राजे माफ करा आम्हाला...!
मी महाराजांचा मावळा छातीठोकपणे सांगतो की माझ्या राजाचा एकच धर्म होता, तो म्हणजे स्वराज्यधर्म... ! आणि त्या धर्माचा एकच उद्देश होता, ‘रयतेचे कल्याण...’ ! आणि त्याच्या आड जो कुणी येईल तो होता आमचा शत्रू... ! त्या शत्रूची जात कोनची आणि धर्म कोनचा आम्ही बघितला नाही कधी... राजे माफ करा मला असं सांगताहेत लेखिका ललिता जगताप जाधव..;
राजं असं उदास का बसलाय ?
चेहऱ्यावरचं तेज कुठं गेलंय तुमच्या ?
तुम्हाला असं बघायची सवय नाही आम्हाला, जीव कळवळतोय नुसता !
आमचा राजा कसा तेजाने तळपत असायचा नेहमी, त्याच्या नुसत्या तेजानेच गनिम कापून उठायचा !
आमच्या सुर्याला कसलं ग्रहण लागलंय ?
आमचं काय चुकलंय का राजं ?
कसली आगळिक झाली का आमच्याकडुन ?
राजं, असं गप गप राहू नका. सांगा राजं, सांगा वं ! जीव जायची एळ आली हो आता !
राजं, तुमच्या या मावळ्यांना सांगणार नाही का तुम्ही ?
महाराजांनी जड अंतःकरणाने मावळ्यांकडे बघितले, आणि म्हणाले,
“याचसाठी केला होता का सगळा अट्टाहास?”
राजांचे मावळेच ते, क्षणार्धात साऱ्यांना समजली आपल्या राजाची व्यथा...
कळलं राजं आम्हाला सगळं. जुनाच शाप हाय की आपल्याला. गनिम बाहेर कमी आणि घरातच लय हायती आपल्याला. तुमचं अखंड आयुष्य तुम्ही समजावून सांगितलं, येळप्रसंगी लढला त्यांच्याबरोबर, तरी पण हे संपलं नाही अजुन.. हे बघुन जीव पिळवटून येणारच की वं तुमचा.
दिसतंय की आम्हाला तुमच्या जन्माची तिथी, शिवजयंती सुरू कुणी केली, तुमचं गुरु कोण होतं, तुमचा वर्ण कोणता होता, या सगळ्यावरनं वाद घालत बसली हायेत, चर्चा करत बसली हायेत सगळी.
अरं बाबाहो, या सगळ्यावर भांडुन भांडुन समाजात फुट पाडण्यापेक्षा, राजांनी जन्माला येऊन काय केलंय आणि तुमच्या हातात काय दिलंय ते बघा की रं जरा. राजांनी आणि आम्ही रक्ताचा सडा शिंपडून हे स्वराज्य उभं करून तुमच्या हाती दिलं ते याचसाठी का रं ? हे स्वराज्यच नसतं तर हा वाद घालायला तरी तुम्ही असता का इथं? जरा तरी ईचार करा की. वाद-विवाद घालायला बी काही हरकत नाही पण आपण ते कोणच्या मुद्द्यावर घालतोय याचं जरा भान राहू द्या की. महाराजांची ऊंची त्यांच्या कर्तबगारीवर ठरवा आणि त्यातून शिका की काहीतरी.
महाराजांची जयंती कुणी सुरू केली त्यापरीस ती का सुरू केली ते बघा. ज्यांनी जयंती सुरू केली त्या महापुरुषांना महाराज कळले होते. सगळे एका ईचाराने एकत्र येण्यासाठी आणि एकीने अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी शिवजयंती सुरू केली. आता ही शिवजयंती तुम्ही कशी साजरी करताय तिकडं लक्ष जाऊ द्या जरा. रात्रीला गाड्यांचे हॉर्न वाजवत, बोंबलत फिरत आणि स्पीकरच्या भिंती उभारून रोषणाई करत, मिरवणुका काढून शिवजयंती साजरी करतात काहीजण. पटताय का रं तुम्हाला हे असलं ? रणांगणात भगवा जमिनीवर खाली पडू नये म्हणून मावळ्यांनी आपलं रगात सांडलय याचं भान राहू द्या. तुमच्या मनी असलेली भावना खरी हाय पण ती जबाबदारीने व्यक्त होऊ द्या इतकंच म्हणणं हाय माझं. महाराजांच्या समोर असंच वागला असता का तुम्ही ? हाच का राजांसाठी तुमचा आदर आणि हीच का निष्ठा ? असं डोसकी बिघडल्यावानी का वागताय ?
