हवामान अंदाजाचा भूल भुलैय्या..

कथित हवामान तज्ञ यंदा तोंडावर आपटले असून त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान केले आहे. हवामान अंदाजाचा भुलभुलैय्या आणि त्याचे शेतीच्या अर्थकारणावरील विपरीत परिणाम यावर विजय गायकवाड यांचा शेतकऱ्यांचे डोळे खाडकन उघडायला लावणारा लेख…;

Update: 2023-06-17 14:31 GMT

सध्या देशातील शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे लागले आहेत. गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात हवामान अभ्यासकांचा सुळसुळाट झाला आहे. सोशल मिडीया आणि वर्तमान पत्रातून वाटेल तसे हवामानाचे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

खरं पाहिलं तर`मान्सून` आणि `पावसा`चे दुष्काळी माणसाला मोठे नवल असते. शेती शिक्षणामुळे माझा मेटेरोलॉजी विषयाशी संबध आला. अलीकडच्या काळात `एल-निनो`,`ला-निना` या शब्दांनी डोक्याचा फार भुगा करुन टाकला होता. मे महिन्यात माझे डोळे अमेरीकन नेव्ही, ऑस्ट्रेलियन मेटरॉलॉजी, जपान मेटेरॉलॉजी संस्थांच्या अंदाजाकडे लागले होते. ही दृष्टी माजी कृषी सचिव नानासाहेब पाटील यांच्याकडून मिळाली. अलिकडच्या काळात `स्कायमेट` नावाच्या भुताने मीडियाला चांगलेच झपाटले होते. आयएमडी (IMDभारतीय हवामान विभाग) संस्थेची व्याप्ती आणि आवाका मी वाचत असतो. भारतीय हवामान विभागाचे( IMD) माजी महासंचालक प्रा. रंजन केळकर यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर त्यांना भेटण्याची संधी मिळाली. एकाच शब्दात सांगायचे तर `झाले मोकळे आकाश’.

मी प्रा. केळकरांना भेटलो. त्यावेळी त्यांनी मान्सूनचे शास्त्र-शुध्द विश्लेषण केले होते. एल-निनो, ला- निनाचे स्पष्टीकरण केले. सांख्यिकीच्या आधारे १४५ वर्षाचा मान्सून समजावून सांगितला. आगमन, प्रवास आणि समाप्तीचे विश्लेषण केले. १४५ वर्षाच्या मान्सून इतिहासात १९ वर्ष चांगल्या पावसाची, २५ वर्षे दुष्काळाची आणि १०१ वर्षे सामान्य पावसाची आहेत. प्रा. केळकरांनी हवामानबदल, दुष्काळ, अवकाळी पावसाची शास्त्रशुध्द कारण-मिमांसा केली.

शक्तीशाली मान्सूनचे दर्शन घेण्यासाठी एकदा चेरापुंजीला जायला हवे, असं सांगतानाच एका वर्षासाठीच्या पाण्याचे नियोजन चार महिन्याच्या मान्सूनमधूनच करायचे आहे, असाही शास्त्रशुद्ध विचार सांगितला होता.

हवामान अभ्यासक सतीश खाडे यांच्या मतानुसार भारतीय मॉन्सूनवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. आधुनिक साधनांमुळे नवीन निरीक्षणे समोर येऊन त्या घटकांमध्ये वर्षागणिक भरच पडत आहे. मात्र त्यातील ‘एल निनो’ हा घटक या वर्षी अधिक चर्चेत आहे.

पावसाचा संबंध ढगांशी आणि वाऱ्यांशी. वाऱ्याचा संबंध हवेच्या तापमानाशी. हवेची वेगवान हालचाल म्हणजे वारे. हवेच्या दाबात फरक होतो तेव्हा ही हालचाल होते. पृथ्वी सूर्याभोवती आणि स्वतःभोवती फिरते. या फिरण्यामुळे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागावर सूर्याची किरणे सरळ वा वेगवेगळ्या कोनात तिरपी पडतात.

परिणामी, पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांत तापमान वेगवेगळे राहते. उदा. सूर्य जेव्हा उत्तर गोलार्धात असतो तेव्हा तिथे तापमान जास्त, तर दक्षिण गोलार्धात कमी असते. तो दक्षिण गोलार्धात असतो तेव्हा तिथे जास्त, तर उत्तर गोलार्धात थंडी अशी स्थिती असते.

