Same colour same feeling ! आणि शुक्रान !!
प्रजासत्ताक दिनानिमीत्त इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दल फतह अल सीसी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. यानिमीत्ताने इजिप्तमध्ये नाईल नदीवर 'जन्नत ए नाईल'चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शिका आरती कुलकर्णी यांनी आपल्या इजिप्तविषयीच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. आरती कुलकर्णी यांचा इजिप्तमधील अनुभव नेमका कसा होता? याबरोबरच शुक्रान म्हणजे काय? जाणून घेण्यासाठी वाचा हा भन्नाट लेख..
या प्रजासत्ताक दिनाचे विशेष पाहुणे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दल फतह अल सीसी (Abdal Fateh al cc) यांना मी आधीच भेटले आहे ! मी इजिप्तला जाऊन नाईल नदीवर 'जन्नत ए नाईल' नावाची फिल्म केली आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला भारत - इजिप्त शिष्टमंडळामध्ये आमंत्रित केलं होतं. दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमधली ही स्मरणचित्रे. नाईलच्या फिल्मचा पहिला शो आम्ही कैरो मध्ये 'इंडिया बाय द नाईल' फेस्टिवलमध्ये केला होता.
या फिल्मसाठी मला ज्ञानेश्वर मुळ्ये सर, भारताचे इजिप्तमधले राजदूत संजय भट्टाचार्य आणि विश्वास सपकाळ सरांनी मोलाची मदत केली होती. मी ही फिल्म केली, तेव्हा इजिप्त तिथल्या राजकीय परिस्थितीतून नुकतंच स्थिरावत होतं. पण इजिप्तमधले उच्चाधिकारी, पत्रकार, कैरो विद्यापीठामधले प्राध्यापक आणि इजिप्तमधल्या सगळ्याच नागरिकांनी मला भरपूर प्रेम दिलं. कुणाशीही बोलायला गेलं की ते म्हणायचे …. Same color same feeling ! म्हणजे तुमच्या आणि आमच्या त्वचेचा रंग सारखा आहे. म्हणून भावनाही सारख्याच!
इजिप्त आणि भारताचे संबंध फार पूर्वीपासून जिव्हाळ्याचे राहिले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत भारत आणि इजिप्तचे औपचारिक संबंध प्रस्थापित झाले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल गमाल नासेर, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो यांच्या नेतृत्वाखाली अलिप्त राष्ट्र संघटना निर्माण झाली. त्यामुळे तर जगाच्या इतिहासात भारत आणि इजिप्तच्या संबंधांना एक वेगळंच स्थान आहे. इजिप्तची राजधानी कैरोमध्ये ठिकठिकाणी भारत आणि इजिप्तच्या स्नेहाचे दाखले मिळतात. इथेच नाईलच्या काठी भारताचा देखणा दूतावास आहे आणि त्याच्या प्रांगणात आंब्याचं डेरेदार झाडही आहे.
कवी रवींद्रनाथ टागोर यांनी इजिप्तला भेट दिली तेव्हा नाईलबद्दल खूप सुंदर आठवणी लिहून ठेवल्या आहेत, असं मला संजय भट्टाचार्य सरांनी सांगितलं. म्हणूनच कैरो मध्ये आमच्या फिल्मचा शो करताना मी म्हटलं, 'माझी ही फिल्म म्हणजे गंगा आणि नाईलचा संगम आहे !' या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारत आणि इजिप्तमधलं नातं दृढ झालं आहे आणि या मैत्रीपर्वात मलाही सहभागी होता आलं याचा मोठा आनंद आहे ! तुम्ही जर एकदा नाईलचं पाणी प्यायलात तर इथे परत येता, अशी इजिप्तमध्ये म्हण आहे आणि झालंही तसंच. 'नाईल' फिल्मच्या शोच्या निमित्ताने मी पुन्हा इजिप्तला गेले आणि नाईलचं दर्शन घेतलं ! आस्वान ची निळीशार नाईल, लक्साॅरजवळच्या गावांमध्ये जीवन फुलवणारी नाईल, कैरो शहरातून दिमाखात वाहणारी नाईल आणि मग अलेक्झांड्रियाला भूमध्य समु्द्राला मिळणारी नाईल. ही तिची सगळी रूपं माझ्या फिल्ममध्ये मी चित्रित केली आहेत. सीसी यांच्या या दौऱ्यामुळे मला नाईलची यात्रा पुन्हा एकदा आठवली. म्हणून तुमच्याशी हे शेअर केलं. नाईलच्या काठी राहणारे शेतकरी, मच्छिमार तिला नदी म्हणतच नाहीत. 'दर्या' म्हणतात ! अशा दर्यादिल इजिप्तवासियांचे खूप खूप आभार. इजिप्तच्या अरेबिक भाषेत म्हणायचं झालं तर शुक्रान ! शुक्रान !!