माणसाचं पहिलं गुरु त्याचं आई-वडिल असत्यात. जसं वय वाढत जातं तसंतसं प्रत्येक टप्प्यावर त्याला गुरु मिळत जातात. माणसाला काय एकच गुरु असतोय व्हय ? आणि गुरु कोण त्यापरीस शिष्याने काय कर्तबगारी गाजवली ते पण बघा की. एका गुरूला लई शिष्य असत्यात पण एकच शिष्य इतिहास का घडवतो याचं बी उत्तर शोधा कधीतरी. माझ्या राजाचं ध्येय लय उदात्त होतं त्याला फकस्त रयतेची काळजी होती, म्हणूनच नियतीनं बी त्यांना साथ दिली. माझ्या राजांच्या आणि त्यांच्या गुरूंच्या असलं काही मनात तरी आलं असंल का कधी ?
एवढं करून तरी थांबलाय का रं तुम्ही ? बोलायला पण जीभ उचलत नाही आमची आणि तुम्ही राजांच्या आणि आमच्या साऱ्यांच्या आऊसाहेब.... यांच्याबाबतही गरळ ओकलंय. त्याच्यासाठी तर स्वतःच्या तोंडात स्वतःच्याच हाताने शेण कोंबायला पाहिजे तुम्ही. कुठून येतो रं इतका विखार ? कशासाठी चाललंय सगळं कळुद्या तरी ? कुणासाठी करताय ही दिशाभूल आणि ही पापं ?
मी महाराजांचा मावळा छातीठोकपणे सांगतो की माझ्या राजाचा एकच धर्म होता, तो म्हणजे स्वराज्यधर्म... ! आणि त्या धर्माचा एकच उद्देश होता, ‘रयतेचे कल्याण...’ ! आणि त्याच्या आड जो कुणी येईल तो होता आमचा शत्रू... ! त्या शत्रूची जात कोनची आणि धर्म कोनचा आम्ही बघितला नाही कधी. स्वराज्याचा शत्रू तो आमचा शत्रू ! इतकं साधं व्हतं सगळं. अठरापगड जातीच्या आणि धर्माच्या माणसांची एक मोट बांधून आम्ही सगळ्या मावळ्यांनी स्वराज्यधर्म जपला, वाढवला. अन्यायाविरुद्ध पेटुन उठायचं आणि लढायचं एवढंच माहीत व्हतं. अन्याय झालेल्याचा आणि अन्याय करणाऱ्याचा पण धर्म नाही बघितला आम्ही. मुळात, अन्याय करणाऱ्याला धर्मच नसतो, कारण जगातला कुठलाच धर्म अन्याय करायला शिकवत नाही कधी, असं आमच्या राजाने शिकवलं आम्हाला. जेव्हा त्यावेळचे राज्यकर्ते धर्माच्या आधारावर सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करून रयतेला अंध:कारात ढकलत होते तेव्हा आमच्या राजानं आम्हाला परधर्माचा आदर करायला शिकवलं. एवढ्या मोठ्या मनाचा होता आमचा राजा. आणि तुम्ही आता काय करताय ते बघा. एक ध्यानात घ्या अनादिकाळापासून राज्यकर्ते धर्माचा वापर फक्त सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता संकटात आल्यावर ती टिकवण्यासाठी करत आले आहेत. पण, धर्माच्या आधारावर आलेली कुठलीच सत्ता लईकाळ टिकली नाही हे स्वतः अभ्यास करून इतिहासात डोकावलात तर कळंल तुम्हाला. धर्म, धर्म म्हणून कपाळाला गंध नि हातात भगवा घेऊन गल्लीबोळात फिरून धर्माचे रक्षण होत नाही, तर त्या गंधाची आणि भगव्याची धर्मासाठी काय जबाबदारी आहे याचे भान असायला पाहिजे. एकेका मावळ्याच्या रक्ताच्या आणि घामाच्या रंगात भिजला हाय भगवा. धर्माचे रक्षण करायचं असेल तर आधी धर्म म्हणजे काय हे माझ्या राजाकडून आणि आम्हा मावळ्यांकडून शिकून घ्या. माझ्या राजाला ही दुरदृष्टी होती म्हणून तुम्हाला आजचा महाराष्ट्र दिसतोय. आमच्या राजांनी फक्त स्वराज्य धर्म जाणला, तोच जपला आणि तुमच्याकडे सुपूर्द केला विश्वासाने. आणि तुम्ही बसलाय त्याची चिरफाड करत कपाळकरंटयासारखे !