पृथ्वीवरील जमिनीचा पृष्ठभाग आणि समुद्राचे पाणी यांच्या तापमानातही फरक असतो. जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते, तर पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. याचा परिणाम हवेवर होतो. हवा गरम झाली की तिची घनता कमी होते आणि ती वर वर जाते, त्या वेळी त्या हवेची जागा बाजूने येणारी थंड हवा घेते, यातून वाऱ्याची निर्मिती होते.

जमिनीचे तापमान सामान्यतः सूर्यकिरणांशी संबंधित असते. मात्र समुद्राच्या पाण्याच्या तापमानावर अनेक घटक प्रभाव टाकतात. कारण समुद्रात अनेक कारणांमुळे अनेक दिशांना प्रवाह सुरू असतात. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमानही सगळीकडे सारखे नसते.

कोण कोणते असतात हे प्रवाह? उदा. पृथ्वीच्या स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरण्याने समुद्रात तयार होणारे प्रवाह, समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या ताकदीमुळे तयार होणारे समुद्राचे प्रवाह, सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्यातल्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे तयार होणारे प्रवाह, जमीन आणि समुद्र यांच्या सीमांच्या असलेल्या आकारामुळे तयार होणारे प्रवाह, सूर्याचे उत्तर व दक्षिण गोलार्धात असल्यामुळे बदलणाऱ्या तापमानामुळे तयार होणारे प्रवाह, तसेच समुद्राच्या पाण्याच्या वेगवेगळ्या क्षारतेमुळे तयार होणारे प्रवाह इ. अशा सर्व प्रवाहांमुळे हजारो किलोमीटरच्या समुद्रात पाण्याचे अनेक प्रवाह वाहत असतात.

अशा अनेक प्रवाहामुळेच समुद्राच्या पाण्याचे तापमान पूर्ण समुद्रभर कधीही सारखे नसते. समुद्राच्या दोन टोकांमध्ये तापमानाचा फरक पडल्याने जमिनीप्रमाणेच समुद्रावरही हवेच्या दाबात फरक होतो. त्यातून समुद्रावर वाऱ्यांची निर्मिती होते. या वाऱ्याद्वारे बाष्प आणि ढग वाऱ्याच्या दिशेने नेले जातात.

आता जेव्हा पॅसिफिक महासागराचा (प्रशांत महासागर) पूर्वेकडील भागाच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असते. त्या परिस्थितीला ‘एल निनो’ असे म्हणतात. तर हेच तापमान जेव्हा सरासरीपेक्षा कमी असते, तेव्हा त्याला ‘ला निनो’ असे म्हटले जाते.

या दोन्ही अवस्थांचा जगभरातल्या वाऱ्यांच्या दिशेवर परिणाम होतो. त्यांचा एकूणच हवामानावर व पावसावर खूप प्रभाव पडतो. भारतीय मॉन्सूनवर ही ‘एल निनो’चा विपरीत परिणाम होऊ शकतो. हा आजवरचा तरी अनुभव आहे. तसेच गेली तीन वर्षे ‘ला निना’ परिस्थिती कायम राहिल्याने भारताला मॉन्सून समाधानकारक राहिला, हे हवामान शास्त्रज्ञांचे अनुमान आहे.

‘एल निनो’ स्थिती दर दोन ते सात वर्षात कधीही घडते. त्याला काहीही नियमितता नाही. ही अवस्था नऊ महिने ते दोन वर्षे टिकते. जेव्हा ती सात ते नऊ महिन्यासाठी होते तेव्हा त्याला ‘एल निनो स्थिती’ आणि यापेक्षा याचा कालावधी अधिक असतो त्याला ‘एल निनो एपिसोड’ असे म्हटले जाते. गेल्या शतकभरात ‘एल निनो स्थिती’ तीस वेळा घडली आहे.

या एल निनोचा जीवसृष्टीवरही खूप प्रभाव पडलेला आहे. गेल्या काही हजार वर्षांचे (जीवाश्म व तत्सम) पुरावे याची पुष्टी करतात. तसेच जगातील ठिकठिकाणच्या मानव समूहांचा इतिहास, विविध मानवी संस्कृती यांचा उदय अस्ताचा संदर्भही ‘एल निनो’शी जोडता येतो.

