सेक्स वर कोण कोणते घटक परिणाम करतात?

सेक्स वर कोण कोणते घटक परिणाम करतात? सेक्स आणि घटस्फोट काय संबंध आहे वाचा डाॅ. प्रदीप पाटील यांचा लेख;

Update: 2022-05-12 11:05 GMT

मुख्यतः तीन घटक सेक्सवर परिणाम करतात आणि हे तीनही परिणाम खोलवर असतात! जनुके, स्वीकारलेली परिस्थिती आणि न स्वीकारलेली परिस्थिती हे ते तीन घटक आहेत. गेल्या तीस वर्षात झालेल्या संशोधनाचे सार हे आहे की स्त्री व पुरुष यांचे लैंगिक दृष्टिकोण भिन्न आहेत. यातील एक दृष्टिकोन असा आहे की समाजातून आणि सांस्कृतिक कारणातून दबाव जर असतील तर अशा गोष्टींना स्त्रिया जास्त संवेदनशीलतेने घेतात.

रॉय बोमिस्टर हे फ्लोरिडा येथील स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये आहेत. त्यांनी संभोग व लैंगिकता याविषयी जे जे साहित्य उपलब्ध आहे ते गोळा करून एक सारांश काढला आहे. स्त्रियांच्या लैंगिक दृष्टिकोनावर संस्कृती, रूढी, शिक्षण, राजकारण, धर्म आणि कौटुंबिक जीवन यांचा मोठा परिणाम होतो.

पुरुषांची लैंगिकता ही भौतिक साधनांभोवती घुटमळते, ती स्त्री देहाच्या पलीकडे कमी जाते. यात निसर्गाचा मोठा हात असतो. समाज व संस्कृती या गोष्टी त्याच्या दृष्टीने दुय्यम असतात. इतर काही संशोधनात असे आढळले आहे की, स्त्रिया जास्त करून समलिंगी व भिन्नलिंगी संबंधास स्वीकारण्यास तयार आहेत. अशावेळी त्या नजर, स्पर्श आणि ऐकणे यांना तीव्रतेने प्रतिक्रिया देतात.

व्यावहारिक दृष्ट्या स्त्रियांचा लैंगिकतेचा आराखडा हा सामाजिक परिस्थितीच्या प्रभावाखाली असतो. बंधने घालणारी संस्कृती असेल तर स्त्री ही आपल्या लैंगिक दृष्टिकोनाला व वर्तनाला बंधने घालून घेते. जर वातावरण मोकळे ढाकळे असेल तर त्या मुक्तपणे आपली लैंगिकता विषयक मते, दृष्टिकोन व वर्तन व्यक्त करतात. ब्रॅडले विद्यापीठातील डेव्हिड स्मिट्ट यांनी ४८ संस्कृती आणि पंचवीस वेगवेगळ्या भाषा असलेल्या समुदायांचे सर्वेक्षण केले तेव्हा असे दिसले की जेव्हा जेव्हा सामाजिक परिस्थिती व राजकीय परिस्थिती आणि नातेसंबंधात मुक्तपणा आला तेव्हा तेव्हा त्यांचा लैंगिकतेविषयीचा दृष्टिकोन पुरुषांच्या दृष्टिकोनासारखा बनला.

परिस्थितीचा परिणाम जसा आहे तसाच परिणाम जनुके किंवा जीन्स यांचादेखील आहे. फ्रान्सिस द वाल यांनी 'अवर इनर एप' या स्वतःच्या पुस्तकात बोनोबो व चिंपांजी यांच्या प्रजातींविषयी निरीक्षणे नोंदविली आहेत. चिंपांजी हे अतिशय आक्रमक आणि सत्ता सामर्थ्य गाजविणारे असतात तर बोनोबो हे स्त्री सत्ताकता स्वीकारणारे व लैंगिक नातेसंबंधात रस घेणारे असतात. आपण मानव मात्र यापेक्षा जास्त व्यापक आणि प्रवाही मतांची लैंगिकता जोपासतो.

आपल्यातही जनुकीय पाळेमुळे आहेत जे लैंगिकता घडविण्यात आघाडीवर असतात. उदाहरणार्थ, हस्तमैथुन करणे. हे जनुकांमुळे घडते आणि ते लहान मुले व तान्हुल्या मध्ये आढळते. स्वतःला आनंद देणे ही स्वानंदी वृत्ती सर्व प्राथमिक अवस्थेतल्या जीवांमध्ये आढळते. मग माणूस व अन्य प्राणी यांच्यामध्ये फरक कोणता आहे?

माणूस हा कोठेही हस्तमैथुन करीत नाही. तो वेळ, काळ बघून ते करतो. हे नंतर शिकून घेतलेले वर्तन या सदरात मोडते. याचा अर्थ आपला मेंदू हा समाज व सांस्कृतिक अपेक्षांनुसार वागण्याचा जास्त प्रयत्न करत असतो. माकडांचे तसे नाही ते कोठेही हस्तमैथुन करू शकतात.

प्रत्येक व्यक्ती भिन्न स्वभावाची असते. काही व्यक्ती या अंतर्मुख...आतल्या गाठीच्या असतात तर काही व्यक्ती बहिर्मुख किंवा मनातले सर्व काही सांगून टाकण्याच्या वृत्तीच्या असतात. या वृत्ती देखील लैंगिकतेवर परिणाम करतात. आणि या वृत्तीच्या मागे जनुके असतात!