इतिहासकार किंवा चरित्रकार जे काही लिहतात ते त्या काळातल्या घटनाक्रमानुसार आणि त्याच्या स्वतःच्या आकलनाप्रमाणे. त्यात त्याने तटस्थ राहून विचार केला पाहिजे हे जरी खरं असलं तरी बऱ्याचवेळा वैयक्तिक मत डोकावतं तिथं. ते बी साहजिक हाय. पण खरी जबाबदारी वाचणारांची हाय. त्यांनी ठरवलं पाहिजे काय वाचायचं ते. लिहण्याऱ्याचा उद्देश ओळखता आला की सोपं होतं सगळं. महाराजांच्या नावाचा वापर तुम्हाला एकत्र आणण्यासाठी केला जातोय की तुम्हाला विभागायला केला जातोय याची शहानिशा करून घ्या नेहमी. महाराजांच्या हयातीत पण त्यांना सगळ्यात जास्त त्रास स्वकीयांकडून झाला आणि नंतरही तेच चालू हाय. हे सगळं थांबवायचा प्रयत्न करा. माझा राजा माणूस होता, त्याला देव करायचा प्रयत्न कधीच करू नका, आणि कुणी करायचा प्रयत्न केला तर हाणून पाडा गड्याहो ! माझ्या राजांवर चित्रपटांचं पीक आलंय सध्या. काही चित्रपट खरंच चांगले आहेत. पण, काही लय अभ्यास करून चित्रपट काढणाऱ्यानी माझ्या शिवबाला अफजलखानाला उचलून घेऊन, नरसिंहासारखे त्याला मांडीवर घेऊन मारल्याचे दाखवलंय त्यांच्या चित्रपटात. राजांचं बुद्धीकौशल्य, रणनीती आणि मानवी चौकटीतले अचाट धाडस डावलून हे असलं का दाखवलं जातंय याचाच अभ्यास करायची गरज आहे तुम्हाला. अखंड सावध राहा. राजांचा एकदा का देव केला की, तुमच्या हाताला त्यांना ते लागु देणार नाहीत. कारण एकदा का महाराजांचे माणुसपण नाकारले की त्यांच्यासारखे वागण्याच्या जबाबदारीतून तुमची सुटका होते. हात जोडतो तुमच्यापुढे, एवढं मात्र कधी होऊ देऊ नका !
उण्यापुऱ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात माझ्या राजानं काय काय केलं तिकडं लक्ष द्या जरा, कर्मदरिद्रीपणा नका करू आता तरी. राजांच्या त्या एकेका कौशल्याचा अभ्यास करायचा म्हणलं तरी तुम्हाला एक आयुष्य पुरायचं नाही. तुमच्यापुढं आत्तापर्यंत जे आलं ते फक्त हिमनगाचं टोक हाय, आणि त्यामुळं जर तुम्हाला इतकी ऊर्जा मिळत असंल तर इचार करा, महाराजांसारख्या या अस्सल हिऱ्याच्या प्रकाशात न आलेल्या पैलुंवर जर तुम्ही अभ्यास केला तर किती ऊर्जा मिळंल तुम्हाला, त्यांच्यासारखं समृद्ध जगण्याची. हसत हसत आमच्यासारख्या मावळ्यांनी महाराजांच्या पायी जीव का वाहिला याचं बी कारण समजंल तुम्हाला आपोआप . माझा राजा उत्तम प्रशासक होता. शेती, स्थापत्य, युद्ध-रणनीती, कर, शस्त्र, अश्व यांचे ज्ञान आणि या सगळ्यावर कळस म्हणजे राजांचे अचूक नियोजन आणि त्याची अंमलबजावणी..! त्यांनी कुणाचा कोथळा बाहेर काढला, कुणाची बोटं तोडली याच्यापरिस राजांचा हे सगळं करण्यामागं अंतिम उद्देश काय व्हता याचा अभ्यास करा. त्यांना काय स्वतःचा स्वार्थ होता का? अन्यायाने नागावलेल्या रयतेला सुखी करण्याचा घाट घातला होता त्यांनी. त्यासाठी स्वतःच्या जिवावर उदार होऊन लढले ते आयुष्यभर. माझ्या राजाने राज्य कसं चालवलं, राज्याच्या हरएक विभागाकडे जातीनं लक्ष घालून, माणसांची योग्य ती पारख करून, त्यांना योग्य पदांवर बसवून प्रशासन कसं चालवलं यातून शिकायला कितीतरी आहे, तिकडं तुमचं लक्ष जाऊ द्या कधीतरी. कोणत्याबी राज्याच्या यशाचा मापदंड ठरतो तो तिथल्या बाया-बापड्यांच्या परिस्थितीवरून. स्वराज्यात स्त्री सुरक्षित होती, सबला होती, तिचा सन्मान होत व्हता, आणि ती स्वतंत्र सुद्धा होती. आऊसाहेबांसारख्या खंबीर स्त्रीचे