मध्ययुगीन व अलीकडच्या इतिहासातील प्रमुख घटनांचा कालखंडानुसार संदर्भ ‘एल निनो’च्या वर्षांशी जुळणार आहे. गेली काही दशके जगातील बहुतांशी हवामान शास्त्रज्ञांनी ‘एल निनो’च्या अभ्यासावर लक्ष केंद्र केले आहे. मात्र या विषयीचे पहिले निरीक्षण व नोंद इसवी सन १५०० ला झाली, तर ‘एल निनो’ या शब्दाचा उल्लेख १८९२ मध्ये पहिल्यांदा झाला.

इंडियन ओशन डायपोल’

प्रशांत महासागरातील वरील दोन्ही परिस्थितीप्रमाणेच हिंदी महासागरातील तापमान बदलाचाही भारतीय मॉन्सूनवर प्रभाव आहेच. हिंदी महासागराच्या सीमाही दक्षिण अंटार्क्टिकाला जाऊन भिडतात. तसेच पश्‍चिमेकडे आफ्रिका खंड, तर पूर्वेला इंडोनेशिया आहे. त्यामुळे या सागराच्या तापमानातही असमानता आहे.

अलीकडच्या अभ्यासातून हेही निरीक्षण नोंदवले गेले आहे, की हिंदी महासागराच्या पश्‍चिमेकडचा भाग जेव्हा त्याच्या पूर्वेकडच्या भागापेक्षा अधिक उष्ण असतो, तेव्हा भारतात मॉन्सूनचा पाऊस चांगला पडतो. ज्या वेळी याच्या उलट परिस्थिती असते.

तेव्हा मान्सूनची विपरीत अवस्था असते. ही परिस्थिती आलटून पालटून येत असते, यालाच ‘इंडियन ओशन डायपोल’ असे म्हणतात. या अवस्थेच्या संबंधावर आधारित हवामानाचे मॉन्सूनचे पूर्वानुमान काढले जाते.

हवामान बदल आणि मॉन्सून

पावसाचा सगळा खेळ हा जमीन व समुद्र यांच्यातील तापमान फरकावर आहे. हजारो, लाखो वर्ष या तापमानावर प्रामुख्याने प्रभाव होता तो सूर्याचा. पण औद्योगिक क्रांतीनंतर वाढत गेलेले औद्योगीकरण आणि त्यातही गेल्या पन्नास साठ वर्षांत वाढत गेलेल्या वाहनांच्या संख्येमुळे हवेतील कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि इतर वायू यांच्यात वाढ झाली. त्यामुळे हवेच्या तापमानात मोठा बदल घडत आहे.

त्यातूनच जगभरात ठिकठिकाणच्या हवेच्या दाबात होणारा फरक मोठ्या प्रमाणात अनियमित झाला आहे. त्यामुळे वाऱ्यांच्या दिशा भरकटल्या आहेत. यातूनच मॉन्सूनची अनिश्‍चितता वाढलेली आहे. इथून पुढे ती वाढतच जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर पर्जन्यछायेचा प्रदेश आणि मराठवाड्यात पर्जन्य कमीच पडणार आहे. दरवर्षी विठ्ठलाला चांगल्या पावसासाठी साकडे घालणे आणि हवामान बदलाच्या नावाने बोटं मोडणं किती चुकीचं आहे हे ह्या वातावरणीय बदलाच्या प्रक्रियेतून समजलं होतं.

एप्रिल महिना सुरू झाला की, शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. जगभरामध्ये भारतीय मान्सूनचे अंदाज व्यक्त केले जातात. अमेरिकन नेव्ही असेल किंवा जापनीज मेट्रोलॉजिकल इन्स्टिट्यूट सगळ्यांनाच भारतीय मान्सूनचे कुतुहल जागं होतं.

कारण तसंच आहे कारण की, भारतीय मान्सून हा जगाच्या दृष्टीने एक आश्चर्य असून लाखो वर्ष अव्ह्यातपणे सुरू असलेली एक वातावरणीय प्रणाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात दुष्काळ पडतो त्यावेळेस भारतीय मान्सूनचा अभ्यास करणे ही त्या देशाची आणि जगाची गरज असते.

सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये कधी नवं एवढं लोकांना जगाच्या माहितीचा द्वार उघडं झाला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) वर्षानुवर्ष ठोकळेबाज अंदाज देत असल्याने,

IMD अंदाजाचे विश्लेषण करून हवामान अंदाज करणाऱ्या तज्ज्ञांचे पीक आले आहे. आपल्याकडे परंपरा आणि संस्कृतीच्या नावावर भेंडवळ असेल बेडूक असेल किंवा इतर काही नैसर्गिक घटनांचे संदर्भ देऊन पावसाचे अंदाज व्यक्त करण्याच्या प्रथा रूढ होत्याच. पण अलीकडे सोशल मीडियाच्या काळात याचा फारच सुळसुळाट झाला.

असंख्य व्हाट्सअप ग्रुप आणि शेतकऱ्यांचा मसीहा यंदा ओला दुष्काळ पडणार असल्याचं सांगत होता.सरकारच्या हवामानाच्या इशाऱ्यावर लोक विश्वास ठेवत नव्हते, एवढा विश्वास पंजाब डखांच्या व्हिडीओवर अलीकडे महाराष्ट्रातील अनेक लोक ठेऊ लागले होते.

गेले तीन वर्ष मान्सूनचा सेट पॅटर्न असल्याने पंजाबराव जे बोलले तसे घडत होते. मात्र यंदा जून महिन्याच्या अनुषंगाने पंजाब डखांनी व्यक्त केले सर्व अंदाज फेल ठरले. सगळेच अंदाज फेल ठरल्यामुळे अखेर पंजाब रावांनी एक व्हिडिओ जारी करत यंदा दुष्काळ पडणार असल्याचे सांगितलं. इथेच शेतकऱ्यांचा संतापाचा कडेलोट झाला.

कांदा उत्पादक शेतकरी संदीप कोकाटे म्हणाले, अंदाज चुकला म्हणतो हा बाबा , म्हणजे हवामान खाते मार्च -एप्रिल पासून सांगत होत की दुष्काळ आहे आणि हा भाऊ खूप पाऊस पडेल म्हणत आणि आता अंदाज चुकला म्हणतो.

पंजाबराव डखांच्या या पलटीवर शेतकरी  म्हणाले, “एक गाजलेले हवामान अभ्यासक त्यांचे अक्षरशः हजारेक whats app ग्रुप,बरेच यु ट्यूब चॅनेल एवढा पसारा आणि ब्रेकिंग न्युज प्रमाणे रोजच पावसाचे अंदाज. 365 दिवसात 365 अंदाज. साहजिकच काही गोळ्या लागायच्या काही हुकायच्या. पण हुकलेल्याचा डेटा कोण ठेवतो? लागलेल्याचा 'डंखा' त्रिखंडात. आणि भाषा धुवुन काढणार, आजवर बघितलं नसेल असं पाणी पडणार, वाहून जाणार, भयानक पाऊस द्राक्षं उतरायला आलेली असतात. तेव्हा हलकासा हवामान बदल देखील शेतकऱ्याचा बीपी वाढवतो. त्यात असल्या भाषेत अंदाज ऐकून अनेकजण सलाईन वर गेले असतील. तीन वर्षात मार्केटला या अभ्यासकाने अक्षरशः झोपवले. अनेक शेतकऱ्यांनी विनंत्या केल्या, आर्जव केली.. तुम्ही क्लिपा ऐकल्या असतीलच, पण साहेब आपल्याच धुंदीत.योगायोगाने तीन वर्षात पावसाने थैमान मांडल्याने यांचे अंदाज बरोबर ढगात लागत. आता मात्र त्यांचा कस लागलाय कधी नव्हे तो आमचं लक्ष आहे. पावसाने दडी मारल्यावर किती अंदाज बरोबर येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एप्रिलमध्ये ओला दुष्काळ पडणार असल्याचे सांगणारा हा माणूस जून कोरडा गेल्यानंतर आता दुष्काळ पडणार असल्याचे सांगत आहे.

या हवामान अंदाजाच्या सुळसुळाटामुळे त्यांच्या अंदाजाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी जादा पैसे देऊन बियाणे खरेदी केले. आता पाऊस पडेल आणि उद्या पेरावं लागेल, असेच शेतकऱ्यांना वाटले परंतु पाऊस काही पडलाच नाही. पंजाबरावांचे ९०% अंदाज बरोबर असतात. परंतु जून महिन्यामध्ये मात्र त्यांचे सर्व अंदाज १००% चुकले.

