ध्यानधारणा किंवा मेडिटेशन: वास्तव काय आहे?

ध्यानाने ब्लडप्रेशर, हार्टअॅटॅक, मधुमेह, संधिवात इ. अनेक रोग बरे करू असे सांगणाऱ्या अनेक संस्था आज फैलावल्या आहेत. असे रोग ध्यानाने बरे झाल्याचा दावा करणारे अनेक ध्यानस्थही आपणांस दिसून येतात. ध्यानधारणा किंवा मेडिटेशन यात खरेच एवढी ताकद आहे का ? यानिमित्ताने अनिसच्या डाॅ.प्रदीप पाटील यांचा हा लेख नक्की वाचा...

Update: 2024-06-01 10:10 GMT

‘ध्यानधारणा’ हा आज परवलीचा शब्द बनला आहे. आजच्या गतिमान आणि धकाधकीच्या जीवनात डोके थंड करण्यासाठी आणि ठेवण्यासाठी प्रत्येक जण कसून प्रयत्न करतो आहे. यासाठी आज ‘मेडिटेशन’ किंवा ध्यान करण्याकडे कल वाढत आहे. ध्यानाने ब्लडप्रेशर, हार्टअॅटॅक, मधुमेह, संधिवात इ. अनेक रोग बरे करू असे सांगणाऱ्या अनेक संस्था आज फैलावल्या आहेत. असे रोग ध्यानाने बरे झाल्याचा दावा करणारे अनेक ध्यानस्थही आपणांस दिसून येतात. ध्यानधारणा किंवा मेडिटेशन यात खरेच एवढी ताकद आहे ? ध्यानाने अमुक-अमुक बरे होते या म्हणण्यात तथ्य किती आहे? ध्यानाचे दुष्परिणाम काही होतात काय ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास अनेक मानसशास्त्रज्ञ व वैज्ञानिकांनी सुरुवात केली आहे. त्यातून काही धक्कादायक निष्कर्ष बाहेर पडू लागले आहेत.

ध्यानधारणा आणि स्वसंमोहन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वसंमोहनात विशिष्ट स्वयंसूचना दिल्या जातात. ध्यानधारणेतही त्या दिल्या जातात, मात्र त्यांचे स्वरूप एखादा मंत्र, तांत्रिक उच्चार, स्वसंमोहनातील अर्धनिद्रितावस्था (ट्रान्स) ही ध्यानात ‘समाधी’ ची अवस्था बनते. परिसराचे भान लोपून ध्यानात व्यक्ती अर्धनिद्रितावस्थेत जाते आणि नंतर ती दीर्घ व सखोल अवस्थेत जाऊन जगाचे अस्तित्व काही काळ विसरते. ही विस्मृतीची अवस्था ध्यानकर्त्यास ‘खूपच वेगळी’ वाटते. यावेळी रोजच्या कटकटी नाहीत, त्रास नाही, भंडावणाऱ्या गोष्टी नाहीत! त्यामुळे ही अवस्था त्यास आनंदाची अनुभूती देते आणि त्यास ताजेतवाने वाटते. ही अवस्था सारखी हवीहवीशी वाटू लागते. मात्र सर्वांनाच हाच अनुभव येतो असे नाही.

