Religious frenzy : धार्मिक उन्मादापासून शिक्षण क्षेत्र अलिप्त ठेवण्याची गरज

धर्मसत्ता आधी राजसत्तेवर (Political Power) कशी आरुढ होते आणि त्यानंतर राजसत्तेपाठोपाठ सर्वसामान्यांच्या मनात आपला वचक कायम ठेवण्यासाठी शिक्षण क्षेत्राला कशी वेठीस धरते? याबरोबरच शिक्षण क्षेत्र (Education Sector) धार्मिक उन्मादापासून (religious frenzy) कशा प्रकारे दूर ठेवलं पाहिजे? याविषयी भाष्य केलं आहे सामाजिक आणि राजकीय विषयांचे विश्लेषक डॉ. बाळासाहेब पवार यांचा परखड लेख...;

Update: 2023-02-12 07:58 GMT

मध्ययुगीन काळाच्या शेवटी धर्मसत्ता व राजसत्ता यांचा संघर्ष झाला. त्या पूर्वी मध्ययुगाला अंधःकार युग म्हणून ओळखले जाते. धर्म व्यवस्थेने सामान्य माणसाचे शोषण केले. त्यासाठी राजसत्तेचा प्रचंड वापर केला. सामान्य माणसाला कोणतेच स्वातंत्र्य नव्हते. याकाळात समाज अडाणी अशिक्षित व श्रद्धाळू होता. धर्म हाच मानसिक आधार होता. धर्म संस्थेने दिलेला आदेश राजा अंमलात आणत होता. त्यासाठी अतिशय क्रूर अशी आमलबजावणी होत होती. धर्मिक मतांची चिकित्सा करण्याचा अधिकार सामान्य माणसाला नव्हता. ही चिकित्सा करणाऱ्या सॉक्रेटीसचा जाहीरपणे बळी घेतला गेला. आपल्या देशात अनेक संत महात्म्यांनी धर्म सामान्य माणसा पर्यंत नेला. सामान्य माणसाला धर्म समजावा म्हणून प्रयत्न केले, म्हणून कर्मठ धर्म मार्तंडांनी बहुजन संतांना व परिवर्तन वादी विचारकांना क्रूरपणे संपवले आहे. यानंतर प्रदीर्घ काळानंतर मकेव्हेलीने धर्मसत्ता व राजसत्तेशी फारकत घेतली . त्याचाही चर्चने बळी घेतला असता. पण तेव्हा समाज थोडा जागरूक आणि शहाणा झाला होता.

त्यानंतर स्वातंत्र्य (Freedom), लोकशाही मुल्यांचा (Democratic Value) कालखंड जगाने पाहिला. पुढे हुकूमशाही (Dectator) व महायुद्धे (World War) जगाने अनुभवली. काही काळानंतर जग शांतता व सहजीवना कडे प्रवास करत असताना विसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी धर्म मतांनी उचल खाल्ली. चर्च सारखी एकमेव धर्मसत्ता जरी नसली तरी प्रत्येक धर्माच्या अंतर्गत एक कट्टरवादी गट मात्र राजसत्तेच्या विरोधात उभा राहिला. तर काही ठिकाणी त्याने सरळ राजसत्तेचा ताबा मिळवला.

आज आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या काळात धर्मसत्ता आपला वरचष्मा ठेऊन सत्ता राबवत आहे. या राजसत्ता व धर्म सत्ता या संघर्षात सर्वात अगोदर मुस्लिम देश बळी पडले त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मदरश्याच्या माध्यमातून मौलवींनी शिक्षण व्यवस्थेचा ताबा घेतला . ही झापडबंद शिक्षण व्यवस्था इतरांच्या अधिकाराबरोबर स्वतः चाही अधिकार नाकारते व फक्त धर्म व धर्माचा आदेश मानते. ज्याची चिकित्सा करायची नसते. त्याची श्रद्धा असणारा धर्माचा ठेकेदार जे सांगतो तेच अंतिम सत्य मानून आत्मघात करायला तयार होतो . यात तो फक्त दुसऱ्या धर्माच्या लोकांना लक्ष करतो असे नाही. तर आपल्याच धर्मातील लोकांना अगोदर लक्ष करतो. त्यांनी आपली कर्मठ धर्मांध मते आपल्याच धर्माच्या लोकांना बंदूकीच्या धाकावर पाळायला लावली यातून यादवी निर्माण झाली. ती मुस्लिम धर्माची अंतर्गत यादवी होती. तिथे दुसरा धर्म नव्हता. याच यादवीतून हे संपन्न मुस्लिम देश आज बेचिराख झाले. तिथल्या लोकांचे काय हाल झाले जगाने पाहिले . महासत्ता यात उतरल्या. शस्त्रे पुरवली व यांना रक्तपात करायला लावला. तिथे आपल्याच धर्माच्या लोकांचे बळी घेतले गेले. स्त्रिया मुलांवर याचा सर्वात भयंकर परिणाम झाला.

