सायकलचे दिवस
आंतरराष्ट्रीय सायकल दिवसाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी शब्दरूपी चितारलेले त्यांचे सायकलचे दिवस..
लहानपणी एखाद्याकडं सायकल असणं म्हणजे आज एखाद्याकडं एसयुव्ही असण्यापेक्षा प्रतिष्ठेचं असायचं. किती मोठा शेतकरी असला तरी त्याच्याकडं सायकल नसायची. परगावी नोकरीला असणा-या गुरुजींच्याकडं बहुतेक सायकल असायची. विजार चेनमध्ये अडकू नये म्हणून ते खाली विजारीला पायासोबत क्लीप लावत. ज्याच्या सायकलला डायनामा म्हणजे लाईट असेल त्याचा रुबाब आजच्या फॉर्च्यूनरवाल्यासारखा असायचा. मी वडिलांना कधी सायकल चालवलेलं बघितलं नाही. बाकी तिघा चुलत्यांपैकी जे धाकटे चुलते होते ते सायकल चालवत होते. लहान असताना त्यांच्यासोबत एकदा शेजारच्या गावी कलापथक बघायला गेलो होतो. पुढच्या दांडीवर एका बाजूला पाय टाकून बसता येत नसल्यामुळं दोन्हीकडं पाय टाकून बसलो. ते इतकं रुतत होतं की त्यांनीच दया येऊन दांडीला टॉवेल गुंडाळला आणि त्यावर मी बसलो. तरीही पुढचा आठवडाभर जी काही फुणफुण व्हायची ती झालीच.
उंचीनं कमी असल्यामुळं सीटवर बसून पाय पोहोचायचे नाहीत. त्यामुळं दांडीच्या आतून आत पाय घालून सायकल चालवू लागलो. अनेक महिने हाप पॅडल मारतच सायकल चालवली. खर्रर्र खट् खर्रर्र खट् करीत सायकल चालवायचो. हाप पॅडल मारत अनेकदा चरणहून कोकरूडला आठ किलोमीटर जाऊन आलो. व्यसनच लागलं होतं सायकलचं. हाप पॅडल मारता मारताच कधीतरी फुल पॅडल मारला गेला आणि गंमत वाटली. धाडस करून पुन्हा तसा प्रयत्न केला. फुल पॅडलनं सायकल पळायलाही लागली आणि पायांची दमणूकही कमी होऊ लागली. अशी बराच काळ आत पाय घालूनच सायकल दामटत होतो. हायस्कूलला असतानाच आमच्या गावात भाड्यानं सायकल देणारं दुकान सुरू झालं. सायकल मार्ट म्हणायचो. तिथं एक कमी उंचीची लाल रंगाची सायकल होती. चार आणे अर्धा तास आणि आठ आणे एक तास असं भाडं असायचं. एकच छोटी सायकल असल्यामुळं तिच्यासाठी नेहमी वेटिंग असायचं. सीटवर बसून चालवलेली ती पहिली सायकल. त्याकाळात सायकली दोनच कंपन्यांच्या असायच्या एटलास आणि हर्क्युलस. एव्हॉन सायकल नंतर आली आणि रेसर हे नाजूक मॉडेल आणलं.
दहावीच्या परीक्षेला कोकरूड केंद्र. रोज जाऊन येऊन करायचो. माझ्या पाठीमागं नंबर असलेल्या विद्यार्थ्याची सायकल होती. त्याला मी पेपर दाखवायचो. दोन-तीन दिवस त्याची सायकल घेऊन मी जाऊन येऊन केलं. आत पाय घालूनच चालवत होतो तेव्हा. दहावीची बोर्डाची परीक्षा आणि त्यात माझे हे सायकलचे प्रयोग सुरू होते. वडिलांनी दोनतीन दिवसांनी सांगितलं सायकल बास. एसटीनं जायचं. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला आज पालक मुलांच्याकडं इतकं लक्ष देतात की त्यावेळी ऐन परीक्षेच्या काळात घेतलेल्या स्वातंत्र्याचं कौतुक वाटतं. ३१ मार्चला शेवटचा पेपर होता. त्यादिवशी सायकल मार्टातली छोटी सायकल भाड्यानं घेऊन जायचं ठरवलं होतं. सीटवर बसून जायचं. त्यानुसार गेलो. वाटेत कुठंही न उतरता डायरेक्ट कोकरूड. त्यातही कोकरूड कॉलनीतला चढ चढण्याचं चॅलेंज स्वतःच स्वीकारलं होतं आणि ते पार पाडलंही. परत येताना अर्ध्या तासाच्या आत चरण गाठलं होतं. त्यादिवशी आमच्या गावचे नामवंत स्वातंत्र्यसैनिक बाबूरावदादा चरणकर यांचं निधन झालं होतं. बाबूरावदादांची नात मनीषा आमच्या वर्गात होती. तिला पेपर संपल्यावर दादा गेल्याचं कळवण्यात आलं होतं.
दरम्यानच्या काळात कधीतरी २२ उंचीची सायकल मिळाली. आत पाय घालून चालवता चालवता दांडीवरून पाय वर घेऊन सीटवर बसायला शिकलो. त्याला मान्यता नव्हती. हापिंग करायला येत नव्हतं. असंच एकदा कधीतरी पाठीमागून पाय टाकून बसण्याचा प्रयत्न केला आणि सहज जमून गेलं. हापिंग करायला येण्याचा तो जो क्षण आहे ना, तो आजही लक्षात आहे. खूप मौल्यवान काहीतरी गवसल्याचा आनंद देणारा तो क्षण होता. शिट्टी मारायला आली होती, त्या क्षणाशी तुलना करता येईल या क्षणाची. खरंतर अशा छोट्या छोट्या प्रसंगांतून आनंद मिळवण्याचे दिवस मागं पडले आहेत. आजकाल सुखं खूप असतात अवतीभवती. सहज मिळतातही. पण त्यात आनंद असतोच असं नाही.
