'आरक्षण' भ्रम आणि वास्तव: जगदीश ओहोळ

I.N.D.I.A आघाडीने 14 मेन स्ट्रीम मीडियातील टीव्ही अँकर वर बहिष्कार टाकला त्याच वेळी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातही काही टीव्ही अँकर च्या माध्यमातून आरक्षण विरोधी प्रपोगंडा राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशाच एका प्रपोगंड्याचा लेखक जगदीश ओहोळ यांनी केलेला पंचनामा...;

Update: 2023-09-15 05:41 GMT


"मागास समाजातील अनेक श्रिमंतांनी जात कधीच सोडलीय आता ते फक्त आरक्षणासाठी जातीत थांबलेत. अशा लोकांनी आरक्षणही सोडायला हवं."

असं मेनस्ट्रीम मीडियात असणारे, मराठवाडा सोडून मुंबईत विलासी जीवन जगणारे, लाईटीच्या झगमगाटात वावरणारे विलास बडे लिहितात.

तर आदरणीय पत्रकार विलास बडे, तुम्ही म्हणता तसं "मागास समाजातील अनेक श्रिमंतांनी जात कधीच सोडलीय आता ते फक्त आरक्षणासाठी जातीत थांबलेत." बरं.. फक्त आरक्षणासाठी जातीत थांबलेत.? या वाक्याला काय आधार आहे नेमका? या देशात अमुक तमुक जातीतील माणूस श्रीमंत झाला कि त्याला त्या जातीतून बाहेर पडण्याची आणि जात सोडून काय म्हणून जगण्याची व्यवस्था आहे.? बरं एखादा एसी एसटी प्रवर्गातील व्यक्ती खूप श्रीमंत झाला म्हणून या देशात त्याची जात पुसली जातेय का ? त्याच्या सोबतचे सर्व व्यवहार जात विरहित होतात का? आरक्षणामुळे जात आहे कि जाती होत्या म्हणून आरक्षण आहे.?

दुसरं मागासांना आरक्षण सोडा, हे मोठ्या काळजीनं सांगणारे तुम्ही 'उच्चवर्णीयांना, जाती सोडा' असं कधी सांगणार आहात का?

मागासांनी जात सोडणे आणि धरणे याने किती फरक पडतो? पण स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या किती लोकांनी जात सोडली हे त्यांना विचारण्याच धाडस करणार आहेत का ?

मागासांनी कितीही जात सोडली तरी तुम्ही त्यांना #मागास हेच नाम वापरून "आरक्षण कधी सोडता?" असा सवाल विचारणार! यातच आरक्षणाचं मूळ आहे.

आणि संविधानानुसार आरक्षण का आहे ? हे ज्याला कळलं तो आरक्षणात गरीब, श्रीमंती या खेळात अडकत नाही.

पुढे माझ्या उत्तरावर तुम्ही म्हणालात..

जगदीश ओहोळ आपल्या मतांचा पूर्ण आदर करून काही गोष्टी मांडतोय.

* आरक्षण हा मुलभूत अधिकार नाहीय.

* आरक्षण अनादीकाळापर्यंत ठेवावं असं घटनाकारांनी घटनेत लिहिलेलं नाही.

* सामाजिक समतोल राहावा, मागे असणाऱ्यांना पुढे येण्याची संधी मिळावी हा आरक्षणाचा मुख्य उद्देश होता. पण आरक्षणामुळे सामाजिक असमतोल निर्माण होतोय का याचाही विचार करण्याचीही वेळ आलीय. आरक्षणाचा फायदा समाजातील एक वर्ग घेत त्या समाजातला उच्चवर्णीय बनतोय का? मागास समाजातील मोठ्या जाती मनगटाच्या बळावर आरक्षण ओरबाडताहेत का? आरक्षणाचा फायदा समाजात समसमान जिरपला का? याची उत्तरं शोधावी लागतील.

* मराठा जात म्हणून उच्चवर्णीय असेल पण बदलत्या काळात त्या समाजातील मोठ्या वर्गाची खालावलेली आर्थिक स्थिती एका नव्या विषमतेचं कारण ठरतीय का? याचा विचार करावा लागेल.

* मागास समाजातील विकसितांनी वारंवार जातीचं भांडवल करत पिढ्यानपिढ्या फायदे घेत राहाणं आणि उच्चवर्णीयांनी जातीचा खोटा अभिमान बाळगणं चुकीचंच आहे. असं करून दोघेही आपपापल्या समाजातील खऱ्या गरजुंची वाटमारी करत असतात.

__________________________

आरक्षणाविषयी भ्रम आणि नकारात्मकता निर्माण करण्याचं काम काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत, त्यातच भर म्हणजे तुमची हि पोस्ट अन प्रतिवाद आहे.

तुम्ही म्हणता

आरक्षण हा मूलभूत अधिकार नाहीय..

