अरेरे! देशाचे पंतप्रधान खोटं बोलतात? चंद्रकांत बर्वे
गोवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसवर टीका करताना सावरकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा उल्लेख केला. आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी चंद्रकांत बर्वे यांनी वस्तुस्थितीवर टाकलेला प्रकाश...
वंदेमातरम्. आकाशवाणीच्या .....केंद्रावरून ....मीटर्स अर्थात ....हर्ट्झवर. सुप्रभात. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक २7 माघ शके १९४३, दिनांक १6 फेब्रुवारी २०२२ अशी उद्घोषणा देशातील २६२ केंद्रांवरून आज सकाळी झाली. २६ जानेवारी १९५० पासून सर्व केंद्रांवरून दररोज वंदेमातरम् ने प्रसारण सुरु होऊन प्रथम सौर दिनांक सांगितली जाते. ही आकाशवाणीची सांस्कृतिक परंपरा आहे. पण दुर्दैवाने अनेकजण आकाशवाणीचे योगदान विसरले आहेत, पंतप्रधान मोदिजींनी तर अर्थ संकल्पीय अधिवेशनात आकाशवाणीची आकारण बदनामी केली.
अर्थात त्यांचा खरा राग कॉंग्रेसवर होता आणि त्यासाठी आपल्या ६० मिनिटांच्या भाषणात त्यांनी ५० वेळा कॉंग्रेसचा उल्लेख केला. अजून त्यांना हवा तसा देश कॉंग्रेसमुक्त होत नाहीये तर!
एनीवे तो त्यांचा राजकीय अजेंडा त्यांनी जरूर राबवावा पण त्यासाठी त्यांनी आकाशवाणीला बदनाम करू नये. त्यांनी हृदयनाथ मंगेशकर सावरकर प्रेमी असल्याने त्यांना आकाशवाणीने नोकरीतून काढले अशी बंडल मारली. अडीच वर्षापूर्वी हृदयनाथांनी मनोरंजक गप्पांच्या ओघात एका खाजगी वाहिनीत ही मुळ बंडल मारली होती. अशा गोष्टीचा आधार मोदिजी घेतात? अरेरे! त्यांनी किमान आकाशवाणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून खातरजमा करून घ्यायला हवी होती. पण सत्त्य जाणून घ्यायचा त्यांचा स्वभाव नाही.
ज्यांचा मोदिजींच्या डिग्रीवर विश्वास आहे 🤔😇अशांना मी पटवून देऊ शकणार नाही पण इतरांच्या माहितीसाठी वस्तुस्थिती अशी.
१) हृदयनाथ मंगेशकर कधीही आकाशवाणीच्या नोकरीत नव्हते, तर संगीतकार म्हणून नैमित्तिक करारावर काही गाणी करत.
२) ते संगीतकार म्हणून ग्रेट आहेतच, पण १७ वर्षाच्याब मुलाला सरकारी नोकरी मिळत नाही आणि
३) १९५५ साली केंद्र संचालकाला देखील ५०० रु पगार नसेल .