वर्षभरात पाऊस पडला काय किंवा नाही पडला काय ? याचा फार फरक पडत नाही. परंतु जून महिन्यात पेरणी असते आणि शेतकऱ्यांचे लगबगीचे दिवस असतात. यात अंदाज चुकले तर आर्थिक कंबरडे मोडते. त्यामुळे किमान हे अंदाज चुकायला नव्हते पाहिजे. पंजाबराव नेमके कोणाचे? शेतकऱ्यांचे की व्यापाऱ्यांचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मान्सून आपल्या जिल्ह्यात केव्हा येणार म्हणून शेतकरी आस लावून बसलेले असतात. आतापर्यंत भारतीय हवामान खात्यासह खाजगी हवामान संस्था व अभ्यासकांनी जाहीर केलेले मान्सूनचे अंदाज वेळोवेळी जे जवळपास ९०% चुकले आहेत. सरकारच्या हवामान अंदाजानंतर लोक स्कायमेट या खाजगी संस्थेवरही विश्वास ठेवत नव्हते. या पंजाबराव डखांचा डंका संपूर्ण मराठवाडयात वाजत होता. लोक त्यांना कार्यक्रमासाठी बोलावू लागले, त्यांचा अंदाज अगदी बिनचूक ठरत होते याचा अनुभव अनेकांनी घेतला. मात्र जून महिन्याच्या अनुषंगाने त्यांनी व्यक्त केलेले सर्व अंदाज व्यक्त केले आणि आता त्यांचे

ठोकताळे आणि अंदाजे.....

एखादा ज्योतिषी त्याच्याकडे भविष्य पाहण्यासाठी आलेल्या लोकांना ठोकताळे सांगतो. अंदाजपंचे काहीतरी बोलतो आणि तेच खरे होते. काहीतरी त्यातून निष्पन्न होणार असते. कुठेतरी दगड लागला की पुन्हा म्हणायला तयार की, मी म्हणलो होतो, असाच पंजाबरावांचा खेळ आहे. जमली तर भट्टी जमते आणि बिघडली तर लोक बोलायला तयार होतात, असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकरी बांधवांनी महागामोलाची बियाणे खरेदी केलेली आहेत. पैसे नसतांना उसणवारी करून सावकाराकडून पैसे घेऊन बी-बियाणे आणले आहेत. आता बळीराजा पावसाची वाट पहात आहे. मान्सून वेळेवर आला नाही. १८ ते २१ पर्यंत मान्सून सक्रीय होणार आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात २ इंच पावसाची ओल गेल्यानंतरच पेरणी करावी किंवा १०० मि.मी. पाऊस झाल्यावर पेरणी करावी. पाऊस लांबला तर मूग, उडीदाची पीके टाळावीत आणि सोयाबीन आणि तूर यांची लागवड करावी.

आता पंजाबरावचा अंदाज खोटा ठरल्याने शेतकयांनी काय करावे असा प्रश्न आहे.

पंजाबरावांच्या भरोशावर शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी केले आणि पाऊस पडला नाही पैसे अडकून बसले आणि पेरणी झाली नाही. मग पंजाबरावांचे काम व्यापाऱ्यांच्या बाजुने तर नाही ना? अशी चर्चा होऊ लागली आहे. तर दुसरीकडे IMD ने १८ ते २१ जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होईल आणि २५ जून नंतर पाऊस जोरात पडेल असा अंदाज ने व्यक्त केला आहे. त्यामुळे पेरण्या कदाचित जुलैच्या पहिल्या आठवड्यात होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्यासह अनेक खाजगी संस्थांनी ४ जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तो अंदाज खरा ठरला नाही, हेही नोंद करायला हवे.

हवामान अंदाजातील या बोगसगिरीबद्दल MaxKisan ने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयाचे निवृत्त अधिष्ठाता आणि हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी चर्चा केली. डॉ. साबळे म्हणाले, मी काही वर्षापुर्वी एका शेतकरी कार्यक्रमासाठी परभणी या ठिकाणी गेलो होतो. एक शेतकऱ्यांचा गट एका व्यक्तीला माझ्याकडे घेऊन आला. म्हणाले, सर हे हवामान अंदाज व्यक्त करतात. त्यांना तुमचा फक्त आर्शिवाद द्या. मी त्यांना सांगितले, हवामान अंदाज व्यक्त करणं हा येरागबाळ्याचा खेळ नाही. आकडेवारी, शास्त्रीय माहीती सोबत तुम्हाला विश्लेषण करण्यासाठी अभ्यास लागतो. तुम्ही हे करु नका,असं मी त्यांना सांगितलं. परंतू पुढील काही वर्षात हेच गृहस्थ पंजाबराव डख म्हणुन पुढे आले, आता ते अनेक शेतकऱ्यांच्या गळ्यातले ताईत बनलेल. हवामान अंदाज ही शास्त्रीय क्लिष्ठ प्रक्रीया आहे, असे बुडबुडे येतील आणि मिटतील असं डॉ. साबळे म्हणाले.

