आजचा रंग शुभ्रधवल
नॉर्थइस्टमधील अनेक महिला वेश्या व्यवसायात आहेत. कशा येतात या महिला वेश्या व्यवसायात? तिने अभ्यास केला. तिची सुरुवातीला हेटाळणी झाली. मात्र, तिने 80 हजार हून अधिक बायकापोरीचं आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवलं! ‘ती’ त्यांच्यासाठी दुर्गा झाली... वाचा समीर गायकवाड यांचा विशेष लेख
एखाद्या व्यक्तीने मनात आणलं तर तो खूप काही करू शकतो. त्यासाठीची इच्छाशक्ती मात्र प्रबळ हवी. एका स्त्रीने ऐंशीहजारहून अधिक बायकापोरीचं आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवलं असेल यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. मात्र हे सत्य आहे. ही दास्तान आहे हसीना खार्भीहची. हसीनाला किशोरवयात असताना पासूनच समाजसेवेची आस लागली होती. १९८७ मध्ये तिने वयाच्या सतराव्या वर्षी लिडरशीप ट्रेनिंग सेंटरमध्ये दाखला घेऊन आपली मनीषा भक्कम केली. १९९३ मध्ये तिने स्वतःची एनजीओ सुरु केली. इम्पल्स तिचं नाव!
हसीनाने या संस्थेच्या माध्यमातून उत्तरपूर्वेतील ह्युमन ट्राफिकिंगला जमेल तितका आळा घातला. सुरुवातीला तिची टवाळी व्हायची. आता तिची स्वतंत्र ओळख आहे. मेघालयची आयडॉल म्हणून ती ओळखली जाते. खासी समूहाने उभं केलेल्या आंदोलनाला तिने नवी दिशा दिली. मात्र, त्याच वेळेस अखिल नॉर्थइस्टच्या मुलींना तिने साद घातली. सुरुवातीला तिच्याशी दबकून वागणाऱ्या, भीड बाळगणाऱ्या स्त्रिया तिच्यापासून अंतर राखून राहत.
मात्र, जेव्हा त्या सगळ्या जणींना कळून चुकलं की, ही आपल्याला वाचवू शकते, आपलं आयुष्य बदलू शकते. तेंव्हा त्यांनी तिच्यावर विश्वास दाखवला. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत हसीना पोलीस आणि सरकारी इन्फोर्मर झाली. तिने मुलींचं जाळं उभं केलं आणि एक मोठा समूहच निर्माण केला. या समूहाच्या माध्यमातून तिने मानवी व्यापारास आळा घातला.
आजही देशभरातील कोणत्याही लहानमोठ्या शहरातील मुख्य वेश्यावस्तीत गेलं तर तिथं नॉर्थइस्टकडील मुली आढळतात. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात हे प्रमाण सर्वाधिक होतं. यांची संख्या सर्वाधिक होती. दलाल आणि ब्रॉथेल मालकीण यात चलाखी करत. या बायकापोरी नेपाळी आहेत. असं सर्रास सांगून यांची ओळख लपवली जायची. पोलिसांचा ससेमिरा आपसूक कमी होई.
हसीना आणि तिचे मानसपुत्र, मानसकन्या
वयाने लहान / किशोरवयीन असूनही केवळ अंगचणीने मोठ्या वाटणाऱ्या कित्येक अल्पवयीन मुलींचे यामुळे सहज शोषण केलं गेलं. नेपाळी मुलींचं रॅकेट चालवणाऱ्या लोकांनी यात आपले हात धुवून घेतले. मात्र हसीनाच्या प्रयत्नांना हळूहळू यश लाभत गेले. हसीनाने केवळ महिलांनाच वाचवलं आहे असंही नाही, तिने बालमजुरी करणाऱ्या हजारो मुलांना त्यातून बाहेर काढलं आहे. आजघडीला हसीनाने तीस हजारहून अधिक स्त्रियांना त्यांच्या पायावर उभं केलं आहे. ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे.
पाहता पाहता हसीनाचं नाव सर्वांच्या मुखी झालं आणि तिच्या 'इम्पल्स'चा पसारा इतका वाढत गेला की नॉर्थइस्टकडील राज्ये वगळून म्यानमार, बांग्लादेश आणि नेपाळमधील स्त्रियांनीदेखील तिच्याकडे मदतीची याचना सुरु केली.
हसीनाने त्यांनाही मदत केली आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजसेवेला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिलं. १९९६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नॉर्थइस्टमधील विशिष्ठ झाडांच्या कटाईस मज्जाव करणारा आदेश दिला.
पर्यावरणाच्या दृष्टीने हा आदेश गरजेचा होता. मात्र, याचा विपरीत परिणाम तिथल्या जनजीवनावर झाला. लाकूडतोड करून पोट भरणारी अनेक कुटुंबे उघड्यावर आली. यातूनच स्त्रिया आणि मुलांचा व्यापार फुलू लागला. ही वेळ कठीण होती आणि न्यायालयीन मुद्दा असल्याने कुणी पुढं येत नव्हतं. अशा प्रसंगी हसीना आणि तिची इम्पल्स पुढे झाली. त्यांनी या बायकांना मदतीचा हात दिला, कल्पक पद्धतीने उदरनिर्वाहाचं नवं साधन दिलं. शहरात विकली गेलेली लहान मुलं परत मिळवली आणि अनेकांचा विश्वास संपादन केला. या घटनेनंतर हसीनाने कधी मागे वळून पाहिलं नाही.
हसीनाचा संघर्ष आता सत्तावीस वर्षांचा झालाय. आगामी काळात तिला जागतिक पातळीवर काम करायचं आहे. जगभरात अडकलेल्या भारतीय आशियाई मुली सोडवून आणायच्या आहेत. ध्येय मोठे असून चालत नाही. तर त्या ध्येयाने झपाटलेलं जीवन जगावं लागतं. मग आपली स्वप्ने सत्य होऊ लागतात. यावर हसीनाचा विश्वास आहे. समाजाने धुत्कारलेल्या, शोषण केलेल्या जीवांना आधार देणारी हसीना नवदुर्गा आहे. जी दुष्प्रवृत्तीचा नाश करतानाच नवचैतन्याचे बीज रोवते आहे.
हसीनाला एकदा का होईना भेटायचं आहे आणि थँक्सगिव्हींग करायचं आहे.
हसीनास संपर्क साधून काही माहिती द्यायची असल्यास या पत्त्यावर कनेक्ट होता येईल -
Address: Riatsamthiah, Block 4, Shillong, Meghalaya 793001
Phone: 0364 250 3140
हसीनाला सलाम आणि तिच्या कार्याला शुभेच्छा !
- समीर गायकवाड