेत. ही स्त्री मायेचा अथांग सागर. जिला कधी काळी खूप काही सहन करावं लागलं? तिची कहाणी जाणून घेण्यासाठी वाचा समीर गायकवाड यांचा लेख

जांभळ्या साडीतली ही स्त्री म्हणजे कुणी सामान्य शिक्षिका नाही. तिच्यासमोर बसलेले विद्यार्थी समाजाने भोगलेल्या स्त्रियांची बालके आहेत. ही स्त्री मायेचा अथांग सागर आहे. जिला कधी काळी खूप काही सहन करावं लागलं. तिची कहाणी जाणून घेण्यासाठी तिच्या बालपणात डोकावं लागेल. तिचं नाव सीतव्वा. पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या सात वर्षाच्या सीतव्वाला सलग नऊ दिवस हळद लावली गेली, लिंबाची पाने घातलेल्या पाण्याने स्नान घातले गेलं. नवव्या दिवशी नवं लुगडं नेसवलं गेलं, हातात हिरव्याकंच बांगड्या चढवल्या गेल्या, गळ्यात लालपांढऱ्या मण्यांचं दर्शन बांधलं (माळ घातली). त्यादिवशी ती फार खूष होती. तिच्या बिरादरीतल्या लोकांना जेवण दिलं गेलं. माणसांची वर्दळ दिवसभर होती, सीतव्वाला त्यादिवशी खेळायला जायचं होतं पण तिचं बालपणच त्या दिवशी कुस्करलं गेलं. हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. आपण कुठल्या तरी आनंदोत्सवात आहोत आणि त्याचे केंद्रबिंदू आहोत. याचा तिला विलक्षण हर्ष झाला होता.

सीतव्वा एका गरीब कुटुंबात जन्मलेली. तिच्या वडीलांना नऊ मुली होत्या. पहिल्या तीन मुली दगावल्यानंतर त्यांनी यल्लमाला नवस बोलला की माझी एक मुलगी तुला अर्पण करेन. योगायोगाने उर्वरित सहा मुली जगल्या आणि दरम्यान आजारपणात सीतव्वाचे वडील वारले.

नवरा मेलेला, घरची अत्यंत बिकट परिस्थिती आणि खाणारी तोंडे वाढलेली अशा कात्रीत सीतव्वाची आई अडकली. अखेर तिने सीतव्वाला यल्लम्माला अर्पण करायचा अप्रिय निर्णय घेतला. सीतव्वा सातव्या इयत्तेत असताना तिला जोदत्तीच्या एका उच्चवर्णीय जमीनदारासोबत 'झुलवा' म्हणून होळकेरी गावी ठेवलं गेलं. त्या दिवशी ती लुटली जाईपर्यंत तिला यातलं काहीच ठाऊक नव्हतं.

त्या जमीनदाराला आधीच्या दोन बायका होत्या, त्या दोघींवरही त्याचं प्रेम होतं. तरीही त्यानं सीतव्वाला झुलवा म्हणून ठेवलं. त्याच्यापासून सीतव्वाला दोन अपत्ये झाली. सीतव्वापासून झालेल्या मुलांवरही त्याने माया केली. त्यांना कपडेलत्ते देण्यापासून ते अन्नधान्य पुरवण्याचे काम त्याने केले. पण आपले नाव त्यांना दिले नाही.

सीतव्वातला चार्म संपत आला तसा तो होळकेरीला तिच्याकडे कमी प्रमाणात येऊ लागला. पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले नाही. या काळात सीतव्वाच्या मनात अनेक वादळे उठली आणि शांत ही झाली. दरम्यान कर्नाटक सरकारच्या वतीने देवदासी पुनर्वसन कार्यक्रम राबवला जाऊ लागला. यातील उपक्रमात ती हिरीरीने भाग घेई. महिलांवरचा अन्याय, शोषण आणि देवाच्या नावावर चालत असलेलली स्त्रीत्वाची लुबाडणूक यावर तिची मते पक्की होऊ लागली.

१९९० च्या सुमारास बेळगावमध्ये या अभियानाने काम थांबवलं तेंव्हा आपणच अशी संस्था काढावी असे तिला वाटू लागले. विचारांना मूर्त स्वरूप देत तिने सप्टेबर १९९७ मध्ये 'महिला अभिवृद्धी मत्तू संरक्षण संस्थे' (MASS) ही संस्था काढली.

आता ती या संस्थेची सर्वेसर्वा आहे. आजघडीला ३६६२ देवदासी या संस्थेच्या सभासद आहेत. यातली सर्व पदे देवदासींकडेच आहेत. ५६१ मागास महिलांनादेखील यात सामील करून घेतले गेलेय. संस्थेकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात समन्वयक ते प्रशिक्षकाच्या जबाबदाऱ्या बहुतकरून देवदासीच पार पाडतात.

देवदासी महिलांना अर्थसहाय्य, विधीसहाय्य, गृहबांधणी. अपत्यांसाठी शिक्षण, तंटामुक्तीतून विवाद सोडवणे अशा विविध पातळ्यांवर ही संस्था काम करते. तिने महिला स्वावलंबन समूह (SHG) बनवून या महिलांना आपल्या पायावर उभं केलं आहे.

