सावधान ! समृद्धीवर प्रवास करण्याआधी अपघाताची कारणं वाचाच...

Update: 2023-07-01 14:35 GMT

समृध्दी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात 25 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची चर्चा सुरु झाली.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना 31 जुलै 2015 रोजी तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत समृद्धी महामार्गाची घोषणा केली. या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथे केले. मात्र पहिल्याच दिवशी समृद्धी महामार्गावर दोन अपघात झाले.

या अपघातांनी सुरु झालेली अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. त्यातच समृद्धी महामार्गावर पहिल्या 100 दिवसात 900 अपघात झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. तर 11 डिसेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान समृद्धी महामार्गावर 39 प्रवाशांचा मृत्यू झाला. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने रिपोर्ट प्रसिध्द केला होता. त्यामुळे नागपूर ते मुंबई हा समृद्धी आणणारा महामार्ग बनण्याऐवजी अपघातमार्ग बनत चालल्याचे चित्र आहे.

त्यातच 1 जुलै रोजी खासगी बसला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा अपघात आहे. त्यामुळे आतापर्यंत समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू पावलेल्यांची संख्या 64 इतकी झाली आहे.

समृद्धी महामार्गावर 22 जानेवारी 2023 रोजी कार डिव्हायडरला धडकून अपघात झाला होता. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

१) 12 मार्च रोजी याच समृद्धी महामार्गावर मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान अशाच प्रकारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात इर्टिगा गाडी दुभाजकाला ध़डकल्याने अपघात झाला. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले होते.

२) मार्च महिन्यातही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड-शेकटाजवळ अपघातात चार भावंडांचा मृत्यू झाला. ते तेलंगणा येथे काकांच्या अंत्यविधीला गेले होते. मात्र परत येत असताना त्यांचा अपघात झाला.

३) समृद्धी महामार्गावर लासूर स्टेशनजवळ स्विफ्ट कारने ट्रकला मागून धडक दिली. त्यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले होते.

या समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने माजी पोलिस महासंचालक पी. एस. पसरीचा यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अपघाताच्या कारणांची माहिती दिली.

ज्यावेळी महामार्गावर अपघात होतात. त्यामागे अनेक कारणं असतात.

१) ड्रायव्हरचं आपल्या वाहनावरचं नियंत्रण सुटल्याने अपघात घडतात.

२) महामार्ग बनवताना त्याचा स्लोप हा अत्यंत महत्वाचा असतो. तो स्लोप जर चुकला तर गाडी वेगात असेल तर गाडीचा अपघात होऊ शकतो.

३) गाडीच्या टायरचं घर्षण होऊन गाडीचे टायर फुटले तर गाडीचा अपघात होऊ शकतो.

४) वाहनाचा अतिवेग

५) वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात होऊ शकतो.

६) रस्त्यावर गाडी दुरुस्त केल्यानंतर आणलेले दगड पुन्हा परत न ठेवल्यास गाडीचा अपघात होऊ शकतो.

७) पावसाळ्यात गाड्यांमधून ऑईलची गळती होत असते. त्यामुळे रस्ता निसरडा होऊ शकतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

८) रस्त्यात प्राणी आल्यानेही अपघात होऊ शकतो.

९) घर्षणामुळे वाहनाला आग लागू शकते. त्यामुळेही अपघात होत असतात.

१०) महामार्गावर लेन चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्यानेही अपघात होण्याची शक्यता अधिक असते.

११) महामार्गावर खड्डे असल्यानेही अपघात होण्याची शक्यता असते.

१२) स्पीड लिमिट न पाळल्याने वाहनाचे टायर गरम होऊन ते बस्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळेही मोठा अपघात होण्याची शक्यता असते.

१३) ट्राफिकचे नियम न पाळल्याने अपघात होण्याची शक्यता असते, अशी माहिती पी. एस. पासरीचा यांनी दिली.

रस्ते अपघातांवर उपाय काय?

१) रस्ते अपघातांवर उपायांसंदर्भात बोलताना भारतात ट्राफिकचे नियम न पाळल्याने जास्तीत जास्त अपघात होत असतात. त्यामुळे ते अपघात होऊ नये, यासाठी प्रत्येकाने नियम पाळणे आवश्यक आहे.

२) स्पीड लिमिट पाळायला हवे. यामध्ये एक्स्प्रेस वे असेल तरी जड वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी आपल्या वाहनाची वेग मर्यादा 100 च्या पुढे नेऊ नये.

३) गाडीमध्ये अग्निशामक यंत्र असायला हवे.

४) प्रत्येकवेळी आपल्या गाडीची तपासणी करणे आवश्यक आहे.

५) एक्स्प्रेस हायवे वर प्रवास करताना टायर चेक करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच चाकांची अलाईनमेंट तपासणे आवश्यक आहे.

६) प्रत्येक 100 किलोमीटरनंतर 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक घ्यायला हवा.

७) रस्त्यांवर खड्डे असतील तर ते बुजवणे हे प्रशासनाचे काम आहे.

८) एक्स्प्रेस वेवर लेनचे पालन करावे.

९) शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा.

१०) एक्स्प्रेस वे वर प्रवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, यासंदर्भात माहिती देणारे फलक महामार्गावर लावण्यात यावेत. जनजागृती करण्यात यावी, अशी माहिती पी. एस पसरीचा यांनी दिली.

Tags:    

Similar News