हा सगळा प्रवास मांडताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, शिक्षण व्यवस्था कधीही धर्मापासून दूर राहिली पाहिजे. ज्या दिवशी धर्मसत्ता शिक्षण व्यवस्थेवर ताबा मिळवील किंवा शिक्षण व्यवस्था धर्मसत्तेला शरण जाईल. त्या दिवशी त्या देशाच्या इतिहासाचा काळा काल खंड सुरु झाला म्हणून समजावा. आपली पुन्हा मध्ययुगाकडे वाटचाल सुरु होईल.

भारत हा धर्म निरपेक्ष (Secularism) देश म्हणून संविधानिक मार्गाने जाहीर केला आहे. परंतु जेव्हा साक्षरता कमी होती तेव्हा आपण जास्त लोकशाही प्रेमी होतो. आज साक्षरता वाढली पण लोकशाही प्रेम कमी झाले. आपण राजकीय व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या धर्म व्यवस्थेला जास्त महत्व देऊ लागलो. 1990 नंतर हळुहळू ही धार्मिक अस्मिता देव आणी देवळा भोवती फिरत राहिली व प्रगतिक विचाराचा प्रगतिक विचारांनीच पराभव केला. त्यामुळे आज धर्माधारित राजसत्ता भारतात सत्तेत आली . हे जाणीव पूर्वक मांडावे लागेल. पुरोगाम्यांनीच पुरोगामी विचारांचा पराभव केला आहे . पुरोगामी चळवळींची हत्या पुरोगामी लोकांनीच केल्या आहेत. आज स्वतंत्र पणे भूमिका मांडून जोखीम घेणारे वैचारीक लोक कमी झाले आहेत. त्यामुळे धर्मसत्ता उन्मत्त होतात. धर्माधारित राजसत्तेला शिक्षण क्षेत्रातून आव्हान मिळत आहे .हा धोका लक्षात घेऊन विद्यापीठांना लक्ष्य केले गेले. तिथल्या विद्यार्थ्यांवर हल्ले करण्यात आले. जो आपले ऐकणार नाही त्याला विष घ्यायला भाग पाडणे, हा धर्म सत्तेचा स्थायी भाव आहे. जेव्हा राजसत्ता तिचे आदेश पाळते तेव्हा ती आणखी आक्रमक होते .

विद्यापीठे व महाविद्यालये आज लक्ष केले जात आहेत . अनेक माध्यमातून आपले कट्टर समर्थक मिळवण्यासाठी तिथे कोणत्यांना कोणत्या मार्गाने घुसखोरी केली जात आहे. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून किंवा काही अस्मितांना हवा देऊन आपले विचार रुजवण्याचा प्रयत्न होत आहे. धर्म सत्तेला प्रश्न विचारणारी व चिकित्सा करणारे लोक नको असतात. मग तो शिक्षक असेल किंवा विद्यार्थी त्या मुळे शिक्षण क्षेत्रात अनेक संघटना काही न काही निमित्त करून शैक्षणिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत . मग धार्मिक कार्यक्रम असतील किंवा धर्माचा आधार म्हणून काही महापुरुषांच्या जयंती असेल. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) या माध्यमातून तिथे शिरकावं करून शिक्षण क्षेत्रात कट्ट्रवादी गट तयार करायचा प्रयत्न आहे. काही शिक्षक यांना साथ देत आहेत हे आणखी दुर्दैव आहे.