ध्यानावस्थेत मेंदूत कोणते बदल घडतात याचा शोध मनोवैज्ञानिकांनी घेतला. अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटीतील बी.के. बागची व एस. वेंगर या मनोवैज्ञानिकांनी गुहेत राहणाऱ्या भारतीय योग्यांची यासाठी तपासणी केली. मेंदूत घडणाऱ्या जैवरासायनिक विद्युत् बदलांचा आलेख विद्युत्मष्तिष्क यंत्राद्वारे (ईईजी) काढता येतो. या ध्यानस्थ योग्यांचे मेंदूचे कार्य-आलेख काढून ध्यानावस्थेतील मेंदू-बदल टिपण्यात आले. ईईजीमधून आपणांस मेंदूपेशींतील जैवरासायनिक प्रक्रियेशी निगडित अशा विद्युत् घडामोडींची माहिती होते. या घडामोडीतून तीन प्रकारचे प्रवाह निर्माण होतात. त्यांना अल्फा, बीटा, थीटा असे संबोधले जाते. यांपैकी अल्फा प्रवाहांचा संबंध हा ध्यानधारणेशी जोडला जातो. अल्फा प्रवाहांची गती ८ ते १२ हर्टस् प्रति सेकंद असते. डोळे मिटल्यावर, तीव्र झोपेत असताना ते अधिक होतात. डोळे उघडल्यावर वा जागृत अवस्थेत ते जाऊन दुसरे प्रवाह अवतरतात. बागची-वेंगर द्वयींस ध्यानस्थांत अल्फा प्रवाह दिसून आले. असाच प्रयोग अकिरा कासामात्सू व टोमो हिराई यांनी झेन नावाचा ध्यानप्रकार करणारे बौद्ध आचार्य व त्यांच्या विद्यार्थ्यांवर केला. ध्यानामुळे अल्फा प्रवाहांची वृद्धी होते असा विचार जेव्हा पुढे आला तेव्हा त्याचा आधार घेऊन ‘अल्फा बायोफीडबॅक’ नावाचे मन शांत करणारे व बुद्धिमत्ता वाढविणारे तंत्र ज्यो कामिया नावाच्या एकाने आणले होते. हे तंत्र वैज्ञानिक निकषांवर फारसे टिकले नाही. खरे तर नुसते डोळे मिटले तरी अल्फा प्रवाह दिसू लागतात तेथे ध्यानधारणेत तर दीर्घकाळ डोळे मिटलेले असल्याने अल्फा प्रवाह दिसणे साहजिकच होय.

ब्रिटिश कोलंबियातील सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटीतील मानसविज्ञान विभागाचे बेरीबेरस्टेन यांनी एक मजेदार प्रयोग केला. संमोहनावस्थेतील संमोहकांना डोळे उघडण्यास सांगितले, तेव्हा त्यांच्याही ईईजीत डोळे बंद केल्यावर येणारे अल्फा प्रवाह आले ! काही प्राथमिक अवस्थेतील (Primates) प्राण्यांतही हे प्रवाह दिसून आले आहेत. काही मानसिक विकारग्रस्त मुलांत (उदा. अती कडमडेपणा) अल्फा प्रवाह आढळले. अल्फा प्रवाह म्हणजे शांत मेंदू आणि तो नसणे म्हणजे अशांत मेंदू असे म्हणणे धाडसाचे ठरावे. कारण काही चिंता-चेतापदशेच्या (Anxiety Neurosis) च्या रुग्णांतही अल्फा प्रवाह भरपूर दिसून आले आहेत. बेरस्टेनने उलटाही एक प्रयोग केला. अल्फा प्रवाह नाहीशा करण्याच्या सूचना देत ध्यानस्थांवर प्रयोग करताना अशा सर्वांना ध्यानधारणेचा अनुभव आला. अल्फा फीडबॅक ट्रेनिंग नवाच्या एका प्रयोगात ओर्ने व पास्केविट्झ या मानसशास्त्रज्ञांनी अल्फा प्रवाह व ध्यानधारणा यांचा संबंध घेण्याचा प्रयत्न केला. ध्यानकर्त्यांपैकी निम्म्यांना त्यांनी शांत व निवांत होण्याच्या सूचना दिल्या व उरलेल्या निम्म्यांना ‘जर अल्फा प्रवाह निर्माण झाले नाहीत तर इलेक्ट्रिक शॉक देऊ’ अशा धमक्या दिल्या. दोघांचेही अल्फाप्रवाह समान आले. अल्फा प्रवाह आणि ध्यानधारणा यांचा थेट संबंध असल्याच्या दाव्यावर हे सारे निष्कर्ष आघात करतात.

