गटबाजीच्या दलदलीत रुतलेल्या काँग्रेसला खांदेपालटीनंतर तरी उभारी मिळेल का ?

शरद पवारांनी भाकरी फिरवली. यानंतर करपून धूर निघणाऱ्या अनेक पक्षातील नेतृत्व चर्चेच्या केंद्रस्थानी आली. काँग्रेसने तीन वर्षांपासून मुंबई काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या सांभाळणाऱ्या भाई जगताप यांची गच्छंती करुन वर्षा गायकवाड यांची मुंबई प्रदेश अध्यक्ष पदावर नेमणूक केली. पण वर्षा गायकवाड यांच्या निवडीने काँग्रेसला उभारी येईल का? वर्षा गायकवाड यांच्या निवडीमागे काँग्रेसने कोणती समीकरणं गृहीत धरलेली आहेत. जाणून घ्या मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांच्या या लेखातून;

Update: 2023-06-17 14:43 GMT

एके काळी मुंबईवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या काँग्रेसला आता मरगळ आली आहे. मुरली देवरा हे मुंबई प्रदेश काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर सलग 22 वर्षे मुरली देवरा यांचा काँग्रेसवर पगडा कायम होता. त्या काळात मुंबई काँग्रेसचं दुसरं नाव मुरली देवरा अशीच परिस्थिती होती. मुरली देवरा यांच्यानंतर काँग्रेसमध्ये बदल होत गेले. काँग्रेसला हळुहळू गटबाजीचे ग्रहण लागले. काँग्रेसची शकले पडण्यास सुरुवात झाली. पुढे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मोठी स्पर्धा सुरु झाली.

मोदी सरकार आल्यानंतर संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संजय निरुपम यांच्या काळातही मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरुच होते. संजय निरुपम यांच्यानंतर मुरली देवरा यांचे पूत्र मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. मात्र त्यांनाही काँग्रेसची सुरू असलेलीव घसरण थांबवण्यात यश मिळाले नाही. 2012 मध्ये काँग्रेसच्या 75 जागा होत्या. त्यामध्ये महापालिका निवडणूकीत मोठी घसरण झाली होती. त्यावेळी काँग्रेसला अवघ्या 31 जागांवर समाधान मानावं लागले होते. काँग्रेसची घसरण आणि मिलिंद देवरा यांच्याविषयी असलेली नाराजी यानंतर पुन्हा माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले. मात्र त्यांनाही पक्षातील गटबाजी रोखण्यात यश आले नाही. याच अपयशामुळे एकनाथ गायकवाड यांनाही मुंबई अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं. तेव्हा कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, वर्षा गायकवाड आणि भाई जगताप हे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्न करत होते. काँग्रेसच्या हायकमांडने मात्र भाई जगताप यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली. त्यानंतर भाई जगताप हे मुंबई काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यातच भाई जगताप यांनी सगळ्यांना समावून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत होते. त्यामुळे मुंबई काँग्रेसमधील गटबाजी रोखण्यात भाई जगताप यांना यश मिळेल असे वाटत होते मात्र तसे घडले नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूकीच्या अगोदरच भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, याची चर्चा आता रंगली आहे.

