हैदराबादचा निजाम हा दिल्लीच्या मोगलाईचा दख्खनचा प्रभारी होता. त्याच्या शासनाचं पॅटर्न सुद्धा उत्तरेकडील मोगलाई सारखेच होते. निजामाच्या सरकारातील उच्च पदांवर ब्राम्हण व इतर उच्च वर्णीय हिंदू होते. त्यामुळे या राज्यात प्रचंड जातीयता, अस्पृश्यता व मागासलेपण होते. 27 नोव्हेंबर 1947 रोजी बाबासाहेबांनी एक पत्रक काढून निजामशाहीचा निप्पात करण्याचे आपल्या अस्पृश्य बांधवांना आवाहन दिले होते.
त्यानंतर बाबासाहेबांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन पक्षाच्या नेतृत्वात हजारो दलित या रझाकारांविरुद्धच्या मुक्ती संग्रामात सामील झाले. शिंदीच्या झाडांपासून निजाम सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळायचा, मोठ्या प्रमाणावर अस्पृश्यांची रोजीरोटी सुद्धा या शिंदिच्या झाडांवर अवलंबून होती. परंतु निजामाचा नीप्पात करण्यासाठी, त्याचा महसूल बंद करण्यासाठी आपल्या पोटावर पाय देऊन स्वाभिमानी दलितांनी सुमारे 8000 शिंदीचे झाडं तोडले. मुक्ती संग्राम सेनानिंनी नांदेडच्या उमरी येथील निजामाची बँक लुटली त्या लुटीत धाडसी दलितांचा सिंहाचा वाटा होता.
परंतु उच्चवर्णीय जातीयवादी तथाकथित स्वातंत्र्य सैनिकांनी दलितांचे हे योगदान तर दाबलेच शिवाय नामांतराच्या हिंसाचारात "हे दलीत रझाकारांच्या सोबत होते" अश्या आफवा पसरवून दलितांच्या झोपड्या जाळायला लावल्या. निजाम सरकारने दलितांना कसण्यासाठी दिलेल्या जमिनी नंतर बळकावल्या गेल्या. उमरीच्या बँकेच्या लुटिवर औरंगाबाद मध्ये हाउसिंग सोसायटी उभी राहिली, त्यात एकही दलीत नाही.
मराठवाड्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत. मराठवाड्यात शिक्षण बाबासाहेबांनी आणले. मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्रासोबत दळण वळण बाबासाहेबांमुळे सुरू झाले. मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक प्रयत्न केले. परंतु मराठवाडा मुक्ती संग्रामातील उच्चवर्णीय तथाकथित स्वातंत्र्य सैनिकांकडून मराठवाड्याच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यास विरोध केला गेला.
पोलिस ॲक्शन नंतर मुसलमानांच्या विरोधातील हिंसाचाराचा जसा पॅटर्न होता तसाच आणि त्याच भागात नामांतर विरोधी हिंसाचाराचा पॅटर्न होता. त्यामुळे खोटे व जातीयवादी स्वातंत्र्य सैनिक वगळून मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या सर्व ज्ञात, अज्ञात, दलीत, दलितेतर स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन!!!
- मुकुल निकाळजे