संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की हत्या..?
आज तुकाराम बीज.संत तुकाराम महाराज यांच्या मृत्यूबद्धल दोन मतप्रवाह आहेत.पहिला आहे ते विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले आणि दुसरा आहे त्यांची हत्या केली. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा l येरांनी वहावा भारी माथाI असं सांगणारे संत तुकारामाचं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी नेमकं काय झाला असेल याचं विश्लेषण केलं आहे इतिहासकार संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी ...;
संत तुकाराम महाराज यांचा जन्म 1608 चा तर मृत्यू 1650 सालचा म्हणजे ते फक्त 42 वर्षे जगले.ते वयाच्या 42 व्या वर्षी मृत्यू पावले.हे वय मृत्यूचे नाही.संत तुकाराम महाराज अत्यंत तरुण असताना त्यांचा मृत्यू कसा झाला हा नेहमीच शंकेचा,वादाचा विषय राहिला आहे.संत तुकाराम महाराजांचा मृत्यू कसा झाला हे समजून घेण्यासाठी त्यांचा संघर्ष समजून घ्यावा लागेल.ते अत्यंत बुद्धिमान, प्रेमळ आणि श्रीमंत होते.त्यांनी सुमारे 5 हजार अभंग लिहिले.त्यांनी लोकांना कर्जमुक्त केले.संत तुकाराम महाराजांचा लढा विषमतेविरुद्ध होता.
ते म्हणतात
भेदाभेद भ्रम अमंगल।
सर्वांची एकची वीण।
तेथे कैसे भिन्नाभिन्न।
संत तुकाराम महाराजानी विषमतेला विरोध करून समतेचा आग्रह धरला. वर्णव्यवस्थेवर हल्ला करताना संत तुकाराम महाराज म्हणतात
वर्णाअभिमाणे।
कोण झाले पावन।
ऐसें द्या सांगून।
मजलागी।
संत तुकाराम महाराजानी वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला केला.त्यामुळे जे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते ते तुकाराम महाराजावर प्रचंड चिडले.संत तुकाराम महाराजानी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला.
नवसे कन्यापुत्र होती।
मग का करणे लागे पती।
नवस सायास करू नका, प्रयत्नानेच यश मिळेल
असाध्य ते साध्य।
करिता सायास।
कारण अभ्यास।
तुका म्हणे।
प्रयत्नवादी व्हा,दैवावर विश्वास ठेवू नका,हा संदेश संत तुकाराम महाराजानी दिला.
ब्राह्मणाचा व आपला धर्म एक नाही त्यामुळे त्यांचा संबंध तोडा,त्यांच्याकडून कोणतेही विधी करू नका,असा मोलाचा उपदेश संत तुकाराम महाराजानी केला.
अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड।
काय त्यासी रांड प्रसवली।
तुका म्हणे ऐसें लंड।
त्याचे हाणोनि फोडा तोंड।
ब्राह्मनांच्या वर्चस्वातून समाज मुक्त व्हावा या हेतूने संत तुकारामांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर कडाडून हल्ला केला.
ऐसें कैसे झाले भोंदू।
कर्म करुनि म्हणती साधू
अंगा लावुनि राख।
डोळे झाकुनि करिती पाप।
दावी वैराग्याची कळा।
भोगी विषयांचा सोहळा।
तुका म्हणे सांगो किती।
जळो तयांची संगती।
भटाब्राह्मणांची संगत सोडा हे संत तुकाराम महाराजानी निक्षून सांगितले.त्यांनी यज्ञ,होम,हवन, तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, दशक्रिय, पुरोहितगिरी, पंचांग, भविष्य याविरुद्ध मोहीमच उघडली, त्यामुळे ब्राह्मण संत तुकाराम महाराजांच्या विरोधात उभे राहिले.त्यांच्या अभंगांची गाथा ब्राह्मणांनी इंद्रायणीत बुडवली.ते पदोपदी संत तुकाराम महाराजाना त्रास देऊ लागले आणि यातच संत तुकाराम महाराज नाहीसे झाले.
