शास्त्रीय व सुगम संगीत आणि बहुजन समाज

शास्त्रीय संगीत आणि बहुजन समाज यांचं नातं काय आहे? लावणी, तमाशा, शाहीरी, वीर सर, श्रुंगार रस न समजताही बहूजन समाज भजन व भावगीतात का रमतो? बहूजन समाज सर्व कलांमध्ये रमण्यामागे नेमकं कारण काय आहे? याचाच वेध समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. बाळासाहेब पवार यांनी घेतला आहे.;

Update: 2023-02-06 05:48 GMT

लावणी व तमाशाचा फड, शाहीरी डफ याचा वीर रस व शृंगार रस न समजताही अंगात ते जन्मजात भिनलेला बहुजन समाज भजन व भावगीतात रमतो. पण त्याला त्यातील फार समजतं अशातला भाग नाही. तमाशा त्यातील गण गवळण व वग त्याला आकर्षित करतो. तो तमाशात जसा रमतो तसाच भजनात, भारुडात व देवीच्या गाण्यात व वाघ्या मुरुळीच्या गाण्यात म्हणजे जागरण गोंधळात पण तेवढाच रमतो त्याला ते आपलं जगणं वाटतं. लोकसंगीत त्याला भावतं. तर भजन, भारूड, देवीची गाणी हा त्याच्या श्रद्धेचा भाग असतो .

लोकसंगीत हे त्याला आपले वाटते, पण तो त्याला आश्रय देत नाही. शास्त्रीय संगीत मात्र त्याला पचवायला जड जाते, तो त्या पासून फार दूर असल्याचे जाणवते, ती परंपरा त्याचीच असताना त्याला परकी वाटते तो तिला ऐकताना ही अभिजना ची परंपरा अशाच दृष्टीने पाहतो. ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत नाही. फार अत्यल्प लोकांना यात रस असतो. त्यामुळे यात ही घराणे निर्माण झाली आहेत. अर्थात ही राग व गायकीची घराणी तर आहेतच, पण शास्त्रीय संगीत ठराविक लोकांच्या घरातच वाढत गेले हे मान्य करावे लागेल.

आणखी एक मुद्दा म्हणजे शास्त्रीय गायनाच्या मैफिलीत जे भजन गायले जाते त्यात सर्वाधिक वारकरी भक्ती संप्रदायाचे बहुजन संतांचे अभंग असतात. कोणताही शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम या अभंगा शिवाय होऊच शकत नाही. विविध राग, वेगवेगळ्या बंदिशी , ठुमरी, टप्पा किंवा आणखी काही गायन प्रकार समजत नसले तरी भजनाला मात्र बहुजन समाज दाद देतो. आपण भजन म्हणतोच, अभंग हा कीर्तनाचा महत्वाचा अंग असतो. ते कीर्तनात गाण्याची पद्धत वेगळी आहे व शास्त्रीय संगीताचे पारंगत गायक तेच, अभंग शास्त्रीय पद्धतीने गातात त्याचा बाज व साहित्य थोडे आधुनिक असते. बैठक वेगळी असते परंतु याचा केंद्र बिंदू महाराष्ट्राचा बहुजन महासमन्व्यक पांडुरंग च असतो. हे नेहमी जाणवते , पंढरपूरची महती सांगणारे अभंग असतात. संतांच्या रचना असतात. संत तुकारामांचे अभंग , नामदेवाचे अभंग, जनाबाई, चोखा मेळा, संत सावता यांच्याच रचना शास्त्रीय गायनाच्या मैफिलीत असतात. मग शास्त्रीय संगीत वेगळं काय असते. वेगवेगळे राग् आम्हाला समजत नाहीत. ते खूप वेळ गायले जातात पण उपस्थित लोक योग्य वेळी दाद देतात.

बंदिश गायली जाते ती मुख्यतः कृष्ण व राम यांच्याच सदर्भात असते. या बहुजन नायकांची महती सांगणारा हा संगीत प्रकार आहे असं न समजणाऱ्याला समजते. जेव्हा त्यात कृष्ण व राम यांची नावे येतात एवढं तरी लक्षात येते. त्यामुळे शास्त्रीय संगीत हे आपले क्षेत्र नाही, असा समज आज पण बहुजन समाजात आहे. त्यामुळे त्याला बहुजना चा अतिशय अल्प प्रतिसाद मिळतो. जो प्रेक्षक वर्ग सभागृहात असतो त्यात बहुतांश विशिष्ट वर्गाचे लोक असतात. खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हे हिंदुस्थानी संगीत त्यांनी पुढे नेलं आहे व आजही तेच त्याचे प्रेक्षक आहेत. पण यात बहुजन समाजाचा प्रेक्षक कुठे आहे ? जर प्रेक्षक नसेल तर त्यातून गायक कसे निर्माण होणार ?

