मशाल आणि ढाल तलवारीचा खेळ पाहून झाला असेल तर अर्थकारणाकडे वळा!

गेल्या काही दिवसांपासून आपण सतत राज्यात चालणाऱ्या राजकारणावर व्यक्त होत आहोत. कुणाला कोणतं नाव मिळालं? कुणी कोणतं चिन्ह घेतलं? या सगळ्यात आपण रमलेलो असताना आता आपल्या पाकीटावर ज्यादाचा खर्च येण्याची वेळ आली आहे. कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा संजीव चांदोरकर यांचा हा लेख!

Update: 2022-10-12 09:36 GMT

महाराष्ट्रात शिवसेना वि शिवसेना , शिवतीर्थ वि बीकेसी ; मशाल वि ढाल तलवार अशा अनेक जोड्यांमध्ये लागलेल्या कुस्तीचा फड पाहण्यात आपण सगळे मश्गुल आहोत ; त्यातून थोडा वेळ बाहेर येऊया. आणि दूरवर जे वादळ घोंघावू लागले आहे त्याकडे कान देऊया ; आपल्यावर हे वादळ येऊन धडकू शकते ते आहे जागतिक मंदीचे नाणेनिधी / आयएमएफ दर सहा महिन्यांनी नजीकच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल काही ठोकताळे बांधत असते ; तसा अहवाल नाणेनिधीने कालच प्रसिद्ध केला आहे

____

जागतिक अर्थव्यवस्था नजीकच्या काळात मंदावणार आहे ; आणि आम्ही जे मांडत आहोत त्यापेक्षा गोष्टी अजून बिघडू शकतात असे नाणेनिधीला वाटते जागतिक अर्थव्यवस्था/ जीडीपी २०२१ सालात ६% वाढली , ती २०२२ आणि २०२३ मध्ये अनुक्रमे ३.२ % आणि २.७% वाढेल

चालू वर्षात २०२२ मध्ये जागतिक पातळीवरील सरासरी महागाई / दरवाढ ८.८ % राहील अशी भाकिते नाणेनिधीने केली आहेत

अमेरिका / चीन / युरोप / जपान या जगातील मोठ्या अर्थव्यवस्था मंदावतील ; साहजिकच ते जगाच्या बाजारपेठेतून कमी वस्तुमाल खरेदी करतील ; दुसऱ्या शब्दात कमी आयात करतील याचा अर्थ असा कि गरीब / विकसनशील देशांची निर्यात कमी होईल ; निर्यात कमी होईल म्हणजे त्यांचे परकीय चलनाचे / डॉलर्स मधील उत्पन्न कमी होईल ; परकीय चलन उत्पन्न कमी झाले कि त्यांच्या डोक्यावरील परकीय कर्जावरील व्याज / परतफेड करता येणार नाही

जगातील ६० % गरीब / विकसनशील देश आजच्या घडीला परकीय कर्जे थकवण्याच्या बेतात आहेत ; अंतरराष्ट्रीय कर्जबाजारात मोठ्याप्रमाणावर कर्जे थकली तर कर्जबाजार कोसळू शकतो / ठप्प होऊ शकतो ; कारण कर्जबाजारात अनेक धनको एकमेकांच्या तंगड्या गळ्यात घालून असतात , एक कोसळला तर इतरांना घेऊन कोसळणार हे नक्की

याचे दूरगामी / खोलवर परिणाम भारतासाठी डॉलर / रुपया विनिमय दर , परकीय भांडवलाची उपलब्धता अशा गोष्टींवर होऊ शकतो

___

जानेवारी २०२२ मध्ये नाणेनिधीने अंदाज केला होता कि चालू वर्षात भारताची अर्थव्यवस्था ८.२% वाढेल ; जुलै मध्ये म्हणले कि ७.४% वाढेल आणि आता म्हणतात ६.८ % वाढेल , अजून वर्ष संपायला बराच अवकाश आहे , आणि अंदाज सुधारण्यासाठी देखील !

आपला मुद्दा वेगळा आहे

भारताची जीडीपी ३०० लाख कोटी आहे ; नाणेनिधीने अंदाज केल्याप्रमाणे ती जवळपास दीड टक्क्यांनी कमी वाढेल ; म्हणजे जवळपास ४,५०,००० कोटी रुपयांचा वस्तुमाल / सेवा ज्या खपू शकल्या असत्या त्या खपणार नाहीत. वस्तुमाल / सेवांच्या उपभोगाचा / खपाचा संबंध त्यांच्या उत्पादनाशी आणि त्यांच्या उत्पदनाचा औपचारिक / अनौपचारिक क्षेत्रातील रोजगार / स्वयंरोजगार निर्मितीशी असतो ते लक्षात घ्या ; आणि मंदीचा सर्वात जास्त विपरीत परिणाम अनौपचारिक क्षेत्रावर होत असतो

एक लाख कोटी म्हणजे : १, ००, ०००, ००, ००, ००० ; चुकले तर शून्य कमीजास्त करा तुम्हीच ! आपल्या सरासरी मासिक / वार्षिक उलाढालीच्या तुलनेत हा किती महाप्रचंड आकडा आहे हे कळण्यासाठी ती शून्य आहेत. अर्थव्यवस्थेतील हि आकडेवारी आपल्याला अमूर्त , आकलनाच्या बाहेरची असते असा ब्रेनवॉश केला गेला आहे

खरेतर काहीही मानवी आकलनाच्या बाहेर नाही ; जे कोट्यवधी नागरिक आत्मा , पाप-पुण्य , पुनर्जन्म अशा अमूर्त गोष्टी कोळून प्यायले आहेत त्यांच्यासाठी तर नाहीच नाही ! फक्त एकच करा ; या सगळ्या चर्चा / हि आकडेवारी सगळे माझ्या जीवनमरणाशी / माझ्या कच्या बच्यांच्या आनंदाशी संबंधित आहे हे आपल्या मनावर बिंबवा , सगळे काही कळतंय

संजीव चांदोरकर (१२ ऑक्टोबर २०२२)

Tags:    

Similar News