कोयारटोल्यावर पहिल्यांदाच पोहचले दो बुंद जींदगीचे
कोरोनाच्या संकटात लसीकरणाचा गवगवा झाला. जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मधे पोलिओ उच्चाटनाचा निर्धार केला.पोलिओमुक्त भारतात आजही पोलिओमुक्तीसाठी दुर्गम भागात लसीकरणाची मोहीम सुरु आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये जगातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याचा ठराव केला. त्यानंतर १९९५ पासून भारत सरकारने पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेतली. दो बूँद जिंदगीके हे अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कँपैन रेडिओ दूरदर्शन वर्तमानपत्रसह सर्वच माध्यमात प्रत्येक लसीकरणाच्या काळात पाहायला वाचायला ऐकायला मिळते.
पण पोलिओ लसीकरणाचे हे दो बूँद पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या कोयार या गावातील कोयार टोला(कुमनार) या गावात पोहचले. कोयार टोला हे अतिदुर्गम गाव असून आशासेविका सुनीता पुंगाटी यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच या गावात पोलिओचे लसीकरण पार पाडले. कोयार टोला पासून लसीकरण केंद्राचे अंतर दहा ते पंधरा किमी आहे. पुंगाटी यांनी महिलांना आवाहन करत मुलांना कोयर गावापर्यंत घेऊन येण्यास आवाहन केले. आलेल्या बालकांचे पहिल्यांदाच लसीकरण झाले.
कोयार टोला या गावाला रस्ताच नसल्याने चालत जाण्याशिवाय येथे पर्याय राहत नाही. हे चालत अंतर पार करत असताना लसीची हानी होण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागाने कोयर या गावात लसीकरण केंद्र दिले होते. आशासेविका सुनीता पुंगाटी यांनी परिसरातील गावात याविषयी जनजागृती केली. यामुळे कोयार टोला येथील २१ बालकांनी पहिल्यांदाच पोलियोचा डोस घेतला. यासाठी आशा गट प्रवर्तक महानंदा आत्राम, आरोग्य सेवक सुनील सिडाम अंगणवाडी सेविका लता वड्डे उपस्थित होते
आशासेविका सुनीता पुंगाटी यांनी स्थानिक गोंडी भाषेत जनजागृती करत आलेल्या पालकांची भोजनाची देखील व्यवस्था केली.याबाबत बोलताना तालुका आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत पुढील प्रतिक्रिया दिली.
"कोयर टोलासारख्या अतिदुर्गम भागातील बालकांना पल्स पोलिओ लसिकरण करण्यात आले, ही बाब आरोग्य यंत्रणेसाठी अभिमानास्पद आहे. कारण या अतिदुर्गम भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळणे, हा त्यांचा हक्क आहे. पोलिओ लसीकरणाच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी लसीकरण पथक, लाहेरी उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्याचे कौतुक करतो. कोयर टोला गावात पोहोचणे अडचणीचे ठरते. मात्र, लाभार्थ्यांना माहिती देऊन त्यांना लसिकरण करणे, ही चांगली सुरुवात आहे. पुढील काळात त्या गावात पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येईल".