जी सीतव्वा किशोरअवस्थेत लुटली गेली. तीच आता अनेकांना आधार देऊन भावी पिढीत कुणी सीतव्वा बनू नये म्हणून प्रयत्न करते आहे. जोगती आणि जोगत्यांना या बंधनातून मुक्त करणे, जातीअंताची लढाई होईल. तेंव्हा होईल पण मागास जातीतील गरीब जनतेच्या डोक्यातून अंधश्रद्धेचा नायनाट करणे. हे सीतव्वाचं पुढचं टार्गेट आहे. तिची जिद्द आणि सच्चेपणा पाहू जाता ती यात यशस्वी होईल यात शंका नाही. रामायण काळातल्या सीतेहून अधिक कठोर अग्नीपरीक्षा दिलेल्या या सीतेचे सामाजिक भान अत्यंत प्रेरणादायी आणि कठोर तपश्चर्येचे ठरले आहे.

खरे तर देवीला मुलं-मुली सोडण्याची कसलीही कारणं पुरेशी असतं. घरात कुणी आजारी असलं, गोठय़ात बैल मेला, अंगावर खरूज उठली व ती लवकर बरी झाली नाही, तरीही त्या मुलीला किंवा मुलाला देवीला सोडल्याची अनेक उदाहरणं आहेत. एक तर गरीबीमुळे या लोकांना दवाखाना करणं परवडत नसे वा डॉक्टरपेक्षा यांचा भक्तावर जास्त विश्वास असे.

केवळ भंडारा लावून रोग बरा होतो, ही समजूत. वंशाला कुलदीपक असावा ही पूर्वापार चालत आलेला खुळचटपणा अनेक सुशिक्षितांमध्ये आजही आढळून येतो. सर्वार्थाने मागासलेल्या घटकांत तर अशा अंधश्रद्धांचा कहर असे. अनेक मुली जन्मास घातल्यावरही आपल्याला मुलगा व्हावा ही इच्छा असे. त्यासाठी पहिल्या मुलीला यल्लम्माला सोडली जायचे. एवढं करूनही कधी कधी मुलगा होत नसे. एकदा सोडलेली मुलगी लग्नसंसार करू शकत नाही. तिला देवदासी म्हणूनच जगावं लागतं. केवळ अंधश्रद्धेतून हे आलेलं नाही तर यामागे आर्थिक कारणंही जबाबदार आहेत.

एखाद्या जोगतिणीला जर तिला कुणापासून मूलं झालं नाही तर ती आपल्या नात्यातली किंवा कुणाची तरी मुलगी दत्तक घेई व लहानपणीच तिला देवीला सोडून आपल्या म्हातारपणाच्या उदरनिर्वाहाची तजवीज करे. असेही प्रकार घडत!

आपल्या गळ्यात बांधलेलं यल्लम्माचं 'दर्शन' दुस-या कुणाच्यातरी गळ्यात आपण मरण्याआधी बांधले नाही तर देवीचा कोप होतो. सुखाने मरण येत नाही. आपल्या मुलीच्या, नातीच्या वा नात्यातल्या कुणाच्याही मुलीच्या गळ्यात एकदा हे बांधलं की, आपण यातून सुटलो अशी काहींची धारणा असते. वरवर ही अंधश्रद्धा असली तरी तिची खरी कारणे आर्थिकही आहेत. ही मुलगी मोठी झाल्यावर जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करून म्हातारपणी आपल्याला बघेल, याची ती सोय असे.

वयात आलेल्या अशा तरुण मुली गावागावातून जोगवा मागत इतर जोगतिणींबरोबर फिरत असत, तेव्हा त्यांच्यावर गावातील श्रीमंत जमीनदार किंवा दुकानदारांची नजर असे. ताफ्यातल्या प्रमुख बाईला पैशाची लालूच दाखवून ती बाई त्या मुलीला फूस लावून त्याच्याबरोबर तिचा 'झुलवा' किंवा त्याची 'रखेली' म्हणून ठेवण्यात यशस्वी होई.

झुलवा लावणे म्हणजे एकाच माणसासोबत लग्नाच्या बाईसारखं राहणं. हा विधीही थोडाफार लग्नासारखा असतो. झुलवा लावलेला पुरुष तिला शेतात घर करून देतो किंवा तिच्या घरी येत असतो. त्याच्यापासून तिला मुलं झाली तर तो त्यांनाही पोसतो. हा उच्चवर्गीय असल्यामुळे अशा बाईला (जोगतिणीला) सहसा आपल्या घरी ठेवत नाही. बहुधा त्याचं पहिलं लग्न झालेलं असतं. हा झुलवा फार दिवस टिकतोच असं नाही. तो पुरुष जर मरण पावला किंवा काही काळाने त्याने मदत द्यायची थांबवली, तर त्या बाईला वेश्याव्यवसायाशिवाय पर्याय उरत नाही.

