रायगड जिल्हा रंगीबेरंगी फुलपाखरांचे नंदनवन, जिल्ह्यात नांदतायत 147 प्रजाती

Update: 2021-10-01 04:15 GMT

रायगड - पश्चिम घाटाचा मोठा पट्टा, मुबलक झाडेझुडपे व निसर्ग संपदा, पोषक वातावरण, 240 किमीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, कांदळवने व अभयारण्य या सर्वांगीण प्रतिकूल परिस्थितीमूळे जिल्ह्यात रंगेबेरंगी फुलपाखरांचे नंदनवन फुलले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सापडणाऱ्या फुलपाखरांच्या विविध प्रजातींच्या निम्म्याहून अधिक 147 प्रजाती जिल्ह्यात आढळतात. शिवाय ब्ल्यू मॉरमॉन हे राज्य फुलपाखरू व पश्चिम घाटामधील सर्वात मोठे व दुर्मिळ "सदर्न बर्ड विंग" हे फुलपाखरू जिल्ह्यात आढळते.




 


1 ते 30 सप्टेंबर या काळात देशात दुसरा "फुलपाखरू महोत्सव" सुरु झाला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील फुलपाखरांबद्दल आढावा घेतला आहे, अलिबाग येथील निसर्ग, फुलपाखरू व प्राणीपक्षी अभ्यासक प्रवीण कवळे यांनी.... जगात फुलपाखरांच्या सुमारे १७,५०० जाती आहेत. भारतात फुलपाखरांच्या सुमारे १५०० जाती तर महाराष्ट्रात सुमारे २२५ जाती आढळून येतात. त्यातील तब्बल 147 प्रजाती एकट्या रायगड जिल्ह्यात आढळून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रेट एगफ्लाय, रथिंडा आमोर, युप्लॉईया कोर,, कॉमन मॉरमॉन, कॉमन लियोपार्ड, कॉमन पियरोट अशा विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातींचा समावेश आहे.




 


फुलपाखरांचे फूड प्लांट येथे आढळतात त्यास होस्ट प्लांट असेही म्हणतात. प्रत्येक जातीच्या फुलपाखरांचे होस्ट प्लांट ठरलेले असते. फुलपाखराची मादी ही मिलनानंतर लगेचच तिला हवे असलेले झाड शोधते व त्यावर अंडी घालते. त्यामध्ये कडूनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, लिंबू, कदंब, अशोक' अशी झाडे येतात. सोनटक्का, पानफुटी अशा छोट्या झाडांवरही ग्रास डीमन, रेड पियरो अशी सुंदर फुलपाखरे वाढतात. असेही कवळे यांनी सांगितले. मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी तणनाशकांच्या वापराचे प्रमाण फुलपाखरांच्या अळ्या, सुरवंट व फुलपाखरांना धोकादायक ठरत आहेत असेही कवळे म्हणाले. भविष्यात जिल्ह्यात फुलपाखरांचे उद्यान होण्यास खूप पोषक परिस्थिती आहे, असे त्यांनी सांगितले.




 


"पोषक वातावरण निसर्गसंपदा व पश्चिम घाटाचा पट्टा यामुळे जिल्ह्यात फुलपाखरांच्या विविध प्रजाती आढळतात. फुलपाखरांसाठी जिल्ह्यात सुरक्षित पर्यावरण आहे. आपल्या इथे फुलपाखरु व त्यांच्या विविध अवस्थांचे निरीक्षण करण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. घराशेजारील परसबागेत विविध फुलपाखरे यावीत म्हणून अनेकजण होस्ट प्लांट लावतात. शिवाय पपई, पेरू अशी पिकलेली फळे किंवा सडका बांगडा मासा आपल्या घराच्या अंगणात ठेवून फुलपाखरांना आकर्षित करता येते", असे प्राणी पक्षी व फुलपाखरु अभ्यासक शंतनू कुवेस्कर यांनी सांगितले.




