पवारांच्या घरावरील हल्ल्याची जबाबदारी कुणाची ?
गुणरत्न सदावर्तेच्या हाताला कोण बळ देत आहे? शरद पवार यांच्या घरावर झालेला हा हल्ला एक नियोजीत षड्यंत्र आहे का? पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? वाचा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी केलेले विश्लेषण;
स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या आठवणी इतिहासजमा होऊन आता मुंबई पोलिसांसाठी फक्त परमवीर सिंह आणि सचिन वाझेच्या आठवणी उरल्या आहेत. बराच काळ हुल्लडबाजी, घोषणाबाजी, शिविगाळ सुरू होती. नीटपणे पढवल्यासारखे सगळे एकाच भाषेत, एकाच सुरात बोलत होते. एकसारख्याच शिव्या देत होते. आणि मोठमोठ्याने शिव्या देणाऱ्या व्यक्तीसमोर बूम धरून टीव्हीचे रिपोर्टर त्यांचा लाईव्ह प्रसार करीत होते. अगदी पवारांच्या घरावर चाल करून जायचे, त्याचे व्यवस्थित मीडिया कव्हरेज करायचे आणि तिथून पवारांना घाणेरड्या शिव्या देऊन त्यांचे थेट प्रसारण करायचे इतके सगळे नियोजनबद्ध दिसत होते. त्यामुळे हा विषय फक्त पवारांच्या घरावर चाल करून जाण्यासाठी उचकावण्यापुरता मर्यादित नाही, हे लक्षात घ्यावे लागते. एवढ्यावर टीव्हीवाल्यांची हौस भागली नाही, त्यामुळे सायंकाळी गुणरत्न सदावर्तेला लाईव्ह कव्हरेज देऊन त्याच्यामार्फत शरद पवारांची शक्य तेवढी बदनामी करण्यात आली.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एवढे नीच राजकारण बघायला मिळाले नव्हते. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पाळीव आमदारांमार्फत शिविगाळ करण्याचा उपक्रम आधीपासून राबवण्यात येत आहे. तेवढे पुरेसे होत नाही म्हणून मग गुणरत्न सदावर्तेसारख्याला दलित व्यक्तिला फूस लावण्यात येते. त्यातूनही पवारांच्या प्रतिमेवर काहीही परिणाम होत नाही. म्हटल्यावर बिनचेहऱ्याच्या माणसांना पुढे करून त्यांच्यामार्फत जाहीरपणे शिविगाळ करण्याचा कार्यक्रम आखला जातो. जेणेकरून सामान्य माणसांमध्ये शरद पवारांच्याविरोधात असंतोष असल्याचे चित्र उभे राहावे. काल कोर्टाच्या निकालानंतर जल्लोष करणा-या, गुलाल उधळून नाचगाणी करणा-या लोकांनी आज आक्रोश करीत पवारांच्या घरावर चाल करून जावे, असे अचानक काय घडले हा प्रश्नही उरतोच.
हे षड्यंत्र एवढ्यापुरते नसावे. आणखी काही भयानक घडवण्याचा त्यामागे डाव असू शकतो. हल्लेखोर पवारांच्या घरांवर चाल करून गेल्यानंतर जर त्यांना अडवले नसते तर त्यांनी पवाराच्या घरात घूसून धुडगूस घातला असता. काही लोक दरवाजापर्यंत गेल्याचे दिसत होतेच. नाहीतर त्यांना अडवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला असता तर त्यातूनही काही अघटित घडू शकले असते. सुप्रिया सुळे यांनी अडवले नसते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला असता आणि त्यातून दोन गटांमध्ये धुमश्चक्री होऊ शकली असती. सुदैव एवढेच की असे काही घडले नाही. परंतु ज्यांनी कारस्थान रचले असेल त्यांचा असेच काही घडवण्याचा डाव असावा.
शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. परंतु सत्तेत असलेली काम करणारी माणसे वेगळी आहेत. ती जबाबदार आहेत म्हणून त्या त्या पदावर नेमली आहेत. तरीसुद्धा सरकारच्या प्रत्येक गोष्टीसाठी शरद पवार यांना जबाबदार धरून त्यांना लक्ष्य केले जाते. शरद पवारही विषय छोटा, मोठा न पाहता शक्य तिथे सूचना देऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करीत असतात. एसटीचा संप लांबल्यानंतर त्यांनी स्वतःहोऊन पुढाकार घेऊन एकदा त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले होते. सर्वसंबंधितांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु संघटनेतील मतभेदांमुळे तो तोडगा सर्वमान्य होऊ शकला नाही. त्यानंतर तर विषय उच्च न्यायालयातच आहे आणि उच्च न्यायालयाने त्यासंदर्भातील आपला निकाल दिला आहे. संपकाळात अनेक कर्मचा-यांनी आत्महत्या करून जीवन संपवले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यासाठी शरद पवार यांना जबाबदार धरण्याचे कारण काय? जबाबदार धरायचेच झाले तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना जबाबदार धरायला पाहिजे. परंतु या सगळ्या प्रकाराला ज्यांची फूस आहे, त्यांचा उद्देश त्यामुळे साध्य होत नाही. शरद पवार हाच या सरकारचा प्रमुख आधार आहे आणि त्याच्यावर घाव घातला की आवश्यक ते साध्य होते, अशी संबंधितांची धारणा आहे. या हल्ल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेशी होती. परंतु विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया ऐकताना एकूण घटनेमुळे त्यांना झालेला आनंदच अप्रत्यक्षरित्या व्यक्त होत होता. ही घटना का घडली असावी याची कारणमीमांसा करताना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा वाराही त्यांना शिवला नसल्याचे दिसून आले. अर्थात राज ठाकरे यांच्या सावलीत कारकीर्द सुरू करून देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाखाली स्थिरावलेल्या दरेकरांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाही करता येत नाही.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. परंतु मुंबई पोलिसांच्या अब्रूची लक्तरे आजच्या घटनेमुळे वेशीवर टांगली गेली ही वस्तुस्थिती. अर्थात महाराष्ट्राच्या गृहखात्याचे जे शैथिल्य आहे, तेच एकूण पोलिसांच्या कार्यपद्धतीतून दिसून येत आहे. गृहखात्यासंदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. गृहमंत्र्याने नुसते असून चालत नाही, तर त्याने दिसावेही लागते आणि त्या दिसण्यात आश्वासकता असावी लागते. जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा वाटावा! महाराष्ट्राच्या दुर्दैवाने महाराष्ट्राचे मारून मुटकून गृहमंत्री केलेले दिलीप वळसे-पाटील असले तरी दिसत नाहीत, दिसले तरी त्यांच्याकडे बघून कुणालाही आश्वासकता वाटत नाही आणि ते बोलले तर सामान्य माणसाचा उरला सुरला आत्मविश्वास डळमळीत होऊन जातो. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया सुरू झाल्यानंतर सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांची एकमेकांच्या आडोशाला लपण्याची ईर्षा लागली आहे. असल्या भेदरट आणि आत्मलंपट लोकांच्या हाती सत्ता सोपवून त्यांच्या निष्क्रियतेचे ओझे शरद पवार कशाला वागवताहेत, असा प्रश्नही सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाल्यावाचून राहात नाही.