वेल, मी १९७७ साली पुणे आकाशवाणीत निर्माता म्हणून नोकरीला लागलो. आम्हा नव्या निर्मात्यांना सुरुवातीलाच व्यंकटेश माडगुळकर, मधुकर गोळवलकर, पुरुषोत्तम जोशी अशा दिग्गज मंडळींकडून अनेक गोष्टी शिकायला, ऐकायला, समजून घ्यायला मिळाल्या. म्हणजे अगदी लेखी भाषा आणि बोली भाषा यांच्यातील फरकापासून ते कोणते शब्द वापरायचे आणि कोणते नाही इथपर्यंत. उदाहरणार्थ 'खालीलप्रमाणे' किंवा 'वरीलप्रमाणे' हे शब्द आकाशवाणीत वर्ज्य, तसंच 'व'च्या ऐवजी 'आणि' वापरायचा वगैरे. त्याकाळी एरवी सहज वापरात असलेला 'बरशेन' हा शब्द न वापरता स्वैपाकाचा गॅस म्हणायचं, 'डालडा' न म्हणता वनस्पती तूप म्हणायचं. 'अमूल' 'कोलगेट' सारखे शब्द तर नाहीच नाही कारण कोणत्याही व्यावसायिक उत्पादनाची जाहिरात होता कामा नये. 'कानडी' न म्हणता 'कन्नड' म्हणायचं कारण 'कानडी' हा शब्द त्यांना आवडत नाही. महात्मा गांधींनी जरी 'हरिजन' हा शब्द रूढ केलेला असला तरी तो शब्द आपण वापरायचा नाही कारण त्याने 'दलित' मंडळींच्या भावना दुखावल्या जातात. शक्यतो कोणत्याही जाती धर्माचा अनावश्यक उल्लेख टाळायचा. कोणतीही धार्मिक, जातीय, प्रादेशिक तेढ वाढणार नाही किंवा भारतीय राज्यघटनेच्या विपरीत काही होणार नाही याची आम्ही काळजी घेत असू. सर्वच ऐतिहासिक महापुरुषांवर, स्वातंत्र्यसैनिकांवर म्हणजे शिवाजी महाराज, झाशीची राणी, राणाप्रताप, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, महात्मा गांधीं, स्वा. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, समाज सुधारक आगरकर, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आम्ही अनेक कार्यक्रम केलेले आहेत. (हां पण नथुराम वर नाही, सॉरी) हे करताना कोणत्याही विवादास्पद किंवा लोकांना रुचणार नाहीत अशा गोष्टी मात्र टाळायच्या.
थोडक्यात म्हणजे "व्हेन इन डाउट लिव इट आउट". कार्यक्रम बोअर झाला तरी चालेल पण त्यात कोणालाही काहीही आक्षेपार्ह वाटता कामा नये, स्तुतीची पत्रे कमी आली तरी चालेल पण तक्रार मात्र येता कामा नये हा फंडा होता. त्या काळापसून आजपर्यंत सावरकरांनी रचलेली "जयोस्तुते" (संगीतकार मधुकर गोळवलकर) आणि "सागरा प्राण तळमळला" (संगीतकार हृदयनाथ मंगेशकर) ही क्लासिक गाणी आकाशवाणीवरून हजारो वेळा प्रसारित झालेली आहेत. मधुकर गोळवलकरांनी आम्हाला 'जयोस्तुते' या त्यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यातील सौंदर्यस्थळे समजावून सांगितली.🙏 त्यांना कधी या गाण्याबद्दल मेमो मिळाला नाही.
२६ फेब्रुवारी १९९१ला जोडून मुंबईतील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकात दोन दिवस कार्यक्रम झाले, ज्याचे उद्घाटन शरद पवार आणि समारोप बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. त्यात या दोन बड्या नेत्यांनी सावरकरांची स्तुतीपर केलेल्या भाषणांवर आधारित रेडीओ रिपोर्ट्स मी स्वतः केले होते आणि त्या निमित्ताने तिथं आलेल्या अनेक अंदमानचा तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या.
मी आकाशवाणीच्या चार केंद्रावर १४ वर्षे होतो अन नंतर दूरदर्शनला गेलो. पण मला किंवा माझ्या ३०,३५ वर्षे नोकरी केलेल्या कोणत्याही सहकाऱ्याला कधीही सावरकरांवरील कार्यक्रमामुळे आजवर कोणीही आक्षेप घेतलेला नाही.
तेव्हा खोटं बोलण्याच्या स्वभावाला मोदींजींनी जमल्यास आवर घालावा.
'दिवार' सिनेमात अमिताभ ला
"मेरा बाप चोर है"
असं हातावर लिहिलेलं आवडायचं नाही
मला देखील माझ्या देशाचा पंतप्रधान................
चंद्रकांत बर्वे, निवृत्त आकाशवाणी अधिकारी