राहुल गांधी चुकलेच
राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळाली आणि काँग्रेसमध्ये उत्साह संचारला. त्यातच काँग्रेसने लोकसभेत अविश्वास ठराव आणला. त्यावर गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यातच राहुल गांधी काय बोलणार ? याकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासह देशभरातील नागरिकांचे लक्ष होतं. पण यावेळी बोलताना राहुल गांधी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यात राहुल गांधी कितीही आक्रमक झाले असले तर त्यांची एक चूक घडली त्याकडे दुर्लक्ष करून पुढं जाता येणार नाही. ही चूक नेमकी काय आहे ? याविषयी जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचे विश्लेषण
खरंतर राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवला. त्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचे संबंध उघड करत हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे वगळण्याची मागणी केली. त्यावरून गदारोळ झाला. एवढच नाही तर राहुल गांधी यांचा पुन्हा नवा हल्ला होईल या भीतीने सुरत कोर्टाच्या निकालाच्या माध्यमातून राहुल गांधी यांना एका जुन्या गुन्ह्यात दोषी ठरवत त्यांची खासदारकी रद्द केली. त्यानंतर काँग्रेसने अधिक आक्रमक व्हायला हवं होतं पण काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसलं नाही. पण अखेर आता राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळाली.
आता एका बाजूला राहुल गांधी यांची खासदारकी परत मिळाली. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांचे मोठे स्वागत केले. त्यातच पहिल्या दिवशी अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून राहुल गांधी मणिपूर मुद्द्यावरून केंद्र सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल करतील आणि सरकारचे वस्त्रहरण करतील अशी शक्यता होती. त्यातच राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी सभागृहात खुद्द गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, स्मृती इराणी यांच्यासह मंत्रिमंडळातील महत्वाचे मंत्री उपस्थित होते. पण अविश्वास प्रस्ताव राहुल गांधी यांच्या ऐवजी गौरव गोगोई यांनी मांडला आणि सत्ताधाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. याबद्दल खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनीही राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी बसलो असल्याचे सांगितले. पण राहुल गांधी यांनी पहिल्या दिवशी भाषण केले नाही.
पहिल्या दिवशी गौरव गोगोई, सुप्रिया सुळे, डिंपल यादव, अरविंद सावंत यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकावर टीका केली आणि सत्ताधाऱ्यांनी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण चर्चेला सुरुवात झाली ती राहुल गांधी यांच्या भाषणाने...
राहुल गांधी यांनी सुरुवात अत्यंत संयतपणे लोकसभा अध्यक्षांचे आभार मानून केली. तसेच आपण अदानीवर बोलणार नाही, त्यामुळे भाजप खासदारांनी रिलॅक्स राहावं असंही राहुल गांधी म्हणाले.
त्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा आणि त्यातील अनुभव सांगायला सुरुवात केली. त्यात भारत जोडो यात्रेमुळे अहंकार गळून पडल्याचे राहुल गांधी यांनी नम्रपणे सांगितले. या भारत जोडो यात्रेत शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा आणि सरकार शेतकऱ्यांबाबत कसं अपयशी ठरले हे राहुल गांधी यांनी मांडलं. त्यावेळी राहुल गांधी एवढं शांतपणे बोलत होते की, त्यामुळे भाषण प्रचंड प्रभावी वाटत होतं. दरम्यान खोडकर पोरं शाळेत परिपाठच्या वेळी जशा इतरांच्या खोड्या काढतात तशा खोड्या भाजपकडून राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान सुरू होत्या. सत्ताधारी मध्येच चिडवत होते, टोकत होते. पण राहुल गांधी शांतपणे मुद्दे मांडत होते.
हे सगळं सुरू असतानाच राहुल गांधी यांनी मणिपूरचा मुद्दा मांडायला सुरुवात केली. त्यावेळी शांत असलेले राहुल गांधी अचानक आक्रमक झाले. मी मणिपूरला गेलो पण पंतप्रधान मोदी अजून गेले नाहीत, कारण ते मणिपूरला भारत मानत नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. त्याबरोबरच राहुल गांधी यांनी मणिपूरमधील हृदयद्रावक दोन अनुभव सांगितले. राहुल गांधी यांच्या या मुद्द्यामुळे राहुल गांधी यांचे भाषण अत्यंत प्रभावी आणि अभ्यासू होईल, असं वाटत होतं. दरम्यान मंत्री किरेन रिजेजू यांनी राहुल गांधी यांच्या भाषणावर आक्षेप घेत मणिपूरच्या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला. पण राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मणिपूरमध्ये तुम्ही आणि तुमच्या राजकारणाने हिंदुस्थानची हत्या केली. तुम्ही भारत मातेचे हत्यारे आहात. तुम्ही देशभक्त नाही देशद्रोही आहात, असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यावेळी राहुल गांधी यांना लोकसभा अध्यक्षांनी भारत माता ही आपली आई आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करू नका असं सांगितलं. मात्र, त्यानंतरही राहुल गांधी अत्यंत आक्रमकपणे आपलं भाषण करत राहिले. माझी एक आई इथं बसली आहे आणि एका आईची तुम्ही मणिपूरमध्ये हत्या केली, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. यावेळी राहुल गांधी यांचा आक्रमकपणा जबरदस्त होता. त्यापुढे राहुल गांधी यांनी आक्रमकपणे सांगितले की, रावण फक्त मेघदूत आणि कुंभकर्णाचे ऐकायचा. तसं पंतप्रधान मोदी अमित शहा आणि अदानी यांचे ऐकतात. रावणाची लंका हनुमानाने नाही तर त्याच्या अहंकाराने जाळली. रावण त्याच्या अहंकारामुळे मेला, असं म्हणत राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर टीका करत होते. हे भाषण अत्यंत आक्रमक होतं. पण तरीही राहुल गांधी यांनी या भाषणाच्या माध्यमातून मिळालेली एक मोठी संधी गमावली.
काँग्रेसकडून गौरव गोगोई यांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये निर्माण झालेला हिंसाचार, त्याची कारणं, त्याची आकडेवारी मांडायला हवी होती. ज्यामुळे भाषण अधिक प्रभावी झालं असतं. त्याबरोबरच राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात मणिपूरचे मुख्यमंत्री कसे अपयशी ठरले आहेत ? केंद्र सरकार कसं अपयशी ठरलं आहे ? गृह विभाग नेमका कुठं चुकला ? सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावरून ओढलेले ताशेरे, राज्यपालांची भूमिका, मैतई आणि कुकी यांच्यातील हिंसाचार थांबवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आणि पंतप्रधान मोदी मौन असण्याची कारणं, किरेन रिजेजु यांना पृथ्वी विज्ञान मंत्रालय देण्यामागचं मणिपूर कनेक्शन याबरोबरच कोणत्या कारणामुळे केंद्र सरकार दोन समुदायातील वाद तेवत ठेवत आहे. याची कारणं याविषयी सविस्तर भाष्य करण्याची संधी राहुल गांधी यांनी गमावली. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून केंद्र सरकारचे उट्टे काढण्याची संधी राहुल गांधी यांच्या हातून गेली आहे.
गेलेली खासदारकी मिळाल्यानं राहुल गांधी यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. देशातील विरोधकांची स्पेस भरून काढण्याची मोठी संधी राहुल गांधी यांच्याकडे आहे. त्यातच भारत जोडो यात्रेने काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असताना देशातील नागरिकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी राहुल गांधी यांनी संसदेत अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण करायला हवे होते. राहुल गांधी यांनी आक्रमक भाषण केले असले तरी त्यात मुद्दे नसल्याने ही राहुल गांधी यांची चूकच आहे.