नवीन कृषी कायदे अभिजनवादी मनोवृत्तीचे द्योतक: भि.म. कौसल

प्रचंड विरोध असून शेती सुधारणांचे कारण सांगून रेटले जाणारे नवे कृषी कायदे राबवण्यामागे अभिजनवादी मनोवृ्त्ती असून वैदीक (हिंदुत्ववादी) विचारधारेत शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोनावर भि.म. कौसल यांनी टाकलेला प्रकाश....;

Update: 2021-01-14 05:38 GMT

केंद्र सरकारने घिसाडघाईने पारित केलेले नवीन कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी मागील 50 दिवसापासून देशभरातील शेतकऱ्यांचे दिल्लीच्या आसपास सिंघू, टिकरी आणि गाजीपूर सीमांवर आंदोलन सुरु आहे. आपला देश लोकशाही मानणारा आहे. लोकांच्या हिताचे कायदे करणे सरकारचे काम आहे. पण ज्या शेतकऱ्यांच्या तथाकथित हितासाठी हे कायदे अस्तित्वात आले आहेत ते जर शेतकऱ्यांना मान्य नाहीत तर प्रतिष्ठेचा प्रश्न न करता ते कायदे मागे घेणे हे लोकशाही सरकारचे कर्तव्य आहे. मात्र शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असूनही सरकार माघार घ्यायला तयार नाही, यामागे काय मानसिकता असू शकते हा विचार मनात आल्यावाचून राहत नाही.

सध्याचे केंद्र सरकार हे हिंदुत्ववादी विचारधारा मानणारे आहे. सरकारमधील अनेक नेते हे उघडपणे तसे बोलतात देखील. ही तथाकथित हिंदुत्ववादी विचारधारा नेमकी काय आहे ? आणि शेतीकडे पाहण्याचा नेमका दृष्टीकोन काय आहे ? याचा विचार करता या मानसिकतेचे मूळ वैदिक विचारधारेत (जिला आता हिंदुत्ववादी विचारधारा म्हटले जाते) दडलेले आहे, असे दिसते. आर्यांनी जेव्हा भारतावर आक्रमण केले तेव्हा राजकीयदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यावर साधारण इ.स.पू. 1500 च्या आसपास ऋग्वेदाची रचना करण्यात आली. आर्यांच्या या सर्वात प्राचीन ग्रंथात त्यांचा येथील लोकांकडे व त्यांचा मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता याची संक्षिप्त चर्चा या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून एवढा विरोध असूनही हे सरकार कायदे मागे घ्यायला का तयार नाही याची कल्पना येईल.

प्राचीन भारताचा इतिहास हा सिंधू सभ्यतेच्या इतिहासासापासून सुरु होतो. ही सभ्यता भारताच्या पश्चिमोत्तर भूभागावर विस्तीर्ण स्वरुपात पसरलेली होती. आजचे पाकिस्तान, पंजाब, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात इत्यादी भूप्रदेशाचा यात समावेश होता. भारताच्या वायव्येकडील ज्या भूप्रदेशावर आर्यांनी सर्वप्रथम आक्रमण केले तो प्रदेश सप्तसिंधू सप्तसिंधू या नावाने देखील ओळखला जात होता. कारण या प्रदेशात सिंधू, विपाशा(व्यास), शुतुद्रू किंवा शतद्रू(सतलज), वितस्ता(झेलम), असिक्नी(चिनाब), परूष्णी(रावी) आणि सरस्वती या सात नद्या वाहत होत्या. यामुळे येथील जमीन अतिशय सुपीक होती.