विधानपरिषद निवडणूकीतील विजय भोवला

भाई जगताप हे मुंबई काँग्रेसमधील तुल्यबळ नेते मानले जात होते. मात्र भाई जगताप यांच्याविषयी सेटलमेंट केल्याची पहिली शंका निर्माण झाली ती विधानपरिषद निवडणूकीत. जून 2021 मध्ये विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसने दोन उमेदवार दिले होते. यामध्ये मतांचं गणित जुळवले तर भाजपला ही निवडणूक जिंकणे अशक्य होते. तर या निवडणूकीत काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूकीची पुर्वतयारी म्हणून चंद्रकांत हंडोरे यांना दलित चेहरा म्हणून उमेदवारी दिली होती. यामध्ये चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या क्रमांकाच्या मतांचा कोटा ठरवून दिला होता. त्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा विजय सोपा मानला जात होता. तर भाई जगताप यांची थेट लढत ही प्रसाद लाड यांच्याशी होणार होती. यामध्ये भाई जगताप यांनी चंद्रकांत हंडोरे यांच्या सुरक्षित कोट्यातील अधिकचं मत घेऊन आपला विजय सोपा केला. त्यामुळे भाई जगताप यांनी सेटलमेंट केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. त्यामुळे चंद्रकांत हंडोरे हा दलित चेहरा देऊन त्यांचा काँग्रेसने पराभव केल्याचा मेसेज काँग्रेसचे मूळ मतदार असलेल्या दलित समाजात गेला. त्यामुळे दलित समाजातील नेत्यांमध्ये काँग्रेसविषयी नाराजी पसरली होती. एवढंच नाही तर दलित समाजातील नेत्यांमध्ये भाई जगताप यांच्याविषयी खदखद होती. त्याचा फटका मुंबई महापालिका निवडणूकीत बसू नये, म्हणून काँग्रेसने भाई जगताप यांची गच्छंती केली.

भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सुरु केली होती. पण मुंबईत काँग्रेसची ताकद वाढायला हवी तेवढी वाढत नसल्याचे दिसून आले. तसेच चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाने दलित समाजात काँग्रेसबद्दल वाढलेला दुरावा कमी करण्यासाठी काँग्रेसने थेट एकनाथ गायकवाड यांच्या कन्या प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाची माळ टाकली. त्यामुळे दुरावलेला दलित आणि मुस्लिम मतांचा टक्का पुन्हा काँग्रेसकडे वळवण्यासाठी वर्षा गायकवाड यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

मुंबईत असलेला 31 टक्के मराठी मतं ही ठाकरे गट, शिवसेना आणि मनसे यांच्यात विभागले आहेत. भाजपने 26 टक्के उत्तर भारतीय आणि 13 टक्के गुजराती मतांची बेरीज जुळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तर समाजवादी पक्षाकडे वळालेला 13 टक्के मुस्लिम मतदार आता भाजपला होणारा फायदा टाळण्यासाठी काँग्रेसकडे वळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच मुंबईत 14 टक्के दलित मतदान आहे. त्यापैकी 9 टक्के नवबौध्द आहेत. त्यामुळे मुस्लिम आणि दलित मतांची बेरीज काँग्रेससाठी महत्वाची ठरणार आहे. त्यामुळेच वर्षा गायकवाड यांना मुंबई अध्यक्ष करून हे समीकरण साधण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे.

भाई जगताप यांची उचलबांगडी पण गटबाजी थांबणार का?

मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम, मिलिंद देवरा, सुरेश शेट्टी, वर्षा गायकवाड, भाई जगताप, चरणसिंग सप्रा आणि बाबा सिद्दीकी यांचे वेगवेगळे गट आहेत. या सगळ्या गटांना सोबत घेऊन काम करण्याचे मोठे आव्हान वर्षा गायकवाड यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हायकमांडने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या रुपाने दलित चेहरा देत दलित मतांची बेरीज जुळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापाठोपाठ आता मुंबईतही दुरावलेला दलित मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना काँग्रेस अध्यक्ष म्हणून संधी दिली आहे. तसेच वर्षा गायकवाड यांनी सलग चार वेळा धारावी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्याबरोबरच त्यांनी मंत्री म्हणून आणि विधानसभेत केलेलं काम उल्लेखनीय आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने संधी दिल्याने त्या मुंबई प्रदेश काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या आहेत. मात्र काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी आहे.

मुंबई महापालिकेच्या आधीच गटबाजी रोखण्यासाठी भाई जगताप यांची गच्छंती केली असली तरी त्यांचा योग्य सन्मान राखला गेला नाही तर भाई जगताप यांच्याकडून वर्षा गायकवाड यांच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे गटबाजी रोखण्यासाठी खांदेपालटच नाही तर त्याबरोबरच राजकीय पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. तसेच इतर नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी वर्षा गायकवाड यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

Tags:    

Similar News