महागात पडेल : कोरोना व्हायरस लस-औषध संशोधनाचे खाजगीकरण

महामारी विरोधात लढण्यासाठी आत्तापर्यंत राबवलेल्या लसीकरणाच्या अनुभव पाहता खाजगीकरणाचे पाऊल म्हणजे आरोग्यव्यवस्था धोक्यात घालण्याचा उद्योग असल्याचे मत ऑक्सफर्डचे शास्त्रज्ञ डॉ.नानासाहेब थोरात यांनी मांडले आहे;

Update: 2021-05-26 04:16 GMT

Courtesy -Social media

आजपर्यंतच्या इतिहासात जगातील सर्व देशात, सर्वात जास्त काळ राबवलेली आणि सर्वात यशश्वी लसीकरण मोहीम म्हणजे 'पोलिओ लसीकरण'. 'जॉन्स साल्क' या अमेरिकन शास्त्रज्ञाने ७ वर्षाच्या अथक प्रयत्नाने १९५५ साली हि लस शोधून काढली. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शास्त्रज्ञाने त्याचे पेटंट घेतले नाही आणि लस सर्वांना मोफत मिळेल अशी व्यवस्था केली. या अवलिया शास्त्रज्ञाला ज्यावेळी प्रश्न विचारण्यात आला कि या लसीचे पेटंट कुणाकडे आहे, कुणाची मालकीहक्क आहे या लसीवर? त्यावेळी त्याचे होते, "Well, the people I would say. There is no patent. Could you patent the sun? त्याने जर या पोलिओ लसीचे पेटंट घेऊन पैसे कमवले असते तर तो बिल गेट्स पेक्षा कितीतरीपट श्रीमंत आणि त्याची कंपनी मायक्रोसॉफ्ट, गुगल पेक्षा मोठी असती. पण जगातील फक्त २० % बालकांनाच पोलिओची लस मिळाली असती हे आजचे वास्तव असते.

२०० देशातील ५० लाखांपेक्षा अधिक लोंकांमध्ये पसरलेल्या करोना व्हायरस वरती लस-औषध सापडले अशा उठसूठ बातम्यांचे सकाळ ते संध्याकाळ थैमान सुरु आहे. इस्राईल, अमेरिका, इटली, जपान ते अगदी बांगलादेशचे सुद्धा नाव मीडियाने बनवलेल्या औषध शोधणाऱ्या देशांच्या यादीत आहे. वास्तवात स्थिती वेगळी आहे. एप्रिल महिन्यापासून अशा बातम्यांचे पीक आलेय, पण जे मिडिया आपल्याला स्वप्न दाखवतेय आणि जमिनीवरील वास्तव हे वेगवेगळे आहे.

बातम्यांमध्ये झळकणाऱ्या जवळपास सर्व खाजगी कंपन्या आहेत. आश्चर्य म्हणजे या कंपन्यांचा व्हायरसवर लस किंवा औषधे शोधण्याचा अनुभव/इतिहास फार कमी आहे. आपला स्वतःचा फायदा आणि फक्त शेअर मार्केट मधील गुंतवणूक पाहणाऱ्या औषध कंपन्या त्याच गोष्टीत संशोधन करतात ज्यामध्ये त्यांचा फायदा अधिक असतो. व्हायरसवरील लस तयार होऊन लोकांपर्यंत पोहोचली की त्यातील फायदा संपून जातो. प्रयोगशाळेतील सुरवातीच्या प्रयोगाचे परिणाम मिडियात जाहीर करून या कंपन्यांनी आपली शेअरची किंमत वाढवून घेतली आहे. रोजच्या बातम्यांचा आणि शेअर मार्केटचा अभ्यास केला तर हिच वस्तुस्थिती समोर येतेय. मुळातच व्हायरसवर संशोधन करणाऱ्या संस्था जगामध्ये फार कमी आहेत,अशा संस्था स्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानांकन आणि नियमन करून घ्यावे लागते. आपल्या देशामध्ये तर हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच सरकारी आणि खाजगी संस्था असल्यामुळे यावरील होणारे मूलभूत संशोधन पण फार कमी आहे.

जगामध्ये वेगेवेगळ्या आजारांवर ४० लसी तर २०००० पेक्षा जास्त औषधे उपलब्ध आहेत. मे २०२० पर्यंत करोना व्हायरससाठी १८० औषधे आणि ५० पेक्षा अधिक लसी शोधल्याचा दावा करण्यात आला आहे परंतु यातील फक्त दोन ते तीन औषधे आणि लसी उपयोगी ठरतील असे शास्त्रज्ञना वाटते. इंग्लंड मधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीलासुद्धा प्राण्यावरील चाचणीत अपेक्षेसारखे यश मिळाले नाही.