वर्षानुवर्षे सत्ता उपभोगलेली ही मंडळी केंद्रीय यंत्रणांच्यासमोर उभीही राहू शकत नाहीत, लढण्याची गोष्ट लांबच! भारतीय जनता पक्ष विरोधात असूनही अनेक मित्रपक्षांना, बाहेरून आलेल्या नेत्यांना सांभाळताना दिसतो. आणि सत्तेत असतानाही राष्ट्रवादीला राजू शेट्टी यांच्यासारखा एक मित्र सांभाळता येत नाही, इतकी ही मंडळी आत्मकेंद्री झाली आहेत. उलट त्यांच्याच पक्षाच्या आमदाराला नादी लावून फडणवीसांसारख्या कपटी राजकारणाचे दर्शन घडवत आहेत. असे मित्रपक्षांचे आमदार फोडून पक्षाची ताकद वाढत नाही, उलट तिचा –हास होत जाईल आणि २०१४ पेक्षा वाईट अवस्था येईल. शरद पवार यांचा पिक्चर २०१९च्या निवडणुकीत सुपरहिट झाला. तो पुन्हा तसा चालण्याची सुतराम शक्यता नाही. एका दिग्दर्शकाची एखादीच अशी अविस्मरणीय कलाकृती असते. तशी पुन्हा साकारत नाही. त्यामुळे कसाही कारभार केला तरी शरद पवार पिक्चर हिट करून दाखवतील, या अपेक्षेवर कुणी असेल तर त्यांचा अपेक्षाभंग झाल्याशिवाय राहणार नाही.
महाविकास आघाडीच्या राज्यात शरद पवार यांच्या घरावर हल्ला होतो, याची जबाबदारी सरकारमधले कुणी स्वीकारणार आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. हल्ला झाल्यानंतर सिल्व्हर ओकवर जाऊन विचारपूस केली की, जबाबदारी संपली. दुस-या दिवसापासून आपले उद्योग करायला मोकळे अशीच बहुधा सगळ्यांची धारणा दिसते. विरोधक आक्रमक होऊन सरकारला घाम फोडताहेत आणि सरकारमधले लोक घाबरून बसले आहेत, असे उलटे चित्र महाराष्ट्रात बघायला मिळते आहे.
शरद पवार यांच्यासारख्या नेत्याबाबत घडलेल्या या प्रकाराबदद्ल महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांच्या तीव्र भावना आहेत. परंतु ही वेळ सत्तेत बसलेल्या लोकांच्या नेभळटपणामुळे आली आहे. याबदद्लही लोकांच्या मनात तीव्र संताप आहे. शरद पवार असल्या शेंदाड शिपायांचे नेतृत्व कशाला करतात, असाही प्रश्न लोक विचारू लागले आहेत. शरद पवार यांचा दिलीप वळसे-पाटील यांच्यावर विशेष लोभ आहे, हे महाराष्ट्र जाणतो. पवारांची मोदींशीही चांगली जानपछान आहे, तेव्हा वळसे-पाटलांची कुठेतरी राज्यपाल म्हणून नियुक्ती करता आली तर ती त्यांच्या योग्यतेला साजेशी ठरेल. त्यांना गृहमंत्रिपदावर ठेवण्यात त्यांचेही हित नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचेही नाही, महाविकास आघाडीचेही नाही आणि महाराष्ट्राचे तर नाहीच नाही. समोरून देवेंद्र फडणवीस आणि कंपनी अत्यंत क्रूरपणे चाली रचत असताना इकडून फक्त चौकशी करून कठोर कारवाई करण्याची आश्वासने दिली जात असतील तर या सरकारला ब्रह्मदेवसुद्धा वाचवू शकणार नाही.
या सगळ्यामध्ये एका गोष्टीची आवर्जून नोंद घ्यावी लागेल, ती म्हणजे सुप्रिया सुळे यांनी दाखवलेले धाडस! समोर प्रक्षुब्ध जमाव असताना त्या त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तयार होत्या. जमावाला हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती करीत होत्या. आताच्या काळातल्या राजकीय नेत्यांकडे एवढे धाडस अपवादानेच आढळते. सुप्रिया सुळे यांनी आजच्या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत दाखवलेला धीरोदात्तपणा आजच्या एकूण वाईट दिवसामधला संस्मरणीय प्रसंग होता!