MaxKisan ने (IMD)चे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्याशी संवाद साधला होता. हवामान अंदाज ही शास्त्रीय पध्दत असते, सर्वच हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवर मांडले जातात. शेतकरी आता जागरुक होत असल्याने भविष्यात बोगस हवामान अंदाजकांची दुकानं बंद होतील, असं ते म्हणाले.जून महिन्यातील सरासरीपेक्षा कमी पावसाचे भाकीत खरे ठरले असुन अर्धा महिना संपला तेंव्हा महाराष्ट्रातील पावसाची महिन्याची तुट ५०% पेक्षा अधिक आहे. गेल्या फेब्रुवारीपासुन IMD सावध करत आहोत , कि ह्यावर्षी एल -निनो आहे. परंतु मागील ३ वर्षाच्या ला निनामुळे झालेल्या भरपूर पावसामुळे सध्या जमिनीत असलेल्या भरपूर पाणीसाठ्याच्या भरवश्यामुळे शेतकरी ऐकायला तयार नाहीत.कितीही फोडून सांगा, तरी विचारत आहे, कि पेरणीयोग्य पाऊस कधी होईल? चुळबुळ करतच आहे.२० जून च्या आसपास सुरु होणाऱ्या मोसमी पावसातून, जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यात (२३-३० जून) सर्व चित्र स्पष्ट करणाऱ्या पेरणीयोग्य अशा पावसाची अपेक्षा आहे तरी ८ इंच साधलेल्या पूर्णओली वरची पेरणीच कदाचित ह्यावर्षी हंगाम जिंकून देईल,  असे वाटते.  ' वाट बघा, लक्ष ठेवा '. पण ह्यावर्षी धूळ पेरणी मात्र टाळाच असे भारतीय हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

कृषी हवामान पत्रकार अमोल कुटे म्हणाले, देशामध्ये हवामान अंदाज देण्यासाठी हवामान विभाग (आयएमडी) ही अधिकृत यंत्रणा आहे. एक तर खासगी हवामान अभ्यासकांना स्वतःचे अंदाज देण्याचे अधिकार नाहीत. मात्र असा कोणता कायदा नसल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. खरं तर अधिकृत हवामान संस्थांच्या हवाल्याने अंदाज सांगणे अपेक्षित आहे. कोणतेही अधिकारपद नसताना, किंवा हवामान शास्त्राविषयी शैक्षणिक पात्रता नसताना, स्वतः स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ होऊन अंदाज सांगणे योग्य नाही. यामुळे होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण याचाही विचार व्हावा.

लांबत चाललेला पाऊस आणि बोगस हवामान तज्ञांच्या विषयी बोलताना भारतीय हवामान विभागाचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, 'IMD कडून दरवर्षी मान्सूनचे चार आठवड्याचे पूर्वानुमान जाहीर करण्यात येते. 18 ते 21 जून दरम्यान पावसाचे पुनरागमन होईल. लहरीपणा हे मान्सूनचे इनबिल्ड कॅरेक्टर आहेत. त्यामुळे मान्सूनच्या तारखा नुसार शेतीच्या कामाचे नियोजन व्हायला हवे. आपल्या नियोजनाप्रमाणे पाऊस येईल अशी अपेक्षा ठेवता कामा नये.

के एस घोसाळीकर शेवटी म्हणाले, "मीडियाने शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी अशा तथाकथित स्वयं दावा केलेल्या तज्ज्ञांकडून दिशाभूल करणारी माहिती काटेकोरपणे टाळली पाहिजे. अशास्त्रीय पद्धतीने केलेले हवामान अंदाजाचे दावे हे खोटे दावे खोटे असतात. त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. अलीकडे महाराष्ट्रात दुर्दैवाने हे वारंवार घडत आहे.ते माझ्या महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे "




 



 



 



 




 





Tags:    

Similar News