वेगळ्या वाटांवरचा वाटसरू: विजय तेंडुलकर

नाटक, पटकथा, राजकीय भाष्य, पत्रकारिता, स्तंभलेखन अशा विविध वाड्ग्मयीन क्षेत्रांवर आपली कायमची छाप लीलया उमटवणारे विजय तेंडुलकर यांचा आज स्मृतिदिन . त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली आहे, ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी..;

Update: 2021-05-19 04:52 GMT

अर्वाचीन मराठी साहित्यावर विलक्षण प्रभुत्व असलेल्या निवडक साहित्यिकांच्या मांदियाळीत तेंडुलकरांचे नाव सदैव अग्रेसर राहील. त्यांच्या अनेक नाट्य व चित्रपट कृती भारतीय सृजनशीलतेच्या मार्गात मैलाच्या दगड बनल्या. मराठी व हिंदीतही त्यांच्या कलाकृतींचा कायम बोलबाला राहिला.

त्यांनी लिहिलेली 'गिधाडे', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'कन्यादान', घाशीराम कोतवाल', ही आणि अशी नाटके, तसेच 'अर्धसत्य', 'आक्रित', 'सिंहासन', 'निशान्त', 'उंबरठा' हे चित्रपट विविध वादांमुळे गाजले.

अशा विविधांगी तेंडुलकरांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही ते घडत गेले. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले.

तेंडुलकर १९६६ मध्ये मुंबईत आले व मुंबईकरच बनले. इथेच त्यांनी आपली व्यावसायिक कारकीर्द घडवली. १९५५ पासूनच त्यांनी लेखन सुरू केले. चरितार्थासाठी प्रारंभी त्यांनी पत्रकारितेचा पेशा स्वीकारला. नवभारत, मराठा, लोकसत्ता, नवयुग, वसुधा आदी वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून त्यांनी सदरलेखनाचे आणि संपादनाचे काम केले.

१९४८ मध्ये 'आमच्यावर प्रेम कोण करणार' ही त्यांची कथा प्रकाशित झाली. १९५१-५२ च्या सुमारास भारतीय विद्याभवनाने नव्याने सुरू केलेल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने तेंडुलकरांचे नाट्यलेखन सुरू झाले.

आकाशवाणीसाठीही त्यांनी नाटके लिहिली. त्यांनी आरंभीच्या काळात निवडलेले नाट्यविषय कौटुंबिक स्वरूपाचे आणि मध्यमवर्गीय जीवनाशी निगडित होते. पण त्यांनी मानवी मनाचा व त्यांच्यात वसलेल्या पशुवत् क्रौर्याचा वेध घेणारे लेखन सुरू केले. त्यमुळे त्यांना जनक्षोभाच्या अनेक वादळांशी सामना करावा लागला.

"देशातील वाढता हिंसाचार" या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस" या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले.

नव्या वाटा चोखाळणारे चित्रपट व नवनाट्याविषयी आस्था बाळगणार्‍या संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांबद्दल त्यांना जिव्हाळा होता. तेंडलकरांना अनेक पुरस्कार व पारितोषिके मिळाली. भारत सरकारने 'पद्मभूषण' देऊन त्यांचा बहुमान केला. प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका प्रिया तेंडुलकर ही त्यांची कन्या. त्यांच्या अकाली निधनाचा धक्का इतका जबरदस्त होता की त्यातून ते सावरलेच नाहीत. २००८ साली आजच्याच दिवशी त्यांनी जगाच्या रंगभूमीवरून कायमची एक्झिट घेतली.

- भारतकुमार राऊत

Tags:    

Similar News