जंगल आणि आदिवासी समाजाचे नाते
जंगल आणि आदिवासी समाजाचे नाते हे आई – मुलाचे आहे. आदिवासींची निसर्गपूजक संस्कृती आणि ग्रामीण भागातील संस्कृतीशी तिची जोडलेली नाळ जाणून घेण्यासाठी सागर गोतपागर यांचा हा लेख नक्की वाचा...;
“जंगलासोबत आदिवासींचे नाते आई – मुलाचे आहे. आई ज्याप्रमाणे मुलाचे पालन पोषण करते त्याच प्रमाणे हे जंगल आम्हा आदिवासींचे पालन पोषण करते. तुम्ही जंगलाला संपत्ती म्हणत असाल त्याचे मूल्य पैशांमध्ये काढत असाल पण जंगल आमच्या उपजीविकेचे साधन आहे”.
जेष्ठ आदिवा नेते माधवजी गोटा यांची ही प्रतिक्रिया आहे. आदिवासी आणि जंगल यांच्या सहसंबंधाची माहिती आपल्याला या त्यांच्या प्रतिक्रियेतून मिळते. आदिवासींचे जगणे पूर्णपणे जंगलावर अवलंबून असते. दुर्गम आदिवासी भागातील गावांच्या अत्याश्यक गरजा जंगलातून भागवल्या जातात. आदिवासी संस्कृती त्यांचे सामुहिक जीवन जंगलाशिवाय पूर्ण होत नाही. आदिवासींच्या प्रत्येक प्रथा परंपरा जंगलाशी निगडीत असतात. जंगल हे त्यांच्या उपजीविकेचे साधन असले तरीही जंगलातील संसाधने मिळेल तशी ओरबाडणे, त्यांचा अपव्यय करणे, लोभासाठी ती नष्ट करणे ही वृत्ती आदिवासींमध्ये दिसून येत नाही. जल जंगल जमीन टिकली तर आपली संस्कृती टिकेल तरच आपण टिकू या भावनेतून जल जंगल जमिनीचे संवर्धन करण्याचे नियम आदिवासींच्या संस्कृतीमध्ये प्रथा परंपरामध्ये गुंफलेले आढळतात.
शिकार करणे हा पूर्वापार चालत असलेली परंपरा अस्तित्वात असली तरीही आदिवासी प्राण्यांच्या प्रजनन काळात शिकार करत नाहीत. माडिया गोंड आदिवासींमध्ये त्यांच्या आडनावावरून वेगवेगळे देव असतात. दोन देव, चार देव, सहा देव. आदिवासींची वेगवेगळी आडनावे यातील एका देवात मोडतात. एकाच देवाच्या व्यक्तीशी लग्न संबंध होत नाहीत. यातील प्रत्येक देवाचा एक प्राणी देव असतो. उदा कुणाचा देव ससा, कुणाचा कासव. ज्याचा देव ससा आहे ते सश्याची शिकार करत नाहीत. पण इतर देव असणारे त्यांचा देव सोडून इतर प्राण्याची शिकार करू शकतात. अशा प्रकारे शिकारीमध्ये सर्रास सर्वजण एकाच प्राण्याची शिकार करत नाहीत. या प्रथेमुळे जंगलातील प्राण्याचा समतोल राखला जातो. एखादा प्राणी लावलेल्या जाळ्यातून निसटून पुढे गेला तर ते त्याच्या मागे पुन्हा लागत नाहीत. पावसाळ्यात जंगलातील बांबूच्या वास्त्यांची भाजी केली जाते. पण एकाच बांबूच्या बेटातील सर्व वास्ते काढले जात नाहीत. बांबूच्या वाढीसाठी ते राखीव ठेवले जातात. जंगलाच्या संवर्धनासाठी गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभा कार्यकर्ते गस्त घालतात. गस्त घालून ते त्यांच्या क्षेत्रातील जंगलाचे संवर्धन करतात.