 


माणगाव तालुक्यातील पाटणूस जवळील म्हसेवाडी येथील धरणाजवळ एकदा घनदाट जाळीमध्ये हजारोंच्या संख्येने फुलपाखरे एकत्र जमलेली पहिली होती. ते स्थलांतरांसाठी एकत्र जमतात किंवा स्थलांतरण करत असतांना विश्रांतीसाठी सुद्धा थांबतात. जिल्ह्यातील फुलपाखरांचे संवर्धन झाले पाहिजे. तसेच या फुलपाखरांची माहिती विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. विळे-माणगाव येथील निसर्ग व पक्षी अभ्यासक राम मुंढे यांनी ही माहिती दिली.




 


"पश्चिम घाटाचा बहुसंख्य भाग आणि प्रतिकूल निसर्ग यामुळे जिल्ह्यात फुलपाखरांच्या विविध प्रजाती आढळतात. कंदळवनांत देखील फुलपाखरे आढळतात. या फुलपाखरांच्या अधिवसाचे संवर्धन होणे आवश्यक आहे. अलिबाग येथील कांदळवन वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी सांगितले




 


'बिग बटरफ्लाय मंथ' म्हणून गेल्या वर्षी सुरू झालेला 'फुलपाखरू महोत्सव' किंवा 'सिटीझनस बटरफ्लाय सर्व्हे इव्हेंट' या वर्षी एक सप्टेंबर २०२१ ला सुरू झाला आहे. यंदाही हा महिना फुलपाखरांवरच्या विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. यामध्ये फुलपाखरांविषयी माहिती देणारे अनेक ऑनलाईन कार्यक्रम आहेत. वेगवेगळ्या भाषांतून फुलपाखरू तज्ज्ञांची भाषणे आयोजित केली आहेत. तसेच फुलपाखरांसाठी अधिवास कसे तयार करावेत, या संबंधीही कार्यशाळा आहेत. फुलपाखरांचे जीवनचक्र, छायाचित्रण स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.




 


महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉनचा जिल्ह्यात सर्वत्र मुक्त संचार पहायला मिळतो. हे फुलपाखरू आकाराने सर्वात मोठे असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरू आहे. ते मखमली काळ्या रंगाचे असते. त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. पंखा खालील बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो. २२ जून, २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे.




 


तिनविरा धरणाजवळ खास फुलपाखरांसाठी खाजगी उद्यान केले आहे. तसेच फुलपाखरांचे होस्ट प्लांट असलेल्या झाडांना सध्या अधिक मागणी आहे. लोक आपल्या परसबागेत किंवा खास फुलपाखरांसाठी छोटे उद्यान करून तेथे ही झाडे लावतात व फुलपाखरांना आकर्षित करतात. आणि विविध रंगेबिरंगी फुलपाखरांचे निरीक्षण करतात. बच्चे कंपनी देखील आंनद लुटले. असे ग्रीनटच नर्सरीचे मालक अमित निंबाळकर यांनी सांगितले.




 


पावसाळ्याच्या सुमारास असंख्य फुलपाखरे फुलझाडांवर बागडताना आढळतात. या वेळी नरमादीचा संयोग होतो व मादी झाडांच्या पानांवर अंडी घालते. काही जातींच्या माद्या आपली अंडी झुडपांवर घालतात. मात्र जिल्ह्यात तणनाशकांचा वाढता वापर यामुळे फुलपाखरांच्या अळ्यांना खाद्य मिळत नाही. तसेच त्यांचा मृत्यू देखील होतो. यामुळे तणनाशकांच्या वापरावर मर्यादा येण्याची गरज आहे. असे प्रवीण कवळे यांनी सांगितले.




 


पुणे मुंबई शहरांच्या वेशीवर असल्याने जिल्ह्यात औद्योगिकिकरण वेगात सुरू आहे. त्यामुळे झाडेझुडपे, वेली, वनस्पती तोडल्या गेल्याने फुलपाखरांना खाद्य मिळत नाही. त्यांचा अधिवास नष्ट होतो. तसेच प्रजनन देखील होत नाही. कारखान्यांमधील प्रदूषके देखील फुलपाखरांच्या जीवनक्रमावर प्रतिकूल परिणाम करतात.

Tags:    

Similar News