पण आरक्षण हि संधीची समानता आहे. हे मात्र तुम्हाला कुठंच सांगावं वाटत नाही. आरक्षण हा मूलभूत अधिकार नाहीच, पण ज्यांच्या जगण्याचे मूलभूत प्रश्न पिढ्यानपिढ्या मिटले नाहीत, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी ज्यांची आयुष्य पालावर, ऊस तोडणीच्या फडात जात आहेत त्यांना बरोबरीत येण्यासाठीची संधी म्हणजे आरक्षण आहे. म्हणजे मागासांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी व त्यांना जगण्यासाठी आरक्षण आहे.

पुढं तुम्ही हास्यास्पद लिहिता "आरक्षण अनादीकाळापर्यंत ठेवावं असं घटनाकारांनी घटनेत लिहिलेलं नाही."

व्वा ! काय तर्क आहे.. उद्या एखादं मोठं आंदोलन उभं राहीलं कि तुमच्यासारखे लिहिणार "हीच राज्यघटना अनादीकाळापर्यंत ठेवावी, असं घटनाकारांनी घटनेत लिहिलं नाही."

पण याबाबतीत परवा मोहन भागवत यांचं एक स्टेटमेंट आलेलं ते तुमच्या सारखे पत्रकार आणि चॅनेल यांच्यामुळं आम्हाला कळलं "जो पर्यंत समाजात अस्पृश्यता आहे , जातीवाद आहे तो पर्यंत आरक्षण राहणार." आता तुम्हाला आमचं शोषितांच दुःख नाही कळत जाऊद्या पण आता शोषक काय म्हणतात त्याचा तरी अर्थ समजून घ्यायचा जरा.

पूढे तुम्ही म्हणता "सामाजिक समतोल राहावा, मागे असणाऱ्यांना पुढे येण्याची संधी मिळावी हा आरक्षणाचा मुख्य उद्देश होता."

तुम्ही म्हणता सामाजिक समतोल राहावा.. राहावा ?? आधी कुठे होता सामाजिक समतोल ?? तर बडे जी 'राहावा' नाही 'सामाजिक समतोल यावा.'

राहावा असं म्हणून तुम्ही , आधी सगळं ठीक व्यवस्थित बरोबरीत सुरु होतं असं रुजवत आहात.

मागे असणारांना पुढे येण्याची संधी मिळावी हा आरक्षणाचा मुख्य उद्देश होता, असं तुम्ही म्हणता तर लक्षात घ्या "केवळ मागे असणारांना पुढे आणणे नव्हे तर 'सर्वाना समान संधी' हे आरक्षणाचं तत्व आहे. आणि सामाजिक समतोल केवळ आरक्षणाने नव्हे तर तो माणसांच्या वर्तनाने आणि मानसिकतेने येत असतो.

पुढे मात्र तुमचा निष्कर्ष फारच भयानक आहे,

तुम्ही म्हणता "पण आरक्षणामुळे सामाजिक असमतोल निर्माण होतोय का ? याचाही विचार करण्याची वेळ आलीय." तशी तर हि ढगात गोळी आहे , तुमच्या सवयी नुसार 'सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार...' तस !

वर म्हणताय आरक्षणाची निर्मिती सामाजिक समतोल राहावा म्हणून झाली अन खाली म्हणताय आरक्षणामुळे सामाजिक असमतोल निर्माण होतोय.. व्वा ! मग यात बरोबर काय आणि कोण ? सामाजिक समतोल निर्माण व्हावा म्हणून आरक्षण देणारे घटनाकार कि आरक्षणामुळे सामाजिक असमतोल निर्माण होतोय असं वाटणारे तुम्ही ??

पुढं तुम्हाला लगेच सत्तर वर्षाच्या आरक्षण काळात फायदा घेतलेल्या मागास लोकांत तयार झालेले महान श्रीमंत उच्चवर्णीय दिसायला लागतात.

पुढं तुम्ही म्हणता "मागास समाजातील मोठ्या जाती मनगटाच्या बळावर आरक्षण ओरबाडताहेत का?" हे वाचून मनात आलं प्रतिवाद करण्याच्या पात्रतेचीही पोस्ट नाही, पण पुनः लक्षात आलं, नाही बोललं तर तुम्ही हे असलंच खपवत राहणार.. आणि अ ब क ड करा म्हणत सगळीकडे फूट पाडणार! अहो विलासराव, आरक्षित प्रवर्गातील आरक्षण मनगटाच्या बळावर दुसऱ्या जातीला कसं ओरबाडता येतं ? हे एकदा स्पष्ट करा ? किती उथळ लिहावं माणसाने ?? आरक्षण हि काय ब्रेकिंग न्यूज आहे का ? सगळ्यात आधी आम्ही दाखवली म्हणण्यासाठी सूत्रांच नाव घेऊन खोटं खपवायला ? आरक्षण हे जातींना नव्हे तर #प्रवर्गांना आहे.. हे आधी लक्षात घ्या. प्रवर्गातील जो माणूस.. माणूस म्हणतोय मी जात नव्हे.. जो स्वतःला सिद्ध करेल तो त्या प्रवर्गाच्या कोट्यातून संधी मिळवेल. यात मोठी जात ओरबाडते, छोटी जात मागे हा तुमचा फुटीचा अजेंडा आहे.