शास्त्रीय गायन ही खरोखर साधना आहे. ती चालता चालता शिकण्याची गोष्ट नाही. ना ती पुस्तकातून शिकण्याची गोष्ट आहे. ही गुरुकडूनच प्रत्यक्ष शिकण्याची कला आहे. या साधनेत बहुजन समाज कमी पडतो. त्याला गुरु भेटणे व त्याने तेवढे कष्ट घेत साधना करणे हे आणखी त्याच्या गावी नाही. एक, दोन किंवा आणखी काही परीक्षा पास होऊन अर्धवट संगीत वर्ग चालवण्या पलीकडे तो काही करत नाही .

बहुजन नेहमी भक्त होतो, तो सेवेकरी होत नाही. संगीताची सेवा व साधना केल्या शिवाय ते आत्मसात होणार नाही. त्याच्यात ते शिकण्याची क्षमता नाही, असे अजिबात नाही तो काहीही काढून शिक्षण साध्य करू शकतो. पण प्रश्न मानसिकतेचा आहे. मला हे शिकायचं आहे. या क्षेत्रात नाव कमवायचं आहे, अशी जिद्द असणारी मुले व पालक भेटत नाहीत. पैसा मिळण्याचे ते साधन नाही, अशी त्यांची भावना आहे. परंतू यात जर कष्ट घेतले तर खूप पैसा मिळतो. या क्षेत्रातील लोकांच्या तारखा वर्ष-वर्ष मिळत नाहीत. कार्यक्रम ठेवणारा बहुजनच असतो, खर्च करणारा तोच असतो, प्रेक्षकात मात्र कमी असतो. गायन तर दूरची गोष्ट हे आपलं दुर्दैव आहे.

मंदिरे जसे बहुजन समाज वर्गणी करून बांधतो परंतु ताबा मात्र पुरोहिताकडे सोपवतो. गायल्या जाणाऱ्या रचना या बहुजन संतांच्या आहेत. गाणारा गायक मात्र बहुजन नाही. अर्थात कोण गातो या बद्दल आक्षेप अजिबात नाही. जो शिकणार, कष्ट करणार तोच गाणार त्यात बहुमताची किंवा वशिल्याची गोष्टच नाही. प्रश्न गुणवत्तेचा आहेच . पण दुर्दैवाने गुणवत्ता असूनही त्या क्षेत्राला आपले क्षेत्र न मानने हे दुर्दैवी आहे. ते कुस्तीच्या फडात लंगोट लावत नाहीत मान्य आहे. पण आपण ही शास्त्रीय संगीतात मुलांना पाठवत नाही हे पण खरे आहे.

गझल या प्रकारात भीमराव पांचाळे यांनी मराठी गझलेला वेगळी उंची मिळून् दिली. सुरेश वैराळकर यांनी गझल ग्रामीण भागात पोहचवली. गझल कार शोधले, मंचावर आणले, महाराष्ट्र भर फिरवले. खेड्या पाड्यातील पोरं, मुली पण कमी नाहीत. अगदी कसदार गझल लिहितात व सादर करतात. आणखी खूप मोठा टप्पा गाठायचा आहे हे तितकेच वास्तव आहे.

शास्त्रीय गायनात ही असे व्हायला हवे आश्रयदाता समाज मात्र ही कला आत्मसात करायला कमी पडतो आहे ही खंत आहे. प्रथम त्याने ती आपली मानली पाहिजे तर त्यात त्याला यश मिळेल.

एक दुर्दैवी खंत म्हणजे आम्ही कला पण जातीच्या चौकटीत कोंबून टाकल्या आहेत. तमाशा विशिष्ट लोकांनी करायचा. शास्त्रीय गायन विशिष्ट समाजानेच करायचे. वादक सुद्धा एक विशिष्ट जातीचा असणार. संगीताचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या जातीत वाटलेले आहेत. लोकसंगीत वेगळ्याचं लोकांचे. आदिवासींचे नृत्य व गायन त्यांची वेगळी वाद्य, आम्ही त्यांच्याकडून शिकलो नाही. शास्त्रीय संगीताला धर्म नाही देशाची सीमा नाही हे सर्वांचं आहे, आमचं आहे.