आर्यांनी ज्या कारणास्तव या भूभागावर आक्रमण केले ते येथील उपजाऊ किंवा सुपीक जमीन आणि बारमाही पाण्याची उपलब्धता हे एक कारण असण्याची शक्यता आहे. येथील सुपीक जमीन आणि पाण्यावर ताबा मिळविण्यासाठी सप्तसिंधू प्रदेशातील मूळ निवासी दास आणि आक्रमक आर्य यांच्यात संघर्ष झाल्याचे उल्लेख ऋग्वेदात आढळतात. आर्यांनी भारतावरील आक्रमणानंतर येथील अतिशय उपजाऊ शेतजमीन बळकावल्याचे व यज्ञप्रथा सुरु केल्याचा उल्लेख ऋग्वेदाच्या दुस-या मंडळाच्या 21 व्या सुक्तातील पहिल्याच ऋचेत आढळतो. -

विश्वजिते धनजिते स्वर्जिते सत्राजिते नृजित उर्वराजिते.
अश्वजिते गोजिते अब्जिते भरेन्द्राय सोमं यजताय हर्यतम् ..

अर्थ - हे अध्वर्यूजनहो ! सर्वजयी, धनजयी, स्वर्गविजयी, मनुष्यविजयी, उपजाऊ भूमी कसणारे, अश्वजयी, गोजयी, जलविजयी तथा यज्ञासाठी योग्य इंद्राला आवडणारे सोमरस घेऊन या.

या ऋचेत येथील मूळ निवासी लोकांसाठी(दास) उपजाऊ भूमी कसणारे असा उल्लेख फार बोलका आहे. कारण शेती हा सिंधू सभ्यतेच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. वर उल्लेखित मोठ मोठ्या नद्यांमुळे सिंचनासाठी पाण्याची भरपूर उपलब्धता होती. त्यामुळे या प्रदेशात गहू आणि बार्ली ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात होती. याशिवाय केळी, कलिंगड व वाटाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. त्याकाळातील या प्रदेशातील सर्वात लक्षणीय पीक म्हणजे कापसाचे उत्पादन होय. इजिप्तसारख्या त्याकाळातील प्रगत देशातही कापसाचे उत्पादन होत नव्हते. त्यावेळी या प्रदेशातून कापसाची व अन्य वस्तूंची निर्यात पश्चिम आशियात केली जात होती. या व्यापारी संबंधांमुळे येथील समृद्धीची तिकडील (बाबिलोनिया, सुमेरिया आदी) लोकांना माहिती असावी. सुपीक जमिनीच्या शोधार्थ आर्यांनी भारताकडे धाव घेतली असावी.

आर्यांनी येथील सुपीक जमीन बळकावल्याचे उल्लेख ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील 127 व्या सुक्ताच्या सहावी ऋचा, सहाव्या मंडळातील 20 व्या सुक्ताताची पहिली ऋचा, याच मंडळातील 25 व्या सुक्तातील चौथी ऋचा आणि 10 व्या मंडळातील 50 व्या सुक्तातील तीस-या ऋचेत आढळतात.

केवळ सुपीक जमीनच नव्हेतर येथील प्रचंड प्रमाणात उपलब्ध पाण्यावर देखील आर्यांनी ताबा मिळविल्याचे उल्लेख ऋग्वेदात आढळतात. आर्यांच्या आक्रमणापूर्वी या प्रदेशातील मोठ्या भूभागावर वृत्र नावाच्या अतिशय शक्तीशाली राजाचे राज्य होते. साहजिकच येथील पाण्यावर देखील त्याचा ताबा होता. पाण्यावर ताबा मिळविण्यासाठी इंद्राने प्रयत्न केले. त्यामुळे वृत्राचे इंद्राशी युद्ध झाल्याचा उल्लेख ऋग्वेदाच्या चौथ्या मंडळातील 19 व्या सुक्ताच्या आठव्या ऋचेत आढळतो. -

पूर्वीरूषसः शरदश्च गूर्ता वृत्रं जघन्वाँ असृजद्वि सिन्धून् .
परिष्ठिता अतृणद्वद्वधानाः सीरा इन्द्रः स्त्रवितवे पृथिव्या ..