अभ्यासक्रमातून लोकशाही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न होत असताना असे शिक्षक धर्माच्या प्रभावा खाली येऊन लोकशाही विरोधी भूमिका घेतात म्हणजे दहशवादी तयार करणाऱ्या मदरसे किंवा दहशतवादी तळ निर्माण करणाऱ्या मौलवीची भूमिका स्वीकारल्या सारखे आहे. एक दिवस आपण तयार केलेला कट्टरवादी विद्यार्थी आपल्याच छातीला बंदूक लावेल व ज्या लोकशाहीने आपल्याला अधिकार दिले शिक्षण दिले, पगार दिला, चांगले आयुष्य दिले, तीच व्यवस्था उध्वस्त करेल याचे भान त्या शिक्षकाला नाही . कोणताही कट्टरवाद अगोदर आपल्याच लोकांच्या मुळावर उठत असतो. हे जगाचा इतिहास सांगतो आहे. आज भावनिक होऊन धर्माचा आधार घेत किंवा धर्म मताला पाठींबा देत जर शिक्षक पिढी घडू लागले तर लोकशाही व्यवस्थेचा अंत जवळ आला आहे. आम्ही स्वतः होऊन आमच्याच मृत्यूचे हत्यार तयार करत आहोत. संविधान अंतिम नाही त्याची चिकित्सा होते. पण धर्माची चिकित्सा करता येत नाही तो सध्या अपराध ठरत आहे.

सध्या एक वेगळा सूर निघतो आहे की, हिंदू लोक आणि हिंदू धर्माबद्दलच का बोलले जाते. कारण हा बहुसंख्य लोकांचा धर्म आहे. याची चर्चा हिंदू अभ्यासकच करतात. कारण त्यात सहिष्णूता आहे. आपल्या धर्मात कट्टरता येऊ नये, याची काळजी सुद्धा हिंदू विचारकांनाच घ्यावी लागेल. सॉक्रेटीस, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर,चक्रधर स्वामी हे त्यांच्याच धर्माच्या सुधारणे साठी झिजले होते.

आपले घर आपल्यालाच राखावं लागेल. पण त्यात काही लोकांची अडचण आहे. मग ते म्हणतात मी म्हणतो तोच धर्म. मी राहतो तो धर्माचा वेष. आपल्याच लोकांवर लादायचा आहे व या प्रकाराची घुसखोरी शिक्षण क्षेत्रातून करायची आहे म्हणून हा प्रकार शिक्षण क्षेत्रात वाढत आहे .

वेगवेगळ्या मार्गाने या तरुण विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. हा विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्या पिढीचा साक्षर आहे. त्याच वय इतक्या क्रूर खेळ्या समजण्याचं नाही. परंतु त्याला घडवण्याची जबबदारी असणारे क्षेत्रच मुलतत्ववादी लोकांच्या हातात गेले तर विद्यार्थी तसेच घडतील व हाच विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे भवितव्य ठरवणार आहे.

कोणत्याही धर्माच्या मुलतत्व वादी गटांचे लक्ष लहान मुलगा ठरतो. त्याला शाखेत किंवा मदरश्यात आग्रहाणे घेतले जाते. तिथे होणारे समजीकरण आयुष्यभर प्रभाव टाकत राहते. ही मुले सुधारण्याची व्यवस्था शिक्षणात आहे. जर शिक्षण व्यवस्था जर अश्याच घुसखोरीची शिकार झाल्या तर त्याच्या त्याच मताला बळकटी येते व ते आणखी कट्टर होतात. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात जास्त सतर्क असले पाहिजे . अभ्यासक्रम बनवणारे शिक्षक, ग्रंथालयात असणारी पुस्तके, वर्गात शिकवत असलेल्या शिक्षकाची विचारधारा यावर फार काही अवलंबून आहे. परंतु आता काही संघटनांनी आता महाविद्यालये लक्ष्य केली आहेत . धर्म प्रसार करताना, इतर धर्मियाबद्दल द्वेष निर्माण करणे. त्याच बरोबर त्यांच्या पासून असलेला धोका सांगत भीती वाढवत नेणे व मग त्याला आपल्या गटात सहभागी करून घेणे, ही मोडस ऑपरेंडी वापरली जात आहे, अशा गटात अनेकदा मुले बाहेर पडतात. म्हणून त्यांना सतत संपर्कासाठी काही लोक नेमले जातात. ते सतत आपले विचार उगळत राहतात .

यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला मुलगा कोणत्या शिक्षकाच्या, मित्राच्या प्रभावात आहे यावर विचार पालकांनी केला पाहिजे . कारण त्या मुलाचे भवितव्य काय असेल? तेच त्याच्या कुटूंबाचे भवितव्य असते म्हणून शिक्षण घेताना तो अशा गटात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे .

सामाजिकरणात शिक्षण सर्वात प्रभावी असल्यामुळे या क्षेत्रावर हळूहळू ताबा मिळवला जात असताना. त्याला गोष्टी सांगताना, विशिष्ट प्रार्थना म्हणताना, विशिष्ट प्रतिकं पूजताना अगदी वर्गात प्रतिमा लावताना किंवा सहली काढतांना हे शिक्षक अनाहुतपणे त्या मुलाला कोणत्या तरी विचार धारेच्या हवाली करत असतात . त्यामुळे राष्ट्रगीत, प्रार्थना व घटनेचा सरनामा वाचला जातो. तेव्हा होणारी कृती पहिली तरी हा प्रभाव जाणवतो . राष्ट्रगीत सरळ उभे राहून गातात, प्रार्थना समोर हात करून म्हणतात. तर राज्य घटनेच्या सरनाम्याचे वाचन आडवा हात करून म्हणतात. हा आडवा हात अचानक होतो का जाणीव पूर्वक होतो? याचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे.

आडवा हात करून शाखेत म्हणलेली प्रार्थना व तसाच हात करून म्हणलेला घटनेचा सरनामा विद्यार्थ्याला फरक कळू देत नाही पण हळूहळू प्रार्थना खरी आहे हे कृतीतून शिकवतो. इतक्या हळुवार पणे न कळत शिक्षण क्षेत्र ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मग ज्यांना संविधान प्रिय आहे, त्यांनी किती जागरूक असले पाहिजे.

पुरोगामी चळवली या माणूस पणाच्या मानवतावादी मुद्द्यावर आधारित आहेत. त्या माणसा-माणसात भेद करत नाहीत . त्या माणसाला माणसा विरुद्ध लढवत नाही. म्हणून त्या टिकल्या पाहिजेत. त्याचा वाहक शिक्षण क्षेत्र आहे. तिथला शिक्षक जर संविधानाच्या अधिकाराने शिक्षक झाला असेल, कामाचा मोबदला घेत असेल. तर त्याने प्रामाणिकपणे संविधानाच्या विचाराचा प्रसार केला पाहिजे . जर संविधान टिकले तरच नोकरी टिकेल हे विसरता कामा नये. तो ज्या प्रभावात आहे ते त्याला काही देणार नाहीत. जेव्हा धर्म संविधानाला वरचढ ठरेल तेव्हा तो शिकवत असलेली शाळा, महाविद्यालय असणार नाही, ना त्याला जगण्याला साधन असणार नाही व त्याला बोलण्याचे स्वातंत्र्य असणार नाही कारण सर्वात अगोदर त्यानेच उभ्या केलेल्या कडून तोच सपवला जाईल. याची जाणीव शिक्षकांनी ठेवली पाहिजे . त्याने कोणत्याही धर्म मतांचा प्रचार आपल्या कार्यक्षेत्रात होणार नाही तर संविधानाचा जागर होईल ही काळजी सतत घेतली पाहिजे

हिंदू संघटन असेल , मदरसे असतील किंवा मिशनरी असतील या सर्वां पासून शिक्षण क्षेत्र वाचवून संविधानवादी समाज निर्माण करावा लागेल. नसता मध्य पूर्वेतील देशासारखी परिस्थिती निर्माण होईल याची काळजी घ्यावी लागेल.

Tags:    

Similar News