अमेरिकेत असलेल्या महर्षि महेश योगींच्या युनिव्हर्सिटीने (MMU) काही प्रयोग मध्यंतरी जाहीर केले होते. या विद्यापीठातून भावातीत ध्यान किंवा ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन (TM) या ध्यानप्रकाराचा प्रचार केला जातो. तेथील डेव्हिड आर्म जॉन्सन व त्यांच्या सहकाऱ्यांनी ध्यानावेळी त्वचेच्या संवेदनेत होणारे बदल, ऑक्सिजनचे शरीरातील प्रमाण, मेंदूतील विद्युत्प्रवाह, इ. ची मोजणी केली, व काही निष्कर्ष काढले. पैकी मेंदूतील उजव्या व डाव्या अधुंकातील प्रवाह एकजीव होतात व ध्यानावस्था प्राप्त होते असा त्यांचा दावा होता. त्यास त्यांनी संसक्ती (coherence) असे म्हटले. वास्तवात ही संसक्ती म्हणजे काय प्रकार होता? अशी संसक्ती अनेक स्थितींत आढळते असे लंडन येथील मॉडस्ले हॉस्पिटलातील न्यूरोसायकिपॅट्रिस्ट डॉ. पीटर फेनविक यांनी दाखवून दिले. फेफरे वा अपस्मार (एपिलेप्सी), कोमा, मृत्यू अशा अनेक स्थितीत संसक्ती आढळते. भावातीत ध्यानाचे महर्षि महेश योगींकडून अनेक दावे होते. उदा. ज्या ठिकाणी भावातीत ध्यान केले जाते तेथे शांतता असते व गुन्हे होत नाहीत. भावातीत ध्यान चालणाऱ्या या विद्यापीठाच्या फेअरफील्ड व आयोवा प्रांतात अशी कोणतीही स्थिती आढळत नाही.

ध्यानावस्थेत अल्फा प्रवाह वाढतात म्हणून काळजी-ताण कमी होतो यास वैज्ञानिक ठोस आधार उपलब्ध नाही. मनोविज्ञानाचे निकष लावल्यास ताण-काळजी व तत्सम मनोविकार व समस्या यांच्या मुळाशी अनेक कारणे असतात. ही कारणे ध्यानाने नाहीशी होत नाहीत. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती बेकार झाली तर ही अचानक उद्भवलेली समस्या होय. त्यातून त्याची मनःस्थिती बिघडते आणि घरात अशांतता निर्माण होते. त्याची मनःस्थिती ठीक होण्यास कोणता उपाय हवा?

ध्यानाने अस्वस्थ, अस्थिर-मानसिकता ध्यानावेळी नाहीशी होईल. ध्यानातून बाहेर आल्यावर दैनंदिन जीवनातील समस्या जैसे थे असतील. दुसरा दावा असा केला जातो की ध्यानाने समस्या सुटण्यास मानसिक बळ प्राप्त होते. थोडासा विचार केल्यास लक्षात येईल की ध्यानावस्थेतील विचार हे समस्येशी निगडित नसतात तर ध्यानक्रियेवरच केंद्रित असतात. मग समस्या सोडवणुकीचे मार्ग शोधणे दूरच. समस्या सोडवणूक करण्यासाठी योग्य समुपदेशनाची-काऊन्सेलिंगची-गरज असते. आणि ही पद्धत खूपच गुंतागुंतीची आणि दीर्घ काळाची असते. वरील उदाहरणातील समस्या दूर करण्यासाठी व्यक्तिमत्त्वदोष दूर करणे, परिस्थितीची जाणीव निर्माण करणे, व्यक्तिमत्त्व विकास करणे, परिस्थितीवर मात करण्यासाठी काही तंत्रे शिकविणे इ. अनेक पद्धती उपाय करताना आवश्यक असतात. ध्यानाने हे साधता येणे कठीण, तात्पुरता भावनिक आधार एवढेच ध्यानाचे मूल्य उरते.

