तो 'श्रीराम' आपला नाही, रवींद्र पोखरकर यांचे विश्लेषण
राम नवमीच्या निमीत्ताने अनेक ठिकाणी राम नवमी उत्साहात साजरी केली जात आहे. पण आपला राम कोणता? राम आणि श्रीराम यात फरक काय आहे? जाणून घेण्यासाठी वाचा लेखक रवींद्र पोखरकर यांचा लेख...;
आज आपल्या गावागावातील राममंदिरांमध्ये मोठीच लगबग. रामजन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी गेले कित्येक दिवस सगळ्या मायभगिनी,सगळे लहानथोर कामाला भिडले होते. कुणी मंडपाचे, कुणी भंडाऱ्याचं, कुणी हारफुलांचं, कुणी लाऊड स्पिकरचं,कुणी स्वागताचं,कुणी किर्तनकारांना आणण्या-नेण्याचं, अशा साऱ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या.आज त्या सगळ्यांची मेहनत सार्थकी लागेल.सगळी गावं एकजुटीने,एकोप्याने आणि उत्साहात आज रामजन्म उत्सव साजरा करतील.
हा आपला प्रभू राम आहे...
सकाळी आंघोळपांघोळ झाली की चौकातील राममंदिरात जाऊन त्याचं मनोभावे दर्शन घ्यायचं आणि पुन्हा घराकडे येऊन चहापाणी घेऊन शेताकडे किंवा आपापल्या कामधंद्याकडे वळायचं. ते करीत असताना जे जे समोर दिसतील-भेटतील त्यांना परस्परांनी 'राम-राम' करायचं आणि पुढे निघायचं हा आमच्या गावांकडचा नित्यक्रम आहे. एकमेकांच्या समोर आल्यावर मुखातून सहजपणे निघणाऱ्या 'राम-राम' मधील राम हा आपला खरा राम आहे..
कुणीतरी भगवेधारी महंत मशिदीच्या समोर जाऊन आरोळ्या देतोय की आमच्या नादाला लागाल तर तुमच्या मुलींना-बायकांना घरातून उचलून नेऊ आणि त्यांच्यावर बलात्कार करू..आणि तो हे बोलताच त्याच्यासोबतच लोक बेभान होऊन आरोळ्या ठोकताहेत..'जय श्रीराम'..'जय श्रीराम'..
तो श्रीराम आपला नाही..
बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला एखादा खासदार आणि स्वयंघोषित संत जामीनावर सुटल्यावर किंवा एखाद्या असहाय्य महिलेवर सामूहिक बलात्कार करून मग शिक्षेत सूट मिळवून जेलबाहेर आलेल्या बलात्काऱ्यांचे जेलबाहेर जमलेले सर्व बगलबच्चे 'जय श्रीराम' च्या घोषात त्याचे जल्लोषात स्वागत करतात..त्यांच्या त्या घोषणांमधील श्रीराम आपला नाही..
धर्मांधता पसरवणारा आणि अर्धसत्य दाखवणारा एखादा गल्लाभरू चित्रपट पाहून बाहेर पडल्यावर 'जय श्रीराम' च्या गळेफाडू घोषणांचा गजर जिथे केला जातो त्या..धर्मद्वेषातून आलेल्या घोषणांमधील श्रीराम आपला नाही.
धार्मिक दंगली घडवण्यासाठी वापरला जाणारा, भीषण रक्तपातासाठी वापरला जाणारा,कुणा राजकीय पक्षाच्या स्वार्थी राजकारणासाठी रथयांत्रांमध्ये वापरला जाणारा, धर्मांधतेच्या जोपासनेसाठी जयजयकारात वापरला जाणारा तो श्रीराम आपला नाही..
अनेक दंगली,कत्तली,रक्तपाताच्या पायावर उभे रहात असलेल्या 'त्या' अतिभव्य मंदिरातील गाभाऱ्यालाही जिथे बहुजनांचा स्पर्श वर्ज्य असणार आहे तो 'जय श्रीराम'वाल्यांचा राम आपला नाही..
आपला राम आपापल्या गावांमधील मंदिरांमध्ये आणि आपल्या हृदयात,मनात वसलेला आहे.तो न्यायप्रिय आणि शांतताप्रिय आहे.एकमेकांविषयी आदराची, मानवतेची शिकवण देणारा आहे.त्याच्या चरणांना स्पर्श करून आपण त्याच्याशी आपलेपणाने हितगुज करू शकतो..
'जय श्रीराम'मध्ये उत्तरेतील धर्मांध विखार आहे.. आपल्या 'राम राम'मध्ये प्रेम, आपुलकी आणि भाईचारा आहे.
आपण त्याच्याच सोबत राहू या.