अर्थ - इंद्राने वृत्र राक्षसाला ठार करून अंधारात बुडालेल्या अनेक उषा आणि संवत्सरांना त्याच्या बंधनातून मुक्त केले. त्याचबरोबर वृत्राद्वारे रोखण्यात आलेले पाणी प्रवाहित केले. इंद्राने मेघाच्या चोहोबाजूला स्थित आणि वृत्राकडून रोखण्यात आलेल्या नद्यांना पृथ्वीवर वाहण्यायोग्य बनविले.

वर उल्लेख केल्याप्रमाणे वृत्राचे या प्रदेशावर राज्य असल्यामुळे त्या प्रदेशातून वाहणा-या नद्यांच्या पाण्यावरही त्याचा अधिकार होता. इंद्राच्या नेतृत्त्वाखालील आर्यांच्या आक्रमणानंतर या नद्यांच्या पाणी वाटपावरून त्यांच्यात युद्ध होऊन इंद्राने वृत्राला ठार मारले व या नद्यांच्या पाण्यावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले, हे यावरून सिद्ध होते. विदेशी आर्य आणि येथील निवासी दास राजे यांच्यात पाण्यावर ताबा मिळविण्यासाठी वृत्राबरोबर अनेक संघर्ष झाल्याचे उल्लेख ऋग्वेदात आढळतात. ऋग्वेदाच्या दुस-या मंडळातील 12 व्या सुक्ताची तीसरी ऋचा, पहिल्या मंडळातील 32 व्या सुक्ताची 11 वी ऋचा आणि पाचव्या मंडळातील 30 व्या सुक्तातील पाचव्या ऋचेत आढळतात. या सर्व ऋचा किंवा मंत्रात वृत्र या राजाचा उल्लेख आढळतो. यावरुन तो अतिशय बलाढ्य दास राजा असावा, हे स्पष्ट होते. अन्यथा त्याचा वारंवार उल्लेख झाला नसता.

आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा ते अर्धभटके व पशूपालन अवस्थेत होते. त्यांना येथील शहरी सभ्यतेची अथवा कृषी जीवनाची फारसी सवय नव्हती असे दिसते. याबाबतचा उल्लेख ऋग्वेदातील 10 व्या मंडळातील 71 व्या सुक्ताच्या नवव्या ऋचेत आढळतो. -

इमे ये नार्वाङ्न परश्चरन्ति न ब्राह्मणासो न सुतेकरासः .
त एते वाचमभिपद्य पापया सिरीस्तन्त्रं तन्वते अप्रजज्ञयः ..

अर्थ - हे अविद्वान लोक या जगात वेदाचे ज्ञान असणा-या ब्राह्मणांकडून आणि परलोकवासी देवतांसह यज्ञकर्माचे आचरण करीत नाही. ते स्तोता किंवा सोमयज्ञ करणारे नाहीत. पापाचा आश्रय घेणारी भाषा बोलतात आणि मूर्खासारखे नांगर चालवत शेती करतात.

ऋग्वेदातील हा मंत्र अनेक अर्थानी फार महत्त्वाचा आहे. यात मूळ निवासी दास आणि आक्रमण करुन या भूभागावर ताबा मिळविणा-या आर्यांची सांस्कृती आणि चालीरीती यातील फरकाचा उल्लेख आढळतो. यात सर्वात महत्त्वाचा उल्लेख म्हणजे आर्यांसाठी ब्राह्मण असा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे. दुसरा उल्लेख म्हणजे येथील लोकांना अविद्वान अर्थात मूर्ख असे संबोधण्यात आले आहे. यावरुन येथील लोकांविषयी ब्राह्मण किंवा आर्यांच्या मनात किती द्वेषभावना होती, हे दिसते. तिसरी बाब म्हणजे येथील लोक यज्ञकर्मरहित आहेत अर्थात ते यज्ञ करीत नाहीत. चौथी बाब ते सोमयज्ञ करीत नाही म्हणजे सोमरसाचे(मद्य) सेवन करीत नाहीत. पाचवा मुद्दा ते पापाचा आश्रय घेणारी लौकिक भाषा(येथील स्थानिक भाषा) बोलतात. ब्राह्मण हे छन्दस किंवा आताच्या भाषेत संस्कृत बोलत असत.

