मी परवा एका पुण्यातील सरकारी दवाखान्यात गेलो असता माझ्या समोर एक मुलगी डॉक्टरकडे आली होती, साधारण इयत्ता पाचवी मध्ये शिकत असावी आणि ती त्या डॉक्टरला सांगू लागली की तिच्या लिंगातून रक्तस्राव होत आहे. त्या मुलीची ट्रीटमेंट झाल्यानंतर मी डॉक्टरांना विचारलं की एवढ्या कमी वयात मासिक पाळी येते? त्यावर डॉक्टर म्हटले की अशी अनेक उदाहरणे आहेत. पण एवढ्या कमी वयात मासिक पाळी येत असल्यामुळे विद्यार्थीनींना काय करावे हे समजतही नाही आणि त्या याविषयी पालकांशी नीट संभाषण ही करू शकत नाहीत कारण लहनपणापासूनच मासिक पाळी किंवा सेक्स याबद्दल शब्द काढणंही काहीतरी वाईट आहे असं मनात भरलेलं असतं. आणि त्या भीती पोटी मुली अश्या गोष्टी घरच्यांपासून लपवतात तर काही मनाची तयारी करून सांगतात पण ज्या मुली सांगतात त्या मुलींकडे शक्यतो पालक दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अनेक मुलींना आरोग्याच्या बाबतीत अडचणी निर्माण होतात.
यावर जागरूकता हाच उपाय आहे. ही मूल्य लहानपणापासूनच रुजवली जावीत आणि त्याचा मार्ग हा शालेय शिक्षण हाच आहे. लैंगिक शिक्षण हे फक्त मासिक पाळी पुरताच मर्यादित नाहीये. लैंगिक शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत तर होईलच पण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या भविष्यासाठी आजच्या युगात लागणारा सकारात्मक दृष्टिकोन ही लहानपणीच रुजवला जाऊ शकतो. किशोरवयीन विद्यार्थी या ना त्या मार्गाने सेक्स विषयी काही ना काही माहिती मिळवतातच आणि अशी चुकीची माहिती आरोग्याला किंवा विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला ही घातक ठरू शकते. मग अशा चुकीच्या महितीपेक्षा शालेय शिक्षण द्वारे विद्यार्थ्यांना उद्यासाठी तयार केलं तर काय वाईट आहे. लैंगिक शिक्षणाद्वारे मुली सोबतच मुलाची पण मासिक पाळी विषयी जागरूकता होईल आणि याविषयी असणारी गैरसमजूत दूर होऊन मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे समजून जाईल. त्याबरोबरच एड्स आणि अशा इतर अनेक STDs पासून विद्यार्थ्यांचा बचाव होईल.
सेक्स या विषयावर अनेक जाणकारांनी वेग वेगळी मते असतील परंतु मला जे वाटते ते मी बोललो कारण तुम्ही तुमच्या एखाद्या मित्रासोबत अनेक गोष्टीवर बोलत असाल आणि अचानक सेक्स या विषयावर बोलायला लागलात तर तो मित्र ऐकण्याच्या मनस्तीतीत दिसणार नाही त्याला कारण ही तसेच आहे, सेक्स या विषयाबद्दल लहानपणापासुनच बाऊ करून ठेवला गेलेला आहे. चर्चा केली तर किती असभ्य बोलतोय असच म्हटलं जातं. खरंतर प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या खाजगी आयुष्यात कोणत्याही प्रकारे सेक्स करण्याचा प्रयत्न करत असतो मग जर आपल्या शिक्षण पद्धती मध्ये सेक्स ह्या विषयावर पाचवी पासुनच विद्यार्थ्यांना शिक्षित केलं तर कोणाची काही हरकत नसावी अस मला वाटते. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे बलात्कार, STDs अशा अनेक गोष्टींचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.