अतिशय कमी वेळेत आणि कमी प्रयोग करून लस निर्मिती करणे फार धोक्याचे असते, अशामुळे वेगवेगळ्या आजारावरील लस तयार करणारे अनेक प्रयोग अपयशी झालेत. आत्तापर्यन्त फक्त एकच लस कमीत कमी वेळेत म्हणजे ४ वर्षात तयार झाली आहे ती म्हणजे गालगुंड (mumps ) या आजारावरील लस. जवळपास ३० वर्षापेक्षा अधिक काळ प्रयोग करूनसुद्धा एड्स (HIV ) वरील लस अजूनसुद्धा बाजारात आली नाही. कॅन्सर सारख्या आजारांवर तर लस तयार करणारे संशोधन अजून पाहिजे तेवढे वेगाने सुरु नाही त्यामुळे नजीकच्या भविष्यात कॅन्सरवर लस तयार होईल याचा विचारसुद्धा कोणी करू शकत नाही. लस आणि औषध संशोधनातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे प्रयोगशाळेतील १०० % यशश्वी झालेले प्रयोग, प्राण्यांवरील चाचणीत अपयशी ठरतात आणि प्राण्यांवरील चाचणीत यशश्वी झालेले प्रयोग मानवी चाचणीत अपयशी ठरतात, त्यामुळे पुन्हा मागे जाऊन असे प्रयोग अनेकदा करावे लागतात. अजूनही आपल्यला या व्हायरसचे नेमके स्वरूप समजले नाही, आणि ते जो पर्यंत समजत नाही तोपर्यंत फक्त करोना व्हायरसचेच संक्रमण रोखेल अशी लस किंवा फक्त करोना व्हायरसच नष्ट करेल असे औषध सापडणे अवघड आहे. तसेच करोना व्हायरसमध्ये संक्रमित होताना बदल (म्युटेशन्स) घडताना दिसून आलेत त्यामुळे एकच लस किंवा औषध फार काळासाठी उपयोगी ठरणार नाही.

काही खाजगी कंपन्यांनी लस किंवा औषध बाजारात आणलेच तर त्याची उपलब्धता फार कमी आणि किंमत जास्त असणार. तसेच सर्व लोकांपर्यंत ती कमी वेळेत पोहोचणार नाही. अशावेळेला या कंपन्या सर्वसामान्य लोकांना लुबाडून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नफा कमवणार हे निश्चित. भविष्यातील असे प्रकार रोखण्यासाठी यूरोपमध्ये 'युरोपियन कमिशनने' १०० मिलिअन युरो (८०० कोटी रुपये) विद्यापीठे आणि सरकारी संशोधन संस्थाना उपलब्ध करून दिलेत तसेच ५० मिलिअन युरो (४०० कोटी रुपये) हे खाजगी आणि सरकारी संस्थांना एकत्रित प्रयोगासाठी दिलेत. याही पुढे जाऊन भविष्यात करोना व्हायरसवर लस निघालीच तर तिची उपलब्धता, नियंत्रित किंमत आणि युरोपमधील सर्व लोकांना कमीत कमी वेळेत मिळावी यासाठी शास्त्रज्ञ, औषध/लस निर्माण करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी आणि आर्थिक सल्लागार यांची समिती पण स्थापन केली आहे.

आपल्याकडेही अजून उशीर झाला नाही, हीच ती योग्य वेळ आहे. देशातील विद्यापीठे आणि सरकारी संशोधन संस्थाना निधी उपलब्ध करून किंवा खाजगी आणि सरकारी संस्थांचा समन्वय साधून भविष्यात येणारी करोना व्हायरसवरील लस/औषध त्यांची उपलब्धता, नियंत्रित किंमत आणि सर्व स्तरावरच्या लोकांना कमीत कमी वेळेत मिळावी यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. नाहीतर आजच्या या मतलबी आणि तकलादू माणुसकीच्या युगात 'जॉन्स साल्क' सारखा अवलिया शास्त्रज्ञ असेल आणि करोना व्हायरसवरील लस/औषध मोफत मिळेल अशी भाबडी अशा ठेवणे आपल्याला महागात पडेल.......!!!

Dr. Nanaso Thorat, Marie Curie Research Fellow (Scientist), European Commission.

Tags:    

Similar News