मराठी भाषा दिन: जे सकस असतंय ते टिकून राहतंय

मराठी भाषा दिन : भाषेचा न्यूनगंड येणं म्हणजे काय? प्रमाणभाषा आणि बोली भाषा यात फरक काय? प्रवाही भाषेला नव्या शब्दांची जोड कशी मिळते? वाचा मराठी भाषा दिनानिमित्त आनंद शितोळे यांचा लेख;

Update: 2021-02-27 08:18 GMT

भाषा प्रवाही राहिली तर टिकते, तिच्यात नवनव्या शब्दांची भर पडत गेली तर ती वाढत जाते. भाषेत ढोबळमानाने दोन प्रकार असतात , लिखित स्वरूपातली भाषा आणि बोली भाषा. जेव्हा अमुक एक भाषा प्रमाणभाषा आहे असं म्हणतो आणि बाकीच्या बोली भाषा आपण गावठी, गावंढळ अथवा दुय्यम म्हणतो. तेव्हा साहजिकच त्या भाषा वापरणाऱ्या माणसांना कुठेतरी न्यूनगंड येतो. मग अशी माणसं आपली बोलीभाषा सोडून तिसऱ्याच भाषेत संवादाचा प्रयत्न करतात.

ह्या नादात सगळं बिघडून जातंय. खरंतर मूळ भाषेचा प्रवाह नदीसारखा वाहात असतो, वेगवेगळ्या बोलीभाषांचे, शब्दांचे छोटे ओहोळ, ओढे जेव्हा त्यात मिसळतात. तेव्हा तो प्रवाह अजून मोठा, वैविध्यपूर्ण आणि समृद्ध होत जातो. काही कर्मठ लोकांना नदी प्रदूषित होते. अशी उगाचच भीती वाटत राहते आणि ते त्या नदीच्या काठांना करकचून बांधण्याचा प्रयत्न करतात, त्याने नदी आकसून जाते. जेव्हा काठ मोकळे असतात, ओढे, ओहोळ मुक्तपणे येऊन मिळतात. तेव्हा भवतालचा प्रदेश सुपीक होऊन जातो.

प्रमाणभाषा म्हटलं की बंधन आली, चौकटी आल्या... एका मर्यादेपर्यंत व्याकरणाचे नियम म्हणून अश्या चौकटी ठीक असतील. पण नवे शब्दच स्विकारायचे नाहीत अथवा दुसऱ्या भाषेतले शब्द जसेच्या तसे न स्विकारता त्यांच भाषांतर करताना ते अवघड करून ठेवायचे ह्याने आपणच आपल्या भाषेला संकुचित करत चालतो आहोत. सगळ्या बोली भाषांना सन्मान मिळाला, त्यातलं साहित्य तितकच स्विकारल गेलं, त्याला सन्मान मिळाला, नवनवे शब्द सामावून घेतले तर मग भाषा फुलायला, वाढायला अडचण येऊ नये.जे सकस असतंय ते टिकून राहतंय. टिकून राहायला चौकटी घालून बंदिस्त करून ठेवायचं की मुक्तपणे सगळे प्रवाह सामावून मोठ होऊन फुलू द्यायचं हे आपलं आपण ठरवायचं.


(सदर पोस्ट आनंद शितोळे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे)


Tags:    

Similar News