झुलवा न लावताही काही वेळा अशा मुलीला एखाद्या प्रतिष्ठित माणसाकडून दिवस गेले तर तो सरळ हात झटकून मोकळा होतो व ''हे मूल माझं कशावरून?,'' असा सवाल निराधार मुलीला विचारतो. काही वेळा केवळ भंडा-याची शपथ घेऊन, ''मी तुला आयुष्यभर, काही कमी पडून देणार नाही,'' असं सांगून काम झाल्यावर तिला वा-यावर सोडून दिलं जातं.

या अशिक्षित मुलींचा यल्लम्मा व तिच्या भंडा-यावर विश्वास असतो, याचा गैरफायदा असे लोक घेतात. या जोगतिणी दरवर्षी सौंदत्तीला यल्लम्माच्या जत्रेला जात असतात. जत्रेच्या वेळी देवीला नवस केलेल्या भक्तांना लिंब नेसवतात. लिंब नेसणं म्हणजे संपूर्ण अंगाला कडुनिंबाच्या डहाळ्या बांधणं. सौंदत्ती डोंगराच्या पायथ्याशी जोगल गावी सत्यम्माचं देऊळ आहे व तिथे एक पाण्याचं कुंड आहे. या अस्वच्छ कुंडात भाविक अंघोळ करतात. काही नवस बोललेले (यात स्त्रियाही असतात) संपूर्ण अंगभर लिंब नेसून दोन-तीन किलोमीटर अनवाणी पायाने उन्हातून चालत डोंगरावर जातात. काही लोळण घेत नमस्कार घालत जाताना दिसतात. हे पाहिल्यावर अंधश्रद्धा कुठल्या थरापर्यंत जाऊन पोहोचली आहे, हे प्रकर्षानं जाणवतं.

परिसरातल्या लग्नप्रसंगात खेडय़ापाडय़ातून जोगतिणींना पहिला मान असतो. आपल्या ताफ्यासह तोरण घेऊन वाजतगाजत जोगतीण येते. एकीच्या हातात तुणतुणं, दुसरीकडे मंजिरी अशी वाद्यं असतात. वयस्कर जोगतिणीच्या हातात भंडा-याची पिशवी असते. ती लग्नघराच्या चौकटीला तोरण बांधते. या जोगतिणीला साडी-चोळी व बिदागी घरमालक देतो. यल्लम्माला मुलेही सोडली जातात. मुले सोडण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. कारण 'धंद्या'च्या दृष्टीने मुलींचा जास्त उपयोग होतो. कधीकधी मुलींनाही शहरात जाऊन धंदा करावा, असं वाटतं.

काही जणी शहरात पळून जातात. शिवाय दलालांची नजर अशा मुलींवर असतेच. गावात जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करूनही पोट भरणं अशक्य असतं. त्यामुळे त्यांचा ओढा शहराकडे असणं स्वाभाविक आहे. काही दलाल हे जत्रेच्या वेळी येऊन मुलगी हेरून ठेवतात. तिच्या पालकांना अनेक प्रलोभनं दाखवून तिला आपल्या ताब्यात घेतात.

मुलीचे आई-वडील हे गरीब व मागासलेले असल्यामुळे नाईलाजानं व हिच्यामुळे दोन घास आपल्याला खाता येतील, या विचाराने हा सौदा करायला तयार होतात. अशा मुली मुंबई, मद्रास, पुणे, कोलकाता, बंगलोर अशा शहरातून वेश्याव्यवसायात ढकलल्या जातात. अंधश्रद्धा व गरिबीमुळे देवीच्या नावावर मुलींचा असा बळी दिला जातो. आजही महाराष्ट्राच्या सर्व भागात देवदासी आणि जोगते आढळतात. या सर्व प्रथा पूर्णतः बंद होतील तो दिवस सुदिन म्हणावा लागेल.

त्या साठी सीतव्वा सारख्या धाडसी लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच मदतीचा हातही पुढे करणे गरजेचे आहे कारण समाजाला अंधारातून उजेडाकडे नेताना स्वतः जळणाऱ्या त्या खऱ्या स्त्रीज्योती आहेत...

नवरात्रीचे हे नवरंग मनोरंजनासाठी वा निव्वळ प्रबोधनासाठी वा लाईक शेअर कमेंटसाठी मांडलेले नाहीत. समाजातील एका दबलेल्या, वंचित शोषित घटकाकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलावा. त्यांच्याप्रती असलेली घृणा नष्ट व्हावी, तिरस्कार नष्ट व्हावा आणि शक्य झालं तर त्यांना आदर सन्मान ही दयावा इतकी माफक अपेक्षा आहे.

सगळेच जण या घटकांसाठी काम करू शकत नाहीत याला काही मर्यादा आहेत, काही अडचणी आहेत. त्यामुळे जे या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवण्याचं काम तरी करता येईल. ह्या अडल्या नडल्या बायका प्रेमाच्या भुकेल्या आहेत त्यांना आपण प्रेम सन्मान देऊ शकत नसलो तर किमान त्यांची हेटाळणी तरी करू नये इतकी अपेक्षा सर्व वाचकांकडून ठेवतो.

अखिल नारीशक्तीला सलाम !

- समीर गायकवाड

Tags:    

Similar News