अनेक व्यक्ती लैंगिकतेविषयी चकार शब्द काढत नाहीत. त्यांना ते पटत नाही नाही. असभ्य वाटतं. तर अनेक व्यक्ती खुलेआम आपले लैंगिक जीवन बोलत राहतात व लैंगिकतेविषयी मते व्यक्त करत राहतात. या दोन्ही वृत्ती स्वतंत्रपणे शरीर धर्मानुसार वाढतात आणि त्यामागे संस्कृती किंवा प्रशिक्षण नसते. या वृत्तीचे मोजमाप करता येते.

१९९१ मध्ये सिंप्सन व गांगेस्तद यांनी सामाजिक व लैंगिक विचारसरणी मोजण्यासाठी एक चाचणी विकसित केली होती. सोशियो सेक्स्युएल ओरिएंटेशन इन्व्हेंटरी या नावाने ती ओळखली जाते. त्यात त्यांनी दृष्टिकोनाचे अनेक स्तर मांडले आहेत. एका टोकास बंधन घालणारे दृष्टिकोण जसे की सेक्स हा फक्त लग्नातच असावा आणि तो आपल्या मनातच ठेवावा हा आहे तर दुसऱ्या टोकास अनिर्बंध दृष्टिकोन जसा की,

सेक्स हा परस्पर संमतीने कोणताही असावा, कोणतीही भावनिक, मानसिक, आर्थिक, गुंतवणूक त्यात नसावी, आणि एकच जोडीदार कायम असावा असे बंधन असायचे काहीच कारण नाही. या चाचणीत जे जे कमी गुणांक मिळवतात ते पारंपारिक व बंधने लादून घेतलेले असतात म्हणजे ते प्रेम हे सर्वोच्च मानणारे, संभोग-संबंध आयुष्यात उशिरा सुरू करणारे आणि अत्यंत कमी मोजकेच जोडीदार असलेले असतात. जे जास्तीत जास्त गुणांक मिळवतात ते आयुष्याच्या सुरुवातीच्या वयात आलेल्या काळातच सेक्स सुरू करतात. एकावेळी अनेक जोडीदारांशी संबंध ठेवतात. आणि त्यांचे लैंगिक संबंध कोणत्याही वचना शिवाय गुंतवणुकी शिवाय प्रेमावर अवलंबून राहण्याशिवाय चालू राहतात.

साधारणपणे सामाजिक व लैंगिक आचरण या संबंधाची वृत्ती आयुष्यभर स्थिर राहते. या चाचणीत बहुसंख्य पुरुषांनी जास्त गुणांक मिळवलेले असतात. स्त्री व पुरुष यांची लैंगिक वृत्ती तपासण्यासाठी ही चाचणी जवळपास पन्नासच्या वर मोठ्या महत्त्वाच्या सर्वेक्षणात वापरली गेली आहे व दरवेळी हेच दर्शविते. सामाजिक लैंगिक कृती मोजण्यासाठी आणखी एक संशोधन महत्त्वाचे आहे जे मायकेल बेले यांनी ऑस्ट्रेलियातील जुळ्यांचा अभ्यास केला आहे त्यात आढळते की ४९% जुळ्यात ही वृत्ती रक्तातूनच आली आहे. स्वीकारलेल्या परिस्थितीचा काहीही परिणाम झालेला नाही. यातून काही निष्कर्ष बाहेर आले आहेत.

एक, ज्यांनी वरील चाचणीत जास्त गुणांक घेतले त्यांना घटस्फोटास सामोरे जावे लागले. दोन, जुळ्यांमधील एकाचे गुणांक हे दुसर्यास देखील लागू पडले. तीन, घटस्फोटाचा संबंध हा त्या व्यक्तीच्या सामाजिक लैंगिक वृत्तीशी निगडित होता. तो त्याच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला होता की नाही याच्याशी निगडित नव्हता. चार, ज्यांनी या चाचणीत अतिशय कमी गुणांक मिळवले त्यांच्यात घटस्फोट आढळला नाही. जरी त्यांच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला होता तरीही! याचा अर्थ वरील निष्कर्ष हे आपल्या मेंदूतील लैंगिक नकाशा कसा आहे हे सांगतात.

लैंगिक वर्तन हे नैतिक आचरण न केल्याचा परिणाम म्हणून होत नाही किंवा नैतिक प्रामाणिकपणा घडवत नाही. ती शारीरिक अभिवृत्ती आहे. म्हणजे जे रक्तातच आहे ते बदलणे हे संस्कृती, समाज यांना जमणे शक्य नाही. मग ती व्यक्ती विशीची असो, चाळीशीची असो, नाहीतर साठीची. बुरसटलेली लैंगिक वृत्ती आणि साहसी लैंगिक वृत्ती या आयुष्यभराच्या सोबती असतात. प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ ई. ओ. विल्सन यांच्या भाषेत बोलायचे झाले तर

जनुके संस्कृतीस आपल्या ताब्यात ठेवतात म्हणजे संस्कृती आपणास इकडून तिकडे ओढून जरी नेत असली तरी आपण आपल्या मूळ पदावर येत राहतोच. मग धर्माचा या सगळ्यांशी संबंध काय?

(पुर्वार्ध) उत्तरार्ध उद्या.

Tags:    

Similar News