मुस्लिम धर्मीयांमध्येही गायनाची घराणी आहेत. वादक आहेत, जे जागतिक पातळीवर पोहचले आहे, याची नोंद विसरून चालणार नाही. त्यात ही सुफी संगीत, कव्वाली ही त्यांच्या पुरतीच मर्यादित ठेवली. आम्ही ती पण शिकत नाही. कव्वाली चा कार्यक्रम आम्हाला ऐकावा पण वाटत नाही त्याच्याकडे पूर्ण पाठ फिरवतो.

असे अनेक संगीत प्रकार आहेत ते ग्रामीण भागातील बहुजन माणसांपर्यंत पोहचलेच नाहीत . तो त्या कलेपासून हजारो वर्ष दूरच राहिला. यातील सधन वर्ग याकडे मनोरंजनाचे साधन म्हणून बघतो टाळ्या वाजवतो. व हेच आपले इति कर्तव्य मानतो. आपली मुलं या क्षेत्रात जावीत हे मनात ही आणत नाही. या कला त्याने दूर ठेवल्या आहेत .

बहुजन स्त्रियांबद्दल न बोललेलं बरं. त्यांना हे सर्व इतक निरस व काही तरी विचित्र वाटतं. नाच गाणं म्हणजे काही तरी वाईट प्रकार ही भावना अगदी घट्ट असते. यात मुलं-मुली बिघडतील हे आपल्या घरापर्यंत यायला नको याची ती काळजी घेत असतात. धार्मिक कार्यक्रमात काय होईल तेवढा तिचा संबंध येतो. आपल्या मुलामुलींना प्रोत्साहन देणारी आई जर अनभिज्ञ असेल तर हे आपल्या घरात व समाजात कसे रुजेल.

बदलत्या काळा बरोबर बदलावे लागेल. बहुजनांची पोरगी लावणीवर नाचली तर तिचा तमाशा होतो. व उच्चवर्णीय लावणी शिकून नाचली तर तिचा स्टेज शो होतो. ही बाब बरेच काही सांगून जाते. आम्ही आमच्या मुलांचे कौतुक कधी करणार व या क्षेत्रात आपली मुले पाठवून लक्ष देऊन पारंगत कसे होईल यासाठी धडपड कधी करणार ? शास्त्रीय संगीत बहुजना पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नांना साथ कशी देणार ? याचा गांभिर्याने विचार केला पाहिजे.

नगारा संगीत महोत्सव एक प्रयत्न.

अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक समाज या संस्थेने न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात संगीत विभाग सुरु केला . आकारावी पासून तो एम ए संगीत पर्यंत पोहचला आहे . ग्रामीण भागातील बहुजन मुलानं मध्ये क्षमता असते संधी मिळत नाही . ती इथे उपलब्ध करून दिली . खर तर हा खर्चिक भाग आहे . परंतु प्राचार्य डॉ. भास्कर झावरे सरांनी दूर दृष्टी ने ही जोखीम उचलली संस्था खंबीर पाठीशी राहिली . प्रयत्न सुरु आहेत . मुला बरोबर पालका समोर या क्षेत्रातील दिग्गज लोक नगारा उत्सवात निमंत्रीत केले जातात . खर्च हा भाग नसतो परतू ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक गायन व वाद्न क्षेत्रा बद्दल उदासीन वाटतो . बहुजन समाज व शास्त्रीय संगीत दोन ध्रुवावर उभे आहे यांची भेट घालण्याचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण व शेतकरी कुटूंबातील मुले प्राध्यापक ,शास्त्रज्ञ ,डॉक्टरेत झाली तशी या क्षेत्रात विदुशी व पंडित व्हावीत या अपेक्षेने हे प्रयत्न नक्की सुरु राहतील . त्याचा भाग असणारा नगारा संगीत उत्सव ग्रामीण भागतील लोकांच्या सहभागा साठी महत्वाचा आहे . हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल असा आशावाद बाळगायला हरकत नाही

Tags:    

Similar News