पुढं तुम्ही म्हणता "आरक्षणाचा फायदा समाजात समसमान जिरपला का? अहो बडे झिरपायला आरक्षण म्हणजे काय विहीर आहे का ? आरक्षण म्हणजे काय? ज्या वर्गाना हि संधी आहे त्यातील लोकांनी काहीच न करता लोक, समाज समृद्ध प्रगत होणार आहेत का .? जे लोक , जो समाज अंधश्रद्धा, गुलामी हुजरेगिरी, व्यसनं अन चुकीच्या बाबी नाकारून शैक्षणिक, सामाजिक वाटेवरून चालून प्रगती करेल त्यांची प्रगती होईल, मग त्या जात समूहानं आरक्षणाचा अधिक लाभ घेतल्याचे चित्र उभे राहील पण लक्षात हे घेतलं पाहिजे कि अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणात त्या प्रवर्गातील 59 जातींना प्रगती करण्याची समान संधी आहे. अनुसूचित जमाती प्रवर्ग 07% आरक्षणात 47 जाती त्यांना आपापल्या प्रगतीची समान संधी आहे, इतर मागास वर्ग obc 19% आरक्षणात 346 जाती या सर्व जातींना आपापल्या प्रवर्गातुन प्रगती करण्याची समान संधी आहे.

*मराठा जात म्हणून उच्चवर्णीय असेल पण बदलत्या काळात त्या समाजातील मोठ्या वर्गाची खालावलेली आर्थिक स्थिती एका नव्या विषमतेचं कारण ठरतीय का? याचा विचार करावा लागेल.

- तर या मुद्द्यात एकदम सहजपणे 'मराठा जात म्हणून उच्चवर्णीय असेल.. ' असं विधान करता अन इथंच आरक्षणाच्या तत्वाला आव्हान देता. त्यातील मोठया छोट्या वर्गाची परिस्थिती कितीही खालावली तरी ते उच्च जातीय मानसिकतेतच असतात, हे मात्र मांडणे तुम्ही टाळता. त्यांच्या त्या आर्थिक विषमतेचे कारण शोधणारे तुम्ही सवर्णवादी मानसिकतेचे मात्र कुठंच काही बोलत नाही. ज्यांनी हि उच्च मानसिकता सोडली असे अनेक बांधव कुणबी दाखल्यासाठी झटत आहेत पण काही मात्र आजही उघडपणे 'पावला नाही म्हणून बाप बदलणारी आमची औलाद नाही..' असे टोकाचे बोलताना सर्वत्र दिसत आहेत.

* मागास समाजातील विकसितांनी वारंवार जातीचं भांडवल करत पिढ्यानपिढ्या फायदे घेत राहाणं आणि उच्चवर्णीयांनी जातीचा खोटा अभिमान बाळगणं चुकीचंच आहे. असं करून दोघेही आपपापल्या समाजातील खऱ्या गरजुंची वाटमारी करत असतात.

आता विचार करून सांगा, मागास समाजातील विकसितांनी वारंवार जातीचं भांडवल करत पिढ्यानपिढ्या फायदे घेत राहाणं... पिढ्यानपिढ्या फायदे ? आरक्षण येऊन किती पिढ्या झाल्या? त्यात शिकायला, SC/ST तील लोक उच्च शिक्षित कधीपासून व्हायला लागले? जितकं जातीचं भांडवल आजवर उच्च वर्णियांनी केलं आणि आपली धार्मिक , आर्थिक , राजकीय सत्ता कायम ठेवली त्यावर कधी कोण सवाल करणार? त्याचा हिशोब कधी मागणार आहात का? स्वतः आरक्षण समूहातून वर आलेल्या तुमच्या माझ्या सारख्या लोकांनी जात, आरक्षण सोडून , नुसता रोटी नव्हे , बेटी व्यवहार राजरोसपणे करून सुरु केलं तर आरक्षणाची गरज उरणार नाही, पण त्यावर न बोलत , भूमिका न घेता इतरांना आरक्षण कधी सोडताय विचारण्यात काय अर्थ आहे?

आणि उच्चवर्णीयांनी जातीचा खोटा अभिमान बाळगणं चुकीचंच आहे. असं करून दोघेही आपपापल्या समाजातील खऱ्या गरजुंची वाटमारी करत असतात. इथं पाहिलं विधान बरोबर ठरविण्यासाठी व त्यांचा रोष नको म्हणून तुम्हाला दोघेही म्हणून समतोल राखावा लागतोय.

असो स्वतःला सोफिस्टिकेटेड दाखवत मुंबईत मीडियात टिकून राहणं हेही तुमच्यापुढं आव्हानच आहे म्हणा.. असेच टिकून राहा.

#जगदीशब्द


Tags:    

Similar News