तसेच या ऋचेतील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख म्हणजे येथील शेती करणा-या लोकांना उद्देशून मूर्खासारखे नांगर चालवत शेती करतात असे म्हटले आहे. त्याकाळात आजच्या सारखी यांत्रिक शेती नव्हती. नांगरणीची सर्व कामे नांगरानेच होत असत. यावरुन असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही की त्यांना नांगराद्वारे शेती करण्याचे तंत्र अवगत नव्हते. दुसरा अर्थ असाही निघू शकतो की त्यांना स्वतः शेती करण्यात फारसा रस नसावा. मग असा प्रश्न निर्माण होतो की त्यांनी जमिनीसाठी संघर्ष का केला ? जमिनीचा संघर्ष हा राजकीय स्वरुपाचा होता. कारण भूभागावर ताबा मिळविल्याशिवाय राजकीय सरशी पूर्ण होत नाही किंवा विजयाला पूर्णता प्राप्त होत नाही. दुसरी बाब आर्य हे पशूपालन अवस्थेत होते. त्यांनी येथील लोकांची पशूधनाच्या रूपातील संपत्तीवरही कब्जा जमविल्याचे बरेच उल्लेख ऋग्वेदात आहेत. या पशूधनासाठी भरपूर चारा उपलब्ध व्हावा या हेतूने देखील जमिनीवर ताबा मिळविण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्यथा शेतकरी लोकांचा तुच्छतापूर्ण उल्लेख करण्याचे प्रयोजन दिसत नाही.

इंद्राच्या नेतृत्त्वाखालील आर्यांच्या विजयाने येथील दासांची परिस्थिती अतिशय बिकट झाली, असे दिसते. आर्यांनी त्यांची चोहोबाजूने आर्थिक कोंडी केली हे ऋग्वेदाच्या चौथ्या मंडळातील 28 व्या सुक्ताच्या चौथ्या ऋचेवरुन स्पष्ट होते. -

विश्वस्मात्सीमधमाँ इन्द्र दस्यून्विशो दासीरकृणोरप्रशस्ताः .
अबाधेथाममृणतं नि शत्रूनविन्देथामपचितिं वधत्रैः ..

अर्थ - हे इंद्र ! आपण या दस्यूजनांना सर्व गुणांनी हीन केले आणि यज्ञकर्मरहित दासांना निंदित केले. हे इंद्र आणि सोम ! आपण दोघेही शत्रूंना बाधा पोहचवा, त्यांना मारा आणि त्यांच्या हत्येच्या बदल्यात यजमानांची पूजा स्वीकार करा.

ही ऋचा फार महत्त्वपूर्ण आहे. आर्यांच्या आक्रमणापूर्वी येथील सिंधू सभ्यता कृषी, उद्योग, व्यापार आणि स्थापत्य अभियांत्रिकी व तत्सम तंत्रज्ञानात अतिशय समृद्ध होती. याचा अर्थ येथील दास लोक या सर्व विद्येत पारंगत होते. परिणामी सप्तसिंधू प्रदेशात समृद्धी नांदत होती. या ऋचेतील हा उल्लेख की सर्व दस्यूजनांना गुणहीन केले, यावरुन असे दिसते की पराजित दासांना आर्यांनी त्यांच्या या नैपुण्यपूर्ण कामापासून दूर केले असावे जेणेकरून त्यांच्या आर्थिक समृद्धीमध्ये बाधा उत्पन्न होईल आणि ते आपोआप कमजोर होतील. असे झाले तर ते आर्यांविरुद्ध डोके वर काढू शकणार नाहीत व आर्थिक विपन्नतेमुळे आर्यांची गुलामी करण्यावाचून त्यांच्यापुढे दुसरा पर्याय उरणार नाही. या उल्लेखावरून असे दिसते की दासांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या कमजोर करण्यासाठी डावपेचांचा एक भाग म्हणून अशी बंदी घातली गेली असावी. तशीही सुरुवातीच्या कालखंडात आर्यांना शहरी सभ्यतेची सवय नव्हती. छोटी छोटी झोपडीवजा घरे बांधून ते ग्रामीण जीवन जगत होते. कदाचित त्यामुळेच दासांच्या प्रगत शहरी तंत्रज्ञानाविषयी आर्यांना स्वारस्य वाटत नसावे.

