पँडोरा पेपर्स: सचिन तेंडूलकर, अनिल अंबानी यांच्यावर कारवाई होणार का?

पँडोरा पेपर्समध्ये सचिन तेंडूलकर, अनिल अंबानी यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तींची नाव या प्रकरणात समोर आली आहेत. मात्र, या लोकांवर भारत सरकार कारवाई करणार का? वाचा संजीव चांदोरकर यांनी उपस्थिती केलेले काही प्रश्न

Update: 2021-10-06 03:00 GMT

ना सचिनच्या देवत्वाला ना त्याच्या भारतरत्नला आव्हान मिळेल, ना अनिल अंबानी, किरण शॉ मुजुमदार यांचे उद्योगक्षेत्रातील आयकॉनिक महत्व कमी होईल का?

एका बाजूला बॉलिवूड मधील नटनट्या, क्रिकेट पंढरीतील देव, औद्योगिक घराण्यातील उद्योजक, आयुष्यभर सतरंज्या उचलायला लावणारे राजकीय नेते. यांना देवाचा दर्जा देऊन, त्यांची मनात आणि खरी सिमेंटची देवळे बांधणे, ते कधीच, काहीही वावगे करूच शकत नाहीत असा अंधविश्वास बाळगणे. त्यांचा खुलेआम भ्रष्ट आचार, त्यांनी बेकायदेशीर मार्गाने कमावलेले हजारो कोटी रुपये या गोष्टी तर मनावर रजिस्टर देखील करून न घेणे.

दुसऱ्या बाजूला देश, धर्म, जात, पोटजात, पोटजातीतील पोटजात, प्रांत, भाषा, आणि अशा अनेक खऱ्या खोट्या अस्मितांच्या निखाऱ्यावर स्वतःला आयुष्यभर भाजून घेत राहणे / जाळून घेणे; सारे आयुष्य त्या कृतक लढ्यात घालवणे; या प्रश्नांवर एकमेकांचा जीव घेणे, अस्मितांच्या प्रश्नांवर जीव देणाऱ्या व घेणाऱ्यांना फिरून एकदा हिरो करणे.

या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ; त्या कशातून येतात?

स्वतःला कस्पटासमान समजायला लावणाऱ्या संस्कारातून; मी जन्मतः XXXX आहे, ती मूठभर यशस्वी माणसे जन्मतः शक्तिमान, बुद्धिमान, टॅलेंटेड असतात; त्यांच्यावर टीका करणारे मूठभर त्त्यांना स्वतःला यश मिळत नाही म्हणून त्या आयकॉनवर जळतात ही मानसिकता...

आपण स्वतः काही कौशल्ये आत्मसात करू शकतो, काही निर्माण करू शकतो, आपले भौतिक राहणीमान आपल्याला सुधारायचे आहे, आपल्याला संसार थाटून, मुलांना जन्म देऊन त्यांना छान वाढवायचे आहे. याबद्दल कधी आत्मविश्वास न वाटल्यामुळे, भविष्याबद्दल विश्वास वाटत नाही म्हणून भूतकाळात रमायचे; आणि वर्तमानात स्वतःला कस्पटासमान लेखत काही यशस्वी व्यक्तींची भक्ती करायची.

संजीव चांदोरकर

Tags:    

Similar News