पुढं कोकरूडच्या यशवंत उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीला असताना दिवाळीच्या सुट्टीत इंग्रजीचे जादा तास होते. चिंचेवाडीच्या शिक्षक असलेल्या मामांची सायकल होती, ती त्यासाठी त्यांच्याकडून आणली होती. त्यानिमित्तानं महिनाभर ती सायकल माझ्याकडं होती.
एकदा मी, आज मेडिकल ऑफिसर असलेला अस्लम नायकवडी Aslam Naikwadi , आज गुजरातमध्ये उद्योजक असलेला बळीराम पाटील Baliram Patil आणि बाळकृष्ण पाटील (याचं अकाली निधन झालं) असे चौघे कोकरूडला सिनेमा बघायला निघालो. दोन सायकलवरून चौघे. जाताना निम्म्या वाटेतच शेडगेवाडीजवळ एक सायकल पंक्चर झाली. तरीही पुढं जायचं ठरवलं. पुढं खुजगावपर्यंत चालत गेलो. चरणला टेलरकाम करणारे सावंत टेलर यांच्याकडं जाऊन पंक्चर झालेली सायकल ठेवली. परत जाताना नेतो म्हणून सांगितलं. चांगली असलेली सायकल घेऊन चालत कोकरूडला गेलो. पिक्चर बघून रात्री दीड-दोन वाजता चालतच परत निघालो. थोडं पुढं आल्यावर कुणाच्यातरी डोक्यात आलं, कुणीही एकट्यानं धाडस असेल त्यानं ही सायकल घेऊन पुढं जावं. या वाटेवर भुताटकीच्या दोनतीन जागा असल्याची वदंता होती. बाळकृष्ण पाटीलनं चॅलेंज स्वीकारलं आणि सायकलवर टांग टाकून तो निघून गेला. आम्ही खुजगावातून पंक्चर झालेली सायकल घेऊन पुढं चालत निघालो. चालताना रस्त्याच्या दोन्ही कडेला बघत निघालो होतो, चुकून बाळकृष्ण कुठंतरी पडलेला असायचा म्हणून. खूप चालून आल्यावर आम्ही गावाच्या जवळ आलो होतो, तर आमच्यासोबत चालता चालता बळिराम पाटील रस्ता सोडून तिरका तिरका चालत पुढं निघाला. अस्लमनं सायकल हातात धरलेली असल्यामुळं, आरं बळ्या कुठं असं म्हणत तो नुसता बघत राहिला. मी झपझप पावलं उचलत तिरका तिरका तिरका पुढं निघालेल्या बळिरामचा हात धरून अडवलं, तेव्हा तो खडबडून जागा झाला. तेव्हा लक्षात आलं की, चालत चालतच त्याची झोप लागली होती. झोपेत चालण्याचा प्रकार माहीत होता, परंतु चालत चालत झोपण्याचा प्रकार पहिल्यांदाच अनुभवत होतो, नंतरही कधी तो अनुभवता आला नाही.
कादंबरीकार आणि आज शिक्षणाधिकारी असलेला नामदेव माळी Namdeo Mali हा जिवलग मित्र. त्याचं लग्न होतं गुरसाळ्याला. पत्रिका आलेली. जवळचा मित्र म्हणून लग्नाला जाणं आवश्यक होतं. सकाळी लवकरची गाडी पकडून कराड गाठलं. तिथं गेल्यावर कंडक्टर मंडळींना विचारलं गुरसाळ्याला कसं जायचं. त्यांनी सांगितलं वडूजवरून जावं लागेल. वडूजला गेलो. तिथून आठ-दहा किलोमीटर गुरसाळं होतं. आयकार्डवर वडूजमधून भाड्यानं सायकल घेऊन गुरसाळ्याला गेलो. सायकल उंच होती आणि तिची सीटसुद्धा पसरट होती. त्यामुळं मांड्या खरवडून निघाल्या. गुरसाळ्यात गेलो तर नामदेव घोड्यावर होता. तिथंच भेटलो. पाकिट दिलं. संध्याकाळपर्यंत ऑफिसला पोहोचायचं होतं म्हणून त्याला भेटून परत निघालो.
सकाळमध्ये नोकरीला लागल्यानंतर काही वर्षांनी कर्मचारी सोसायटीनं हप्त्यानं सायकली घेण्याची स्कीम केली होती. त्यातून मी स्वतःची सायकल घेतली. ९०-९१च्या सुमारास तेराशे रुपयांची ही रेसर सायकल होती. तोपर्यंत मला ऑफिसची टीव्हीएस ५० मोपेड मिळाली होती. त्यामुळं सायकल धाकट्या भावाला दिली. त्यावेळी सहज विचार करता करता लक्षात आलं होतं की आपल्या एकूण भावकीत, खानदानात स्वमालकीची सायकल खरेदी करणारे आपण पहिलेच आहोत.
आज सायकल दिनानिमित्त सायकलीसोबतचा भूतकाळ असा उलगडत गेला. अशीच एक दिवस एटलासची दिल्लीतील सायकल कंपनी बंद पडल्याची बातमी आली.