ब्राह्मणी पक्षाच्या मतानुसार ते वैकुंठाला गेले,तर संस्कृतपंडित डॉ.आ.ह.साळुंखे आणि सुदाम सावरकर यांच्या मतानुसार त्यांचा घातपात झालेला आहे.दोन्ही पक्षाचे मत पाहण्यापूर्वी संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ,स्वर्ग याबाबत काय मत होते,ते आपण पाहू.संत तुकाराम महाराज हे जीवनाला कंटाळलेले नव्हते.ते जगू आणि लढू इच्छिणारे हिम्मतवान आणि क्रान्तीकारक संत होते.ते म्हणतात
बुडता हे जन न देखवे डोळा।
येतो कळवळा म्हणोनिया।
लोकांना ब्राह्मणी गुलामगिरीतून बाहेर काढणे हे त्यांचे जीवितकार्य होते.त्यामुळे ते जबाबदारी सोडून इहलोक सोडून जाणारे नव्हते.ते उपास तापास जप जाप्य करणारे नव्हते.
नको सेवू वन।
नको सांडू अन्न।
अन्नत्याग करणे आणि वनांत जाणे,याला संत तुकाराम महाराजानी विरोध केला.
संत तुकाराम महाराजानी स्वतः स्वर्ग,वैकुंठ,मोक्ष नाकारलेला आहे. ते म्हणतात
येथे मिळतो दहिभात।
वैकुंठी त्याची नाही मात।
पृथ्वीवर काबाडकष्ट केले तर दहीभात-भाजीभाकरी तर मिळेल,पण वैकुंठात जे कामधेनू,कल्पवृक्ष,चिंतामणी सांगितले जातात ते धादांत खोटं आहे.ते म्हणतात
भय नाही जन्म घेता।
मोक्षपदा हाणो लाथा।
तुका म्हणे आता।
मज न लगे सायुज्यता।
संत तुकाराम महाराज म्हणतात या जन्माची मला भीती नाही,म्हणजे ते पृथ्वीवर राहू इच्छित होते,मोक्षाला लाथा घाला असे म्हणून ते मोक्ष(वैकुंठ) नाकारतात.जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात,ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का?.तथाकथित मोक्षाचे अतिउच्च पद म्हणजे सायुज्यपद आहे, असे वैदिक परंपरा सांगते,त्या सायुज्यपदाला तुकाराम महाराज नाकारतात. म्हणजे जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का.?. तुकाराम महाराज म्हणजे
बोले तैसा चाले।
त्याची वंदावी पाऊले।
या विचारांचे जसे बोलायचे तसे वागायचे,असे होते.म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत हे त्यांच्याच अभंगावरून/विचारावरून स्पष्ट होते.
मग तुकाराम महाराजांच्या वयाच्या 42 व्या इतक्या तरुण वयात मृत्यू कसा झाला.?
संत तुकाराम महाराजांचा लढा ब्राह्मणाविरुद्ध होता, त्यांनी तुकाराम महाराजाना खूप त्रास दिला होता. तुकाराम महाराज विचाराने लढत होते, तर, ब्राह्मण त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान करत होते. त्यांच्या अभंग लेखनावर बंदी घालणे, त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवणे, त्यांची बदनामी करणे, या बाबी ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांची हत्या करून ते विमानात बसून वैकुंठाला गेले अशी अफवा पसरवली.
अफवा पसरवण्यात ब्राह्मणांचा हात जगात कोणीही धरणार नाहीत. सर्वात महत्वाचे -संत तुकाराम महाराजांनाच विमान न्यायला आले ,तर मग आद्य शंकराचार्य, संत एकनाथ,रामदास यांना न्यायला विमान का आले नाही..?
17 व्या शतकात वैकुंठाला नेणारे सोडा पण चंद्रावर घेऊन जाणारे तर विमान भारतात होते का? वैकुंठाला खोटं ठरवणारे संत तुकाराम महाराजच वैकुंठाला गेले,असा प्रचार करणे,ही बाबच त्यांची हत्या झाली,हे स्पष्ट करते...✍
- श्रीमंत कोकाटे ( इतिहासकार संशोधक )