राजांना आणि आमच्या स्वराज्याला आशीर्वाद होतं यातच सारं आलं. राजांची दुरदृष्टी, त्यांचे बुद्धीचातुर्य हे आत्मसात करण्याची खरी गरज हाय. पुरंदरच्या तहात जवळपास संपलेला स्वराज्याचा डाव धीरोदात्त राजांनी परत कसा मांडला याचा अभ्यास केला तर तुम्हाला आयुष्यात कधीच निराशा येणार नाय. एकाच येळी चहूबाजूने संकटाने घेरलंलं असतानाही मनात आशावाद जिता ठेऊन त्या संकटांना नुसतं सामोरंच नाही तर तेंच्या डोक्यावर पाय ठेऊन विजय कसा मिळवायचा हे तुम्हाला राजांच्या संपूर्ण आयुष्यातुन शिकायला मिळंल. कल्याणकारी राज्य कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वराज्य. आजची परिस्थिती तुम्हीच तपासून घ्या. महाराज म्हणजेच न्याय ..! माझ्या राजाचं मोठेपण या सगळ्यात दडलंय. महाराज हा काय येऱ्यागबाळ्यांनी तोंडी लावायला घ्यायचा विषय नाही, महाराज हा फक्त हाडाच्या मावळ्यांचा विषय हाय आणि तो मावळा कुठल्याबी जातीचा आणि धर्माचा असू शकतो हे पक्क ध्यानी राहूद्या. अजून एक सांगतो ते मनावर कोरून ठेवा 'शिवाजी महाराजच' तुमचा भुतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असणार . तुम्ही कितीबी प्रयत्न केला तरी शेवटी तुम्हाला त्यांच्यापाशीच येऊन थांबावं लागणार हाय .
महाराजांचा उदास चेहरा बघून जीव कळवळतो आमचा. पण तुम्हाला ते नाही समजायचं. माझ्या राजाला जर समजून घ्यायचं असंल तर आधी तुमचं काळीज मावळ्याचं असलं पाहिजे. राजांचं मन ज्याला समजले तोच खरा मावळा. आम्ही राजांच्या ध्येयाशी, त्यांच्या मनाशी एकरूप झालो होतो ते काही भक्ती म्हणून नाही तर त्यांचं उदात्त ध्येय, त्यांची रयतेसाठीची तळमळ, त्यांच्या विचारातील आणि आचरणातील विशुद्धता, आणि त्यांची अजोड निष्ठा आणि योग्यता पाहून. आणि नेमक्या याच गोष्टींकडे दुर्लक्ष करून नको त्या गोष्टींमध्ये तुम्ही वेळ घालवत आहात, याची खंत वाटते आम्हा सगळ्यांना. आम्ही आमचे रक्त सांडून हे स्वराज्य मिळवलं आणि तुम्हाला दिलं, याची खंत वाटायला नका लावू आम्हाला. आमच्या राजांनी आम्हाला माणसं बांधायाला शिकवलं, उसवलेली मनं सांधायला शिकवलं, जाती-धर्म बाजूला सारून आम्हाला खरा मावळा बनवलं, म्हणून तर आज मी एवढं बोलतोय तुमच्यासंगं. शिवाजीमहाराज जन्माला यावे असं वाटत असंल तर आधी मावळे जन्माला यावं लागत्यात. आताच्या घडीला खऱ्या मावळ्यांचीच कमी हाय. मावळ्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त राजं होतं आणि आहेत. राजांच्या मनात काय चाललंय हे राजांच्या आधी मावळ्याला समजतं. शिवबा आणि मावळं वेगळे नव्हतेच कधी, ते एकच होते. राजा आणि रयत दोघं एकरूप असली की स्वराज्य आपोआप येतंय. राजांची उदासी घालवून त्यांचं हरवलेलं तेज परत आणतील तर ते फकस्त मावळेच.
म्हणूनच म्हणतो गड्याहो, एकदा का तुम्ही मनानं मावळा झाला की महाराज आणि आपलं स्वराज्य काय आल्याबिगर राहणार नाही. कारण जिथं खऱ्या मावळ्यांचं पीक उगवतं तिथंच माझा राजाबी रुजतोय ...!
कळत-नकळत झालेल्या आगळिकीसाठी आपल्या राजांकडं माफी मागा आणि
पुन्यानदा असं होणार नाही असा शबुद द्या बरं राजांना..!
भले शाब्बास...!
बघा जरा तिकडं, आपल्या महाराजांचा झाकोळलेला चेहरा कसा तेजाळून
आलाय परत..!
आता सा-या आसमंतात गर्जु द्या,
आम्ही शिवबाचं मावळं....!
हर हर महादेव...!
जय भवानी जय शिवाजी...!
जय जिजाऊ.. जय शिवराय...!
ललिता..!