ताण (स्ट्रेस) ही मानसिक समस्या ध्यानाने कमी होते का याविषयी कॅन्सस विद्यापीठातील डेव्हिड होल्म्सने संशोधन केले. उपाय म्हणून निव्वळ आराम करणारा व ध्यानधारणा करणारा या दोहोंची बोधावस्था (consciousness) समान आढळली. त्यामुळे ताण कमी करण्याचे ध्यानाचे महत्त्व प्रश्नांकित बनले आहे. शरीरक्रियेतून निर्माण होणारा ताण (Physiological stress) हा ध्यानाने कमी होत नाही हे मनोवैज्ञानिक पॉल लेहरवच्या प्रयोगाने दिसून आले. ध्यान करणाऱ्या व्यक्तीत स्वभावबदल होतात काय असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे. स्वभावबदलाविषयी स्वभावविज्ञानशास्त्र बरेच पुढे गेले आहे. व्यामिश्र व गुंतागुंतीच्या क्रियांतून स्वभावनिर्मिती व विकास होतो असे दिसते. वर्तनविकासासाठी ध्यानाचा काही फायदा होतो का हे पाहण्यासाठी डब्लिन येथील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मायकेल डेलमोंटे यांनी काही चाचण्या केल्या. ध्यानस्थांना प्रश्नावल्या देऊन दैनंदिन व्यवहारातील त्यांचे वर्तन यांचे मूल्यांकन केले. वर्तनविकासाऐवजी आपले सध्याचे वर्तन योग्यच असून याच वर्तनात आता नवीन भर टाकावयास हवी असा आत्मकेंद्रितपणा त्यांच्यात आढळला. एखाद्या विषयात भान हरवून पूर्ण बुडून जाणे हा प्रकारही ध्यानस्थांत आढळतो. त्यामुळे मनोदुर्दशा (सायकोसिस) व विषादविकृती (डिप्रेशन) या रुग्णांना ध्यानामुळे गंभीर दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते.

ध्यानाच्या फायद्या-तोट्याचा विचार करताना वरील वैज्ञानिक पद्धतीच्या संशोधनाचे हे निष्कर्ष आहेत. भारतात याविषयी वस्तुनिष्ठ संशोधन स्वतंत्र वैज्ञानिक संस्थांतर्फे, निष्पक्षपणे, फारसे झालेले नाही. जे संशोधन झाले ते ध्यानाचा पुरस्कार करणाऱ्या संस्थांतून, त्यामुळे त्यांची विश्वासार्हता फारशी नाही. ध्यानाचे फायदे सांगणारे ध्यानस्थ मात्र खूप भेटतात. हे दावे अर्थातच व्यक्तिनिष्ठ होत. व्यक्तिनिष्ठ दावे वस्तुनिष्ठ निकषांवर फारसे टिकत नाहीत. समजा ध्यानाने ब्लडप्रेशर कमी झाले असा दावा कोणी केला तर रक्तदाबाची समस्या उद्भवण्यामागे कोणते घटक होते व त्या सर्वांची छाननी होऊन त्यांचा निरास आपसूकपणे (उदा. परिस्थितीत बदल) झाला काय, याविषयी ते फारसे सांगत नाहीत. मनःकायिक (सायकोसोमॅटिक) रोगांत तर सरळसरळ मनोव्यथेमुळेच शारीरिक व्याधी उद्भवतात तेव्हा त्याची लक्षणे मनोव्यथा दूर होण्याने नाहीशी होतात.

ध्यानधारणेभोवती गूढतेचे वलय उगाचच निर्माण करण्यात आले आहे. सर्वत्र आज विविध रूपांत ध्यानाची केंद्रे दिसत आहेत. ध्यानाचे हे असंख्य प्रकार सामान्यांना चक्रावून सोडतात. त्यांचे रोग बरे करण्यापासून ते आयुष्य आनंदी बनवू इथवरचे अफाट दावे निराधारच होत. मानसिक वा शारीरिक रोग किंवा समस्या बऱ्या करण्याचा दावा केल्याने ध्यानास अवास्तव महत्त्व आले आहे. वास्तवात काही वेळा वैज्ञानिक उपचारात मदत करणारे एक साधन, एवढेच महत्त्व त्यास द्यावयास हवे. आणि अर्थातच ते वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करणे केव्हाही चुकीचेच नव्हे तर धोकादायकच होय.


Tags:    

Similar News