ऋग्वेदाची हीच परंपरा पुढे मनुस्मृतीने सुरु ठेवल्याचे दिसते. कारण परंपरागत व्यवसाय करून ब्राह्मणाची उपजीविका भागत नसेल तर क्षत्रिय आणि वैश्य यांचा व्यवसाय करुन तो आपले जीवनयापन करु शकतो. मात्र कोणत्याही परिस्थितीत शेती व्यवसाय करु नये, असा आदेश मनुस्मृतीच्या 10 व्या अध्यायातील 83 व्या श्लोकात देण्यात आला आहे -

वैश्यवृत्त्यापि जीवंस्तु ब्राह्मणः क्षत्रियोऽपि वा ।
हिंसाप्रायां पराधीनां कृषिं यत्नेन वर्जयेत् ।।

अर्थ - ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी उपजीविकेसाठी वैश्याचा व्यवसाय पत्करला तरी चालेल. मात्र शेती(व्यवसाय) जोतण्यापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवावे कारण त्यात मोठ्या प्रमाणात जीव हिंसा होते.

शेतीमुळे जीव हिंसा होते हा मनुस्मृतीचा तर्क किती हास्यास्पद आहे. शेतीची कामे करतांना होणा-या जीव हिंसेची काळजी घेणा-या मनूला यज्ञ आणि श्राद्धकर्माचेवेळी विविध पशूपक्षांची हत्या करुन त्या मांसापासून चमचमीत भोजनावर ताव मारतांना हिंसा आठवत नाही, हा किती ढोंगीपणा आहे. कोणत्या पशूपक्षांचे मांस ब्राह्मणाला खाऊ घातल्याने स्वर्गातील पितरांना किती काळ शांती लाभेल याची तपशीलवार माहिती मनुस्मृतीच्या तिस-या अध्यायातील श्लोक क्रमांक 268 ते 272 मध्ये आढळते. यात रान डूकरापासून गवा, हरिण, बकरा, मेढी, ससा, विविध प्रकारचे मासे आदींचा समावेश आहे.

याच आशयाचा उल्लेख मनुस्मृतीच्या 10 अध्यायातील 84 व्या श्लोकात आढळतो -

कृषिं साध्विति मन्यन्ते सा वृत्तिः सद्विगर्हिता ।
भूमिं भूमिशयांश्चैव हन्ति काष्ठमयोमुखम् ।।

अर्थ - काही लोक शेतीला उत्तम कार्य मानतात. परंतु साधूजन कृषी कार्याची निंदा करतात(कृषीला निकृष्ट समजतात). कारण नांगर, वखर इत्यादी(कृषी उपयोगी साधने) जमिनीला विदीर्ण करीत जमिनीतील जीव जंतूना नष्ट करतात. शेतीची कामे करतांना होणारी जीवहिंसा लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी शेती करणे सोडून दिले तर काय अवस्था होईल ? शेती करणा-या ब्राह्मणाला श्राद्धकर्मात बोलावण्यात येऊ नये असा उल्लेख मनुस्मृतीच्या तिस-या अध्यायातील 165 व्या श्लोकात आढळतो.

वरील विवेचनावरून शेती व्यवसायाकडे पाहण्याची अभिजन वर्गाची मनोवृत्ती लक्षात येते. शेती व्यवसायात अडथळे निर्माण करुन बहुजन समाजाला आर्थिक गर्तेत लोटणे ही यामागील मानसिकता असल्याने सरकार शेतक-यांच्या आंदोलनाकडे हेतुतः दुर्लक्ष करीत आहे, असे दिसते.

भि.म. कौसल

Tags:    

Similar News