माडिया गोंड आदिवासींच्या सन उत्सवात निसर्ग पूजक परंपरा आढळते. धानाची रोवणी, धानाची कापणी करण्याचा त्यांचा सन असतो. धान कापणीच्या वेळी देखील गावात सामुहिक सोहळा होतो. गाव पुजाऱ्याच्या हस्ते प्रथम कापणी केली जाते. त्यानंतर गावात कापणीला सुरवात होते. जुने धान्य संपल्यावर नवे धान्य खाण्यास सुरवात करण्यासाठीचा देखील एक वेगळा सोहळा असतो. त्याला नवा पंडूम असे म्हटले जाते.
लग्न समारंभा नैसर्गिक मांडवातच केला जातो. पूर्वी लग्न विधीच्या ठिकाणी नांगर ठेवला जात असे. मोहाचा मुंडा रोवला जातो. मोहाच्या या सूर्य चंद्र तारे आदिवासींची शेतात वापरली जाणारी शस्त्र कोरली जातात. आदिवासींची प्रतीके कोरली जातात. मोहाच्या मुंड्याचे पूजन हा एक सुंदर सोहळा असतो. मुंड्याभोवती फेर धरून रेला नृत्य केले जाते. मोहाचे पूजन असो अथवा इतर सन यामध्ये निसर्ग पूजा प्रामुख्याने दिसून येते.
फोटो मोहाचा मुंडा आदिवासींमध्ये दिसून येणाऱ्या निसर्गपूजक संकृतीची नाळ महाराष्ट्रातील इतर ग्रामीण भागातील प्रथा परंपरांमध्ये असल्याचे आढळते. आदिवासींमध्ये मोहाच्या लाकडाची पूजा केली जाते. तर ग्रामीण भागात आजही लग्नाच्या आदल्या दिवशी मुहूर्त मेढ रोवण्याचा सोहळा असतो. यामध्ये पाच वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या रोवल्या जातात. त्याची पूजा केली जाते. लग्न घराच्या समोर करंजाच्या फांद्यांचा मांडव घातला जातो. याचे विश्लेषण करायचे झाल्यास आदिवासींच्या निसर्ग पूजक संकृतीची काही बीजे ग्रामीण भागातील संस्कृतीमध्ये देखील पाहायला मिळतात. अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील या प्रथा परंपरा हळूहळू लुप्त होत चालल्या आहेत. परंतु आदिवासी भागात मात्र या जश्याच्या तशा अद्याप पाहायला मिळतात.
आदिवासी संस्कृती ही पर्यावरणाला धक्का लावत नाही. आपल्याकडे शहरातील कार्यक्रमात होणाऱ्या जेवणावळीत धोकादायक असलेल्या प्लास्टिकच्या पत्रावळ्या द्रोण वापरले जातात ज्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. आदिवासी आजही पळसाच्या पानांच्या पत्रावळ्या व द्रोण वापरतात ज्यांचे सहज विघटन होऊन पर्यावरणात त्याचे खत तयार होते.
तथाकथित विकासाच्या दिशेने झेपावताना विकसित समजल्या जाणाऱ्या पुढारलेला समजल्या जाणाऱ्या माणसाने निसर्गाला ओरबाडण्याचे काम केले आहे. हा तथाकथित विकास येथील पर्यावरणाला धोका निर्माण करणारा आहे. येथील नद्या जंगल हवा प्रदूषित करणारा आहे. या तथाकथित विकासाला आवश्यक असलेले खनिज मिळविण्यासाठी अशा सुजलाम सुफलाम असलेल्या आदिवासी भागात वृक्षतोड केली जात आहे. तीच परिस्थिती गडचिरोलीमध्ये येऊ घातली आहे. जेष्ठ आदिवासी नेते देवाजी तोफा म्हणतात “ गडचिरोली हा सोन्याच्या ढगावर उभा राहिलेला जिल्हा आहे. हा सोन्याचे ढग लुबाडण्यासाठी चोर चारी बाजूनी टपून बसलेले आहेत. या जंगलाचे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आदिवासी समाज संविधानाने दिलेले वनहक्क संरक्षण तसेच पेसा कायद्याचे संविधानिक शस्त्र घेऊन याविरोधात वर्षानुवर्षे संघर्ष करत आहे.
पर्यावरण वाचविण्याची ही लढाई केवळ आदिवासींची नाही. तर पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाचीच आहे. चला निसर्गाला वाचविण्याची आपल्या वाट्याची ही लढाई प्रत्येकाने लढूया....